Tuesday, October 29, 2013

॥ शुभ दिपावली ॥

जागोजागी आकाश कंदील, पणत्यांचे स्टॉल दिसू लागले, की वेध लागायचे ते दिवाळीच्या सुट्टीचे. घराघरातून भाजण्यांचा सुटलेला खमंग वास मग उरात साठवून आम्ही पोर नदी, बांधकाम सुरू असलेली एखादी इमारत, मैदान अश्या जागांवरून दगड,माती गोळा करून मग किल्ला बनवत. आपला किल्ला झाला की नंतर मित्राचा असे अनेक किल्ले मोठ्या आनंदाने बनवले जात. आधुनिकतेचा वारसा जपण्य़ासाठी मग त्या किल्ल्यांनमधे एखादे कारंजे, विमान, विमानतळ, रेल्वे, पवनचक्की हे देखील दाखवले जात. एकमेकांना मदत करण्याची, आधुनिकतेचा वारसा जपण्याची, आपल्या सह्याद्रीचा अभिमान बाळगण्याची, प्राणांची बाजी लावणा-या मावळ्यांचा, राजांचा मान राखण्याची सवय, एकत्रपणे कष्ट करण्याची गोडी आपोआप लागली जात.
घरची परिस्थीती तशी बेताचीच त्यामुळे आम्हा दोन भावात मिळून ५० रूपयांपेक्षा जास्त फ़टाके आणायचे नाहीत हे आईने अगोदरच बजाबलेले असे. मग बाबांबरोबर सारसबागेत फ़टाक्यांच्या दुकानांकडे आमचा मोर्चा वळत असे. मी पानपट्टी घेतो, तू लवंगी घे अश्या चर्चा  आम्हा भावांमधे घडत आणि जेमतेम एका लहान पिशवीत मावतील  एवढे फ़टाके घेवून आम्ही परतत असू. घरी आल्यावर रात्री जागून लवंगीच्या सरीतला एकएक फ़टाका सुट्टा करून सर्व फ़टाके दोघांमधे मग मोठ्या आनंदाने समान वाटून दोन मोठ्या पिशव्या केल्या जात. तशी शिकवणच दिली जात असे.भावांमध्ये सारख वाटून एकत्र आनंद लुटण्याचा मजा काही औरच होता हे नक्कीच त्या वयात देखील उमजत असे.
मोती साबण, उटणे लावून केलेले अभ्यंग स्नान.ताटाच्या बाजूने काढलेल्या रांगोळीचे देखील तेव्हा मोठे अप्रूप वाटे. लाडू,चिवडा,कडबोळी, चकली च्या फ़राळावर सर्वांसमवेत मग ताव मारला जात.वर्षातून फ़ारफ़ार तर दोन ड्रेस मिळत आणि ते ही कोणत्याही नामांकीत कंपनीच्या ‘ब्रॅंड’चे नसलेले. तरिही त्यात संपूर्ण ‘कंफ़र्ट’ मिळत असे.बेताच्या परीस्थितीत देखील पूर्ण कुटुंब मोठ्या आनंदाने आणि जल्लोशात दिवाळीचा सण साजरा करत.जे मिळते त्यातच मनसोक्त आनंद लुटून समाधान मानण्यासा ‘संस्कार’ त्याकाळी आपल्या बालमनावर नकळत कोरला जात.
पण आज ती मजा खरच राहिली आहे का ? ते संस्कार ती शिकवण कुठे हरवली आहे का ? सतत पैश्याच्या मागे फ़िरणारे आम्ही हजारो रूपये खर्च करूनदेखील त्या आनंदाला मूकत चाललोय असे कधीतरी वाटते. मोठ्ठाली घर, गाड्या,पैसा आज आपल्या दारात आहेत पण आपला आनंद, समाधान, स्वास्थ्य हरवत चालल्यासारख वाटतय. कारण ‘लक्ष्मी’ च्या मागे लागताना आपण ‘पैश्याच्या’ मागे धावट सुटलोय असे जाणवते.स्पर्धेच्या गतिमान चक्रात आपण अभिमन्यू प्रमाणे अडकत आहोत असे जाणवले की मनाला क्लेश होतो.संपत्ती सर्वांना हवी असते पण पैसा आणि लक्ष्मी यातला फ़रक आपल्या हजारो वर्षाच्या परिपक्व संकृतीने, जेष्ठ व्यक्तींनी आपल्याला समजावलाय.तो आपल्याला समजलाच नाही हे लक्षात येते.
“जो मागच्या दरवाजातून वा गुपचूप येतो, बायकोच्या कानात हळूच सांगतो,असतो भरपूर पण आनंदाबरोबर कायम  असमाधान आणि एक भिती घेवून येतो तो “पैसा” व जो समोरच्या दारातून योग्य कष्टाच्या मोलात, वाजत, गाजत दिमाखात आणि फ़क्त आनंदच घेवून येतो जिचा उपभोग केवळ आपणच नव्हे तर आपले कुटुंबीय आणि आपल्या आजूबाजूचा समाज देखील मोठ्या समाधानाने, संयमाने घेतात ती “लक्ष्मी”.
अश्या या पवित्र लक्ष्मी चा सण म्हणजे ही ‘दिपालवी’ ! “म्हणूनच या मंगल प्रसंगी आपल्या घरात ती “लक्ष्मी” व तिचे पावित्र्य सदैव नांदो,आपली भरभराट होवो आणि आपणास निरोगी, समाधानी,आयुष्य लाभो हिच या दिपावली च्या शुभदिनी ‘वाळिंबे’ परिवाराकडून परमेश्वर चरणी प्रार्थना ! ॥ शुभ दिपावली ॥


