Friday, August 26, 2011

ऎन पावसात खुंटीच्या वाटेने सर.. ॥ किल्ले हडसर ॥

 दि. १३.०८.२०११ वार शनिवार आम्ही मावळ्यांनी बेत केला होता की या स्वातंत्रदिनी आपण कळसूबाई शिखर सर करून यायचे त्याप्रमाणे रात्रौ ११ वा. माझ्या घरापाशी जमण्याचे ठरले आणि चक्क चक्क सर्वजण हजर देखील झाले त्याचक्षणी खरतर माझ्या मनात शंकेची पाल चुकचूकली, की सर्वजण वेळेत हजरच कसे झाले ? (पूर्वानुभव बाकी काय) आम्ही ठरविलेली गाडी माझ्या घरी ११ वा. येणार होती पण पुढे १,२ तास होवून देखील पोहचली नव्हती. गाडीचे चालक त्यांचा भ्रमणध्वनी (ज्याला मराठीत mobile म्हणतात ;))उचलत नव्हते आणि मालक त्यांचा भ्रमणध्वनी उचलून काहीतरी थातूर माथूर उत्तरे देउन त्यांची वेळ मारून नेत होते आणि आमचा वेळ वाया घालवत होते. शेवट १.३० च्या आसपास आमच्या सर्वांच्या “ठरविलेल्या गाडीच्या” आशा संपुष्टात आल्या आणि शनिवारी निघणार असा बेत आखला असल्याने मारूतरायचे स्मरण करून आपण आपल्याच स्वत:च्या गाड्या घेउन निघण्याच्या निर्णय झाला तोच लगेच मारूतराया देखील आम्हाला प्रसंन्न झाले आणि आमच्या प्रवासासाठी एक नव्हे दोन नव्हे तर साक्षात तीन मारूतीची रूपे हजर झाली. मारूती झेन, मारूती स्वीफ़्ट आणि मारूती ईस्टीम. आता जवळपास २ वाजत आले होते पुण्यातून कळसूबाई पायथा गाठायला आता सकाळी उशीर होणार म्हणून आम्ही किल्ला बदलावा या मतावर आलो.”पावसाळ्यात हडसर च्या खुंटीच्या वाटेने चढणे म्हणजे १ धाडस समजतात” त्यामूळे आपण हीच मोहीम आखावी असा धाडसी निर्णय घेण्यात आला आणि गाड्यांचे धूराळे उडाले जून्नर च्या दिशेने !
दि. १४.०८.२०११ जवळपास पहाटे ४ च्या सुमारास आम्ही जुन्नर ST स्थानकात पोहचलो होतो.येथेच थोडी विश्रांती घेउन पुढे निघायचे होते साधारणत: सकाळी ७ ला आम्ही जुन्नर सोडले. रस्त्याच्या दूतर्फ़ा गर्द वनराई पसरली होती दोन्ही बाजूला असलेल्या वडाच्या पारंब्या जणू आमच्या स्वागतालाच हात पसरून उभे असल्याचा भास मला जाणवत होता.सकाळच्या प्रहरी ताई, माई, आक्का विहीरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी करत होत्या तर वरती आकाशात ’खग’ देखील आपापल्या कामाला लागल्याची चाहूल जाणवत होती.चहूबाजूला उंच डोंगर आम्हाला आपल्या कुशीत घेत तो सह्याद्री आपले विराट रूप आमच्यासमोर मांडून जणू आमचीच वाट पहात असल्यासारखा भासत होता.मधूनच पावसाच्या रिमझिम ’श्रावण सरी’ आपली हजेरी लावत होत्या आणि त्यांच्या साथीलाच जणू गाडीच्या काचेवर वायपर्स खर्र. खर्र. अशी साथ देत एक नवीनच नाद निर्माण करत होत्या.रस्त्याने जाताना घाटात नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा हिरवाईचा जो काही उत्सव नजरेस पडला, त्यामुळे मूड एकदम प्रसंन्न होऊन गेला होता.डोंगर उतारावरची ती टुमदार कौलारू घरे, वस्त्या पार करत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या हडसर या गावी पोहचलो आणि तडक आपापली ओझी पाठीवरती घेउन मावळे निघाले किल्ल्यावर...तेही खडतर अश्या खुट्टीच्या वाटेने !
गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहेत त्यातली सर्वात कठीण आणि प्रस्थारोहणाला अवघड पण, कमी वेळात माथ्यावर (किंवा एकदम वर) पोहचवणारी वाट म्हणजेच “खुंटीची/खुट्ट्याची वाट” म्हणून ओळखली जाते पावसाळ्यात या मार्गाने जाण्याचा अनूभव हा काही औरच असतो आता आमची पाऊले चालत होती त्या पंढरीची त्या सह्याद्रीची वाट.एकंदर १२ मावळे आता पूर्ण जोशात डांबरी रस्ता सोडून बाजूच्या शेतात घूसले होते.पहिल्यांदा पाण्यात, चिखलात पाय खराब होवू नये म्हणून जपत चालणारी पावल थोड्याच मिनीटात, हे शक्य नाही हे अनुभवाने समजून चिखलात पचा पच ढांगा टाकू लागले होते.चहूबाजूला गर्द वनराई आणि थंड हवा मनाला गुदगूल्या करत होती. चढण चढल्यावर घामेजलेल्या देहांना मध्येच रिमझीम सर गारवा देत होती.सुमारे आर्ध्या तासानंतर आम्ही सर्वजण “त्या” जागेवर पोहचलो होतो जिथून कठीण प्रस्थारोहण सुरू होणार होते.सर्वजण ’आ’ वासूनच त्या कातळाकडे बघत असताना मी आणि अमोद ने अंदाज घेण्यासाठी १-२ अयशस्वी प्रयत्न केले.थोडा प्रयत्न आणि घसरणीचा अंदाज घेउन ’हे शक्य होत नाही’ हे समजत होते आणि त्यामुळेच कदाचीत आत्मविश्वास देखील कमी होत चालला होता आता आमच्यातल्या ब-याच मावळ्यांचा हिरमोड झाला होता.पण,“त्या सह्याद्रीने आज आपल्या प्रेमाचा पुन्हा १ पुरावा आम्हास दिला”आणि कोथरूड पुणे येथून आलेल्या काही सवंगड्याची आणि आमची तेथेच भेट झाली.त्यांचा गटप्रमूख ’महेंद्र’ ने सर्वाना खात्री देत काही मि. मद्धेच हा भयंकर टप्पा चुटकीसरशी पार केला आणि वरून बाकी कार्यकर्त्यांसाठी दोर टाकला.या जागेवर “बिले” देणेही फ़ारसे सोपे नसले तरीही दोराचे १ टोक वर अडकवीण्यात आले आणि दुसरी बाजू कमरेला आधारासाठी बांधून दुसरा गडी पुढे सरसावला.थोड्याच प्रयत्नात कोणत्याही दुखापतीविना तो वर पोहचला मग काय एकमेकांना मानसिक आधार देत सर्व मावळे चढाइला लागले कष्टाने पहिली खुंटी पकडून झाली की लक्ष फ़क्त आणि फ़क्त दुस-या खुंटीवर केंद्रीत होत होते ती झाली की तिसरी मग चौथी अस करत करत प्रत्येक जण चढत होता “एकाग्रता” म्हणजे काय आणि ती जर असेल तर ’असाध्य ते साध्य’ कसे होते याची जणू प्रचितीच त्या कातळाने आम्हास दिली होती.बघता बघता सर्वजण वरच्या गुहेपाशी सुखरून पोहचले शेवट सर्वांची दप्तरे दोराने 
 ओढून घेतली गेली व पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू झाली. १० फ़ूटांवरतीच पुन्हा दुस-या कातळाने आवाहन केले आणि पुन्हा त्यात रोवलेल्या खुट्टया आणि खोदलेल्या कपारींचा आधार घेत आम्ही सरसावलो. या टप्प्यात पाठीमागची खोल सरळ दरी आणि पावसाने निसरडे झालेले चढाईचे कडे आमची चांगलीच परीक्षा घेत होते.त्यांना अक्षरश: बिलगून मानवरूपी घोरपडी बनून सर्वानी तो कडा देखील पार केला.पुढच्या १ मि. मधेच मावळे पोहचले होते गडमाथ्यावर आणि सर्वांच्या छात्या त्या २ कड्यांवरच्या शेवाळ्याने, मातीने भरल्या असल्या तरी त्या फ़ुगल्या होत्या “गर्वाने,अभिमानाने आणि त्या अथांग गगनात न मावणा-या आनंदाने” !
