आपण सगळ्यांनी स्वातंत्रदिन हा संह्याद्री च्या कुशीत जाउन मस्तपैकी साजरा करायचा असा आमच्या पोरांचा बेत ठरला आणि क्षणात समोर आला तो कोकणातला अत्यंत मनमोहक वातावरणात असणारा "रसाळगड" !२ दिवस रासाळगडा वरच काढायचे नक्की झाले. कात्या आणि आमोद ची हि तिसरी फेरी होती. मी त्यांना म्हणालो कि २ दिवसात एकच किल्ला काय करायचा ? आपण अजून दुसरी कडे पण जाऊन येऊ ! तर दोघे म्हणाले, आधी इथे चल तर आणि मग ठरव जायच का अजून कुठे.
ठीक आहे म्हणत मग, १३ तारीख रात्री बरोब्बर ९ वा. सगळ्यांनी रात्रीचा डबा आणि १ दिवसाचा शिधा घेउन चांदणी चौकात जमायचे ठरले. आणि अगदी ठरल्याप्रमाणे आमचा इन्या बरोब्बर ९.३० ला (फ़क्त अर्धा तास उशीरा) ठरवीलेली गाडी घेउन त्याच्या घरून म्हणजेच लोहगाव येथून डेक्कन, मग कात्रज ला आमच्या राजेंना घेउन रात्री बरोब्बर (ठरल्याप्रमाणेच म्हणा हव तर) ११ वाजता चांदणी चौक येथे पोहचला.तोपर्यन्त बाकी मंडळींचे प्रवासात खायला घेतलेले डबे संपत आले होते.मग परत एकदा राहीलेल्या पाव भाजी चा फ़डशा पाडून श्रीगणेशस्तवन झाले आणि अखेर... स्वारी निघाली निसर्गात भरारी मारायला !
रात्री एकदा चहापानाचा थांबा सोडता मी सर्व प्रवास मनामद्धे रसाळगडाच्या कार्यक्रमाचे आराखडे आखत मस्त पडी ठोकली.
१४.ऑगस्ट २०१०
सगळ्या स्याक येका ओळीत लावून प्रथम आम्ही गडावरचे देवीचे मंदीर साफ़ करून येथेच तळ ठोकण्याचा निर्णय घेतला.आणि ठरल्याप्रमाणे कामाला लागलो. मंदीराची देखभाल गावातल्या लोकांकडून अत्यंत उत्तम रितीने ठेवली जात असल्याने आम्हाला फ़ारसे कष्ट पडले नाहीत. आणि अगदी पाचच मि. मधे सगळी स्वच्छता आटपून आम्ही पूढचा आणि महत्चाचा बेत आखायला सूरवात केली.
बघतो तो ड्रायव्हर काका येव्हान मस्त घोरायला देखील लागले होते. आता पोटातले कावळ्याच्या कलकलाट बाहेर ऎकू यायला लगला होता, तशी आमची तयारी जोरात सूरू झाली. आपच्या जावईबाप्पूंना म्हणजेच "प्रसाद डेंगळे (त्रुतीय)" उर्फ़ "वारे बत्तीवाले" याला त्याच्या सासरेबूवांनी (हे नको नको म्हणत असतानाही) दिलेली अत्यंत मोलाची अशी भेटवस्तू अर्थात "बत्ती वजा स्टोव्ह " बाहेर काढला. आणि सेना कामाला लागली पाणि आणून.. पोहे भीजत घातले गेले, कांदा चीरताना पण का होईना पण मला रडवायची ही संधी देखील कोणी सोडली नाहीच, बटाटे,मिरच्या, मसाला, हळद, मोहरी, जीरं, मिठ, साखर सगळ बाहेर काढून मस्तपैकी "पोहे" बनवायला सुरवात केली. आता सगळ्यांच्या आशाळभूत नजरा पोह्याच्या पातेल्यावर खिळल्या होत्या. पोहे तयार होताच. गिरया आणि कात्याने चहाचे आधण ठेवले आणि स्थाई स्वरूपात असलेल्या दुधा्चे अर्थात मिल्क पावडरचे, ’..पानी का भी दुध’ करण्यात पटाईत लोकांनी दुध बनवीले.आणि मग आमचा "कांदे पोहे" कार्यक्रम पार पडला. (नव्हे नव्हे तो कांदे पोहे कार्यक्रम नव्हे बर !)