निलेश गो. वाळिंबे.   


Tuesday, October 1, 2013

|| मढे घाट ||

पावसाळ्याचे दिवस आले की  मनाला कसा वेगळाच आनंद होतो, आणि मग त्या आनंदात आपल्या मनाचा गारवा शोधायला तूमच्या आमच्यासारखे सह्यप्रेमी निघतात त्या निसर्गाच्या कुशीत. मस्तपैकी पाऊस लुटायला, भिजायला. त्याच्या त्या जलधारांनी शरिरालाच नव्हे तर आपल्या मनालादेखील तो गारवा देण्यासाठी सगळे बाहेर पडतात.आम्हालादेखील पुढच्या आठवड्यात काही सवंगड्यांसमवेत किल्ले तोरणाची सफ़र घडवून आणायची होती. पण त्यांना खाली पायथ्याला जेवण देण्याचे ठरल्याने आज जेवणाचे पैसे देवून यायचे ठरले होते. याच कारणासाठी  सत्या आज सकाळी सकाळीच घरी हजर झाला म्हणाला, चला ते पैसे देवून जरा पाऊस बघून येऊयात. मग मुहूर्ताला मोडता कशाला कोण घालेल.. मी पण लगेच हो म्हणालो आणि आम्ही दोघांनी कात्रज गाठले. सकाळी सकाळी जातानाच वाटेत ‘पारिजातकाच्या’ सड्याने आणि त्याच्या सुघंधाने आम्हाला एकदम टवटवीत केले.त्याची काही छायाचित्रे टिपून पुढे मी, आमोद आणि सत्या ३ टाळकी निघाली आपल्या ‘मनाचा गारवा’ शोधायला...

गाडीतून चेलाडी फ़ाटा, नसरापूर मार्गे टुमदार अश्या वेल्ह्याच्या पायथ्याला पोचलो तेव्हा वरूणराज आमच्या स्वागताला तयारच होते. मागच्या महिन्यात उन्हाने भाजला गेलेला, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तोरण्यावर निसर्गाने आपल हिरव मखमली तोरण चढवून त्याला कधीच सजवून टाकल होत. पावसाची रिमझीम, कुंद हवा, चहूबाजूला सह्याद्रीच्या कुशीतून पावसाची चाहूल देणारा हिरवागार पसरलेला तो गवतांचा, रानफ़ुलांचा भव्य मेळावा आणि इतिहासाची साक्ष देत शेकडो वर्षे रूबाबात उभा असलेला तोरणा बघताच मन अगदी प्रसन्न झाले.गडाच्या पायथ्याला ज्या खानावळ वाल्यांना पैसे देयचे होते ते देवून टाकले आणि पुढच्या आठवड्याची ऑर्डर पक्की करून टाकली. मग जरा थांबून गरमागरम कांदेपोहे आणि फ़क्कड कटींग मारता मारता आता या समोर पसरलेल्या निसर्गात काही काळ घालवूनच माघारी फ़िरण्याचा बेत झाला म्हणून गाडी माघारी घेण्याऎवजी पुन्हा थोडी पुढे दामटून निसर्गाने लयलूट केलेल्या व ऐतिहासीक महत्व असलेल्या अश्या ”मढे घाटाकडे” प्रस्थान केले.
                         
