Wednesday, October 31, 2018

|| भास्करगड आणि हरिहर ||


'ऑक्टोबर हिट भयंकर असते भाऊ, त्यात ट्रेक आणि किल्ले भटकंती न केलेली बरी !' असे फुकट सल्ले ऐकून घेतले जात होते मात्र खरेतर आत्ताच्या आत्ता कामाच्या व्यापातून बाहेर पडून पुन्हा "छोटा रिचार्ज" मारणे खूपच गरजेचे वाटत होते.
नुकतेच देवीचे नवरात्र सुरू होऊन ३,४ दिवसच झाले होते. एकीकडे ऐन नवरात्रीत आपल्या देवीच्या दर्शनाला आतूर झालेले देवीभक्त आणि दुसरीकडे आपल्या लाडक्या सह्याद्री च्या भेटीला आतूर झालेले सह्यभक्त दोघांच्या मधील साम्य म्हणाल तर, आपल्या ईश्वरावर असलेली प्रचंड 'श्रद्धा' आणि कोणाचीही, कशाचीही पर्वा न करता त्याला भेटण्याची लागलेली 'ओढ.' मग काय इकडे 'देवीचे घट' बसले आणि आम्हा मंडळींचा 'घाटातून' प्रवास सुरू झाला.... ते थेट भास्करगड आणि हरिहर या जोड किल्ल्यांच्या भेटीला.
१२ ऑक्टो. ला चंदन नगर येथून रात्री ११ वाजता निघणारी बस बरोब्बर ११ वाजता निघाली खरी पण पुणे ते नाशिक जेवढा प्रवास असेल तितके अंतर पुण्यातच पूर्ण करण्याचा जणू 'पण' करूनच.. चंदननगर - स्वारगेट - कात्रज - सिव्हगड रस्ता - वडगाव - नांदेड गाव (त्यात नांदेड सिटी त्यात शेवटची गल्ली मग शेवटचे वळण घेऊन शेवटच्या इमारतीपाशी थांबून शेवटच्या फ्लॅट मधल्या शेवटच्या खोलीत पार कोपऱ्यात बसून, 'आजून लांब गाडी कशी बोलविता येईल?' हा विचार करत बसलेल्या विनय धनश्री ला घेऊन) - चांदणी चौक - बाणेर - (म्हणजेच १० जनपथ रोड) - कोकणे चौक मार्गे १३ ऑक्टो. पहाटे १ वाजता पुण्याबाहेर पडली आणि "बाप्पा मोरया" चा जयघोष झाला.
वाटेत कितीही उशीर होवू देत पण चालीरीती आणि परंपरांचा मान ठेवत 'नारायणगाव बस थांब्यावर' गरमागरम 'मसाला दुधाचा' आस्वाद घेण्यासाठी न चुकता आम्ही थांबलो आणि '१५ तोफांची सलामी देऊन' अर्थात दूध आणि १५ क्रीमरोल चोपून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता आमचे चालक जागे आहेत ना, याची खात्री करत १० जनपथ वर राहणारा आमचा काथ्या (विकास) आणि काथ्या जागाच आहे ना, हे तपासात बसायला 'मी' :D असे तिघेच जागे होतो (तिसरा आपला चालक) आणि बाकी मंडळी गाडीच्या घर्र-घर्रर्रर आवाजा मध्ये स्वतःचे घोर्र-घोर्रर्ररर आवाज मिसळत गुडूप झाली होती. सकाळी ७ वाजता आमचा दुसरा थांबा झाला आणि काही शिकारी आपापली शिकार उरकून आले. (अर्थबोध होत नसेल तर खाजगीत संपर्क करावा) पुढे काही वेळातच आमचा बेस कॅम्प अर्थात तळथांब असलेल्या 'निरगुडपाडा' या छोटेखानी टुमदार गावात आम्ही उतरलो.