गडमाथ्यावरून आजूबाजूचा निसर्ग फ़ारच विलोभनीय दिसत होता. एका बाजूला माणिकडोह धरणाचा महाप्रचंड जलाशय व तिन्ही बाजूंनी पर्वत रांगा त्यात अर्ध्यापर्यंत आलेले कुंद श्रावणी ढग चित्त उल्हसित करून टाकत होते, त्यांना बघतो ना बघतो तर त्यातलेच पान्हावलेले ढग मधूनच एखादी जोरदार श्रावणसर अंगावर शिंपून चित्तवृत्ती उल्हसित करुन टाकत होते.वेलबुट्टीच्या नक्षीने रेखाटलेल्या त्या हिरव्यागार रंगाच्या असंख्य छटांनी भरलेला तो मखमली शालू लपेटून तो सह्याद्री आपले मनोहरी दर्शन देत होता.मग काय पटापट छायाचित्रकार पुढे सरसावले.आता चिखल तुडवत पुढची वाट सुरू झाली आणि आम्ही पोहचलो गडमाथ्यावरच्या “महादेवाच्या मंदिरामध्ये” अजूनही पाषाणात कोरलेले हे मंदिर अगदी उत्तम स्थितीत आहे ४-५ लोक यात आरामशीर मुक्कामी राहू शकतात.आता मावळे माथ्यावर विसावले होते.सातवाहन काळातला हा किल्ला १६३७ मध्ये शहाजीरानी मोघलांच्या हवाली केलेल्या पाच किल्ल्यांनध्ये गणला जातो. थंडगार वा-याच्या साथीत, सह्याद्रीच्या कुशीत, पावसाची टपटप अनूभवत मातीच्या सुगंधात आलेयुक्त चहापान झाले आणि कोरड्या खाऊवर ताव मारून किल्ला दर्शन करत मावळे राजमार्गाने म्हणजेच पाय-याच्या वाटेने पुन्हा उतरायला लागले.वाटेत रानफ़ुलांचा मेवा फ़ारच विलोभनीय दिसत होता जणू चहूकडे गालीचा पसरल्याप्रमाणे तो भासत होता.शेकडो वर्षांपासून आजदेखील हा किल्ला आपले रांगडे रूप धारण करून आहे याची प्रचिती आम्हाला बेलाग कडे आणि उत्तूंग बुरूज देत होते. कातळात कोरलेल्या पाय-या उतरून शेताच्या बांधांवरून प्रवास करताना त्या भाताच्या खेचरांकडे बघताना “निरागसतेचे भाव” मला जाणवत होते. साधारण २ तासाच्या पायपिटीअंती आम्ही हडसर गावाच्या हनूमान मंदिरी मुक्कामी थांबलो होतो.
 २५-३० लोक राहू शकतील आश्या मंदिरात हनूमानाच्या साक्षीने पुन्हा चहापान झाले आणि तयारी सुरू झाली भोजनाची.लगोलग सगळे पुढे सरसावले.पाणी आणून किराणा बाहेर निघाला मंदिराच्या साफ़सफ़ाईला काही मावळे सरसावले तर काही आपणहून कांदे बटाटे चिरू लागले आणि आनंदाश्रूंना वाटा मिळाल्या “बल्लवाचार्याचा” पोशाख परीधान करून मी देखील पुढे सरसावलो. एकीकडे मस्त खिचडी शिजायाला पडली तोवर दुसरीकडे घरून आणलेल्या थेपल्या, पोळ्यांचा फ़डशा पडला आणि गंप्पांच्या,चेष्टा मस्करीच्या ओघात पापड भाजत रटरटलेली खिचडी बघताच पोटातल्या कावळ्यांना शांत करायला मावळ्यांची अंगत पंगत बसून मेजवानीवर ताव मारला गेला.जेवणे उरकून आता एकीकडे भांडी पालथी पडली आणि दुसरीकडे दिवसभराच्या आठवणीत रमत मावळे देखील निद्रीस्त झाले.
