Wednesday, November 6, 2013

भरारी ची स्वारी.. ॥ कुलंग ॥ गडावरी.


महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर मान मिळवून देणार एक नाव म्हणजे ‘सह्याद्री’. निसर्गाची अद्भुत अशी किमया ,एक चमत्कारच म्हणावा असा तो सह्याद्री. असंख्य आक्रमण पचवून कायम आपले रक्षण करत आज हजारो वर्षे आपल्या रांगड्या, रूबाबदार रूपात, ताठ कण्याने उभा असलेला तो सह्याद्री. आपले आक्राळ रूप आणि भव्य उंचीने भल्याभल्यांना ज्याने नामोहर केले आणि असंख्य जणांना ज्याने आपल्या प्रेमात देखील पाडले तोच हा सह्याद्री. अश्या या सह्याद्रीत देखील आपल्या उत्तूंग उंचीने आणि खडतर व बिकट वाटेने स्वत: चे वेगळेपण जपणारी अशी कळसुबाई शिखराची सह्याद्री शृंखला म्हणजे काय विचारता... इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची ही कळसुबाईची बेलाग शृंखला पुर्व पश्चिम पसरली आहे. या रांगेत अलंग, मदन, कुलंग,पारबगड, रतनगड कळसुबाई असे अनेक किल्ले शेकडो वर्षे आपले ठाण मांडुन बसलेले आहेत. सह्याद्री पर्वताची उंची याच रांगेत  सर्वात जास्त आहे. बेलाग कडे,पाताळ्स्पर्शी द-या व उध्वस्त झालेल्या वाटा यामुळे सह्यविरांना कायमच या किल्ल्यांवर जाणे आव्हानात्मक व तितकेच थरारक वाटते. याच रांगेतले अलंग, मदन, कुलंगगड हे दुर्गत्रिकूट म्हणूनच चढायला सर्वात कठीण मानले जाते. ‘भरारी’ च्या मावळ्यांचे कुलंग वर चढाई करण्याचे स्वप्न काही ना काही कारणांने आजवर बाकी राहिले होते. पण या दिपावलीच्या पूर्वसंध्येला ही नामी संधी आम्ही नक्कीच सोडणार नव्हतो. जेथे आकाश देखील ठेंगणे वाटते अश्या ‘कुलंग’ ला बिलगण्याचा बेत भरारी मधे शिजला आणि मेलामेली उरकून २५ ऑक्टो. २०१३ ला रात्रौ १२ वाजता मंडळी भेटली व विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्तवन करून आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आम्हा मावळ्यांचा प्रवास सुरू झाला किल्ले कुलंग च्या वाटेने.

