Wednesday, August 13, 2014

॥ श्री अमृतेश्वर मंदिर.. मोहरी ॥

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे हे पुणे शहर आणि त्याच्या आसपासचा परिसर. महाराजांची पहिली राजधानी किल्ले राजगड ही देखील पुणे जिल्हातच. थोडेथोडके नव्हे तर तब्बल पंचवीस-तीस पेक्षा जास्त किल्ले आज पुणे जिल्हात अभिमानाने इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभे आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाण्या-या या पुण्यनगरीस केवळ किल्लेच नव्हे तर अनेक प्राचीन मंदिरांकरीता देखील ओळखले जाते. अश्या या पुण्यापसून सुमारे ४५ कि.मी. असलेल्या गुंजण मावळच्या खो-यात आणि छत्रपती श्री. शिवरायांच्या चरणस्पर्शाने ज्या गावाचे सोने झाले ते माझे गाव ‘मोहरी’ म्हणजेच महुरी बुद्रुक. या माझ्या गावामधल्या अतिप्राचीन मंदिराबद्दल माहिती सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.
हेमाडपंथी शैलीच्या बांधकामाचा उत्तम नमूना असलेले श्री अमृतेश्वराचे यादव कालीन मंदिरा करिता प्रसिद्ध असलेले  गाव म्हणजे मोहरी. सूमारे ४०० ते ५०० ऊंबरा असलेले छोटेखानी,  शहराच्या अगदीच जवळ पण आधुनिकतेच्या रेट्यात आजदेखील आपल गावपण जपून मोठ्या थाटात वसलेले आहे. पूर्वी “महुरी बुद्रुक” अशी नोंद असलेल्या नावाचा पुढे अपभ्रंश होत आज ‘मोहरी’ या नावाने ते ओळखले जाते.गुंजवणी व शिवगंगा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेला हा गाव म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान.          
             
 पुणे-सातारा महामार्गावरून कात्रज-शिवापूर-चेलाडी-कापूरहोळ ओलांडल्यावर उजव्या हाताला भोर फ़ाटा लागतो.त्याला वळून भोर कडे जाताना शहरी जीवनातून बाहेर पडत, ग्रामीण शैलीच्या, हिरव्याकच्च रानात आपल प्रवेश होतो. दोन्ही बाजूला लांबवर पसरलेली हिरवीगार शेते, वृक्षराई आपल्या मनाला एकदम प्रसंन्न करतात. समोर आडव्या पसरलेल्या सह्याद्री च्या शृंखलेत राजगड, तोरणा, रोहिडा, रायरेश्वर,केंजळगड असे अनेक किल्ले इतिहासाची साक्ष देत उभे असतात. तर पाठिमागे पुरंदर, वज्रगड आपल ठाण मांडून बसलेले दिसतात.
नागमोडी रस्त्याने आपला प्रवास सुरू होतो आणि आपण गुंजवणी नदीवर बांधलेल्या पुलावर पोहचतो. तो ओलांडला की कासुर्डी गावाच्या बस थांब्याला उजवीकडे वळण घेताच आपण निसर्गाच्या आणि सह्याद्रीच्या आणखीनच कुशीत घुसल्याचे जाणवू लागते."खुणा गावच्या दिसू लागल्या दूर अंतराहुनी । अंतरी हर्ष येई दाटुनी ॥" या कवितेच्या ओळींचे आपोआप गुंजन केले जाते. दुतर्फ़ा झाडी, काळ्या आईची मशागत करण्यात रमलेले शेतकरी,त्यांची काळी कसदार जमीन,  शेणाने सारवलेल्या अंगणातील ती कौलारू घरे, गळ्यात घंटा बांधून आपल्याच नादात त्यांचा मंजूळ आवज करत बागडणारी गुरे वासरे, पाण्याचे लहान मोठे पाट,शिवरायांचे वास्तव्य ज्या भूमीत सर्वात जास्त राहिले त्या डोंगर द-यात हिरवाईचे शालू लपेटून नटलेली सह्याद्री ची रांग या सगळ्यांचा आस्वाद घेत आपला प्रवास सुरू असतो.गावरान मनाचा एक वेगळाच ‘श्वास’ मग आपल्या मनाला भिडू लागतो. याच रस्त्याने सुमारे २ कि. मी. पुढे गेल्यावर आपण मोहरीत दाखल होतो. व्यसनमुक्त गावाचा सन्मान लाभलेले हे गाव खूप मोठे नसले तरी स्वत: चे वेगळेपण जपत आज अभिमानाने उभे आहे. 