अनेक धार्मिक स्थळे, असख्य मंदिरे, कुंभ मेळ्यासारके पवित्र मेळे भरणारा नाशिक जिल्हा केवळ तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध नाही तर तेथे मिळणारी गोड द्राक्षे, सह्याद्री चे उत्तुंग कडे आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेला एक रांगडा आणि मनमोहक जिल्हा म्हणून देखील प्रसिद्ध आहे. इतिहासाची साक्ष देणारा आणि ज्याचा भूगोल देखील प्रसिध्द आहे अश्या या नाशकाच्या पश्चिमेकडे त्र्यंबकेश्वर च्या बाजूने जी उत्तुंग अशी सह्याद्रीची रांग दिसते तिला "त्रिंबक रांग" म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वत, वीर हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून ओळखला जाणारा अंजनेरी पर्वताला सामावून घेतलेल्या या रांगेत 'भास्कर किंवा बसगड' आणि 'हरिहर' हे २ किल्ले आपली ओळख आजही राखून आहेत. याच दोन किल्ल्यांवर 'माथा टेकण्यासाठी' आता आम्ही सज्ज होत होतो. पोहे आणि कोऱ्या चहाचा आस्वाद घेऊन आमची गाडी बाजूला लावली गेली आणि फक्त पाण्याच्या बाटल्या घेऊन 'हर हर महादेव!' च्या जयघोषात साधारण साडेनऊ वाजता मंडळी निघाली किल्ले भास्करगडा कडे. 



कोवळी उन्हे आता मोठी होत होती आणि साक्षात 'रवी-भास्कर' त्यांच्याच नावानी प्रसिध्द असलेल्या भास्कर गडावर आमची साथ देत होता. पहिला कारवी चा टप्पा पार करून डाव्या हाताच्या वळणावर पोचेस्तोवर घामाच्या धारा सुरू देखील झाल्या होत्या, पण आता चहूबाजूला असलेले गगनभेदी कडे पवनराजला प्रवेश नाकारत होते. गप्पा गोष्टी करीत मंडळी पुढे चालत होती आणि किल्ल्या संबंधी असलेली माहिती इतरांना सांगत प्रवास सुरू होता. साधारण ११ वाजता समोर आकाशाला भिडलेल्या भास्कर गडाच्या सुळक्यापाशी आम्ही पोहचलो आणि त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या निमुळत्या वाटेवर लागलो उजव्या हाताला खोल दरी आणि डाव्या हाताला कातळ कडा असा प्रवास करून सरतेशेवटी अत्यंत कोरीव अश्या गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहचलो. बेसॉल्ट च्या खडकात तयार झालेल्या या किल्याची बरीच पडझड झालेली आहे आणि वरून वाहून आलेले दगड आणि माती यांच्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त प्रवेशद्वार हे बुजून गेलेले आहे यातून आत प्रवेश करताना आपल्याला पूर्णपणे वाकून किंवा बसून आत जावे लागते. अश्या या द्वारातून आत जाताना बसून जावे लागते म्हणून तर त्याला 'बसगड' म्हणत नसतील ना ? अशी पुसटशी शंका मला त्यावेळी येऊन गेली.