प्रवासात गप्पा गोष्टी करत, डुलक्या घेत पहाटे पहाटे जाग आली ती थेट कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरत असतानाच, सत्याला शिकारीची हुक्की आल्याने (अर्थबोध होत नसेल तर सत्याशी संपर्क करावा) तिथे काही काळ थांबून  इंदोरे मार्गे आंबेवाडीला आमची गाडी पोहोचली. आंबेवाडी गावात गाडी लावून आम्ही मावळे पुढे कुलंग कडे कूच करणार असे ठरले होते. छोटेखानीच पण टुमदार अश्या अंबेवाडीत गाडीला आराम देवून आमचा वाटाड्या ‘कैलास’ ला सोबत घेतले आणि किराणा व इतर साहित्याची विभागणी उरकली. गावातूनच समोर आपल्या अलंग-मदन आणि कुलंग हे महामल्ल आम्हाला खुणावत उभे होते. ४८२२ फुट एवढी प्रचंड उंची असलेला, अंगा-पिंडानं धष्टपुष्ट असा कुलंग अगदी उठून दिसत होता. कुलंग वर चढाई करण्याकरीता आता भरारी चे मल्ल देखील आपले शड्डू ठोकून तयार होते. तूप पोळीवर ताव मारून पाणपिशव्या भरून घेत आता आंबेवाडीला पाठ दाखवून आम्ही सर्वजण त्या निसर्गाचा आस्वाद घेत आमची वाटचाल सुरू केली.
आमच्या दोन्ही बाजूला कारवीच्या दाट झाडीतून आम्ही पुढे सरकत होतो. नुकताच पावसाळा संपला असल्याने ‘कारवी’ चांगलीच माजली होती. आमच्यापेक्षा उंच झाडी सर्वत्र असल्याने उन्हाच्या झळा जाणवत नव्हत्या पण पायपीट करून घामाच्या धारा मात्र लागल्या होत्या. मधे मधे पाणवठ्यांवर थांबत आम्ही त्या कातळातून वाहत आलेल्या थंडगार पाण्यावर आमची तृष्णा भागवत पुढच्या प्रवासाला निघत होतो. २ तास जंगल तूडवल्यानंतर आता एका धबधब्याजवळ सर्वजण थांबलो. तेथे जरा पोटपूजा उरकून थोडी विश्रांती घेत असतानाच आम्ही आज येतोय या आनंदाच्या बातमीनेच जणु काही, आमच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आकाशात विमान सोडण्यात आले की काय..
असा आम्ही सवंगड्यांनी अंदाज बांधला आणि त्या विमानाची काही छायाचित्रे घेतली गेली. जरा ताजेतवाने झाल्यावर नव्या दमाने आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला होता. अजूनही तासभर जंगलातूनच आमची वाटचाल सुरू होती. पुढल्या तासात आम्हाला पहिला रॉक पॅच लागला. इथे पाठीमागे बघीतल्यावर आपण चालत आलेल्या अंतराचा अंदाज सर्वप्रथम समजला. जवळपास एका छोट्या गडाची उंची आम्ही गाठली होती. अंतर जरी बरेच कापले होते तरी समोरचा कुलंग मात्र अजुनही मान पूर्ण वर केल्याशिवाय दिसत नव्हता. येथून पुढे वाटचाल करत गेल्यावर थोडीशी कठीण अशी कुलंगवर चढणारी धार लागली. सावध पवित्रा घेवून धारे वरुन चढायला सुरुवात केली. या ठिकाणी आपल्याला काळ्या कभिन्न कातळात कोरलेल्या पाय-या लागतात, ज्या की पटकन नजरेत येत नाहीत. सुरवातीला अत्यंत छोट्या नि नजरेस न पडणा-या ह्या पाय-यांचा आकार पुढे मात्र ब-यापैकी वाढत जातो. तशी आपली वाट सुकर होत जाते. या इतक्या छोट्या पाय-यांपाशी आमचा खंदा कार्यकर्ता  ‘सत्या’ कसा काय येणार, त्याचा पाय यात कसा मावणार अशी १ शंका माझ्या मनाला चाटून गेली पण तो माझा एक गैरसमज होता हे सत्या ने दाखवून दिले.
 (खर तर या इतक्या लहान खोबणीमधे सत्याने आपला (हत्ती)पाय रोवून येणे म्हणजे ५१२ एम बी च्या पेन ड्राईव्ह मध्ये संजय लिला भंसाळी चे २ चित्रपट कॉपी करण्यासारखे होते. असो.) अजून थोडे चालून गेल्यावर १ कडक असा पॅच लागतो येथे जरा जास्त सावधान रहावे लागते. अतिशय अरूंद वाट एका बाजूला कातळ तर दुसरीकडे थेट दरी दिसते. पण सर्वजण तो टप्पा देखील पार करून आता शेवटच्या टप्प्यात आले होते. येथे गडाचा पहिला दरवाजा लागतो येथेच बाजूला अतिशय सुबक आणि स्वच्छ अश्या २ गुहा आपल्या नजरेस पडतात. त्या ठिकाणी जरा विश्रांती घेवून थोड्याश्या अवघड अश्या पाय-या पार करून आम्ही आता अवाढव्य आणि अत्यूच्य अश्या कुलंग गडावर अवतरलो होतो.

