Friday, April 27, 2012

नूतन वर्षाची सुरूवात.. ॥ शिवतिर्थ रायगड ॥



१ जानेवारी फ़िरंगी नूतन वर्षाची सुरूवात आपल्या सह्याद्रीत करूनच कामाला सुरवात करावी ही इच्छा अनेक दिवस मनात होती. अखेर या वर्षी हा योग आलाच. सकाळी १० वा अमोद ला फोन झाला. दुपारी २ वा निघायचे ठरले आणि मी, अमोद्, अमीत  माझ्या घरापाशी दुपारी भेटलो आणि पुढे चांदनी चौकात राहूल आम्हाला भेटला. अमोदच्या पायाला दुखापत झाली असल्याने आम्ही फ़क्त अश्या गडावरच जाउ शकणार होतो जेथे गाडी वरपर्यंत पोहचेल. आणि हेच दुखणे आमच्या पथ्यावर पडले आणि आम्ही राजधानी “रायगडाची” निवड केली. नूतन वर्षाची सुरूवात यापेक्षा अजून चांगली होणे शक्य नव्हते.तडक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आणि आम्ही ताम्हीणी मार्गे कूच केले.  
प्रत्येक मराठी माणसाची सर्वात अभिमानाची गोष्ट कोणती असेल तर शिवरायांची राजधानी “रायगड” होय. इ.स. १६७० च्या सुमारास महाराजांनी आपली राजधानी राजगडहून रायगडास हलविली. मुंबईचे गोरे इंग्रज, जंजी-याचा सिद्दी यांच्या हालचालीवर बारीक लक्ष रहावे आणि घाटमाथा व कोकण या दोन्ही भागावर सुरक्षीतता राखता यावी तसेच मोघलांना सहजासहजी शिरकाव करणे अवघड पडावे म्हणून ‘खास’ याची निवड करण्यात आली. त्याच रायगडाचे दर्शन आज आम्ही करणार होतो. मधे चहा नाष्टाचा एक थांबा घेउन आम्ही गाड्या पुन्हा दामटल्या. खराब रस्ता असल्याने आम्हाला पोहचता पोहचता जवळ्पास ७ वाजले होते.  आता अमोद च्या पायाला दुखापत झाल्याने ‘रज्जूमार्ग’ अर्थात ‘रोप-वे’ नेच वर जाण्याचे ठरविले होते. मग काय अवघ्या ४-५ मिनीटात रायगडाच्या उत्ताल कड्याचे दर्शन करत आम्ही ‘शिवतिर्थावर’ पाउल ठेवले आणि थोड्याच वेळात आम्ही होळीच्या माळावर पोहचलो. येथेचे गो.नी.दा. च्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होवून थोडावेळ गडमाथ्यावर विसावलो आता पोटातल्या कावळ्यांची चाहूल लागल्याने मस्तपैकी झुणका भाकरीचा बेत ठरला आणि गडावरच वस्तीला असलेल्या धनगराच्या झापावर आम्ही तळ ठोकला हात,पाय धूवून होइस्तोवर मस्तपैकी गरमागरम पिठल,भाकरी,खरडा,पापड असे सुग्रास जेवण पुढ्यात हजर होते मग काय सारवलेल्या अंगणात पंगत बसली आणि सर्वांनी आडवा हात मारून तृप्तीचे ढेकर दिले.रात्रीचे ९ वाजत आले होते ब-यापैकी अंधार पडला असला तरी हवेत मस्त गारवा होता आणि झोपही आली नव्हती म्हणून आम्ही सर्वजण जगदीश्वर मंदीराकडे गेलो. अथांग नभाच्या खाली मंदीराच्या परीसरातच आता आमच्या गप्पा रंगल्या आणि सर्वजण तेथेच गप्पा मारत निद्राधीन झालो.