आत प्रवेश करून सर्पिलाकार नागमोडी पायऱ्याची वाट पार करीत आम्ही योगायोगाने मध्यानाला बरोब्बर सूर्य-भास्कर डोईवर असतानाच भास्कर गडाचा माथा गाठला होता. माथ्यावर गडाचा इतिहास आठविताना त्याची सध्याची अवस्था पाहून खूपच वाईट वाटले, इ.स. १२७१ ते १३०८ काळात देवगिरी च्या अधिपत्याखाली असलेला हा किल्ला पुढे बहामनी आणि निजामशाहीत गेला. इ.स. १६२९ मध्ये बंड करून हा किल्ला शहाजी राजांकडे आला आणि १६३३ च्या सुमारास तो शहाजी राजेंकडून मोघलांच्या हवाली गेला. १६७० ला शिवरायांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी मोघलांकडून हा किल्ला काबीज केला मात्र १६८८ ला पुन्हा तो मोघलांच्या ताब्यात गेला.१७३० मध्ये कोळ्यांनी बंड करून हा किल्ला जिंकून घेतला आणि त्या नंतर १८१८ पर्यन्त हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. अश्या या रांगड्या गडाची आजची अवस्था खूपच बिकट आहे, वर एका पडक्या वाड्याचे अवशेष आपले अस्तित्व सिद्ध करण्याकरिता आजही धडपडत आहेत, पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नसून अत्यंत सुरेख कोरीवकाम असलेली सातवाहन काळातील टाकी आपली ओळख तेव्हढी टिकवून आहेत एक छोटेखानी छप्पर वा भिंत नसलेल्या हनुमानाच्या मंदिरी,
'बजरंगबली केवळ आपल्या अफाट ताकदीच्या जोरावर तग धरून उभे आहेत' या सगळ्यांच्या साथीला वाढलेले गवत आणि असंख्य फुलपाखरे मुक्त विहार करीत आपापल्या परीने गड जागता ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पलीकडे गडावर पाहण्यासारखे काहीही नाही. निसर्गनिर्मित आजूबाजूला दिसणारे उत्तुंग डोंगर आणि महाकाय दरी इतके पाहून थोडी विश्रांती घेतली आणि लगोलग आमची स्वारी निघाली किल्ले हरिहर कडे. झपाझप पाऊले टाकीत आता आम्ही परतीची वाट धरली होती.आता आमच्या भ्रमंतीचा भाग २ सुरू होणार होता दूरचित्रवाणी वरील मालिका या खऱ्याच असतात या भावनेने त्या मालिका बघणार्यांना मालिकांमध्ये दोन भागात असतो तसाच या २ भागातील 'ब्रेक' देखील अनिवार्यच वाटत होता.त्यात आता पायथ्याला पोहचताच पोटातील कावळे पार हत्ती बनून आवाज देऊ लागलेच होते त्यामुळे थोडी पोटपूजा उरकायची आणि पाठपिशव्या उचलून थेट हरिहर गाठायचा ठराव 'आवाजी मतदानाने' पास झाला आणि नांदेड सिटीतून निघण्यास प्रचंड उशीर झाल्याचे खरे कारण उघडकीस आले. विन्याने घरून बनवून आणलेला 'पोळ्यांचा ढीग' आणि खमंग झणझणीत 'खर्डा' आपल्या पिशवीतू  बाहेर काढला आणि हापापलेली मंडळी त्यावर तुटून पडली सोबतीला बिस्किटे, चिवडा, फुटाणे असा कोरडा खाऊ बाहेर आला आणि गडाच्या पायथ्याशी वनभोजनाचा आस्वाद घेत मंडळी तृप्त झाली. आता दुसऱ्या पर्वाला सुरुवात होत होती.पाठपिशव्या शक्य तितक्या हलक्या करून (म्हणजे जास्तीत जास्त वस्तू दुसऱ्याच्या पिशवीत कोंबून) मंडळी आता पुन्हा तयार झाली व वाटाड्या मामांना घेऊन मूळ वाटेला न लागता मधील २ डोंगर पार करून गडाच्या सोंडेवर पोचण्याचा बेत ठरला जेणेकरून लौकरात लौकर आम्ही गड गाठू शकू.


भास्कर गडाच्या शेजारील डोंगराच्या आता आम्ही पोटात शिरलो होतो. एकमेकांची चेष्टा मस्करी करीत आणि दुर्वास मुनींचे दर २५ फुटांवर फोटो काढीत आमचा प्रवास सुरू होता. वाटेत लागणारा १ टेकडी वजा डोंगर आम्ही पार केला होता आता उन्हाने बराच दम लागत होता पण गप्पांच्या ओघात पावले हळू हळू पुढे टाकत आम्ही प्रवास सुरूच ठेवला होता जरी ऊन बरेच होते तरीही निसर्गातील हिरवळ पूर्ण करपली नव्हती आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेत आता आमची स्वारी दुसऱ्या डोंगराच्या मध्यातून एका बाजूने पुढे सुरूच होती डाव्या हाताची दरी आता बरीच खोल वाटू लागली होती त्यावरून आपण बरेच उंचीवर आलो होतो हे समजत होते पण पूर्ण हरिहर आजून समोर आला नव्हता. पुन्हा १५ मिनिटांचा पाणथांबा घेतला आणि थोड फोटोसेशन पार पाडून पुन्हा पाठपिशव्या लादल्या गेल्या. सुमारे २० मिनिटात हाही डोंगर पार करून अडीच तासाच्या पायपीतीअंती आम्ही आतुरतेने वाट पहात असलेल्या 'हरिहर' किल्ल्याच्या सोंडेवर येऊन ठेपलो.