याच गावातील ‘अमृतेश्वराच्या’ नावाने प्रसिद्ध स्वयंभू असे देखणे शंकराचे अतीप्राचीन मंदिर आजदेखील भक्तांच्या अलोट गर्दीने वाहत आहे. पुरातन असलेल्या येथील अमृतेश्वर मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. तसेच शिवकाळातील या गावाचे व मंदिराचे महत्व देखील नक्कीच ‘दखल’ घेण्याजोगे आहे.
हैबतराव शिळिमकर (मुळचे शिंदे) हे महाराजांचे सरदार यांच्याकडे १२ मावळापैकी ‘गुंजण मावळाची’ सुभेदारी होती त्याकाळी त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या काही नोंदी आढळतात. पुढे इनामदारांपैकी श्रीमंत नारायण बाबूराव वैद्य हे पेशव्यांतर्फ़े नागपूरकर भोसल्यांकडे वकील होते त्यावेळी १७६३ च्या श्रावण महिन्याच्या सुमारास देवाल्याच्या शिखराच्या अस्तगिरीचे काम पूर्णत्वास नेल्याचा उल्लेख एका पत्रात मिळतो. तसेच मंदिरासाठी सहा सेवेकरी नेमण्यात आले होते त्या ब्राम्हणांपैकी ‘कै. श्री. शिवराम बल्लाळ वाळिंबे’ व ‘कै. श्री. हरभट पुरोहित’ यांनी गावोगाव भटकून वर्गणी गोळा करून सन १९०५ साली मंदिरापुढे लाकडी सभामंडप उभारला  व उत्सव मंडळाने भक्तगणांसाठी १९३५ साली धर्मशाळा बांधली असे देखील दाखले आहेत. सध्या आपण पाहतो तो सन २००० साली गावकी ने लोकवर्गणीमधून लाकडी मंडप उतरवून त्या ठिकाणी सिमेंटचा मंडप घातलेला आहे. शिवकालात महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावात श्री. शिवाजी महाराज आणि श्री. दादोजी कोंडदेव हे अमृतेश्वर मंदिरामधे जवळपासच्या गावातील अंतर्गत तंटे सोडवून न्यायनिवाडा करण्यासाठी बैठका घेत असे सांगितले जाते. तसेच “सुभेदार सर्जेराव मांग” यांना मावळातून रायगडावर एक महाप्रचंड तोफ़ घेवून जाण्याची जबाबदारी देखील याच मंदिरात सोपविण्यात आली. इतकेच नव्हे तर, शिवरायांच्या काळातील पानसे आणि गावखंडेराव या दोन घराण्यातील कुळकर्णी वतनाचे भांडणात खरेखोटे ठरविण्यासाठी राजांच्या आदेशाप्रमाणे याच मंदिरात शके १६९० मध्ये “दिव्यप्रयोग” झाल्याचा उल्लेख देखील पानसे घराण्याचा इतिहास आवृत्ती पहिली सन १९२९ या पुस्तकात आढळतो. अश्या त्या शिवशंभो च्या वास्तव्याच्या ठिकाणी तमाम मराठी मनाचे दैवत साक्षात श्री. छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ‘अमृतेश्वर’ मंदिराची रचना व परिसर देखील फ़ार सुरेख व देखणा आहे. 



