Friday, March 4, 2011

माझी दंत-कथा

                                                                                                                                                                                           
मित्रहो नाव वाचून कदाचीत लक्षात आलं नसेल पण खरच हो ही माझीच दंतकथा आहे. अगदी सत्यघटनेवरची दंतकथा म्हणा हव तर. म्हणजे माझ्या दाताची कथा आहे ही.” ऐन तारूण्यात हे असले आजार होतातच कसे ?” परंमपुज्यांच्या या प्रश्णाच्या प्रहाराने माझ्या कथेला सुरूवात झाली. त्याच झाल अस की, जवळपास १ आठवडा माझी दाढ अचानक प्रचंड दुखू लागली. मागेही दुस-या एका दाढी(ढे)ने (मिशी आणि दाढीतली दाढी नव्हे) मला या “(प्रसूती)वेदना”  दिलेल्या होत्या आणि त्यावर उपाय म्हणून मला “root canal” नावाचा महाभयंकर प्रकाराला सामोरे जावे लागले होते.त्यावेळेपासूनच root canal नाव जरी ऐकले तरी माझी “दातखिळीच” बसते. आता पुन्हा त्या सगळ्या प्रकाराला आणि त्या मेंदूत आतपर्यंत घूरघूरणा- -या आवाजाला त्या जादूच्या all in one अश्या खूर्चीत बसवून रबरी हातमोजे घालून आपले जबडे ताणले जाणार या भितीनेच मी जवळपास आख्खा आठवडा घरगूती उपायांवर काढत होतो.
कापराचा कापूस, लसणाची पाकळी, लवंगीचा बोळा असल्या नाही नाही त्या ’फ़ोडण्या’ मी आठवड्याभरात त्या दाढेला देउन बसलो होतो. यात फ़ायदा काहीच झाला नव्हता मात्र काहीही खाल्ले तरी मला त्या मसाल्याच्या पदर्थांचीच चव सगळ्याला जाणवू लागली होती. पण वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यामूळे आता आपल्याला दंतवैद्याच्या ”त्या” खुर्चीत लोळायला लागणार (सहसा खुर्चीत बसतात पण त्या खुर्चीत तूम्ही गडाबळा लोळायचे बाकी असता ) हे जवळपास निश्चीत झाल होत. पण आता काहीही झाल तरी मी त्या मागच्या वेळी गेलो होतो  त्या Dr. कडे जाणार नव्हतो(तो मी तेव्हाच केलेला निश्चय होता) त्यामूळे आता माझी नविन शोधमोहीम सुरू झाली होती. माझ्या घराजवळच लहानपणापासून (म्हणजे माझे दुधाची दात होते आगदी तेव्हापासून) मी  १ दातांच्या Dr. चा दवाखाना पहात आलो होतो आणि मला त्यांच्या आडनावाबद्दल फ़ारच कुतूहल वाटत असे. म्हणजे ते आत्ता देखील वाटते म्हणूनच मी त्यांच्याकडेच जायचा निर्णय घेतला.