दि.१५.०८.२०११ सकाळी मंदिराच्या बाहेरच गावाचे झेंडावंदन असल्याने गावकरी, शाळकरी मुलांसोबत आम्ही सर्वजणांनी देखील तिरंग्याला सलामी दिली.लगेच पुन्हा न्याहरी ची लगबग सुरू झाली आणि कांदेपोहे व खास श्रावणी सोमवार स्पेशल साबु. खीचडीवर ताव हाणून आम्ही गावाचा निरोप घेतला. संपूर्ण दिवस हातात असल्याने घरी न जाता “चावंड” किल्ल्याला भेट देउनच परतीला निघायच असा प्रस्ताव मान्य झाला आणि तडक गाड्यांनी कूच केले चावंड च्या दिशेने !      
प्रसिद्ध कुकडी नदीच्या खो-यात आपल्याच थाटात उभी असलेली टुमदार कौलारू घरे, चहूबाजूला डोंगर, संतविचाराने रंगविलेल्या भिंती, बागडणारी मुले, १-२ लहान पण सुरेख मंदिरे, गावात मधोमध बांधलेला ’पार’ त्याच्या बाजूलाच दगडाच सुबकतेने कोरून काढलेली विहीर,छोटेखानी टपाल खात्याच्ये कार्याल्य आणि प्रेमाची हाक जाणणारी माणसे यांनी नटलेल्या “चावंडवाडी” या पायथ्याच्या गावी पोहचताच आपणास अगदी गावालाच चिटकून उभा असलेला उत्तूंग आणि निधड्या छातीचा कडा आव्हान देत उभा असतो तोच “प्रसंन्नगड उर्फ़ चावंड” किल्ला होय !
गाड्या अडथळा येणार नाहीत अश्या जागेवर उभ्या करून फ़क्त पाण्याच्या बाटल्या घेउन आता सर्वजण किल्ला सर करण्याकरीता पुढे सरसावले.किल्ल्य्याची उंची खूप नसल्यामुळे फ़ार दमछाक होणार नव्हती याची कल्पना सर्वांना होतीच.(नाहीतर काय डोंबल चढणार हे) मावळे आता गर्द झाडीमधून नागमोडी पाऊलवाटेने सपासप पुढे सरसावले होते. थोडे अंतर चालून जातो तोच सरळसोट कातळात जेमतेम पाउल बसेल अश्या तिरक्या खोबण्यांनी आमचे लक्ष वेधून घेतले. त्या कोरलेल्या खोबण्यांमध्ये चढताना तोल जाउन काही अपघात होवू नये म्हणून कठड्यासारख्या आधाराला लावलेक्या शिड्या दिसत मात्र होत्या पण त्या स्वत:च इतक्या अगतिकतेने खाईवर जेमतेम लटकलेल्या दिसत होत्या की त्यावर शरीराचा भार टाकण्याची कल्पनाच शक्य नव्हती आम्ही सगळे सावधतेने तो टप्पा पुर्ण केला आणि मग सुरू झाला गड प्रवेशाचा मार्ग.जवळपास १००-१२५ पाय-या चढून आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहचलो. श्री. गणेशाचे सुंदर शिल्प कोरलेल्या भिंतीपाशी रस्ता डावीकडे वळून मगच दरवाजा बांधून काढला आहे जेणेकडून खालून थेट दरवाज्यावर हल्ला करणे अशक्य होईल.गडमाथ्यावर पोहचेस्तोवर तासभर वेळ देखील चिक्कार होता. गडावर आता आमचा फ़ेरफ़टका सुरू होता.बालेकिल्ल्यावरील शिव मंदिरी आम्ही नतमस्तक होवून दुस-या बाजूस असलेल्या कोरीव अश्या    तळ्यांपाशी पोहचलो. प्रगत शास्त्र आणि उत्तम शिल्पकलेचा अनूभव आम्ही समोरच पहात होतो.सुबक अश्या ७ कोरीव बारमाही पाणी असलेल्या तळ्यांच्या काठावर आता मावळे विसावले होते.एका वर्तूळाकार खड्ड्यात खडकाच्या 