अमृतेश्वर मंदिरामागून १ ओढा वाहता असून ओढ्याकाठी चिरेबंदी बांधणीची तीन विलोभनीय तळी आहेत. पावसाअभावी नदी नाले कोरडे पडून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते त्या वेळी देखील आजवर या तळीतील पाणी आटलेले नाही. अवीट गोडीचे पाणी असलेल्या या शेकडो वर्षापुर्वीच्या तळ्यांवरच सध्या विद्युत मोटारी बसवून गावाला पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान शमविली जाते. मंदिरापुढे सुंदर वनराई असून एका छोटेखानी कमानीचे प्रवेशद्वारातून आपण मंदिर परिसरात जातो. आत गेल्यावर आपल्या डाव्या हाताला एक प्राचीन, सुबक अशी ‘दिपमाळ ’ आपले लक्ष वेधून घेते. तिचे निरीक्षण करून समोर दिसणा-या मूळ मंदिराकडे प्रस्थान केल्यावर मंदिराची विभागणी एकूण तीन भागात केलेली आपणास आढळते. सर्वात प्रथम आपणास शंकराचे वाहन ‘नंदी’ याचा मंडप दिसतो. दगडात घडवलेली नंदीची रेखीव मूर्ती तिच्या भव्यतेमूळे आपल्याला आकर्षित करते. नंदीचे दर्शन घेवून आपण संपूर्णपणे कातळात कोरलेल्या यादवकालीन मंदिराच्या सभामंडपी प्रवेश करतो. चार मोठ्या खांबावर उभ्या असलेल्या सभामंडपात प्रवेश करताच, शिवमंदिरी अनूभवली जाणारी शांतता आणि हवेतील गारवा आपणास जाणवल्याशिवाय रहात नाही.एका भल्या मोठ्या घंटेला मग आपण स्पर्श जरी केला तरी शेकडो आवर्तने घेणारा तिचा तो सुंदर नाद आपल्या कानात साठवत असतानाच मंदिरात दोन्ही बाजूंना असलेल्या दोन सूबक दिवड्या आपल्या नजरेस पडतात.गाभा-याच्या मध्यभागी ६० से.मी. * १०० से.मी. आकाराचे पक्षीरूपी प्रकारातील “द्वि शरभांसह युद्धरत पक्षीदेहदारी गंडभेरूंडाचे” पाषाणात कोरलेले चित्र नजरेस पडते. या चित्रात महाकाय द्विमुखी पक्षी दोन शरभांशी झुंज देत आहेत पण यात कोणीही जेता किंवा जीत दाखवलेला नाही हे विशेष. पुढे समोरच गाभा-याच्या बाहेर उजव्या बाजूस पूरातन श्री महिषासूरमर्दीनी तसेच शिवपार्वती अतिशय कोरीव आणि सुबक मूर्त्या नजरेस पडतात तर डाव्या बाजूला श्री गणेशाची शेंदूर लावलेली मूर्ती विराजमान झालेली दिसते. गाभा-यात प्रवेश करताना आपणास उतरून तळात जावे लागते. प्रशस्त सभामंडपातून अंतराळात प्रवेश केल्यावर गाभा-याच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूच्या खांबांवर पारंपारीक पद्धतीची सूबक शिल्पे कोरलेली आढळतात.त्यात… 