त्या माझ्या Dr. नाव होत “दाते”. यांच्याकडे जावून,“तूम्ही आडनावावरून हा व्यवसाय निवडला का या व्यवसायात आला म्हणून आडनाव बदलले” किमान या यक्ष प्रश्णाच उत्तर आतातरी नक्की मिळणार या आशेने मी त्या दवाखान्याच्या (लहानपणी मी याच “दवाखाना या शब्दाला दवारवाना” अस वाचायचो) वेळा, फोन नं. टिपून घेतल्या. फोन केल्यानंतर दुस-या दिवशी संध्या. ७.३० ची वेळ मिळाली. ठरल्या वेळेनुसार मी बरोब्बर ८.१५ ला (फ़क्त ४५ मि. उशीर) पोहचलो. दारातच  “एकदंताच” स्मरण करून आत गेलो. आतमद्धे माझ्या आगोदर १ आजोबा आपला नंबर लावून बसलेले होते. सहजच माझ लक्ष त्यांच्या चमकणा-या दातांवर गेल आणि त्यांच्या (आजोबांच्या) जबडा आकसून बसण्याच्या त्या कृतीने माझ्या लक्षात आल की आजोबांनी नक्कीच ही नवीन कवळी लावलेली दिसतीये. थोडा वेळ तिथे पडलेली काही चित्रपटांची मासीके चाळून मी माझी दाढ्दूखी कमी करत (आणि दोकेदुखी वाढवत) बसलो असताना २० मि. नंतर माझा नंबर आला आणि मी आत गेलो.
आतमद्धे गेल्यावर समोरच मल प्रथम नजरेस पडली ती सर्वगुणसंपंन्न आशी लोळायची (म्हणजे लोळायला लावणारी खुर्ची) आणि टेबलवर  मला दात दाखवत ईईई.. करून बसलेली खोटी कवळी.त्याच्याच बाजूला त्रिकोणी आकाराची १ हातोडी दिसली आणि मला मागच्या
वेळेच्या सगळ्या घटना आठवू लागल्या. तेवढ्यात इतका वेळ हात धूवत असलेल्या Dr. सौ. दाते आपल्या चेह-यावरचा मास्क बाजूला सारत आपले “दाखवायचे दात” दाखवत समोर आल्या. आता दुस-या पर्वाला सुरूवात होणार होती.
आता मी त्यांच्या टेबलाच्या समोरच्या खुर्चीत बसून माझी ‘बत्तीशी’ सुरू केली सगळ ऐकून घेतल्यावर त्यांनी मला खुर्चीत बसण्याची सूचना केली. मी बसल्यावर त्या जादूई खुर्चीला डाव्या हाताला असलेल्या नळाला आपोआप पाणी आले त्याखाली ठेवलेल्या ग्लासमद्धे भरले गेले.(अय्या..’जादू’ अस झाल) आता मला चूळ भरून “आ” करायला सांगीतले गेले. त्या पाण्यानी चूळ भरताच मला एकदम दात घासल्यासारखा भास झाला. मी “आ” वासून बसलो होतो वैद्य बाईंनी आता माझ्या डोक्यावर त्या खुर्चीचाच १ भाग जो मला दिवा असलेला  हात वाटला तो आणून ठेवला होता आणि कुठल्याश्या लोणी लावायच्या सूरीसारख्या आयुधाने आपले परीक्षण सुरू केले होते. आणि थोड्या क्षणातच माझी “आंकाळी” (आ करून मारलेली किंकाळी) त्या वेदनेसह बाहेर आली. २-३ मि. च्या निरीक्षणानंतर परत चूळ भरायला लावून आपल्या चेहत्याचा मास्क बाजूला सारत शक्य तेवढा गंभीर भाव चेह-यावर आणून (ही बिलाच्या वेळी त्रास वाटू नये म्हणून केलेली युक्ती असावी असच वाटते मला) मला म्हणाल्या कदाचीत “root canal” कराव लागेल आत्ता आपण X-ray काढून