Tuesday, June 4, 2013

तो आला !

आज ऑफ़िसच्या बंद काळ्या काचांच्या आड नित्यनियमाने काम सुरू होते. पण मन सकाळपासूनच कुठेतरी हरवले होते.. आहो का काय विचारता. सकाळी येतानाच ‘ती’ ज्याची आतूरतेने वाट बघतीये असा ‘तो’ लवकरच येतोय असा संदेश आला होता. सकाळीच लक्षात आल होत तिच्या.. त्या धरणीमातेच्या. येणा-या जाण्या-या च्या डोळ्यांत धूळ उडवत, दरवाजे खीडक्या वाजवत, रस्त्यावरचा सारा पाचोळा उधळत, आत्ताच काढलेला केर गावभर पसतर ती, एखाद्या नुकत्याच तारूण्यात आलेल्या सुंदर तरूणीला आपला स्वप्नातला तो राजकूमार, तोच प्रियकर भेटून जो आनंद होतो आणि मग ती जशी अल्लड्पणे सैरभैर पळत सूटते अगदी तशीच ती ‘वावटळ’ तीला निरोप देउन गेली होती. काय सांगू काय आनंद झाला होता तीला. आतातर तीची तयारी देखील सुरू झाली असेल…
त्याच्या स्वागताला आता ढगांचे ढोल आणि विजांचे ताशे येतील, त्याच्या आगमनावर त्या टप्पो-या थेंबांच्या  लेझीमतालाने सारा आसमंत वाजू लागेल, मोर आपला मोहक पिसारा फ़ुलवून थूई थूई नाचू लागेल. आजवर बहरलेला तो गुलमोहर आपल्या लाल फ़ूलांचा गालीछा सा-या रस्त्यावर पसरवेल.तो येणार म्हणून धरणीमाता आपल्या मातीत लपलेल्या “अत्तराची कूपी” या पृथ्वीवर सडयासारखी शिंपडेल आणि सारी पृथ्वी आणि निसर्ग फ़ुलून जाईल. तूमच्या आमच्यासारखे ‘जीव’ देखील त्या गंधाने सुखावतील. सप्तरंगांची उधळण करत इंद्रधनूची कमान उभारून ती त्याच स्वागत करेल.चहूकडे हिरव्या रंगाच्या असंख्य छ्टा पसरतील आता मी नटणार, सजणार या निसर्गाला बहर येणार.अस ती म्हणत असेल आणि तिकडे….
खिडकीतून डोळे किलकीले करीत आजोबा आपल्या अर्धांगिनीकडे बघून आपली कवळी सावरत एक स्मीतहस्य करतील, क्षणात या निसर्गाच्या कृपेने याच्याच आगमनाने दोघे आपल्या तारूण्यातल्या त्या नाजूक आठवणीत हरवून जातील, ‘ईश्श काहीतरीच तूमच आपल !’ या कायम हवाश्या वाटणा-या वाक्याने आजोबा मनोमन खूष होतील.हातातील जपमाळेला जरा आराम पडेल आणि जून्या नाजूक आठवणी, गप्पांमधे दोघे रंगून जातील. गप्पा मारताना आजोबा नातवंडासाठी कागदाच्या होड्या बनवून देतील तर आजी गरमागरम कुरडई च्या खाऊच पोरांसाठी तळण तळेल. आता नातवंड देखील रत्यावर झालेल्या ओढ्यातून आपली नाव सोडतील, ती मधेच पडेल, मधेच अडेल कदाचीत बूडेल, पण काहीही झाल तरी आपली ती कागदी बोट तरावी त्या कृत्रीम लाटांना पार करत रस्त्याच्या त्या बाजूला जावी म्हणून प्रयत्न सुरूच असतील. एक बुडाली तर काय झाल, दुसरी बनवली जाईल माझी नाही पण ताईची तिकडे पोहचली म्हणून देखील एकच जल्लोश केला जाईल.हार न मानण्याचा आणि दुस-याच्या आनंदात सहभागी होण्याचा ‘संस्कार’ आपोआप त्या बालमनांवर रूजला जाईल.पायातली स्लीपर पाण्याबरोबर वाहून जाताना मागे पळून तीला पकडण्यासाठी पोरांची पळापळ सुरू असेल. चिखलाची परवा न करता एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण सुरूच असेल.
