Monday, March 20, 2017

सिंगापूर आणि आग्या नाळ


२०१६ वर्षाअखेर ट्रेक ठरल्याप्रमाणे जबराच झाला पाहीजे हा संकल्प भरारी च्या मावळ्यांनी सोडला आणि किल्ला न करीता २ तगड्या नाळा ३१ डिसे. २०१६ आणि १ जाने. २०१७ अश्या पुर्ण करण्याचे ठरविले. महाराष्ट्राच शक्तिपीठ दुर्गदुर्गेश्वर रायगडाभोवताली फ़ेर धरलेल्या बोराटा, बोचघोळ, फ़डताळ, शेवत्या, मढे, उपांडे, आग्या, सिंगापूर अश्या अनेक उदंड घाटवाटांपैकी सिंगापूर नाळीतून उतरून आग्या नाळेने पुन्हा वर चढण्याचे नक्की झाले. 
ठरल्याप्रमाणे ३० डिसे. ला संध्याकाळीच मंडळी कात्रजला जमली. पण (नेहमीप्रमाणे) ऐन वेळेला मला निघण्यास थोडा उशीर होत असल्याने मी आणि बिक्या मागाहून दुस-या गाडीने येतो तुम्ही पुढे व्हा असा संदेश पाठवला व तयारीला लागलो. ५ वाजता १५ मिनीटात येणारा बिक्या बरोब्बर ७ वाजून १५ मिनीटांनी नारायण पेठेत पोहचला. त्यामुळे पटापट किराणा उचलून आम्ही कूच केले थेट 'सिंगापूर' च्या दिशेने.मात्र प्रचंड वाहतूक असल्या कारणाने आम्हाला कात्रज गाठेस्तोवरच जवळपास ८.३० झाले होते, त्यापुढे १ वडापाव ब्रेक घेवून गर्दीतून वाट काढत आम्हाला पुणे- कात्रज - चेलाडी फ़ाटा - नसरापूरमार्गे 'वेल्हे' या गावी पोहचायला जवळपास १० वाजत आले होते. तोवर बाकीच्या मंडळींनी मटण भाकरीवर चांगलाच ताव मारून आपला पोटोबा शांत करून घेतला होता व आमच्यावर मनसोक्त शिव्या हासडून मन देखील भरून घेतले होते.पटापट जेवण उरकून बिक्याची गाडी वेल्ह्यातच लावण्याचे ठरवून बोरसे व राजेंच्या 'नव्या को-या' गाडीतून आमच्या प्रवास सुरू झाला.मढे घाटाच्या अलीकडून उजव्या हाताचा फ़ाटा घेत आता आम्ही मावळे सह्याद्रीच्या कुशीत शिरलो होतो. घाटवळणाच्या रस्त्यावरून आता फ़क्त आमच्याच दोन गाड्यांचे धुराळे हवेवर उडत होते.चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात गप्पा मारत हारपूड गाव ओलांडून केळद खिंडीतून आम्ही तासाभरात चक्क 'सिंगापूर' गावात 'लॅंड' झालो ते देखील विदाऊट विझा.जेमतेमच वस्ती असलेल्या सिंगापूर गावाच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या श्री. पोटे मामांच्या झापापाशी पोचून मामांना आवाज दिला व आल्याची खबर देत आमचे तंबू ठोकले.
३१ डिसे. २०१६ रोजी गाईंच्या हंबरण्याने आणि काहिंच्या घोरण्याने आमची रम्य पहाट उजाडली व कोरडा खाऊ खावून लगोलग नाळ उतरण्याच्या निर्णय झाला. तेवढ्यात, "खालच्या वाडीतून काल रातच्याला बिबट्या ने शेरडू पळवीलय" ही वार्ता घेवून वाडीतील एक मुलगी धडकली आणली आणि प्रार्तविधींना आपोआपच गती आली. तोंड खंगाळून कोरड्या खाऊवर न्याहरी उरकली गेली व पाठपिशव्या तयार झाल्या. तेवढ्यात गावातील बंदूकधारी लोकांच्या परवान्यांची अंतीम तारीख बघण्याचे काम पोटे मामांनी माझ्या गळ्यात मारले व सरकारी अधीका-याच्या अविर्भावात मी देखील ते काम चोख पार करून तयार झालो. भरारीची मंडळीना आता पोटे मामा त्यांची दोन कुत्री आणि मामांची बंदूक असे सर्वजण सेनापती म्हणून लाभले होते आणि मावळे आता सिंगापूर नाळ उतरून थेट कोकणात उतरण्यास सज्ज झाले होते.