घेउ. मी फ़क्त ठिक आहे म्हणालो (अजून काय बोलणार हो हा माझा देह) आणि त्यांनी लगेच त्याच जादुई चा दुसरा शस्त्रधारी हात वाटावा असा एक टोक असलेल मशीन समोर ओढून माझ्या दाढेखाली काहीतरी ठेवून एखाद्या जाहीरातीमद्धे “एका क्षणात क्ष-किरण” अशी पंचलाईन शोभेल इतक्या वेगात तो X-ray काढला व पुन्हा उठून त्यांच्या टेबलपाशी बसायाची सूचना केली. दात घासायच्या ब्रश सारख्या आकाराच्या एका पेनने त्यांनी मला काही गोळ्या लिहून २ दिवसांनी काहीतरी खाउन यायाला सांगीतले.
मी तिकडून निघालो पण घरी पोचेस्तोवर आता मला मागच्या वेळेचा घडलेले सर्व प्रकार आठवले. आता मला त्या सर्व वेदनांना आणि त्या root canal नावाच्या प्रकाराला पुन्हा सामोरे जायचे होते. त्यातल्या त्यात मला बर वाटेल आशी वैद्य बाईंनी आजून १ गोष्ट सांगीतली होती ती म्हणजे माझी जी दाढ दुखत होतो ती म्हणे “अक्कल दाढ” होती. त्यामूळे की काय, “चला किमान (अक्कल)दाढ तर आहे म्हणजे आपल्याला यानेच काय ते मी थोडा सुखावलो होतो.”
आज ठरल्याप्रमाणे मी थोड खाउन दवारवान्यात (दवाखान्यात) पोहचलो २ दिवसाच्या गोळ्यांनी वेदना ब-याच कमी झाल्या होत्या. पुन्हा त्या “एकदंताला” स्मरून मी वैद्य बाईंपुढे माझे ’हस्तीदंत’ उघडून बसलो. त्यांनी तो छोटासा X-Ray बघत मला जो जबरद्स्त धक्का दिला त्याने माझी ’दातखीळीच’ बसली. त्या म्हणाल्या, “कीड फ़ार आत गेली आहे ही दाढ काढूनच टाकूयात असही फ़ारसा उपयोग नसतोच आजकाल हिचा.” मनात म्हणल उपयोग नसतो मग काय Dr. ला काढायचे पैसे मिळावेत आणि उत्पंन्नाचा त्रोत मिळावा म्हणून निसर्गाने दिलीये का ती मला ? पण हे प्रत्यक्ष कस बोलणार हो आपण पडलो गरीब लोक, शेवट काय “दात दाखवून अवलक्षण” म्हणाव त्यातला प्रकार झाला होता आणि मी ५ मि. वेळ घेउन शेवटी ती काढायचा निर्णय घेतला.( त्या ५ मि. मधे अक्कल नव्हतीच आता अक्कल दाढ पण जाणार याचच दु:ख करत बसलो होतो ) मग काय, ती खुर्ची, पक्कड, सुई, इंग्जशन,कापूस यांनी मला संगीतातले आकार घेयला लावले आणि १० मि. मध्दे पुढचे सोपस्कार उरकून मी फ़क्त हुम्म्म.., हम्म..,हुउउउउ.. असली उत्तर देत माझे बिल चुकते केले आणि
“हा दाते नामक दंतवैद्य माझ्या दातांचा ’दाता’ असावा आश्या भ्रमात ज्या दवाखान्यात अक्कल नसल्यासारखा गेलो तेथेच ती अक्कल दाढ देखील सोडून दाते बाईंच्या हसताना दिसणा-या त्या दंतपंक्ती बघत पुढच्या वेळी आजून नवा वैद्य हा निश्चय करत तिकडून बाहेर पडलो.”  