 विस्तीर्ण अश्या कुलंग गडावर रानफ़ुलांची जणू जत्राच भरली होती. श्वेतांबरा,तेरडा, निसूर्डी, नभाळी, पांडा अश्या नानाविविध फ़ुलांनी पठार गच्च भरल होत. सोनकीचे तर गालिचेच आमच्या स्वागताला पसरले होते. सोबतीला फ़ुलपाखरे  जणू अत्तरदाण्या घेवून आमच्या स्वागताला तयार होती तर भूंग्याची गुणगुण आमच्या स्वागताची सनईच असल्याचा भास क्षणभर झाला. अश्या मस्त वातावरणात मग कॅमेरांचा क्लिक-क्लिकाट झाला. दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या हाताला आपल्याला गुहा लागतात. आमचा मुक्काम तिकडे ठरला असल्याने आता आम्ही सर्वजण तिकडे प्रयाण केले. पण मुंबई वरून २५ जणांच्या एका समुहाने अगोदरच गुहेचा ताबा घेतला असल्याने आम्ही रात्री गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी असलेल्या गुहेत राहण्याचा बेत केला. आणि आत्ता येथेच चहापान उरकून गडावर भटकून येणे निश्चित केले. लगोलग भरारी ‘टी मास्टर’ विकास ने मस्त चहा आणि गरमागरम मॅगी आम्हा सर्वांसाठी बनवले त्यावर मनसोक्त ताव मारून आमची भटकंती सुरू झाली. गुहेजवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याची २-३ टाकी लागतात. ही टाकी ब-यार्पैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. यातील पहिल्या टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. या
टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे नक्कीच मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. वाडे पाहून सूर्यास्ताला खास कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे आम्ही ठरवले होते पण अचानक आलेल्या ढगांमुळे आमचा तो बेत रद्द झाला पण सूर्यास्त दिसला नाही तरिही निसर्गाने आपली जादू आम्हाला दाखवलीच. गडाचे ते विहंगम दृश्य पाहुन सर्व सामानसुमानासह आम्ही खालच्या गुहांकडे प्रस्थान केले. खालच्या गुहांमधे आता साफ़सफ़ाई करून थंडगार हवेत आमच्या गप्पांचा फ़ड जमला होता.एकीकडे गप्पा आणि दुसरीकडे रात्रीच्या भोजनाची पुर्वतयारी सुरू होती. तयारी पूर्ण झाल्यावर पाकशाळेचा ताबा सन्मानपूर्वक माझ्याकडे सोपविण्यात आला. आजचा मेनू होता मुगाची खिचडी, पापड चटणी आणि सोनपापडी. एकिकडे खिचडी शिजत होती तर तिकडे चुलीवर सुध्या ने पापड भाजून ठेवले होते. थोड्यावेळातच खिचडी रटरटली आणि त्याच्या वासाने आमचे जठराग्नी प्रज्वलीत झाले, तशी पंगत मांडली गेली आणि ‘फ़ुल्ल टू’ ताव मारला गेला. सह्याद्री च्या कुशीत बसून त्यातल्याच तळ्यांमधले ते अमृतासमान पाणी वापरून व तिथल्याच चुलींचे निखारे सा-या स्वयंपाकाची चवच बदलतात याची आज पुन्हा अनुभूती आली.

मनसोक्त ताव मारून पोटोबा शांत झाले होते. हवेत देखील आता गारवा खेळत होता. सभोवताली एकदम मस्त वातावरण होते. वरती नभांगणात ता-यांची देखील मैफ़ल सजली होती. त्यांचा लख्ख प्रकाशाने सारा आसंमंत चमकून निघाला होता. एवढ्या भव्य उंचीवर जणू त्या शेकडो तारका, नक्षत्रांच्या बैठकीतच आपण दाटीवाटीने बसल्याचा मला भास होत होता. लांबवर दिसाणारी गावे/वाड्या आता त्या तारकांच्या प्रकाशातच गाढ झोपले होते. मधेच एखादा निखळता तारा आमच्या इच्छापूर्तीचे आश्वासन देत गायप होत होता. अश्या त्या अंगावर हलका शहारे आणणारा थंडगार वारा नि आकाशात नटलेले तारांगण अश्या मदधुंद वातावरणात गड ‘जागता’ ठेवण्यास सज्ज झाले भरारी चे तानसेन. गुहेच्या दिवडीत लावलेला दिवा त्याचा मंद पण  तेजस्वी प्रकाश त्या प्रकाशात आता ‘राकेश’ नि आपले सूर आळवले आणि वातावरणात आजूनच धुंदी चढली… वा वाहवा ची दाद, टाळ्यांचा गजर, एकावर एक फ़र्माइशी आणि वन्स मोअर चा आवाज यांनी मध्यरात्र उलटली. आणि मोठ्या समाधानाने त्या गुहेतच सर्वजण निद्राधीन झालो. 