"आपल्या महाकाय उंचीने आकाशाला फाडून पार आत घुसलेला, स्वतःच्या डोईवर निसर्गानेच मानाने दिलेली, हिरवाई ने नटलेली हिरवी-पिवळी मानाची पगडी घालून रुबाबात बसलेला आणि त्यावर जणू मानाचा तुरा म्हणून 'जरीपटका' फडकवत दौलदार पणे शेकडो वर्षे ठाण मांडून बसलेला तो "हरिहर" सर्वांच्या दृष्टीस पडला आणि आलेला थकवा पार लांब पळून गेला. "शंकराच्या पिंडी" प्रमाणे आकार असलेला हा किल्ला म्हणजे सह्यवीरांसाठी एक पर्वणीच. सर्व बाजूने उभे च्या उभे सरळसोट कातळ आणि त्यातील एका कातळावर अत्यंत सफाईदार पणे कोरलेल्या एकावर एक अश्या पायऱ्या, प्रत्येक पायरीवर चढताना तोल संभाळण्यासाठी कोरलेल्या सुरेख खोबण्या लांबून पाहताना मनात नक्कीच धडकी भरवितात. सोंडेवरून त्या पायऱ्या पाहताना मला, 'लहानपणी दिवाळीत केलेल्या किल्यांच्या पायऱ्या आठवत होत्या, लाकडी पट्टीच्या मदतीने २ फूट किल्ल्यावर देखील त्या पायऱ्या बनविताना प्रचंड अवघड वाटत असे' आणि इथे प्रत्यक्षात समुद्रासपाटी पासून सुमारे ३५००  फूट उंच असलेल्या आणि दोन्ही बाजुंना महाकाय दरी असताना कोणत्याही अत्यधुनिक
उपकरणांशीवाय या कातळावर कोरलेल्या पायऱ्या पाहून आपल्याकडील शेकडो वर्षांपूर्वी असलेल्या स्थापत्य कलेचा प्रचंड अभिमान वाटत होता. अत्यंत कठोर मेहनत घेतल्याशिवाय हे शक्य नाही हे पहाताक्षणीच आपणास जाणवते. त्या सर्व जाणत्या, आजाणत्या आजरोजी नावे नसलेल्या पण अमरत्व प्राप्त झालेल्या कलाकारांना मानाचा मुजरा करून आम्ही हा 'माथा' गाठाण्या अगोदरचा शेवटचा थांबा घेतला. थंडगार लिंबू सरबत, कोवळी खमंग काकडी, गूळ दाण्याची चिक्की आणि लिंबू भेळेवर मनसोक्त ताव मारला.सकाळपासून साथ देत आलेले भास्कर राव आता परतीच्या प्रवासाला निघाले होते त्यांना कॅमेरा मध्ये साठविण्यासाठी आता आमची लगबग सुरू झाली व सरतेशेवटी समोरील भास्कर गडाच्या मागे क्षितिजापार त्यांना निरोप देऊन त्या उभ्या सरळ कातळात लाकडी शिडी प्रमाणे कोरलेल्या पायऱ्या गाठण्यासाठी पुन्हा मावळे सज्ज झाले.