कूंद हवा, हिरवागार निसर्ग, मधेच पडणारी पावसाची सर, धूक्यात हरवलेलो आम्ही आणि गरमागरम पोह्या बरोबर कडक चहा पानाची अवीट गोडी याची मज्जा काही औरच होती ! आता वेळ आली होती ठराव पास करण्याची.आमच्यात कधीच कोणतेही मतभेद अथवा वाद न होता नेहमी "जो ठराव एकमताने पास होतो" अर्थात तोच झाला "वामकूक्षी" घेण्यावर सगळ्यांचे एकमत झाले. (आपणास संसदेत पगार वाढीकरीता आपल्या खाजदारांनी दाखीवलेल्या एकीचा प्रत्यय येथे आला असेल कदाचीत ) आणि मग काय, दिली मस्त ताणून.तास दोन तासाची (छोटिशी) विश्रांती झाल्यावर आम्ही गडावर फ़ेरफ़टका मारायला बाहेर पडलो.
इथल्या निसर्गाच वर्णन करायला खरतर माझ्याकडे शब्दच नाहीयेत. उंच आकाश, डोळ्यांसमोर अथांग पर्वतरांगा, त्या ऊत्तूंग पर्वतशिखरांना मिठी मारू पाहणारे धुरकट ढग, हिरवीगार मखमली शाल पांघरलेला निसर्ग, थंडगार वारयाची सळसळती लाट, मधूनच पडणारी पावसाची हलकीच पण मनं चिंब करणारी ती सर, क्षणात आपल्या धूक्याच्या जादूने संपूर्ण निसर्गाला जणू पांढरया चादरीखाली झाकून टाकणारी ती धूक्याची जादू,आपल्या राष्ट्रासाठी आपले "भगवे रक्त" वाहीलेल्या त्या थोरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमितून वावरताना आम्ही सर्वजण आता एका वेगळ्याच विश्वात पोहचलो होतो.भयाण शांततेत फ़क्त त्याचा आणि त्याचाच (निसर्गाचा) हक्क असलेल्या त्या वास्तूत "स्वर्गसूख स्वर्गसूख म्हणतात ते काय, याची प्रचिती आली". त्या निसर्गाची मैत्री आणि मनमूराद आनंद देणारा त्याचा सहवास अक्षरश: माझ मन सूखावून गेला ! रसाळगड सुमारगड आणि महिपतगड अशी हि ३ किल्ल्यांची रांग मुख्य सह्याद्रीच्या रांगे पासून थोडी तूटलेली आणि महाबळेश्वर च्या रांगेला समांतर धावताना फ़ारच विलोभनीय दिसत होती तर दूसरीकडे, चकदेव पर्वताच्या त्या उत्तूंग शिखरांना पाहताना मनात धस्स होत होते. किती पाहू किती घेऊ आणि किती साठवू अशी हपापलेली अवस्था झाली होती. मग काय क्षणात आपआपले छायाचित्रणाचे छंद जोपासत जितक जमेल तसे "क्लिक" पडायला सुरूवात झाली.
पून्हा मला रडविण्याची संधी न चूकविता कांदे हातात दिले गेले, कात्या तांदूळ धुवून घेतोय, एक निल्या पाणी आणतोय, दुसरा निल्या भांडी धुवायला गेलाय, वारे आपली बत्त्ती (दिवे) लावतायेत, राजेंच निरीक्षण आणि पुराव्यादाखल छायाचित्रण चालू आहे, इन्या साफ़सफ़ाई करत मदतनीसाच्या भूमिकेत आहे असा "माजघराचा रंगमंच" आत त्या मंदीराच्या पवित्र वास्तूत उभा राहीला होता आणि आमच्यावर नजर ठेवत होती ती साक्षात "आई" देवी झोलाई थोड्याच वेळात पूर्वतयारी होत आली आणि मुख्य आचारयाच्या भूमिकेची संधी पून्हा मला सोपविण्यात आली. एकीकडे फ़ोडणी टाकण्यात आली आणि मुख्य खिचडी शिजायला लागली आणि तोवर लगेच दुसरीकडे आमचा उद्याचा बेत शिजायला लागला. १५ मि. खिचडी तयार झाल्यावर नंतर परत वरून १ मस्त लसूण तडका मारून आम्ही ताव हाणला. आणि मग गप्पा मारत येकमेकांच्या चादरी पळवत माजघराचा सेट निघून शयनघर ऊभे झाले.दिवसभराच्या त्या निसर्गाने दिलेला आनंद आठवत आम्ही दिवसाचा निरोप घेतला.