पहाटे पहाटे अक्षय ने मला जोरजोरात हाका मारून उठवले कारण, आमचा वाटाड्या कैलास ला जनावराच्या (सापाच्या) फ़ूत्कारांचे आवाज ऐकू आले आणि त्याने एकच गोंधळ मांडला म्हणून आम्ही उठून पाहू लागलो आणि सकाळी सकाळीच खळखळाटी हास्याने आमची पहाट झाली. त्याच झाल अस की काही मावळे स्लिपींग बॅग च्या आत झोपून आपल्या घोरण्याच्या कला सादर करत असताना… कैलास ला (अर्धवट)झोपेतून जाग आली आणि या अजगरांच्या घोरण्याला तो सापांचे फ़ुत्कार समजला होता. हा कार्यक्रम संपतो तो, थोड्याच वेळात लांबवर दिसणा-या कळसूबाई शिखरामागुन आपल्या भगव्या, सोनेरी छटांनी सारा आसमंत रंगवत सूर्यनारायण अवतरले आणि पाखरांचा किलबीलाटाने सार रान जाग झाल, तसा सारा माहोलच बदलून गेला. आता मावळे पून्हा एकवार गडावर हजर झाले. प्रार्तर्विधी आटोपून आम्ही आता गडाच्या पूर्वेकडे कूच केले. मदन, अलंग, कळसुबाई सारे सारे त्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघत होते त्यांना एक वेगळाच टवटवीत पणा आला होता. आळस झटकून, बलोपासना झाल्यावर,चंदनाच्या ऊटीने अभ्यंग स्नान उरकून,आई भवानीच्या आशिर्वादाचे तिलक आपल्या कपाळावर रेखून, देशरक्षणार्थ उभ्या असलेल्या मावळ्याचा रूबाब त्या कड्या शिखरांमधे दिसत होता.ते सारे सृष्टीच चैतन्य उरात साठवून आम्ही गडाच्या टाक्यांच्या समोरची दिशा पकडली आणि  एका घळीपाशी येऊन थबकलो. दुर्गस्थापत्याचा मोठा अविष्कार कुलंगच्या या घळीत पाहायला मिळाला.
 या घळीत वरील बाजूने येणार्‍या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसतो. या बांधा-याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी कोरून काढलेली आहेत. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधा-यांमधूनच एक वाट काढून दिलेली आहे या वाटेने हे पाणी वहात येते व एका गोमुखातून खाली पडून शेवटाला दरीत फेकले जाते.  केवळ अप्रतीम रचना बघताना ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे हे आमच्या लक्षात आले. आज एवढे सुंदर काम करून ज्याने आपले नाव देखील कोरले नाही हे पाहून ‘गड बघायला येवून, जाताना आपली नावे कोरून जाणा-या त्या क्षूद्र मनोवृत्तीच्या माणसांबद्दलचा माझा राग आजूनच वाढीस लागला.’ पुढे थोडा फ़ेरफ़टका करून आम्ही पुन्हा गुहेपाशी जमल्यावर भरारी चे योगगुरू श्री. सतिश निकमांकडून काही योगसाधनेचे धडे गिरवीले गेले आणि  फ़ोडणीच्या भाताचा गरमागरम न्याहरीवर आडवा हात व कडक चहा मारून आवराआवर केली गेली. आता गडाला मुजरा ठोकून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघालो.