केवळ एकेरी वाहतुकीस परवानगी असलेल्या या वाटेने कोणीही ओव्हरटेक करण्याचे धाडस दाखवीत नव्हता (पुणेकर असूनही) एकामागोमाग एक, अत्यंत सावधपणे, काही नवोदितांना योग्य काळजी घेण्याचे संदेश देत मावळे चढाई करीत होते. दोन्हीही बाजूला महाकाय दरी 'आ वासून' उभी होतीच, त्या खोलीची ज्यांना भीती वाटते त्यांनादेखील, "ये मूर्खां कशाला बघतो इकडे तिकडे, इतकी फाटते तर वर बघ ना पायरीकडे. बावळट घाबरतो किती फक्त तोंडात दम.." असे प्रेमाचे सल्ले देखील दिले गेले आणि त्यांना आधार देत १,२,३,४ अश्या त्या उभ्या सर्व पायऱ्या पार करून पहिल्या प्रवेशद्वारात मंडळी पोहचली. दारातून आत शिरून डाव्या हाताच्या कड्याखाली जेमतेम फूटभर रुंदी आणि चार फूट उंची असलेल्या पाउलवाटेवर लागूनच असलेली प्रचंड खोल दरीतील निसर्गाचा आस्वाद घेत सावधपणे पुढे सरकून आता पायऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यावर मंडळी पोहचली आता बऱ्यापैकी अंधार झाला असल्याने विजेऱ्या बाहेर निघाल्या आणि त्यांच्या झोतात सावधपणे थोड्याच वेळात आम्ही माथा गाठला.सरतेशेवटी आपल्या गडाच्या किल्ल्यावर मुक्कामी पोहोचल्याचा आनंद आणि समाधान सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होते. गडाच्या माथ्यावर असलेल्या हनुमान मंदिरी व शिवपिंडी वर आम्ही माथा टेकून स्वयंपाक आणि मुक्कामाची जागा शोधू लागलो. गडावर ५,६ तळी आहेत मात्र त्यातील केवळ २ तळ्यातील पाणी आज पिण्यायोग्य आहे. आपल्याच काही मूर्ख आणि स्वयंघोषित ट्रेकर्स नि प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, तेलाची भांडी, माश्याना खाण्यासाठी टाकलेले तेलकट पदार्थ यांनी येथील सुरेख, कोरीव व त्यातील नितळ पाण्याच्या टाक्यांचा आणि तळ्यांचा सत्यानाश केला आहे. गडावर १ सुस्थितील धान्यकोठी आहे आणि तिच्या पाठीमागे पिण्याच्या पाण्याचे टाके आहे त्यामुळे या कोठीत मुक्काम करण्याचा विचार झाला मात्र कोठीमध्ये प्रचंड चिखल आणि पाणी जमा झाले असल्याने मुक्कामाची जागा बदलली गेली. हनुमान मंदिरापाशी उघड्यावरच मुक्काम करावा असे ठरले आणि जागेची टेहाळणी पार पाडतानाच सर्प राजाने दर्शन दिले आणि सगळ्यांचे स्वागत करून पुन्हा बिळात ते लुप्त झाले. त्या बिळाला खुणेदाखल १ दगड ठेवण्यात आला आणि पिंडीपाशी चुलीची तयारी सुरू केली. 

पाठपिशव्या उतरवून साफसफाई झाली, पटापट किराणा, पातेली बाहेर काढून एका बाजूला पद्धतशीरपणे मांडून शेकोटीची लाकडे गोळा झाली हवेतील गारवा आता खूपच सुखद वाटत होता. आता गरज होती ती गरमागरम जेवणाची. झणझणीत रस्सा आणि भात की, चमचमीत मुगाची खिचडी यावर १ छोटेखानी चर्चासत्र पार पडले आणि खिचडी चा बेत मान्य झाला. कांदे बटाटे मिरच्या चिरचिरी सुरू झाली तर काही मंडळी शेकोटीत कांदे बटाटे भाजून त्याची चव चाखण्यात व्यस्त झाली, काही 'चालू' मंडळी सगळे कुठे ना कुठे व्यस्त आहेत हे बघून त्यातल्या त्यात सपाट जागेवर आपल्या पथाऱ्या पसरवून आपली जागा आरक्षित करीत होती.