ऑफ़ीसातून निघताना तीला घरी घेवून जायचय हे तो विसरला नसेल, गाडीवरून ट्राफ़ीकमधून भिजत निघाला असेल जाताना आपल्या पुढच्याच्या गाडीचा चिखल चूकवत आपल्या गाडीने मागच्याला भरवायचा खोडकर आनंद त्याला मिळत असेल. जाताना सिग्नल ला अडोश्याल्या उलटी करून ठेवलेल्या काळ्या छत्रीत ती पांढरी शूभ्र मोग-याची फ़ूल ठेवून स्वत: पावसात भिजत उभा असलेला तो पो-या त्याच्या नजरेस नक्कीच पडेल १० चे ३ गजरे घेउन तो पुढे निघेल.ती बसमधून उतरत आपली रंगींत छत्री उघडत स्वत: ला सावरत त्याला म्हणेल,’सांगत होते रेनकोट घे बरोबर..’ त्यावर तो फ़क्त स्मितहास्य देत तिच्या छत्रीत शिरत थोडा आडोश्याला उभा राहील, मग खिशातले ते मोग-याचे हार आपल्या ओंझळीत घेऊन तिच्या चेह-याजवळ नेत तिला निरखेल, डोळे मिटून त्या ताज्या मोग-याचा मंद वास घेत त्याचा ओला स्पर्श ती अनूभवत असेल. जणू जगातली सर्वात महाग भेट मिळाल्याच्या आनंद तिच्या नजरेत बघताना, छत्रीतून ओघळणारे ते थेंब तिच्या केसांवर पडतील आणि ओली झालेली ‘बट’ झटकण्याची ती अदा बघतानाच त्या थेंबाचे तूषार नकळत त्याच्या चेह-यावर उडतील. त्या टप्पो-या थेंबात विरघळणारी ती आणि तिच्यात विरघळणारा तो आता ऑफ़ीसातून उचलून आणलेल्या टिशु पेपरने आपल्या मोबाईलवर जमलेली वाफ़ पूसेल आणि घरी फ़ोन करून पावसामूळे जरा उशीर होतोय अशी बतावणी करेल. दोघे मस्त गरमागरम कांदा भजी आणि कडक चहा मारूनच घराकडे निघतील.गेल्यावर मऊ मूगाची खिचडी आणि पापडाचा मेनू ठरला असेल. नकळत  त्यांना देखील आपले प्रेमाचे दिवस आठवून मनाला गुदगुल्या होतील ते देखील आज अजूनच तरूण झाले असतील.अशीच जन्मभर साथ निभावण्याच्या शपथा आपोआपच मनामधे घेतल्या जातील.सगळे दिवस कसे मखमली वाटू लागतील.नुकत्याच तारूण्यात प्रवेश केलेले तरूण तरूणींच तर विचारूच नका. या धरणीला जो आनंद झाला, जो बहार आला  तोच त्यांच्यात पण दिसत असेल. कॉलेज बूडवून मग प्लान होतील, गुपचूप एक कोरडा ड्रेस सॅकमध्ये लपवून ते दोघ बाहेर पडतील, अखंड जलधारात न्हाऊन निघताना त्या खट्याळ मनांना प्रेमाच्या लाटांची एक अनामीक धूंदी चढलेली असेल. गरमागरम कणीस, उकडलेल्या शेंगाची चव आज भलतीच न्यारी लागत असेल. कवी आपली ‘लेखणी’ घेवून बसेल त्याच्या शब्दांनी आज काळजाचा वेध घेतला असेल. तर गायकाचा सूर लागुन त्यातून ‘मल्हार’ उमटेल त्या सूरांनी आज सप्तरंग उधळले असतील.सगळ्याच कलाकारांच्या कलेला कसे एक उधाण आले असेल. सह्याद्रीची बात तर विचारूच नका. त्याच्या कुशीतून असंख्य जलप्रपात कोसळत असतील,हळदही न उतरलेल्या सर्व दागीन्यांनी नटलेल्या नववधूच्या चेह-याची ती लकाकी त्याच्या चेह-यात ओसंडत असेल.आपल्या सहवासात आजवर राहीलेल्या त्या नदिची भेट तिच्या प्रियकर सागराशी घडणार असेल.तिलादेखील आनंदाने पूर आला असेल. निसर्गाचा पूरता दंगा सुरू असेल. झाड,वेली पार बहरून निघतील पानांवर मोत्यांच्या रांगांचा शिवणापाणीचा खेळ रंगला असेल. सगळीकडे कसा फ़क्त आनंद असेल. महत्वाच म्हणजे क्षूद्र अश्या माणूस जातीच्या मनाला आलेली ‘कूबट’ स्वच्छ होईल.त्याच्या विचारांना लागलेली जळमटे आज धूतली जातील त्यानेच मळवलेला तो निसर्ग एकदम साफ़ चकचकीत होईल, शेतकरी दादाच्या डोळ्याचे अश्रू पूसले जातील, बैलजोडीला तयार करत आपल्या ‘हीला’ या सणाला एक तरी दागीना घडवायचा हे स्वप्न उराशी बाळगत तो कामाला लागेल.आपल्या पोटाचा प्रश्ण सूटेल आणि त्या काळ्या आईच्या कुशीत आज पून्हा अंकूर उगवेल.कारण आज तीचा बहर घेवून येणारा ‘तो’ वरूणराज तीला भेटायला आला असेल, तिच्याशी खेळायला आला असेल, तिला आता तो सांभाळणार असेल पूरत्या एका वर्षासाठी.

भेटा अथवा लिहा, (शक्यतो भेटाच)

निलेश गो. वाळिंबे 
९८२२८७७७६७