गड उतरताना तसा कसच लागणार होता.पहिले दोन पॅच तर अगदीच व्यवस्थित उतरायला लागणार होते.एक जरी पाय चुकला तर खाली दरी आ वासुन उभी होती. सरळ उतरायला फ़ारस जमत नव्हत. कारण माझ्या पायात जरा गोळा आला होता त्यात पाठीमागे बॅग खाली टेकत होती. मग क्रॉस होऊन कातळभिंतिचा आधार घेऊन उतरण चालू केली. तर काहि कार्यकर्ते उलटे उतरत होते. एकमेकांना आवज, आधार देत सर्व कडे पार करून एकदाचे कारवीच्या रानात घुसलो आणि घसरगुंड्या करत पुढल्या तासा,दिड तासात सर्वांनी गडाचा पायथा गाठला. पायथ्यालाच एका ओढ्यामधे मग धडाधड उड्या पडल्या आणि मनाने शुद्ध असलेल्या मंडळींनी आपली शरिरशुद्धीदेखील उरकली. “नहा, धोके, चकाचक होके…” सर्वजण गाडीत बसलो आणि पुनवडी कडे मार्गस्थ झालो. गप्पा, गाणी करत वाटेत हॉटेल सर्जा मध्ये तांबडा-पांढरा रस्सा, भाकरी, शेव भाजी आणि मास वडी वर मनसोक्त ताव मारून. प्रसाद डेंगळे उर्फ़ वारे बत्तीवाले अर्थात डेंगळे तृतीय यांच्या अभिनव शोधांवर जोरदार चर्चा झाडत वेळ कसा गेला कोणाच्याच लक्षात आले नाही. कुलंग स्वारीचे (आणि डेंगळे च्या शोधांवरच्या चर्चेचे देखील ) अनेक दिवसांचे स्वप्न आज पूर्णत्वाला आले होते.  भरारी च्या मावळ्यांनी आज आकाशाला गवसणी घालण्याचा एक यशस्वी प्रयत्न पार केला होता. हाता पायांमधे वेदना, खरचटणे हे तर नेहमीचेच होते.पण आज त्या सह्याद्रीच्या कुशीत जे काही अनुभवलं जे काही मिळवल ते केवळ एक स्वप्न होतं. कुलंग वर चढाई केल्याच समाधान होत.भरारी च्या शिरपेचात आज मानाचा अजून एक तूरा खोवला गेला होता. शांतपणे गाडीत डोळे बंद करून बसलो होतो मधेच जाग आली तर महाराष्ट्रात संताच्या वास्त्यव्याने पवित्र झालेल्या देहू, आळंदी, च्या जवळून आम्ही पुण्यनगरीत प्रवेश करीत होतो त्या पवित्र भुमी जवळच होत्या म्हणूनच असेल कदाचीत पण अचानक त्या वाटेवर श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचे बोल आठवले आणि मन समाधान पावले…. “याच साठी केला होता अट्टाहास !”

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.                                                                                                                                    ९८२२८७७७६७






मार्ग :- पुणे-नारायणगाव-संगमनेर-भंडारदरा-बारी-ईंदोरे-अंबेवाडी
पाण्याची सोय :- गडावर मुबलक पाणी आहे पण वाटेतल्या प्रवासात पाण्याचा भरपूर साठा असणे अत्यावश्यक.
लागणारा कालावधी :- अंबेवाडीतून सुमारे ४-५ तास.
  
इतर छायाचित्रांसाठी :- https://picasaweb.google.com/111727050074656731618/Kulang2627Oct2013?feat=email

https://plus.google.com/photos/116885383589105899440/albums/5940068771074651201


https://plus.google.com/photos/105098712578296142266/albums/5940103945063919681?authkey=CK7H1v3h5cKqXg

मोहिमेतील सहभागी मावळे :- सतिश सुर्यवंशी (सत्या), सतिश निकम (रॉकेल), राकेश जाधव (राक्या),अक्षय बोरसे (नथूराम), सुधीर जुगधर (सुध्या), अमित पानसरे (पेढ्या), विकास पोखरकर (कात्या), प्रसाद डेंगळे (वारे बत्तीवाले, डेंगळे तृतीय) अमोद राजे (सेनापती), निलेश वाळिंबे (वाळ्या)