'आजवर आपण घरातील कोणतेही काम केलेले नाही तसेच लहानपणी आईचे आणि आत्ता बायकोचे आपण सांगकाम्या नाहीत हे आमच्या काथ्या ने आज सिद्ध केले', कारण किरणांच्या यादीतील केवळ दाणे, तांदूळ आणि डाळ या ३ गोष्टी वगळता बाकी सगळा 'आनंदच' होता मुख्य म्हणजे मॉलिश साठी किंवा उत्तर

भारतीयांमध्ये वापरले जाणारे 'सरकी चे तेल' आणि 'आलं लसूण च्या पेस्ट' ची पाकीट च्या पाकीट का आणली होती याचे उत्तर तो आजुनही देत नाही.(काहीतरी स्कीम असणार नक्की) पण आता पर्याय काहीच नव्हता. जी उपलब्ध सामुग्री आहे त्यात स्वयंपाक उरकून जे आहे त्यात समाधान मानणे हेच आमच्या हाती होते. त्यातल्या त्यात थोडे जास्त समाधान मिळविण्यासाठी प्रत्येक जण 'काथ्या वर आवाज उठवून आपापल्या परीने जमेल तसे ज्ञानामृत पाजून वर खुमासदार शिव्या हासडून समाधान मिळवू लागला. या 'सुवर्ण संधी' चा न चुकता सर्वांनीच फायदा घेतला' आणि पुन्हा पुढील तयारीला लागलो. कांदे बटाटे बारीक चिरून, दाणे भाजुन घेऊन मस्त फोडणी पडली आणि मसाला खिचडी शिजेस्तोवर दाणे, कांदा मसाला व आलं-लसूण पेस्ट घालून (ही पेस्ट आम्ही चहा सोडून सगळ्यात घातली, सकाळी दात घासायला देखील हीच वापरावी असेही सुचविण्यात आले तरीही पुढील १० ट्रेक पुरेल एवढी ती शिल्लक राहिली) झणझणीत खर्डा केला गेला आणि रटरटणारी खिचडी खाली उतरवली गेली. गरमागरम खिचडी, झणझणीत खर्डा, चमचमीत लोणचे, खमंग चटणी, शेकोटीत भाजलेले कांदे बटाटे असा 'पेशल-मेनू' आता पुढ्यात आला आणि "वदनी कवळ घेता.." चा जप म्हणून भोजनाचा कार्यक्रम पार पडला. मधेच काही नेहमीचे आवडते पदार्थ आठवले जसे की, पापड, साजूक तूप की लगेच 'तोंडी लावणं' म्हणून काथ्या च्या नावाचा उद्धार होत आणि पुढील जेवणाला प्रारंभ होत. थंडगार वाऱ्यात, निसर्गाच्या कुशीत, गडाच्या त्या उंच माथ्यावर केवळ आमचाच गट (ग्रुप) मोठ्या समाधानाने भोजन उरकून पोटोबा शांत करून आता गप्पांचा फड जमवित होता. आधीच्या भ्रमंतीचे किस्से, पुढील प्लान, शिवकथा, साप आणि त्यांचे किस्से यावर मनसोक्त गप्पा रंगल्या आणि मध्यरात्रीच्या आसपास त्या अफाट उंचीवर, दगडाची उशी डोक्याला घेऊन, नभांगणला अंगावर ओढून मंडळी निद्राधीन झाली.