गावामागे खालच्या अंगाला असलेली काही शेतं ओलांडून गावाच्या उजवीकडे असलेल्या टेकडीच्या पोटातील कारवीच्या जाळीत शिरलो. ही पायाखालची मळलेली वाट असून पुर्वी लोक याच वाटेने कोकणात उतरायची अशी माहिती मामांनी दिली.पंधराएक मिनिटांच्या वाटचालीनंतर ही वाट एका टेपाडाच्या पोटाशी पोहचली. आम्ही जेथे उभे होतो तेथून टेपाडाचा कडा उजव्या हाताशी ठेवत एका निमुळत्या निसरडय़ा आडव्या टप्प्यावरून टेपाडाला वळसा घालत पलीकडच्या नाळेत उतरायचं होतं. जेमतेम एक फुटी रुंद तिरकस पायवाटेवर पसरलेल्या बारीक दगडांमुळे आणि वाळलेल्या गवतामुळे पाय निसटू लागले. त्यात डावीकडे दिसणा-या दरीच्या दर्शनाने आता मजा यायला सुरुवात झाली होती. एकमेकांना आधार देत एक एक करून नाळेत उतरलो.तेवढ्यात फ़ोटोच्या हट्टापाई माझ्याकडील १ लेन्स थेट २ टप्पे खावून खाली गेली. पोटे मामांच्या अथक प्रयत्नाने ती काढण्यात यश आले व तोवर मंडळींचे उपदेश डोस मी सवईप्रमाणे ऐकून घेतले.थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला ईंग्रजी 'सी' अक्षराप्रमाणे सह्याद्रीच्या पोटातून खोलवर कोकणात जाण्या-या त्या नाळांचे थेट दर्शन झाले व मंडळी वेगाने पुढे सरकू
लागली.आता निघाल्यापासून ज्या सुळक्याचे दर्शन घेण्याची ओढ लागली होती तो लिंगाणा सुळका आमच्या जवळ येत होता म्हणूणच की काय पावले पण झपाझप पडू लागली होती. निसरड्या वाटेने थोडे पुढे सरकर आता मावळ्यांचा पहिला वहिला थांबा येवून ठेपला. आमच्या डाव्या हाताला खोलवर उतरत जाणारी सिंगापूर नाळ व उजव्या हाताला असलेला तो अजस्त्र लिंगाण्याचा सुळका. तो सुळका आम्हा सर्व मावळ्यांना खुणावत होता पण मोह आवरून आम्ही मंडळींनी त्याचे दर्शन करून लौकरच त्याला भेट देण्याचे आश्वासन दिले आणि काही क्लिकक्लीकाट करून मंडळी पुढे सरसावली. वाट आता निसरडी होत झुडूपांमधे घुसत होती. आमच्या बरोबरचे राजा आणि राणी ही दोन चपळ कुत्री त्या पाल्यापाचोळ्याचा आवज करीत माकडांची चाहूल लागली की जोरदार दंगा घालत आमच्या पुढे चालत होती. दुपारची उन्ह आता डोईवर आली होती आणि पोटभर नाष्टा नसल्याने पोटातले कावळे चोचा मारू लागले होते. पण आत्ता थांबून फ़ायदा नाही कारण नाळ ओलांडून खाली गावात जायचे आहे व अंधार पडण्याअगोदर आपणा सर्वांना आग्या नाळीत शक्य तेवढ्या पुढच्या पाणवठ्यावर मुक्काम टाकावयाचा आहे हे मामांनी खडसावले होते, त्यामुळे पुन्हा थोड्याफ़ार