भगवान शंकराने धारण केलेल्या काल्पनिक पशूचे रूप म्हणजे “शरभ” हे चित्र ब-याच शिवमंदिरात व गडांवर आढळणारे येथेदेखील नजरेस पडते. या शरभ संकल्पनेबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. शिवाचा नि:सीम भक्त म्हणून ओळखल्या जाणा-या ‘हिरण्यश्यपूच्या’ वधा पश्चात नर-सिंहाने जनतेला देखील त्रास देण्यास सुरूवात केली. त्याने मोठ्या प्रमाणात उत्माद केला.त्याचा नाश करण्याकरिता स्वत: शंकराने पशू, पक्षी व नर यांच्या एकत्रीत शक्तीचे रूप धारण केले व नरसिंहास धडा शिकवीला. तेच रूप हे ‘शरभ’ नावाने संबोधले जाते.त्या शरभाच्या शिल्पात देखील खूप विविधता आढळते. एकूण २९ प्रकारांत गणल्या जाण्या-या शरभ आकृत्यांपैकी एक अतिशय देखणे आणि महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर (उदा: शिवनेरी-हत्ती दरवाजा,सिंहगड-कल्याण दरवाजा व पुणे दरवाजा,लोहगड-नारायण व हनुमान दरवाजा,प्रतापगड-दुसरा व तिसरा दरवाजा,रोहिडा- दुसरा व तिसरा दरवाजा,सोलापूरचा किल्ला,उद्गीरचा किल्ला, पुरंदर-बालेकिल्ला तिसरा दरवाजा) आढळणारे असे “पंखविहीन केवल शरभ” आपणास या मोहरी येथील अमृतेश्वर मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करताना डाव्या बाजूच्या खांबावर  कोरलेले दिसते. त्याच्या खालचे शिल्प हे पुरूषविग्रह अर्थात अर्धमानवी (Anthropomorphic) प्रकारातील अतिशय दुर्मिळ समजले जाणारे “द्विगज विजयी अर्धमानव देहधारी गंडभेरूंडाचे” चित्र नजरेस पडते. या शिल्पाकृतीस तैलरंगाचे लेप फ़ासल्यामुळे आज आपणास त्याची सुबकता फ़ार निरखून पहावी लागते. एका द्विमुखधारी पक्ष्याने आपल्या दोन्ही हातात साप पकडलेले असून, पायातही प्रत्येकी एक असे दोन हत्ती पकडलेले आहेत. त्याच्या मागील बाजूस पंख आणि पोटापाशी मानवी मस्तक दर्शविलेले आहे. कटीवस्त्र परिधान केलेल्या या रेखीव चित्राची आपणच मूर्खपणाने केलेली दुरावस्था पाहून मन विशण्ण होते.येथेच आपणास “अव्याळ” शिल्प देखील आढळते.तर छत आणि खांब हे महाराष्ट्रातील इतर प्राचीन मंदीराप्रमाणे सूबक कोरीवकाम केलेले दिसतात. या प्राचीन मंदीराचा  मंदिरातील स्वयंभू शाळूंका विरहीत शिवपिंडी म्हणजे शिवभक्तांचे श्रद्धास्थान. या शिवपिंडीवर सहसा
आढळणारी शाळूंका नसून त्यावर “गोपद्माचे” चिन्ह आहे.अतिशय सुरेख आणि अप्रतिम अश्या शिवपिंडी पुढे आपण मनोभावे नतमस्तक होतो. आपण नमस्कार करून उठताच पिंडीच्या मागच्या बाजूला असलेल्या कोनाड्यात आपोआपच आपले लक्ष वेधले जाते.बघताक्षणी मन मोहून टाकणारी, सुबकता, सुंदरतेच्या सर्वात उकृष्ठ नमूना असलेली. अत्यंत प्राचीन, रेखीव 

आणि अपार कष्टाने कोरीव काम करून घडवलेली “श्री विष्णू-लक्ष्मी” मूर्तीची आपणास भूरळ पडते.चोरीचा प्रयत्न करीत असताना न निघालेल्या ही अतिप्राचीन मूर्ती म्हणजे कलेचा उत्तम नमूनाच होत. असे ऐकीव आहे की याच गाभा-यातून एक तळघरात जाणारा रस्ता होता पण कालांतराने तो आता लूप्त झालेला असल्याने दिसत नाही. स्वत: अमृतेश्वर रात्रौ या ठिकाणी विश्राम करतात अशी भाविकांची श्रद्धा असल्या कारणाने आज देखील अनेक वर्षे या ठिकाणी रोज रात्री भक्तिभावे त्यांचा बिछाना घातला जातो. मंदिरातून बाहेर पडून आपण आता प्रदक्षिणा मार्गावर येतो.मंदिराच्या बाहेरील बाजूने देखील आपणास सुबक असे कोरीवकाम नजरेस पडते, मंदिराच्या भिंतींना बाहेरून देखील शरभ, गंडभेरूंडाची विविध रूपे कोरलेली आढळतात.  प्रदक्षिणा पूर्ण करून आपण मंदिराच्या डाव्या बाजूला पोहचतो, त्या ठिकाणी सुंदर असे गोमुख आढळते. त्याच्याच बाजूला “गजजेता शरभाचे” कोरीव शिल्प आपण पाहू शकतो.तसेच कळसावर देखील विविध देवदेवतांच्या सुंदर आकृत्या कोरलेल्या दिसतात.मुख्य मंदिराच्या आवारातच आपणास तुळशी वृंदावन पहावयास मिळते व छोटेखानीच देवीचे आणि मारूतरायाचे मंदिर देखील दृष्टीस पडते.

