Friday, December 15, 2017

कणखर सहयाद्रीचा सौंदर्यपुर्ण नजराणा - अलंग व मदन

अलंग, मदन कुलंग हे त्रिकुट म्हणजे महाराष्ट्राच्या कणखर सहयाद्रीचा सौंदर्यपुर्ण नजराणा.सह्याद्री मधे भटकंती करणा-या सह्यवेड्य़ाला कायमच अलंग, मदन कुलंग हे तीन अवाढव्य किल्ले एकदा तरी सर करावेत हे स्वप्न असतेच. तेच स्वप्न उराशी बाळगून सर्व सह्यप्रेमी कायम त्या संधीची वाट पहात असतात. जशी या तिघांची चमत्कारी नाव तशी यांची चमत्कारी रचना, अलंग मदन कुलंग ही त्रिकूट त्यांच्या उच्चाराप्रमाणेच सर करण्यास देखील भयंकर किचकट. त्यांची नाव घेताना जीभ टाळूला लागते मात्र त्यांची महाकाय उंची बघून -याच जणांची जीभ घश्यात जाऊन तोंडाचा '' देखील होतो. महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणून मान मिळवलेल्या कळसूबाई शिखराच्या डोंगररांगेत औंढाचा किल्ला,पट्टा ,बितनगड,हरिशचंद्र, हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी,खुट्टा सुळका ,कात्राबाई चा डोंगर अजोबा पर्वत, रतनगड अश्या एकापेक्षा एक उंची गाठणा-या सुळक्यांच्या सह्यरांगेमधे नाशिक जिल्ह्यातील अकोले तालुकयात उत्तूंग शिखरातून मान वर करायला लावणारे अलंग, मदन कुलंग हे सह्यमल्लांनप्रमाणे ठाण मांडून बसलेले तीन किल्ले आपले लक्ष वेधून घेतात.
महाराष्ट्राला लाभलेल्या अतीभव्य दिव्य अजस्त्र सह्यरांगेतील मानाचे आणि बरेच कठीण समजले जाणारे अदभूत, चमत्कारी, भयंकर अवघड तितकेच रहस्यमय असे हे तीन किल्ले सर करावेत हेच स्वप्न उराशी बाळगणा-या सह्यप्रेमी मधे अर्थात आम्हीही अफ़वाद नव्हतोच. त्यात कुलंग किल्ला सर केल्यापासून तर ही ओढ आणखीनच वाढली होती पण काही ना काही कारणाने आमचे जाणे रद्द होत होते. अखेरीस डीसे. , या दिवसात मोहीम आखली गेली आणि तब्बल १३ मावळे रवाना झाले किल्ले 'अलंग' कडे. आयत्या वेळी पुन्हा अड्चण आल्याने मला, भास्कर, अमोद आणि कौस्तुभ ला दि. ला निघणे अशक्य झाले म्हणून तारखेला सकाळी निघण्य़ाचा बेत झाला पण माझे काम दुस-या दिवशी सकाळीही पुर्ण होईना शेवट माझी वाट पाहून दुपारी १२ च्या सुमारास ते तिघे पुढे निघाले, मात्र मलादेखील हि संधी सोडायची नव्हती म्हणून जरा उशीरा का होईना पण मि पुणे ते नाशीक फ़ाटा भाड्य़ाने गाडी करून तर नाशिक फ़ाट्य़ावरून रांजणगाव ची एस.टी. पकड्ली मंचर ला या तिघांना येऊन मिळालो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुरूवात झाली. वाटेत अतीविषारी समजल्या जाणा-या घोणस या सर्पराजांचे दर्शन घेवून दि. डीसे. ला सुमारे रात्री .३० वाजता आम्ही आमची गाडी घाटघर या टुमदार गावी लावली आमचा वाटाड्य़ा ( येथे 'वाटाड्य़ा' म्हणजे आमची वाट पाहून पाहून ज्याची पार 'वाट' लागली होती असा  देखील अर्थ घेता येईल ) लक्ष्मण ला घेवून बरोब्बर रात्रौ .३५ ला किल्ल्याकडे कूच केले.