कोरड्या खाऊवर पोटपूजा करून मावळे पावले टाकीत राहिली. टी मास्तर विकास आला नसल्या कारणाने आजचा पेश्शल चहा हुकला आणि त्यामुळे येणारी तरतरी कमी झाली अश्या ठाम मतावर मंडळी पोचली आणि एकसूरात काथ्या उर्फ़ विकास चा उद्धार सुरू झाला. काथ्याला मनसोक्त शिव्या हासडून आता नाळीच्या शेवटच्या टप्प्यावर बाकी गैरहजर मंडळींचा समाचार घेण्यात आला व सिंगापूर नाळेची कूस ओलांडून मावळे पायथ्यावर पोहचायला लागले.सह्याद्रीच्या पोटातून अनंत काळापासून आपला प्रवास करीत राहणा-या 'काळ' नदीचे पात्र आता आमच्या नजरेस स्पष्ट दिसू लागले तस वरूनच योग्य पाणवठ्याचा शोध सुरू झाला व पुढच्या १० मि मधेच पाठपिशव्या उतरवून त्या शितल जलाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वजण सरसावले. थंडगार पाण्याने सर्व थकवा दूर सारून त्याच पात्रात पण थोड्या लांबवर दिसणा-या एका खडकावर चूल मांडण्याचा बेत ठरला आणि सगळे कामाला लागले. पुढील २ तासात सूर्य मावळतीला लागेल आणि आपणास उशीर होईल म्हणून संपूर्ण जेवण बनविण्याऐवजी पोटभर चहा पोहे बनविण्यावर एकमत झाले व तयारी सुरू झाली. हाकेच्या अंतरावरचा निसर्गरम्य कोकण तर त्याच्या विरूद्ध बाजूला थेट आभाळ चिरून जाणारा तो लिंगाण्याचा सुळका त्याच्याच उजव्या बाजूला जणू भल्यामोठ्या अजगराप्रमाणे त्या लांबवर पसरलेल्या नाळा आणि त्या सगळ्यांच्या कुषीत विसावलेली ती काळ नदी, हवेतला मंद गारवा, लांबवर ऐकू येणारा किलबिलाट, मधूनच येणारा माकडांचा आवाज, नदीत जमा झालेली पाण्याची डबकी व त्यात टाकलेल्या दगडाने तयार होणारी ती असंख्य वलये या सगळ्याचा त्या शांततेत आनंद घेता घेता गरमागरम चहा आणि कांदापोहे तयार झाले व अखेर पोटोबा सुखी झाले.२०१६ वर्षाच्या अखेरच्या दिवसाची ती संध्याकाळ त्या सा-या वर्षाच्या दु:ख, वेदना बाजूला सारून जणू आम्हाला निसर्गाचा खरा आनंद भरभरून देत होती.   

चहा पोहे कार्यक्रमात जवळपास तासभर खर्ची पडला होता (आयुष्यात खूप कांदे पोहे कार्यक्रम केलेल्यांना त्याची फ़िकीर नव्हती म्हणा) त्यामूळे पोटे मामा घाईवर आले होते. या नाळांच्या कुषीतच वर्षाअखेरची रात्र काढावी आणि उद्या पुढच्या प्रवासाला निघाव अस सगळ्यांना वाटत होते पण उद्या नाळ पार करून पुणे गाठणे आवश्यक असल्याने त्या ईच्छेला मूरड घालीत मावळ्यांनी पुन्हा पाठपिशव्या चढविल्या आणि आता आम्ही निघालो 'आग्या नाळेच्या' प्रवासाला. 