१५.ऑगस्ट २०१०.
सकाळीच ड्रायव्हर काका चहा पावडर(जी काल संपली होती) घेवून गडावर आले. बरोबर २ गावकरी होते झेंडावंदनासाठी तयारी सुरू झाली "ध्वजस्थंब" उभारला गेला गावातील काही तरूण, शाळेतली मूलं, आणि खास मुबई वरून आमचे मित्र प्रविण कदम "दुर्गभरारी" या संस्थेतर्फ़े गडावर आले. मोठ्या थाटामाटात गावातील सर्वात जेष्ठ "काशीद आजोबांच्या" वय वर्षे ७९ फ़क्त यांच्या हस्ते महाराज्यांच्या प्रतीमेच पुष्पहार घालून त्याच्याकरवे झेंडावंदन पार पडले. आणि "भारत माता की जय "च्या घोषणांनी सारा आसमंत दूमदूमला. मग सगळ्यांना जिलबी वाटण्यात आली सर्वांची न्याहरी आणि चहापान आटोपून गावतल्याच एका छोट्या मित्र "लव" समवेत आम्ही गडाच्या पूर्वेस साधारणत: २५० फ़ूट दरीत उतरून अत्यंत सूबक आणि सूंदर अश्या कपारीत कोरलेल्या पाण्याचं टाकं बघायला गेलो. प्रचंड सूरेख कलाकूसर आणि अडीअडचणीत भासणारया गरजेचा विचार करून या बारमाही पाणी असलेल्या टाक्यापाशीच आम्हाला ती १७ वी तोफ़ देखील आढळली. ती बघून येताना वाटेतील स्म्रुती मनोरयातील भंगलेले अवषेश एकत्र रचून ईतिहासाचा हा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न करत, वाटेतील कचरा साफ़ करत/ऊचलत आम्ही गडाला मुजरा करून त्याचा निरोप घेतला.
परतीच्या प्रवासात नागराजांनी आपले दर्शन देत आम्हाला आडवे गेले जणू ते निरोपच द्यायला आले असावेत.अखंडीत गाणी तसेच कात्या, गिरया, निल्या ची स्व:निर्मीत अत्यंत श्रवणीय गाण्यांचा अस्वाद घेत वाटेत "सावीत्री नदीत पवीत्र स्नान" करून आम्ही महाबळेश्वर मार्गे निघालो.वाटेत नयनरम्य निसर्गाची साथ येथेही कायम होती मोठमोठ्या डोंगरावरून कोसळणारे पांढरेशूभ्र धबधबे आमचा भिजण्याचा मोह आवरू शकले नाहीत दोन्ही बाजूला गर्द वनराई आणि नागंमोडी वाट पार करत,
स्वातंत्रदीनाच्या या दिवशी आम्ही त्या, "शहीदांना सलाम करून थोडेपार किल्ल्यावर सामाजीक कार्य करून आपला हा देश खरोखरच "भ्रष्टाचार मूक्त" बनावा आणि त्यातला निसर्ग सर्वांना जपण्याची बुध्दी मिळावी अशी मनोमन प्रार्थना त्या "झोलाई देवी" च्या चरणी नतमस्तक होवून केली आणि पूढ्च्या ट्रेक ची योजना आखत सरतेशेवटी रात्रीचे जेवणदेखील सगळ्यांनी बाहेरच करून घरी जायचा बेत ठरला पण कात्याला नेहमीप्रमाणे आजही "कोंबद्यांच्या तंगद्याच" पहीजे होत्या त्यासाठी बरेच ढाबे पालथे घातले पण जागा काही मिळेना १५ ऑगस्ट चे औचित्त साधून बहूधा समस्त पूणेकर महीलांनी देखील आज स्वत:ला स्वयंपाकतून "स्वातंत्र" दिले होते अखेर बरयाच मेहनतीअंती आम्हाला शाकाहारी जेवण मिळाले आणि कात्यासकट सगळे तेच मस्त पिठलं भाकरी आणि खरड्यावर ताव मारून रात्री ११ वाजता पुनवडीस परतलो."
भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.
९८२२८७७७६७