या मंदिरातील शिवपिंडीचा इतिहास देखील फ़ार वेगळा असून त्याची कथा रोचक वाटते. पुर्वीच्या काळी गावात राहणारा एक कोळी नित्यनियमाने आपली गुरे घेवून नदीकाठावर (संगमावर) चरायला जात त्यावेळी त्याची एक गाय एका ठराविक जागी नेहमी आपल्या ‘दुधाची धार’ देत असे  ही गोष्ट त्या कोळ्याच्या लक्षात आली म्हणून त्याने त्या ठिकाणी शोध घेतल्यावर त्याल तिथे दोन पिंडी आढळल्या. त्यातील एक पिंड त्याने काढण्याचा प्रयत्न केला पण ती त्याच्याकडून काही हलेना. त्या रात्री त्याला अमृतेश्वराने स्वप्नात येवून दृष्टांत दिला की, ‘तुझ्याकडील या गाईचे जे खोंड (बैल) आहे त्याच्या मदतीने ही पिंडी बाहेर काढ’. त्याप्रमाणे प्रयत्न करताच ती पिंड त्या जागेवरून काढण्यास त्याला यश आले. ती काढलेली शिवपिंडी ज्यावर त्या गाईचे पाउल उमटले होते ती त्याने या मंदिरामधे आणून ठेवली. त्यावेळेपासून कोळी समाजाला या मंदिरात मोठा मान दिला जातो. सापडलेल्या पिंडीच्या त्या मूळ जागेवर (संगमावर) पाणी नसेल त्यावेळी आपणास आजदेखील ती राहिलेली दुसरी पिंड पाहण्यास मिळते. असे जाणकार सांगतात. 

शंकराचा प्रमुख समजला जाणारा महाशिवरात्र उत्सव देखील येथे यथासांग पार पडतो. पूर्वापार चालत आलेल्या पद्धतिनुसार गावातील ब्राम्हण कुटुंबियांकडून हा महाशिवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो जात-पातीचे राजकारण बाजूला सारून त्या उत्सवात देखील ग्रामस्थ मंडळी यथाशक्ती सहभागी होतात. शेकडो वर्षे चालत आलेल्या या उत्सवाची कथा देखील मोठी रंजक आहे.
मोहरी हे गाव वाईचे वैद्य यांस शाहू महाराज यांनी सन १७४२ साली इनाम म्हणून दिल्याचे दाखले आहेत. पुढे १८१३ साली पूजाअर्चेची नीट व्यवस्था चालावी म्हणून वैद्य यांनी सहा वेगवेगळ्या ब्रांम्हणांस या ठिकाणी घरे बांधून दिली आणि एका सेवेकरी ब्राम्हणाने दुमासे सेवा करण्याची सनदेत शर्त घातली गेली.त्या बदल्यात त्यांना भोर संस्थानातर्फ़े काही मुशाहिरा मिळत असे.अश्या या देऊळवाड्यात राहणा-या कुटुंबांपैकी एक श्री. केळकर यांना श्री अमृतेश्वर महादेवाचा दृष्टांत झाला आणि त्याच्या आदेशाप्रमाणेच सुमारे शंभर, सव्वाशे वर्षापूर्वी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. यात देऊळवाड्यातील ब्राम्हण त्यांचे आप्तस्वकीय मोठ्या आनंदाने सहभागी होत. पुढे जवळपास सर्वजण उपजिवीकेसाठी गाव सोडून बाहेर गेली. तरी आज खास उत्सवाच्या दिवसात केवळ श्रद्धेपोटी, प्रेमापोटी या आर्थिक धकाधकीच्या आयुष्यात सलग तीन दिवस नि:स्वार्थी भावनेने सर्वजण मित्रपरिवारासह त्या ठिकाणी वेळात वेळ काढून हजर राहतात व संपूर्ण उत्सव यथासांग पार पाडतात. त्याचबरोबर चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुडीपाडवा व त्रिपुरारी पोर्णिमा या दोन दिवशी गावकरी आणि भक्तमंडळी मोठ्या आनंदाने मंदिरी दाखल होतात त्यावेळी गावात मोठी जत्रा भरविली जाते.    