'आग्या नाळ' जागोजागी झाडांना लगडलेल्या आग्या माशांच्या पोळ्यांने नाळीच नाव 'सार्थक' करणारी ही सह्याद्री मधील १ सूरेख नाळ. एखाद्या अजस्त्र अजगराप्रमाणे लांबवर पहूडलेली ती नाळ आता आम्हाला खूणावत होती. आकाशात लांबवर घुसून पुन्हा डाव्या हाताला वळसा घालून तीचा उश्याला अर्थात शेंड्यावर आम्हाला पोचायचे होते. आणि सरत्या वर्षाच्या अखेरची रात्र देखील तिच्याच कुषीत निसर्गाच्या सानिद्ध्यात घालवून येणा-या नववर्षाच्या सूर्याला अर्घ्य देखील तिच्याच साक्षीने द्यायचे होते. मामांच्या म्हणण्य़ानुसार आता मुक्कामाला पाणी हवे असेल तर २-३ तासाची चढाई करून पोचणे आवश्यक होते म्हणून पावले झपाझप पडू लागली आणि वर्षानूवर्षे आपले अस्तीत्व टिकवून ठेवलेले ते मोठमोठाले खडक चढून पुढच्या खडकावरची चढाई सुरू झाली. थोड्याच वेळात छातीचे भाते वाजू लागले पण तरीदेखील एकमेकांना प्रोच्छाहन देत पावले पुढे चालत राहिली. दिनकराने आपला दिनक्रम उरकून आता कधीच विश्रांती घेतली होती. चमचमत्या चांदण्याचे छत्र आता आमच्या सोबतीला आले होते. विजे-यांच्या प्रकाशात त्या मोठाल्या खडकाळ वाटेतून तोल सावरत जाताना वेग देखील मंदावत होता मात्र तरी पाणवठा काही येत नव्हता. 'हे आलच की आता' मामांच्या ह्या वाक्याचा नक्की अर्थ लावील मंडळी चढाई करीत होती. खडतर वाट, रात्रीच्या अंधारातला अपूरा प्रकाश,खांद्यांनवरचे ओझे सावरत, घसे कोरडे होत होते आणि सोबत घेतलेले पाणी संपून बाटल्यांमधे देखील खडखडाट झाला होता. चढाई करून आता ३ तास होत आले होते.काही मंडळीची फ़ारच दमछाक झाली होती पण पाणवठा नसल्याने थांबणे शक्य नव्हते. एकदा का मुक्कामाला पोहचलो की एकदम फ़क्कड मसालेभाताचा मेनू आणि गरमागरम पापड बनवणार आहे चला लौकर या अमिशावर आता दमलेल्यांना पुढे रेटले जावू लागले व सरतेशेवटी ४ तासांनी त्या नाळेतील पाणवठ्यावर आम्ही सर्वजण पोहचलो. पाठपिशव्या सोडून ढसा ढसा पाणी ढोसले गेले आणि जागा स्वच्छ करून सरपण गोळा देखील झाले. आता फ़क्त चूल करून मसालेभात कधी मिळेल हीच एकमेव ईच्छा मंडळी व्यक्त करीत होती तोच शाहू आणि बिक्याची नजर बरोब्बर आमच्या डोक्यावर असलेल्या महाकाय झाडाच्या फ़ांदीवर गेली आणि चूल नका लावू....! असा शाहूचा आवाज आला तसे सर्वच्या सर्व विजे-यांचे झोत आता त्या झाडाच्या फ़ांदीवर पाडले गेले. नाळीचे नाव सार्थक करणा-या त्या आग्या माशांचे १ मोठ्ठे पोळे आता आमच्या बरोब्बर डोक्यावर आले होते.चूल पेटवीणे भयंकर धोकादायक ठरू शकते याची जाणीव सर्वांनाच झाली म्हणून दुसरीकडे चूल बनवू म्हणून मी शाहू आणि राजे आजूबाजूला जागा शोधू लागले तसे आमच्या लक्षात आले की इथल्या सगळ्याच झाडांना या आग्या माशांची पोळी लगडली आहेत. आता काय ? तर हरी हरी.... 'चूल पेटवीणे शक्य नसल्याने जेवण बनू शकत नाही' ही बातमी देत मी पाठ टेकली.'जेवण नाही' ही बातमी जशी झाली तसे चेहरे असे काही काळवंडले की त्या नाळेतला अंधार अजूनच गडद झाल्याचा भास मला झाला,पण योग्य वेळीच त्या निसर्गाने त्या सह्याद्री ने आजदेखील आम्हा सवंगड्यांना एका फ़ार मोठ्या अपघातापासून वाचविले होते व आमच्या सर्व सह्यवेड्यांनी देखील त्याचे आभार मानत लगोलग आपले उपाशी झोपण्याचे दु:ख गिळून टाकले व त्यावरच आपली पोटं भरून घेतली.शिल्लक असलेला कोरडा खाऊ बाहेर काढून सर्वांनमधे वाटण्यात आला व त्यानेच २०१६ च्या शेवटच्या रात्रीचे उदरभरणंम उरकून ढेकर काढण्याचे प्रयत्न झाले.थंडगार वातावरणात, कीर्र झाडांच्या त्या फ़्रे-यामधे आपापल्या झोपण्याची व्यवस्था करून दमलेली मंडळी कशाचीही परवा न करीता पुढच्या काही मिनीटांनमधेच निद्राधीन झाली.जमीनीला पाठ टेकवत त्या चांदण्या मोजत मधेच माझे लक्ष पोळ्यांवर गेले व एखाद्या महालातील महाकाय झुंबराखाली मला झोपवल्याचा भास होत मी देखील निद्रावतार स्विकारला.