मढे घाट, मढे घाटाच्या सौदर्याला हळवी पण अतिशय पवित्र अशी किनार लाभलेली आहे.. आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आपल्या राजाकडे, जीवलग मित्राकडे आपल्या परमेश्वराकडे गेलेला सुभेदार नरवीर तानाजी मालूसरे राजाच्या प्रेमापोटी मुलाचे लग्न बाजूला सारून प्रथम किल्ले कोंढाणा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या मोहिमेसाठी आग्रह करू लागला. म्हणाला.. “राजे… आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे !” आपल्या भावाला ‘सूर्याजीला’ बरोबर घेवून जीवाची परवा न करता, आपल्या प्राणांची बाजी लावून तो थोर योद्धा, सिंहासारखा लढला अखेर धारातिर्थी पडला पण राजाचा गड तो कोंढाणा जिंकून घेतलाच.पश्चात त्या वीर सुभेदाराचे त्या योद्ध्याचे ते पार्थिव (मढे) त्यांच्या कोकणातील ‘उमरठ’ या गावी याच घाटमार्गातून नेण्यात आले तेव्हापासून या घाटाला ‘मढे घाट’ असे संबोधू लागले. काय काय माहिती असेल या घाटाला तिथल्या या निसर्गाला, काय काय पाहिले असेल याने. त्या थोर योद्ध्या चे पार्थीव या वाटेने जाताना किती अश्रू ढाळले असतील त्या घाटानी,तिथल्या कडेकपा-यांनी, पालखीवर चिरविश्रांती साठी निघालेल्या त्या तानाजीच्या चेह-यावर आपल्या मुलाच्या लग्नाची चिंतेची पुसट रेषाही नसेल कारण त्याला खात्री असेल माझा राजा हे सर्व यथायोग्य पार पाडेलच आणि मुलाच्या लग्नापेक्षा महत्वाचे आपले स्वराज्य, त्यासाठी कामी येणे यासारखा बहूमान नाही. उलट त्याच्या चेह-यावर असतील ते फ़क्त पराक्रमाचे भाव.आउसाहेबांचा आवडता कोंढाणा त्यांना मिळवून दिल्याबद्दल चेह-यावर उमटलेले समाधान.आपल्या सख्ख्या भावापेक्षा जवळचा आपला ताना आज या स्वराज्यासाठी कामी आला याचे दु:ख त्या राजाला देखील आवरले नसेल साक्षात त्याच्या आसवांनी ही पवित्र भूमि भिजली असेल. किती थोर असेल ती वाट आणि तो निसर्ग. या सगळ्या गोष्टींचा आज तो घाट साक्षीदार बनून  त्या जागी शेकडो वर्ष उभा आहे.आज त्या निसर्गाशी बोलायची कला मला जमली असती तर त्याने मला या सत्य कथा सांगितल्या असत्या. पूर्वाजन्मीचे पुण्य कदाचीत की आज त्या थोर वाटेवर आम्हास जायला मिळाले. धन्य ती वाट, धन्य तो तानाजी, धन्य ते राजे आणि धन्य तो निसर्ग. अश्या या पवित्र घाटात आम्ही पोहचलो होतो. तिथे कर्णावाडी नावाच्या वाडीत आम्ही गाडी लावली व वीर तानांजीचे स्मरण करून त्या अत्यंत शांत पण विलोभनीय जागेत भटकंतीला सुरूवात केली. 


