भारतीय संगीतविश्वातल्या आणखी एका दैवी स्वराच आज स्वर्गारोहण झाले. भारतीय संगीताच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरावटीने आजवर जे कोणी भारावून गेले असतील त्या प्रत्येकाच्या मनात आशा भोसले यांचे नाव हे भारतीय पार्श्वगायनाची राणी म्हणूनच उमटले असेल यात शंकाच नाही. एक दोन नव्हे तर तब्बल 12000 पेक्षा जास्त गाणी गाऊन गेली अनेक दशके ज्या सुरांनी या विश्वावर राज्य केले त्या केवळ 93 वर्षे वय असलेल्या एका देखण्या तरुणीचा आवाज आज कायमचा शांत झाला!
कोणतीही भावना आशाताई जेव्हा गाण्यातून व्यक्त करायच्या तेव्हा प्रत्येकाला मला असेच व्यक्त होयचे होते असे वाटणे हीच खरी त्यांनी केलेली जादू होती. जगातील असंख्य माणसांना त्यांच्या बालपणापासून 'नाच रे मोरा' च्या आवाजाने भुरळ घालत गेलेला हा आवाज पुढे पुढे तारुण्यात पदार्पण केल्यावर तर खूपच आपलासा वाटू लागला. गेली अनेक दशके तरुणांना त्यांची प्रेमिका ही आशाताईंच्याच आवाजात सापडत आलेली आहे.आपल्या श्रृंगार रसातील संगीताने त्यांनी तरुणांना अक्षरशः वेड लावले. भावगीत, नाट्यगीत, लावणी, गझल, उडत्या चालीची गाणी सोडाच पण एकीकडे अगदी पॉप आणि रॉक गात असताना दुसरीकडे अध्यात्माच्या वाटेवर जाणाऱ्यांना आशाताईंनी आपल्या सुरातून थेट ज्ञानेश्वरांचे दर्शन दिले.परमेश्वराने विश्वाला दिलेल्या 'कान' या अवयवाचे आपल्या सुरांनी सार्थक करणारी व्यक्ती म्हणजे आशाताई. कणेकर म्हणतात तसे या जगात दोनच भोसले झाले एक शिवाजीराजे आणि दुसऱ्या आशाताई. वपु म्हणाले तसे लता सरस्वती असेलच पण आशा त्या सरस्वतीची वीणा आहे. आशाताई म्हणजे सुरांमधून कोसळणारी वीज होत्या पण त्या ज्या झाडावर कोसळत त्याची राख न होता ते उजळून निघत असे.
आशाताई तुम्हीच तुमच्या मुक्तीची जी व्याख्या मांडली ती आज खरी ठरते आहे.... "माझा जन्म, माझी नाती, माझं संगीतातील समर्पण, माझी यशस्वी वाटचाल आणि मुलगी, आई, बहीण, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य यांच्या सर्वांच्या प्रवासात बोट चालवणारा नावाडी म्हणजे माझं संगीत आहे. जे मला आयुष्याच्या या नदीतून जाताना मार्गदर्शन करतं. जेव्हा मी या नदीच्या दुसऱ्या काठावर पोहचेन तेव्हा हा प्रवास पूर्ण होईल आणि मला मोक्ष प्राप्त होईल. त्या अवस्थेत मी आपल्या आजुबाजूला तरंगणाऱ्या हजारो आवाजांपैकी एक होईन. जो पुढे जाऊन सुंदर गाण्याचा सूर बनेल. असे गाणे जे हजारो वर्षे अनेक पिढ्या ऐकतील. निसर्गाशी एकरूप होण्याची ही मुक्ती मला त्या दुसऱ्या काठावर मिळणार आहे.
पद्मविभूषण या भारतातील दुसऱ्या सर्वोच्च नगरी पुरस्काराने सन्मानीत आणि हजारो पदके, पुरस्कार पटकाविलेला हा ध्रुव तारा आज निखळला पण त्याचे भूलोकातील स्थान हे पृथ्वीच्या अंतापर्यंत अबाधित राहील यात शंकाच नाही. रफी, किशोर, लता आणि आशा या चार दिग्गजांची मैफल आज स्वर्गात रंगेल तेव्हा देवांनाही ' स्वर्गसुख ' म्हणजे नक्की काय याची अनुभूती मिळेल. या विश्वातील सुरांवर ज्यांनी शब्दशः राज्य केले त्या आशाताईंना आजही म्हणावेसे वाटते.... अभि ना जाओ छोडकर, की दिल अभी भरा नाही ! भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻 निलेश वाळिंबे.