१ जाने २०१७ सकाळी ६ पासूनच मंडळी जागी होऊन सगळ्या पोळ्यांकडे कुतूहलाने वा काळजीने बघत आपला कार्यक्रम उरकून आली व फ़क्त तोंड खंगाळून लगेच ही जागा सोडायची यावर एकमत करून आम्ही लगोलग त्या पोळ्यांना रामराम ठोकला. थोडे पुढे गेल्यावर एका निसर्गसुंदर धबधब्यापाशी आम्ही सर्वजण पोहचलो त्याला विळखा घालून वर चढायचे व तिकडेच आता मसालेभात करायचा असा फ़क्कड बेत ठरला. पुढील १५ मिनिटातच थोडी बिकट वाट चढून मंडळी त्या धबधब्याच्या माथ्यावर आली आणि एकीकडे न्याहरी ची तयारी तर दुसरीकडे खास शिकारी पोशाखातले फ़ोटोशेशन सुरू झाले. दुस-या चुलीवर राजे नी फ़क्कड चहा टाकण्याचा प्रस्ताव मांडताच सर्वांनी टाळ्यांने त्याला अनुमोदन दिले तसा गरमागरम चहा देखील बनला. 

नववर्षाची रम्य पहाट,हवेतील हलकासा गारवा,पक्ष्यांचे किलबीलाट,आणि प्रचंड शांतता.ना माणसांची गर्दी, ना ते मोबाईल चे आवाज, ना ते प्रदुषण,ना कोणते टेंशन.मधूनच केवळ वानरांच्या खीखी आवाजाने भंग पावणारी ती 'शांतता' थोडाफ़ार पालापाचोळा वा २,४ दगडगोटे खाली पाडून पुन्हा आपले 'मौन' धारण करत होती.वाफ़ाळ्ता आलेयुक्त चहा, गरमागरम कुरकुरीत पापड आणि मसालेभाताच्या खमंग वासाने आता वातावरणात आणखीनच लज्जत आली होती. चुलीवरून पातेले खाली उतरले तस सर्वजण आपापली ताटे घेत सज्ज झाले आणि 'वदनी कवळ घेता..' म्हणत आम्ही सवंगड्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशीच कायम आठवणीत राहील अश्या अप्रतीम वनभोजनाचा आस्वाद घेतला.कालपासून लागलेली भुक शमविण्यासाठी मंडळीं मसालेभातावर पार तुटून पडली होती.पार शेवटच्या शितापर्यंत भात फ़स्त करून आता तृप्तीचे ढेकर देण्यात आले. थंडगार पाण्याने शरीरशुद्धी झाली आणि पुन्हा पाठपिशव्या टांगून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता कमीत कमी थांबे घेत संपुर्ण नाळ तिन्हीसांजीच्या आत पार करण्याचा 'पण' करून मावळे मोठ्या आविर्भावात निघाले खरे... पण 'पण' फ़क्त करण्यासाठीच असतात याचा प्रत्यय लौकरच आला. 