बांधानीच एकमेकांपासून विलग केलेली ही “सप्ततळी” फ़ारच सुरेख आहेत. आजूबाजूचा परीसर न्याहळताना गडाचे नाव प्रसंन्नगड का याचा पुरावाच आता मिळत होता.”गार वा-याच्या झुळकेबरूबर ताल धरून त्या गडावर नावाप्रमाणेच प्रचंड वाढलेले ते हत्ती गवत “ऎरावताप्रमाणे” डोलत त्या वा-याचा मनमूराद आनंद घेत होते. चहूबाजूच्या त्या सह्यकड्यांवरून कोसळणारे असंख्य जलप्रपात आपल्या सह्याद्रीचे पाय धुण्यासाठीच जणू झेप घेताना भासत होते आणि त्याच्या पायाच्या स्पर्शाने पावन झालेले ते तीर्थ चंदेरी रेघांच्या रूपाने लांबवर पसरत जाताना फ़ारच विलोभनिय भासत होते. थोड्या वेळातच सूर्यनारायण आपल्या परतीचे संकेत देवू लागला आणि वरून दिसणा-या काळ्या आईच्या कुशीत राबणारा शेतकरी दादाची परतीच्या मार्गाला निघायाची लगबग सुरू झालेली बघताच आम्हीदेखील भानावर येउन गडाला मुजरा ठोकला.” लाडक्या सह्याद्रीला रामराम करून त्याच्यी माती हातापायावर तशीच ठेवून तिला जपत जुन्नर गाठले.जुन्नर ला मस्त खानावळ बघून सर्वांनी गुलाबजामयुक्य अश्या थाळीवर मनमुराद ताव हाणला आणि १ गाडी येथूनच मुंबई ला निघाली आणि राहिलेल्या २ गाड्यांनी पुनवडीस प्रस्थान केले.
गाडीत माझ्याबरोबर आठवणी देखील प्रवास करत होत्या.आठवत होता तो सह्याद्री जेवताना भूकेलेल्या जिवांनी ना हात धुतले होते ना कपडे साफ़ केले होते. लागलेली भूक त्या सह्याद्रीचे प्रेम आणि तो निसर्ग मला सांगत होता साद घालत होता...
“माझ्याकडे आलात की मातीतही हात घालायचा असतो, जाऊ द्यायची असते नखांमध्ये ती माती. आरे पोरांहो, ते अरोग्य शास्त्र, हायजिन, बियजिन सगळ पुढे आलं बाबा, मी या सर्वांच्या फ़ार फ़ार आधी आहे रे. आठवतय का ? ते विज्ञानाचं पुस्तक माझ्या फ़ार नंतर हातात आलय तुमच्या. ते आल्यावर हेल्थ वगैरे समजल हो तुम्हाला पण... पण आयुष्याची खरीखुरी ’गंमत’ मात्र हरवून गेलात रे तूम्ही.म्हणूनच सांगतो, माझ्यापासून दूर जाऊ नका रे पोरांनो मी भुकेलेला आहे तुमच्या प्रेमाचा !“
 मी आमच्या सह्याद्री ची ती साद,त्याची ती हाक ऎकली होती त्याच्या हाकेचा मान ठेउन मी पण आता त्या शहराच्या गर्दीत प्रवेश करत होतो अर्थात पुढच्या मोहिमेची आखणी करतच !

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश वाळिंबे
९८२२८७७७६७

मोहिमेतील सहभागी मावळे :-             
अमोद राजे,निलेश महाडीक, प्रसाद डेंगळे,अक्षय बोरसे,अमित गाजरे,वल्लभ येवलेकर,विकास पोखरकर,अनिल पिसाळ,हेमंत जगताप,सुषांत पाटील,सुरज आणि निलेश वाळिंबे.