         
नवे कपडे,विद्युत रोशणाई, फ़टाक्यांची अतिषबाजी,खेळणी,मिठाई वाटप,रेवड्या-भेळेचे ठेले यांनी गावाला एक वेगळाच रंग आलेला असतो.अबाल-वृद्धांची गर्दी,चिल्ल्यापिल्ल्यांच्या दंग्याने गावाचे वातवरणच बदलून जाते. मंदिरापुढे सर्व गावकरी असंख्य पणत्या दिवे लावून मोठा ‘दिपोत्सव’ साजरा करतात.वर्षात येणा-या प्रत्येक सोमवती अमावस्येला श्रध्येपोटी देवाला पालखीत बसवून, भजन म्हणत मोठ्या थाटामाटात गावच्या ‘संगमावर’ स्नानासाठी आजही मोठ्या भक्तिभावाने घेवून जातात. अश्या या माझ्या लाडक्या गावात आपण देखील एकदा आवश्य भेट द्या ! आणि निसर्गाची लयलूट असलेल्या तसेच यादवकालीन शिल्पस्थापत्याचा उत्तम नमूना असलेल्या ‘अमृतेश्वर’ मंदिरास येवून त्याच्या दर्शनाने येण्या-या अनुभवाची प्रचिती घ्या व त्या अद्न्यात कलाकारांच्या कलेला अवश्य दाद देवून अभिवादन करा…बाकी काही नाही पण अविस्मरणीय यादवकालीन हेमाडपंथी सुरेख मंदिर, ज्यांच्यात आजही माणुसकी दिसेल अशी माणसे आणि बालकवींच्या कवितेतील या ओळी तरी तुमच्या नक्कीच लक्षात राहतील यात शंका नाही. 

                                                        ऐलतटावर पैलतटावर, हिरवाळी घेऊन
                                                        निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटातून 
                                                        चार घरांचे गाव चिमुकले ऐलटेकडीकडे
                                                      रानमळ्यांची दाट लागली, हिरवी गर्दी पुढे...



भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच),

निलेश गो. वाळिंबे              

९८२२८७७७६७ 

Sunday, April 13, 2014

बाळाचे आगमन एक अविस्मरणीय अनुभव.