पहाटे थंड वा-याच्या झुळूकेबरोबरच कोंबड्याची बांग आली आणि सूर्योदयापूर्वीच आम्ही जागे झालो मग काय “महाराष्ट्रातल्या प्रत्येक फोटोग्राफ़रला हवी असणारी संधी आम्हालादेखील मिळाली ” तडक होळीच्या माळावरच्या पठारावर धूम ठोकली आणि आयुष्य सार्थकी करणा-या त्या श्री. शिवछत्रपतींच्या पुर्णाकृती पुतळ्याचे फोटोशेसन सुरू झाले.वेळ थोडाच असल्यामुळे लगेच तोंडे खंगाळून आम्ही किल्ला दर्शनास निघालो. पुतळ्याच्या समोरच असलेल्या विस्तीर्ण बाजारपेठेचा फ़ेरफ़टका झाला. पेठेच्या दोन्ही बाजूस २२ दुकाने आहेत आणि बरोबर मधल्या दुकानावर सुंदर नागाचे शिल्प कोरलेले आपणास आढळते.येथून आम्ही थेट टकमक टोक गाठले.लगोलग गडाचा बालेकिल्ला, मंत्र्यांची घरे, राणीमहाल,पीलखाना, कोठारे,गडाचे वैभवात भर घालनारे मनोरे, मंदीरे सगळ्यांची धावती भेट घेतली. आता आम्ही पोहचलो होतो त्या भव्य राजमहालात, होय हीच ती जाग जिथे महाराज आपला न्यायनिवाडा करीत. त्याच दरबारात आम्ही हजर होतो. सगळ्यांचे उर भरून आले होते. नव्याने स्थापन झालेल्या महाराजांच्या पुतळ्यास आम्ही सर्वांनी मुजरा केला. महाराज्यांच्या कर्तृत्वाची ओळख आपणास रायगड भेटीत समजते. येथील ठिकाणे आज जरी आपण पाहीली तरी गतकालातील वैभवाची कल्पना आल्याखेरीज राहत नाही.अती विस्तीर्ण परीसर आणि तरीदेखील अतीशय नियोजनबद्ध आखणी पाहून महाराजांची आठवण आल्याखेरीज राहात नाही.चौफ़ेर विचार करून राजधानी म्हणून याचीच निवड का केली असावी याचा प्रत्यय आपणास गडावर आल्यावर मिळतो. इतिहास चाळता सभासद लिहीतो, राजा खास जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फ़ा गडांचे कडे तासील्या प्रमाणे,दिड गाव उंच पर्जंन्याकाळी कडियावरी गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतू तो उंचीने थोडका, दौलताबादचे दसगुणी उंच असे देखोनी बहुत संतुष्ट जाले आणि बोलले “तस्तास जागा गड हा करावा” मराठी अस्मीतेसाठी आणि फ़क्त आपल्या प्रजेसाठी अहोरात्र झटलेल्या अती धाडसी आणि बुद्धीमान अश्या शिवरायच्या या निर्णयाचा अभिमान बाळगत आम्ही सर्वजण दरबारतून निघून 
जगदीश्वराच्या मंदीरी दाखल झालो होतो, हेच ते मंदीर जेथील शिवाची स्थापना साक्षात आमच्या या महाराष्ट्राच्या या भारतभूच्या तमाम हिंदूंच्या “शिवा”नेच केली आहे. सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत् छत्रपती शिवाजीराजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. शिवपिंडीला प्रणाम करून आम्ही पूर्वेकडील शिवसमाधी पाशी पोहचलो.येथेच महाराजांनी अखेरची “चिरनिद्रा” घेतली. ‘शिवसमाधी’ म्हणजे अष्टकोनी जोते असूम त्यावर दगडी कळस चढविलेला आहे आणि आतमधील फ़रसबंदीत शिवस्मारक उभारले आहे. येथे सभासद म्हणतो,”क्षत्रियकुलावतंस श्रीमन्ममहाधीराज शिवाजी महाराज यांचा काल शके१६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे जाहला.देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा तो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर द्क्षणभागी केले ” सर्वजण भावविभोर होवून समाधीसमोर शांत बसून शिवस्मरण करून महाराजांना श्रद्धांजली वाहून बाहेर पडलो.पुढे मी आणि अमीत महादरवाज्यास भेट देउन विस्त्रीर्ण आणि अभेद्य अश्या तटबंदीला सलाम करून पुन्हा माथ्यावर पोहचलो आणि सर्वांनी वेळेअभावी परतीचा निर्णय घेतला गेला.
 गडाला मुजरा ठोकून आमचा परतीच प्रवास सुरू झाला होता नवीन वर्षाची सुरूवात तर छान झाली होती पण मनात काही सलत होते. याच रायगडावर महाराजांनी अशी माणसे तयार केली जी देशासाठी आपल्या प्राणांची पर्वा करीत नसत आज कुठे मिळतील ती मराठी माणसे ? याच दरबारी बसून सच्चा आणि योग्य न्यायनिवाडा झाला, येथे ना कधी जातीचे राजकारण झाले ना घराणेशाही होती तो राजांचा महाराष्ट्र आज कुठे आहे ? या गडावरचे ते वैभव तो सोहळा ती देशभक्ती कुठे पहावयास मिळेल मला. बत्तीच मण सुवर्णाचे सिंहासन होते याच ठिकाणी कुठे गेले ते ? इ.स.१६७३ मधे रायगडी भेट देणारा इंग्रज वकील टोमस निकल्स गडाविषयी लिहीतो “फ़क्त मुबलक अंन्न पुरवठा झाला तर हा किल्ला अल्प शिबंदीच्या सहाय्याने संपूर्ण जगाशी लढू शकतो” पण … पण आज हाच आमचा रायगड सांभाळायला आमच्याकडे आमच्या सरकारकडे वेळ नाही. प्लास्टीक च्या बाटल्या आणि पिशव्यांनी त्याला बसत चाललेला विळखा त्याला कधी गिळेल सांगता येत नाहीये. जगाशी सोडा आपल्याच लोकांशी आता त्याला त्याच्या अस्तीत्वासाठी लढावे लागतय हे जाणवून मनाला दुख: झाल. आणि  स्वत:च्या मनाशी, “नवीन वर्षात कमीत कमी प्लास्टीक वापरीन” हे ठरवूनच आज निद्रीस्त झालो.

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७