गप्पा मारत दरमजल करीत रात्री विजे-यांच्या मदतिने आमचा प्रवास सुरू होता. चंद्राच्या नितळ प्रकाशात आम्ही लोक चढण चढून जंगलाच्या वाटेला लागलो होतो सुमारे तासाभराच्या पायपिटी अंती आम्ही पहिला थांबा घेतला पुढे सरसावलो. आता बरीच खडी चढण लागली होती आणि छातिचे भाते चांगलेच वाजू लागले होते पण अगोदरच खूप उशीर झाल्या असल्याकारणाने कमीत कमी थांबे घेत पुढ्च्या दीड तासात आम्ही घाटघर च्या वाटेने लागणा-या लोखंडी शिडीपाशी पोहचलो. पुन्हा जरा विश्रांती घेवून सरळ कड्याला लावलेल्या त्या शिडीवरून आम्ही पुढे सरसावलो आणि लौकरच गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी पोहचलो. हा दरवाजा दरड कोसळून पुर्णपणे बंद झालेला असून त्याच्या बाजूच्या कड्यावरून सावधानतेने वर चढत आपल्याला दरवाज्याच्या वरची वाट पकडावी लागते. त्यापुढे सुमारे १५ मिनिटे कड्य़ाच्या जरा अवघड चढणीनंतर आम्ही गडाच्या कुषीत असणा-या आड्व्या कपारीपाशी पोहचलो. त्याच कपारीतून एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या
पाऊलवाटेने उजवीकडे गडाचा माथा आणि डावीकडे आवंढा काढणारी दरी पकडून पाऊण तासाचा वेढा मारून आम्ही  तासाअंती गडावरील अतिशय सुंदर आणि रेखीव अश्या गुहांपाशी साधारण रात्रीचे वाजता मुक्कामाला पोहचलो. "गुढ अंधार, थंडगार घोंघावणारा बोचरा वारा, मंद चंद्रप्रकाश, पुढ्यात असलेल्या महाकाय दरीत जमा होणारे धूके आणि त्या वातावरणात आजूनच महाकाय वाटणारे समोर उभे असलेले अवाढव्य मदन कुलंग किल्ले, रात्री वाजता सुखरूप पोहचून अलंग किल्ल्यावर बसून या सगळ्य़ाची अनुभुती घेत होतो आमचे जेवण उरकत होतो." बाकी मंडळी त्या वातावरणात केव्हाच निद्रीस्त झाली होती. गुहेत थोडी जागा करून आता आम्हिही आमच्या पथा-या पसरल्या आणि त्य निसर्गाच्या कुषित निद्राधीन झालो.
डीसे. २०१७ सकाळी च्या सुमारास जाग आली तेव्हा बाकी मंडळी उठून बरेच जण आपापल्या शिकारीला गेले होते. (अर्थबोध होत नसेल तर तज्ञाचा सल्ला घ्यावा) आम्ही देखील आता पटापट आवरण्य़ास सुरूवात केली नाष्टा तयार होईस्तोवर पटकिनी गडाचा माथा गाठला. सुरेख कोरलेली पाण्य़ाची १०-१२ टाकी दिसली या टाक्यांचा विस्तार बघुन यांचे त्याकाळचे वैभव काही औरच असावे याची कल्पना आली, तसेच गडाचे काही अवशेष,लहानसे मंदीर असा गडावरील परीसर न्याहाळत आम्ही माथ्यावरील प्रशस्त पठारावर आलो होतो."पूर्वेला कळसूबाई पार आभाळ फ़ाडून वर घूसली होती, औंढाचा किल्ला,पट्टा ,बितनगड कोवळी उन्ह खात निवांत पहुडले होते ,उत्तरेला
हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी धूक्यातून हात दाखवित होते तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाई चा डोंगर आपली पंगत मांडून सोनेरी किरणातून त्या निसर्गावर मुक्त उधळण करीत होते असा चहूबाजूंनी वेढलेल्या परिसराला न्याहाळत असताना सह्याद्री चे खरे प्रेम, सौदर्य हपापल्या सारखे शक्य तितके मनात, डोळ्य़ात साठवत होतो." फ़ारसा वेळ घालवता क्लिकक्लिकाट करण्य़ाकरीता कॅमेरा काढला तेव्हा त्यात बिघाड झाल्याचे लक्षात आले तसे फ़ार वाईट वाटले मग थोडे मोबाईल वरच फ़ोटो काढून पुन्हा गुहेपाशी परत आलो. तोवर मंड्ळी आवराआवर करत होती. गरमागरम मॅग्गी वर ताव मारून पुन्हा पाठपिशव्या भरल्या गेल्या मंडळी तयार झाली पुढच्या प्रवासाला,अलंग कडून मदन वर जाण्य़ाकरीता संपूर्ण किल्ला उतरून जाण्य़ाची गरज नाही, अलंग आणि मदन च्या मधल्या घळी मधे उतरणे आणि मदन किल्ला करून पुन्हा घळीत येवून आपण पुढे कुलंग किल्ला देखील गाठू शकतो वा खाली उतरू शकतो.