हरिहर च्या माथ्यावरून फुटणारं तांबडं त्याच्या प्रकाशात चमचमणारी शिखरं आणि त्याने फुलांवरून पसरलेले सोनेरी गालिचे,पहाटेचा बोचरा पण गोडच वाटणारा गारवा, वानरांची सुरू झालेली दंगा मस्ती आणि पक्षायांचा किलबिलाट म्हणजे निसर्गाने जणू आमच्यासाठी गायलेली 'भूपाळी' च होती. अश्या त्या पवित्र वातावरणात आमची सकाळ झाली आजूबाजूचं मनमोहक दृष्य नजरेत भरभरून साठवत आम्ही लगोलग भटकंती सुरू केली. प्रातर्विधी उरकून आता या मंगल वातावरणात गरज होती ती फक्कड चहाची. 'टी-मास्तर' तसेच 'भरारी चे येवले' हे किताब मिरवणारा काथ्या लगोलग कामाला लागला आणि काही वेळातच आमच्यासमोर 'अमृतकुंभ' घेऊन हजर झाला. कडक बासुंदी चहा आणि जिवाभावाचे पार्ले जी चा आनंद घेऊन पुन्हा भटकंती सुरू झाली. थोड्याच वेळात गडावरील गर्दी वाढू लागली तसे आम्ही लोकांनी पण परतीचा मार्ग धरला. लगोलग पाठपिशव्या भरल्या आणि गडाची अंतिम भ्रमंती सुरू केली. गडाचे पठार तसे निमुळते असल्याने आणि वरती पाहण्यासारखे काही नसल्याने आजूबाजूचं निसर्ग, सह्यदऱ्यांचं कातळवैभव पाहात आमचा विहार सुरू होता. प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील बंदरांमध्ये उतरणारा माल हा नाशिकच्या बाजारात आणला जात त्यावेळी गोंडा घाटातून येणाऱ्या मालावर नजर ठेवण्यासाठी मुख्यतः या गडाचा वापर होता. थोड्या भटकंती नंतर आता पुणे गाठणे गरजेचे होते म्हणून आम्ही गडाला मुजरा केला आणि त्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून पुन्हा गड उतरून सुमारे २ तासात आमच्या गाडीपाशी पोहचलो.
परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली खरी पण निघाल्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका सुरेख 'बांधा' ला पुन्हा मंडळी खाली उतरली. थंडगार पाण्यात गडाच्या पायथ्याला मनसोक्त पोहुन आणि शेकड्याने सूर मारून झाल्यावर पुन्हा ताजेतवाने मावळे गाडीत बसले आणि पुण्याचा प्रवास सुरू झाला. वाटेत झुणका भाकर, खर्डा, व्हेज थाळी आणि लिटर च्या लिटर ताक ढोसून पुन्हा धष्टपुष्ट गडी तयार झाले आणि अभिजात भारतीय संगीता मधील सर्व पैलू उघडिले गेले. काही (अ)रसिकांनी आता डुलकी घेणे पसंत केले.
परतीचा प्रवास पुन्हा सुरू होणाऱ्या कामांची आठवण करून देत होता खरा.पण त्या सर्व कामांवर हिमतीने मात करण्यासाठी लागणारी ताकद आता आम्ही सोबत घेऊन निघालो होतो. दोन दिवसाच्या गडाच्या आठवणीत मी देखील थोडा हरपून गेलो. तोंडावर येऊन ठेपलेल्या 'दसऱ्याचे सोने' मी आज दोन दिवस आगोदरच लुटून आणले होते. खरंतर त्या सह्याद्री ने, निसर्गाने स्वतःहूनच आम्हाला ते भरभरून दिले होते. असे "सोने लुटायला कायम सीमोल्लंघन करीत राहा!" असा संदेश तो देतोय असा मला भास झाला आणि माझी डुलकी काही काळ उघडली. गाडीतिल मंडळींची, सध्या वाहिनिवर व सोमी वर ताज्या असलेल्या #मीटू या विषयाची चर्चा सुरू होती ती चर्चा मधेच तुटली व पुन्हा दिवाळीतील गड भ्रमंती चे प्लान झाले. कोण कोण दिवाळीतील ट्रेकला येणार? या प्रश्नावर अभिमानाने एकसुरात #मीटू म्हणीत आम्ही पुण्यनगरिस परत पोहचलो.


भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७


मोहिमेतील सहभागी मावळे : निखिलेश,स्वप्नील,महेश,सुनील,दुर्वास,श्रीकांत,विनय,विकास, आमोद,निलेश.