आता लग्न झालय आतातरी स्वत: ला बदला… जरा जबाबदारीने वागा !
आता बाप होणार आहात आतातरी बदला… जरा जबाबदारीने वागा !
ही असली वाक्ये आता ऐकून चोथा झाली आहेत खरतर, त्यांच आता काहीच वाटत नाही म्हणून ’कोडगे’ हि उपाधी देखील पटकवून झाली आहे. तरीदेखील जबाबदारीची जाणीव म्हणजे नक्की काय आणि ती कशी असली पाहिजे हे अजून तरी मला उमगले नव्हते. पण अत्यंत आनंदाबरोबरच  अचानक जाबाबदारी/काळजी असल्या शब्दांच्या जवळ जाणारी एक ’भावना’ मला त्या दिवशी जाणवली. बाळाच्या आगमनाची चाहूल लागली तेव्हाच सा-या घरी आनंदाच वातावरण झाल होत व त्याची तयारी देखील सुरू झाली होती. सौ. ना डॉ. कडे चेकअपसाठी घेवून जाणे, वेळोवेळी करावी लागणारी सोनोग्राफ़ी हे सगळ तर आता सौ. आणि माझा नित्यक्रम झाला होता. डिलेव्हरी ची तारीक १३,१४ एप्रील असल्याने तसा आजून आठवडा शिल्लक होता, त्यामूळे आज देखील फ़क्त साप्ताहीक तपासणी ला आलो होतो. तपासणी झाली आणि डॉ. साहेबांनी पून्हा केबीन मधे बोलवून घेतले. ’बाळाची वाढ पूर्ण झाली आहे पण डोक अजूनही वरच्या बाजूलाच आहे आणि पोटातल्या पाण्याची पातळी त्या मानाने खूपच कमी झाली आहे. एकंदरीत पाहता नैसर्गीक प्रसूती होणे जरा अवघडच आहे, लवकरात लवकर आपण ‘सिझर’ केलेले बरे.’ डॉ. चे बोलणे पूर्ण होईपर्यंत सौ. च्या चेह-यावर जरा काळजीची छटा दिसली आणि माहित नाही पण त्या काळजी ची भावना मलाही नकळत जाणवली. घरी बोलून फ़ोन करतो असे सांगून आम्ही दवाखान्यातून बाहेर पडलो.घरी आल्यावर सर्वांशी चर्चा झाली आणि अगदी पुढचाच म्हणजे ८ एप्रील २०१४ हा ’रामनवमी’ चाच दिवस पक्का करण्यात आला. लगोलग डॉ. ना फ़ोन करून पुढील तयारीची विचारपूस करून घेतली आणि तयारी पूर्ण केली.
सौ. ची काळजी तर आता तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. मलाही तशी काळजी वाटत होती पण आपल्याला असलेली चिंता न दाखवता तीची काळजी दूर करणे आवश्यक असल्याने तिला आधार देणे आता सुरू होते. आजची रात्र, फ़क्त आजची रात्र आणि उद्या.... उद्या मी ’बाप’ बनणार होतो. रात्रीची झोपदेखील मला फ़क्त उद्याचीच स्वप्ने दाखवत होती. एरवी ढाराढूर घोरत पडणारा मी सकाळी काय होईल, सगळ व्यवस्थीत पार पडेल न, फ़ार त्रास तर नाही होणार ना हिला, होणारे बाळ कसे असेल, मुलगा का मुलगी ? अश्या अनेक प्रश्णांनी मनात केलेल्या गर्दीमूळे निटसा झोपू शकत नव्हतो. पण उत्तर मात्र या कशाचेच सापडत नव्हते. सौ. ना देखील काहिच विचारता येत नव्हते. फ़क्त “सर्व काही व्यवस्थीत पार पडेल, तू काही काळजी करू नकोस” या एकाच आधारावर ती आज झोपी गेली होती. लहानपणी शाळेच्या ट्रीप ला जायच्या आधल्या रात्री जशी झोप लागता लागत नसे अगदी तशीच अवस्था आजदेखील होती. उद्याचा उगवणारा सूर्य माझ्यासाठी नेहमीसारखा नसून काही वेगळा होता हे मला जाणवत होते.
आज रामनवमी होती. सकाळीच उठून रामरायचे स्मरण कधी नव्हे ते न चूकता केले. सकाळची पोटभर न्याहरी उरकून सूनबाईंच्या हातावर दही देण्यात आले आणि आम्ही निघालो.पुढच्या काही तासात माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण माझ्यासमोर येणार होता.कदाचीत मला जबाबदारीची जाणीव करून देणारा तो क्षण आता अगदी समीप येवून थांबला होता.एका बाजूला होणारा आनंद आणि दुसरीकडे वाटणारी थोडी काळजी या दोन्हीची सांगड घालणे मनाला तितकस जमत नव्हत.पण आनंदाच्या क्षणांची चाहूल देखील एक वेगळाच आनंद घेवून येते याची आज पहिल्यांदाच प्रचिती येत होती. चक्कपणे कोणतिही गडबड न करता मी शांत होतो. दवाखान्यात डॉ., नर्सेस यांच्यां बोलण्याकडे बारीक लक्ष देत होतो, दीर्घ श्वास घेत सगळ सुरळीत पार पडेल अस स्वत:च्या मनाला पटवत होतो.उगाचच आपल्यावर फ़ार मोठी जबाबदारी आहे ही भावना आज प्रथमच नकळपणे मला जाणवत होती. पण एकीकडे होणा-या आनंदाला दुसरीकडे काळजीची एक छोटी किनार होती कारण आता तिला शस्त्रक्रियेकरता आत नेले होते. गेले काही महिने एकेक करत मोजत असलेले दिवस आठवू लागले, घरातल्या जेष्ठांनी कैक महिने अगोदर पासून सुरू केलेली तयारी आठवली. आमची पहिली भेट, लग्नात रूपांतरीत झालेल आमच प्रेम, त्यासाठे केलेले खटाटोप हा सगळा प्रवास डोळ्यांसमोर तरळून गेला. लग्नानंतरचा तो प्रत्येक क्षण आता आठवत होता, ज्यात दडलेल्या भावना कळतनकळत आजच्याच दिवसाची वाट बघत होत्या. पुढच्या काही मिनीटांतच आमच्या नात्याला कायमस्वरूपी घट्ट करणारी आणखी एक ‘वीण’ साक्षात परमेश्वराने बांधयला घेतली होती. मी बाबा बनणार होतो. घरातले सर्वजण शांत बसलेले बघून मी पण शांतच असल्याचे भासवत होतो पण मनात ’सध्याच्या या क्षणांची काळजी आणि येणा-या क्षणांची एक अनामिक ओढ होती.’एकीकडे हिला फ़ार त्रास तर होत नसेल ही काळजी तर दुसरीकडे येणा-या नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल मला शांत बसू देत नव्हती. दवाखान्याच्या व्हरंड्यात माझ्या येरझ-या सुरू होत्या नव्हे त्या जरा वाढल्याच होत्या.आणि अचानक तो क्षण समोर आला.