                           थंड हवा, वा-याच्या झुळूकेनिशी नववधू प्रमाणे लाजणारी ती गवताची पाती, हातात हात गुंफ़ून जन्मोजंन्मांचे सोबती असल्याप्रमाणे वरून आपल्या प्रवासाला निघालेले ते काळे ढग जणू आपल हरवलेल कोणी सापडल की काय.. त्या अत्यानंदात त्या सह्याद्रीच्या अतीउंच कड्यांना त्या ढगांनी मारलेल्या त्या मिठ्या आणि आनंदाश्रू अनावर व्हावे तश्या धबाबा कोसळणा-या त्या जलधारा.त्या निसर्गाची ती किमया बघतच आम्ही बागडत होतो. डोंगर कड्यावरून आपल्या जिवाभावाच्या मैत्रीणीला त्या धरणीमातेला बिलगण्यासाठी आतूर झालेले अंगावर चंदेरी शाल पांघरून तीला बिलगणारे ते धबधबे खूपच मनमोहक दिसत होते. जागोजागी अवखळ  झरे आपल्या नागमोडी वाटांनी खळखळाट करत आपला आनंद व्यक्त करत होते.मधूनच येणा-या धूक्याच्या लाटांनी पहिला अंक संपून पडदा पडावा नी लगेच दुस-या अंकाला तितक्याच जोमाने सुरूवात व्हावी असा भास होत होता. शेतावर जीव ओवाळून टाकणारा शेतकरी दादापण जोमानी कामाला लागला होता. आपल्या ढवळ्या पवळ्याला पण त्यानी मदतीला आणल होत. मधेच १ बगळा त्या बैलाच्या पाठीवर बसून जणू आपल्याच हातात त्याची वेसण असल्याच्या थाटात भाव खावून जात होता. सभोवतालचे दाट जंगल पुर्णत: धुक्यात बुडाल्याने आमचा आता स्वर्गविहार सुरू होता. वातावरणातील त्या धुक्याच्या जादूने अगोदरच सुंदरता लाभलेल्या त्या वृक्ष वेली अजूनच विलोभनीय भासत होत्या. मढे घाटाची अजून एक ओळख पटवून देणारा म्हणजे तिथला महाकाय, उंचावरून कोसळणारा जलप्रपात. मनाला भूरळ घालणारा “लक्ष्मी धबधबा”.  त्याच्या त्या एकसंघ आवाजाने आता आम्ही त्याच्याकडे प्रस्थान केले. पूर्ण भरलेले आपले शुभ्रांग मोठ्या आवेशाने खाली कोकणात लोटून देताना दिसणारे ते विहंगम दृश्य.भगवान शंकराचे तांडव नृत्य सुरू असताना होणारा शंखनाद, असंख्य एकसंध मृदुंगाचे आवाज ज्याप्रमाणे भासत असतील तसा तो त्याचा नाद तो आवाज. पट्टीच्या गायकाने मल्हार आळवावा असे ते सूर. कोसळणा-या त्या प्रपाताचे ते विलोभनीय दृश्य पाहताना काही काळ आम्ही स्वत: लाच विसरून गेलो होतो. तो सोहळा कायमचा डोळ्यात साठवत पुन्हा माघारी फ़िरलो आणि दोन्ही बाजूला गर्द झाडीत वसलेल्या छोटेखानीच पण डुमदार ‘कर्णावाडीत’ येवून पोहचलो. फ़ारसा वेळ नसल्याने  आता परतीला निघायचे होते. गाडीत बसून पावसाची रिमझीम ऐकत वाटेत मग पोटपुजेला थांबलो. आज सत्याला फ़ारशी भूक नसल्याने तिघात फ़क्त १ व्हेज. थाळी, २ चिकन थाळी, १ अंडा मसाला, ४ रोट्या, भात, भजी आणि कोल्ड्रिंक एवढाच मेनू मागवला गेला.निसर्गाच्या कुशीत काही तास घालवल्यावर हवाहवासा वाटणारा तो मनाचा गारवा आता आम्हाला सापडला होता. ते मदमस्त वातावरण तो निसर्ग त्याची ती किमया, ती जादू , तो थंड वारा, ती हिरवळ सगळ सगळ कस उरात भरून घेतल होत. त्या निसर्गाचे “आभार” मानून पुन्हा येण्याच्या बोलीवर आम्ही परतीला निघालो होतो. धुक्याची नवलाई, मनाला चिंब करणा-या पावसाच्या सरी, मधूनच दाटून आलेल्या कृष्णमेघांना दूर सारून त्या अजस्त्र सह्यकड्यांना आणि हिरवाई ने नटलेल्या धरणी मातेला लखलखणा-या पाचूंचे रूप बहाल करणारे ते कोवळे कवडसे, साक्षात लक्ष्मी चे नाव धारण करून तिच्याप्रमाणेच ओथंबून वाहणारा तो अजस्त्र धबधबा हीच तर खर आम्हा सवंगड्यांच्या या छोट्याश्या निसर्गयात्रेची फ़लश्रुती होती !


भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७