अलंग ला मुजरा करून मावळे आता पुढे निघण्याच्या तयारीला लागले होते, कातळारोहण कलेत पारंगत असलेला आणि त्याच्या अनुशंगाने तांत्रीक बाजू जाणणारा ट्रेकरच केवळ या किल्लांच्या मोहिमा आखू शकतात. कातळारोहणाचे केवळ पुस्तकी ज्ञान असणारे नव्हे तर २०१२ साली जगातील सवोच्च शिखरमाउंट एव्हरेस्ट’ पादांक्रात करून आलेले आमचे मित्र आदरणीय  एव्हरेस्ट वीरटेकराज आधीकारी’ हे जातीने आमच्या मोहिमेचे नेतृत्व करीत होते त्यामुळे त्यांनी सेनापती च्या नात्याने सर्वात पुढे कूच केले, अलंग किल्ल्यावरून खाली उतरण्य़ास दगडात कोरलेल्या पाय-या लागतात पण उभ्या खडकातील केवळ छींन्नी हतोड्य़ाच्या मदतिने कोरलेल्या या पाय-या आकाराने लहान असून उतरताना समोर ४५०० फ़ूटाची वासून बसलेली खोल दरी आपली नजर फ़िरवीत असते, अतिषय सावध गतिने सर्वजण या पाय-या उतरून एका छोट्य़ाश्या गुहेपाशी पोहचलो काही वेळासाठी तिथे गप्पांचा फ़ड रंगला कारण त्याच्याच पुढे साधारण ८०-९० फ़ूटाच्या सरळसोट कड्य़ावरून आता आम्ही दोराच्या मदतिने कडा उतरणार होतो. आवश्यक असणारी सर्व खबरदारी घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक असे सर्वजण तो उभा कडा उतरून खाली आलो. पुढे थोड्य़ाच
अंतरावर पुन्हा दोराच्या मदतिने आम्ही आजून छोटा ट्प्पा पार करून पुढे सरसावलो. येथून पुढील वाट ही डावीकडे कडा उजवीकडे सरळ दरीमुळे जास्त धोकादायक आहे. जेमतेम पाऊल ठेवून पुढे जाता येते. पुर्ण काळजीने, शांतपणे, निसर्गाचा, सहयाद्रीचा तो सौंदर्यपुर्ण नजराणा पहात आम्ही एकापाठोपाठ एक जण पुढे सरकत होतो. (येथे ओव्हरटेक शक्यच नाही,कोणी 'ओव्हरटेक' करण्याचा प्रयत्न केला तर तो 'वरचाटेक' ठरण्याची शक्यताच जास्त आहे.) साधारण १५-२० मिनीटाच्या प्रवासाअंती आम्ही सर्वजण खिंडी पाशी पोहचलो. 'समोर ४८२२ फ़ुट उंचीवर ठाण मांडून बसलेला मदन किल्ला मला एखाद्या वेटोळे मांडून बसलेल्या सुस्त अजगरा सारखा वाटत होता.' मदन सर करून पुन्हा याच खिंडीतून आम्ही खाली उतरून परतीच्या मार्गावर निघणार होतो त्यामुळे पाठपिशव्या खिंडीतच ठेवून आम्ही आता थोड्य़ा उजवीकडे असणा-या धोकादायक अश्या वाटेवर आलो. येथून जाताना मागे कुलंग गडावर आमचा मित्र सत्या लहान वाटेवर पाऊल टाकताना जी कसरत करीत होता तीच कसरत आता आम्ही सर्वजण करत होतो त्यावेळी मला कुलंग च्या वेळी झालेल्या विनोदाची पुन्हा आठवण झाली, या वाटेने चालणे म्हणजे 'संजय लीला भंसाळी चे (सो-कॉल्ड) अवाढव्य चीत्रपट ५१२ एम बी च्या पेन ड्राईव्ह मधे बसविण्य़ासाठी जी कसरत करावी लागेल तिच कसरत आम्हाला या ठिकाणी करावी लागत होती.'या कडा तुट्लेल्या वाटेने जाताना वाटेत