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश वाळिंबे

॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥

                                                              

२४ जानेवरी २०११ सकाळी माझ्या मित्राचा फोन आला आणि इतर वेळी तास तास गप्पा मारणारे आम्ही आज फ़क्त १ ओळ फोनवरती बोलून दोघेही स्तब्ध झालो. तो म्हणाला.. "निल्या, अण्णा गेले रे" डोळ्यात टचकन पाणि आले आता वाटले जणू संपूर्ण विश्वातले सूरच हरपले होते. अण्णा जवळपास २ आठवडे दवाखान्यात होते मागच्या शनिवारी दवाखान्यात भेटायला गेलो पण फ़क्त निरोप मिळाला की, आत्ता तब्येत सुधारते आहे तेवढ्यावरच समाधान मानून घरी परतलो होतो पण "बहुधा दिप अस्ताला जाण्याअगोदर त्याची वात प्रखर आणि मोठी होते त्याचाच तो प्रत्यय होता".मी तडक गाडी काढून पंडीतजींचे घर गाठले. आसपासचे सर्व रस्ते बंद, मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आणि प्रचंड चाहता वर्ग अगोदरच जमा होता मी दर्शनासाठी घरात गेलो.
समोर अण्णाचे पार्थिव बघून मन विशण्ण झाले क्षणात ते "सूर" कानात घूमू लागले.मैफल संपवून निवांत पहुडलेल्या आण्णांच्या चेहर्‍यावर मैफलीची एक सफल सांगता झाल्याची "चित्कळा" पसरली होती. सूरांचा तो राजा ज्याने राज्य केले अहो, साधेसूधे नव्हे तब्बल ८९ वर्ष राज्य केले त्या सूरांवर, त्या चाहत्यांवर, त्या गाण्यावर, त्या आवाजावर ज्याने आपला अंमल ठेवला तो गंधर्व आज स्तब्ध होता.
"अण्णा" हे एक अस व्यक्तीमत्व होत ज्याच्यासमोर या भूतलावरच्या सर्व स्वरांनी जणू लोटांगण घातल होत. ज्यांच्या अभंगात स्वत: पांडूरंग तल्लीन होत आपले भान हरपत असेल आपला कमरेवरचा हात काढून तो "हरी" देखील ’वाह..वा’ ची दाद देत असेल असा तो "स्वरभास्कर" आज आपल्यात नाही हे मनाला पटत नव्हते, सहन होत नव्हते. या महाराष्ट्रातील अभंगवाणी आता मुकीच झाली जणू असे वाटायला लागले.   मी शाळेत असल्यापासून माझ्या आजोबांचे मित्र असलेले आण्णा, सवाई मधे पहाटेपर्यंत गाणारे आण्णा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आण्णा, "मिले सूर मेरा तूम्हारा" या ओळी ऐकल्या की वाड्यातल्या कोणाच्यातरी एखादयाच्याच घरात असलेल्या टिव्ही समोर संपूर्ण वाडा क्षणात गोळा करणारे आण्णा, माझ्या शाळेत आण्णांचा "सवाई" असतो असे अभिमानाने आम्हा पोरांना गावभर सांगायची ईच्छा निर्माण करणारे आण्णा, २००८ साली देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या "भारतरत्न" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ते आण्णा, पाच दशकांपासून भारतीय शास्त्रीय गायनाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे आण्णा, जणू आताच अखेरची "भैरवी" घेउन पहूडलेले भासले. संगिताच्या तिर्थक्षेत्रातील विट्ठलच आज हरपला हे कटूसत्य तेव्हा मला सहन होत नव्हत !
आता आण्णां चा "तो" प्रवास सुरू झाला असेल. स्वर्गलोकी आज आपल्या मैफ़लीत आण्णांचे ते जुने सवंगडी भेटतील वसंतराव, पु.ल. यांसमवेत आता पून्हा ती मैफ़ल बसेल आणि तो आसावरी तोडी, मालकंस, पूरिया धनश्री गायला जाईल साक्षात "ईद्र" पण वाहवा.. क्या बात है। ची दाद देईल आज ते "तुकाराम महाराज" ती स्वर्गीय संत मंडळी खरी "अभंगवाणी" ऐकून तल्लीन होतील आणि साक्षात परमेश्वराला देखील आज खर्या "स्वर्गसुखाची" गोडी कळेल!
अश्या त्या पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण,भारतरत्न आश्या अनेक किताबांनी गौरविलेल्या रसींकाच्या तारा जुळवून खरा सूर गवसलेले माझे, तूमचे, आपले, सर्वांचे ते "भिमाण्णा" त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभेलच आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना असे स्वर्गीय सूर ऐकवण्यासाठी ते नवा आवाज घेऊन परत येतील कारण ते "स्वरभास्कर" आहेत भास्कराचा अस्त शक्य नाही फ़क्त ते परत येतील तोपर्यत आपण सारे त्यांच्या त्या सूरांमध्दे त्यांना सदैव स्मरत राहूयात. नव्हे, याला पर्य्रायच नाही ! फ़क्त आज तूमची माणस म्हणतायेत..

तंबोरयाच्या तूटल्या तारा, अभंग वाणी गोठून गेली,
शेहनाईची गुंगी अचानक, अश्रूंमध्दे भिजून गेली,
भारत भू चे रत्न हरविले, पुण्य भूमी कुंतीथ झाली.

निलेश वाळिंबे.