उन्ह जशी डोईवर येत होती तसा दम वाढू लागला होता त्यात नाळ देखील अरूंद होत आता उभी चढण दाखवीत होती. डाव्या वळणावर पोचेस्तोवर तास दोन तासाच्या या वाटेने चांगलाच घाम काढला होता.आता आम्ही कारवीच्या रानातून चढाईला प्रारंभ करीत होतो. वाटेत येणारे मोठमोठाले खडक पार करून घामाच्या धारांनी सर्वजण चींब होत पुढल्या वाटेला लागत होतो. थांब्यांची संख्या थोडी जास्तच झाली होती पण सर्वांचा विचार करता ते घेणे देखील गरजेचे होते. थांब्यांवर रसना सरबत बनवून घशाला कोरड पडलेल्यांची रसना तजेल करण्याचे प्रयत्न सुरू होते. उन्हाने चांगलाच चटका देण्यास सुरूवात केली होती. मंडळी थकली होती पण संपली नव्हती. चेष्टा मस्करी, टिंगल टवाळी करत आधार देत आधार घेत हळूहळू पावले टाकीत ध्येय गाठीत होती. एक अर्ध्यापाऊण तासाचा मोठा ब्रेक घेतला गेला. व पुन्हा थोडी तरतरी निर्माण करून वेग वाढविण्याचे देखील काही प्रयत्न केले गेले. सरतेशेवटी पुढच्या २ तासांनी आम्हाला माथा दिसू लागला. 'त्यो उंबर हाय नव्ह तिथ उजव्या आंगाला घुसल तर १ शार्ट्कट हाय.." अस मामांनी सांगितल होत म्हणून मी, राजे व मालतेश पुढे सरसावलो आणि काही क्षणातच आमच्या लक्षात आले की आपण प्रचंड धोकादायक वाटेवर अडकलो आहोत. डाव्या बाजूला निवडूंगाची काटेरी झुडूपे, उजव्या बाजूला सरळसोत प्रचंड खोल दरी व केवळ अर्धे पाउल कसेबसे बसेल एवढीच वाट अश्या जागी आम्ही पोहचलो होतो. कोणत्याही प्रकारचा धोका उचलणे शक्य नसल्याने बाकी मंडळींना उंबराच्या झाडापासून सरळ जाण्यात सांगण्यात आले व आम्ही तिघे माघारी फ़िरून मुळ रस्ता पकडला. हा शेवटचा तासाभराचा टप्पा पार करून सरतेशेवटी सर्वजण माथ्यावर पोहचलो. पुन्हा १५ मि विश्रांती घेवून थेट गावतल्या विहीरीवर पिशव्या काढल्या गेल्या व स्नान उरकून लगोलग मामांची बिदागी देवून परतीला निघालो. वाटेत वेल्ह्याला पुन्हा मनसोक्त जेवण चोपून सर्वजण पुण्यनगरीस रवाना झालो.

नववर्षाची सुरूवात तर सह्याद्रीने जोरदार केलीच होती. तसेच आमच्या वरील प्रेम दाखवत त्या निसर्गाने आम्हा सर्वांना सुखरूप परत आणले होते. महाराष्ट्राचे शक्तिपीठ मानले जाणा-या दुर्गदुर्गेश्वराच्या कुशीतील त्या सिंगापूर आणि आग्या नाळा पार करून मंडळी दमली असतीलही कदाचीत पण त्या सुखरूप पार करून ‘पावन’ झाल्याचे समाधान देखील सर्वांच्या चेह-यावर दिसत होते. परतीच्या प्रवासात त्या नाळांबद्दल अ्नेक चर्चा झाल्या, २ दिवसांच्या गमतींचे अनेक किस्से काढुन भरपूर हास्य फ़वारे उडवीत मंड्ळी सुखरून घरी पोहचली. घरी गेल्यावर गरम पाण्य़ाने अंघोळ करताना स्नायुंना झालेला त्रास जाणवत होताच पण त्याचबरोबर या सुरेख नाळा पार करून त्या निसर्गाची आणि त्या सह्याद्री बरोबर असलेली माझी "नाळ" मात्र आता आणखीनच घट्ट झाली होती हे देखील मला आता जाणवले होते. 

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश वाळिंबे  

सहभागी मंडळी : अमोद राजे, भास्कर कुलकर्णी, अक्षय बोरसे, राकेश जाधव, निलेश महाडीक, योगेश भडके, मालतेश कुसाळकर आणि निलेश वाळिंबे