काळजी घेणे गरजेचे असून काही ठिकाणी दोर लावणे आवश्यक आहे. ही वाट पार करून आता सर्वजण स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेल्या मदन गडाच्या कोरीव पाय-यांपाशी पोहचलो होतो. येथूनच पुढे तुट्लेल्या कड्य़ाला दोर लावून प्रस्थारोहण करून आपण गडाचा माथा गाठतो.मदनगडा वरील चढण ही तशी अलंग गडा वरील कातळकड्या पेक्षा सोपी, परंतु खाली सरळ दरीमुळे भयंकर धोकादायक आहे. समाजहीत जाणणा-या गिर्यारोहकांनी आधीच बोल्टींग करून ठेवल्यामुळे ही चढण काहीशी सुरक्षित झाली आहे. सर्वप्रथम टेकराज कातळ चढून दोराला बोल्ट्स मध्ये सुरक्षित करून माथ्यावर पोहचला त्यानंतर सर्वांना थोड्य़ा प्रयत्नाअंती माथा गाठता आला. "सह्याद्री वरील तुमच असलेले प्रेम, त्याने देखील प्रेमाचा मान दाखवत तुम्हाला दिलेली साद खाली येखाद्या बोक्याप्रमाणे जीभल्या चाटत वासून बसलेली ती महाप्रचंड दरी, तिची भिती वाटू नये म्हणून त्या सह्याद्री ने आपल्या कड्य़ाचा कुषीत घेवून दिलेला आधार आणि त्याच्या ओढीने अंगातली रग बाहेर पडल्यावर होणारा आनंद जो असतो तो केवळ येथेच मिळतो." वेळेअभावी गडाचा माथा फ़िरता आम्ही सर्वजण माघारी फ़िरलो पुन्हा त्याच वाटेने सावधानतेने घळी पाशी पोहचलो. तोवर सूर्यदेव अस्ताला निघाले होते. पटापटा थेपले, चीवडा आणि बाकी कोरडा खाऊ पोटात ढकलून सर्वजण घळ उतरण्य़ास सज्ज झालो. विजे-यांच्या प्रकाशात आणि गप्पांच्या ओघात संपूर्ण दरी सुमारे तासात उतरून मंडळी विश्रांती साठी थांबली, गडबडीत झालेल्या प्रवासामुळे भरारी चे गायक राकेश च्या गाण्य़ाची मेजवानी मिळाली नव्हती ती सर्वाची ईच्छा राक्याने पूर्ण केली. समोर अंधारात उभे असलेले किल्ले त्यांच्या माथ्यावर पोर्णीमेचा चांदोमामा आणि थंडगार वातावरणात 'वा-याने हालते रान' या सुमधूर गाण्य़ाने सर्वांचे कान तृप्त करून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. नदीचा टप्पा त्यपुढील टेकडी ओलांडून घाटगर गावी पोहचेस्तोवर १२ वाजत आले होते. पुन्हा थोडी पोटपूजा उरकून धकल्या पावलाने मावळे गाडीत बसले. 

परतिच्या प्रवासात या किल्ल्यांचा इतिहास, त्या किल्ल्य़ांना आजवर जिवंत ठेवणा-या वीरांचा ईतिहास आठविण्य़ाचा प्रयत्न केला, तसा 'अलंग, मदन आणि कुलंग गडाचा इतिहास बहुदा फ़ारसा कुणाला ज्ञात नाही,मराठ्यांची शक्ति ही या गडांवरच आहे हे जाणणा-या इंग्रजांनी त्यांचा अम्मल येताच हेतुपूर्वक गडांची नासधूस केली. ह्याचे सगळ्यात प्रचंड परिणाम अलंग कुलंग मदनगडांना भोगावे लागले असावेत. इंग्रजांनी दुर्ग जिंकून स्थानिकांच्या परंपरागत हक्कांवर गदा आणल्याचे पडसाद त्या काळी स्थानिक जमातींमध्ये देखील उमटले. जुन्नर येथील 'काळा चबुतरा' य़ा आदिवासी लढा म्हणजे याचीच तर आठवण. रतनगड आणि अलंग किल्ल्यांच्या पोटातून ज्या नदीचा उगम झाला ती प्रवरा नदी, तिच्याच खो-यातून मग १८१८ साली महादेवकोळी आणि भील्ल जमातीने महाराष्ट्रातील इंग्रजी सत्तेविरुद्ध लढ्याचा आरंभ केला. या लढ्याचे नेतृत्व रामजी भांगरे आणि रामा किरवा यांनी केले. रामजी भांगरे याने इंग्रजांविरुद्ध जोरदार उठाव केला मात्र नेहमी प्रमाणे फितुरीचा शाप या लढ्यालाही लागला आणि तो लढा शेवटपर्यंत अपयशी ठरला. पुढे हा वारसा भागोजी नाईकाने सुरू ठेवला.अश्या अनेक लढ्यांमुळे आणि त्या वीरांच्या बलिदानाने किमान आपणा सर्वांना आज हे किल्ले उभे तरी दिसत आहे. त्या सर्व विरांना मनोमन प्रणाम केला आणि गाडीच्या धूराळ्य़ात देखील सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तूरा खोचून बसलेले अलंग, मदन आणी कुलंग या मंल्लांचे त्रिकूट पुन्हा नजरेस पडले. '
अंतरजालावरून साभार - किल्ले मदन वर जाणारी वाट
दरवेळी या भागातून प्रवास करताना हे किल्ले दिसले की त्या नंतरच्या कित्येक रात्री आपण यांच्या माथ्यावर पोहचल्याचे स्वप्न पडायचे ते आजच्या परतिच्या प्रवासात मला पडले नव्हते, त्याचे कारण आज ते हवेहवेसे स्वप्न प्रत्यक्ष पुर्णत्वास आले होते. २४ तासाच्या आत हे किल्ले पूर्ण करण्य़ाचे स्वप्न पुर्णत्वास आले होते... पण त्यांचे रांगडे रूप आत्ता जरा हळवे भासत होते. आपल्या लोकांना ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्यांना निरोप देतानाची खिंन्नता त्या अंधारात जाणवत होती. 'मला भेटायला पुन्हा नक्की या असेच तो सांगत असावा' "सह्याद्रीकडून शिकण्य़ासाठी परत आलेच पाहिजे, मैत्री म्हणजे काय हे जाणण्य़ासाठी सह्याद्रीत आलेच पाहिजे, अडचणीची परिस्थीती विनासायास सोडविण्य़ाची शिकवण घेण्य़ासाठी सह्याद्रीत आलेच पाहिजे आणि निसर्गापुढे आम्ही मानव जात किती खुजे आहोत हे लक्षात राहण्य़ासाठी आलेच पाहिजे हेच मनोमन ठरवत पहाटे वाजता सुखरूप पोहचलो ते आज आयुष्यात एक 'उंची' गाठली या समाधानाने...."

 भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.

मोहिमेत सहभागी मावळे : राकेश जाधव,प्रसाद डेंगळे,अश्विन मेनकुडले,योगेश भडके,सुरज पाटील,सुषांत पाटील,निखिलेश नावाडकर,स्वप्नील राजपूत,सुनिल काटकर,महेश मोरे,विजय मुंडफ़ने,सुरज मानकर,आमोद राजे,भास्कर कुलकर्णी,कौस्तुभ खांदवे,निलेश वाळींबे आणि एव्हरेस्ट वीर टेकराज अधीकारी.
मुलभूत माहिती:
गड प्रकार - खडतर
पुण्यापासून अंतर - २५० किलोमीटर (पुणे-नारायणगाव-आळेफाटा-बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा-घाटघर)
थोडक्यात पण महत्वाचेया गडांवर जाण्याकरीता प्रस्थारोहणाचे तंत्र अवगत असणे, त्याकरीता लागणारे साहित्य असणे, खोलिची भिती नसणे आवश्यक आहे.

आंतरजालावरून साभार