आतून एक नर्स एक गोजीरवाण रडणार बाळ घेवून बाहेर आली आणि माझ्या समोर धरत ’मुलगा झाला’ अस म्हणाली. खर सांगायच तर त्या नंतरच्या २ मिनीटात काय झाल हे मलाच आठवत नाही. मी हवेत होतो का जमिनीवर हे देखील मला समजले नव्हते. काही क्षणापूर्वी या जगात आलेल तान्ह बाळ मी प्रथमच पहात होतो. आणि ते बाळ माझ आहे या गोष्टीचा आनंद आता गगनात मावत नव्हता. नाळेपासून वेगळ्या केलेल्या त्या गोंडस जिवाची ‘नाळ’ आता माझ्याशी, माझ्या जीवनाशी, माझ्या आयुष्याशी बांधली गेली होती... अगदी कायमची ! केवळ काही निमिटे वय असलेला माझा मुलगा साक्षात माझ्या समोर दिसत होता. शब्दात व्यक्त न करता येणा-या त्या आनंदात मला आता ‘तिची’ खूप प्रकर्षाने आठवण येत होती. कधी एकदा ती समोर दिसतीये आणि माझा हा आनंद द्विगुणित होतोय अस मला झाल होत. तिच्या प्रतिक्षेने अता मी पुरता बैचैन झालो होतो. तिची प्रकृती कशी असेल याची काळजी होती. थोड्याच वेळात तिला देखील बाहेर आणल गेल. शस्त्रक्रियेची वेदना जरी शरीराला होत असली तरी मातृत्वाचे ते सुख मी तिच्या डोळ्यात बघत होतो, अनूभवत होतो. दोघांनाही सुखरूप बघून मला जे समाधान आणि आनंद मिळाला तो शब्दात सांगणे माझ्यासाठी केवळ अशक्य असल्याने मी शांतपणे त्या दोघांनकडे एकवार बघीतले आणि इतकावेळ त्या आनंदा बरोबर जी काळजी, हुरहूर, चिंता लागून होती ती एकदाची निघून गेली आणि मागे राहिला होता तो केवळ आनंद, अत्यांनंद, उत्साह आणि समाधान. त्या समाधानाच्या क्षणी कुण्या लेखकाचे कुठेतरी वाचलेले ते वाक्य अचानक आठवले आणि आज प्रथमच मलाही त्या वाक्याचा ‘प्रत्यय’ आला... “कोण म्हणत फ़क्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला बाप पण हळुहळू सुटत असतो !”  

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे