Monday, June 4, 2012

होता उन्हाळा पण सर झाला ॥ सिंदोळा ॥


“ आता पावसाळ्याची वाट नको रे बघत बसायला.. चला एवढही काही उन वाटत नाहीये !” हे वाक्य ‘ऐकून’ आणि ‘ऐकवून’ “भरारी ग्रुप” मधील सगळ्यांनाच वीट आला होता त्यामूळे आता “बासच” या एका शब्दानेच त्या वाक्याला पूर्णविराम दिला गेला आणि तारखा ठरल्या २६,२७ आणि २८ मे. २०१२ सगळ्यांना फोन झाले काही जणांना शक्य नव्हत तर काही जण उन्हामूळे होणा-या त्रासाबद्दल सांगून रडत होते. पण सह्यवीरांपुढे रणरणत्या उन्हाला घाबरण आता शक्य नव्हत. रापलेला आणि तापलेला आपल्या जवळच्या सवंगड्याच अर्थात सह्याद्रीच विराट आणि राकट रूप कधी दिसतय असच त्याच्या मित्रांना आता वाटू लागल होत. यावेळी शिवजन्माने पवित्र झालेल्या जून्नर तालूक्यातल्या किल्ल्यापैकीच सहसा न होणारा किल्ला निवडण्यात आला समूद्रसपाटीपासून अंदाजे ११२८ मीटर उंची असलेला आणि “मध्यम श्रेणीतला” असून देखील शेवट्च्या टोकाला थोडासा खडतर झालेला असा “किल्ले सिंदोळा”
ठरल्याप्रमाणे २६ ला रात्री १२ वा. सर्वजण खास पोशाख म्हणजेच फ़ाटलेल्या वा फ़ाडलेल्या हाप चड्ड्या, मळके टी शर्ट, मोठाल्या सॆक,दोर अश्या ऐवजासह तयार झाले ड्रायव्हर विनोद हा अमोद राजे ला घेउन निघाला आणि पुढे राजे एकेकाला गाडीत कोंबत मला डेक्कन ला भेटला आणि जाताजाता शाहू म्हणजेच आमचे निलेश महाडीक आणि विश्रांतवाडीस शरदरावांचे कोंबीग ओपरेशन करून “बाप्पा मोरया” च्या गजरात गाडीने ‘भरारी’ घेतली जून्नर च्या दिशेने. गाडी चालक विनोदला आमचे पेहेराव नवरदेवाच्या वरातीला चाललो असल्यासारखे का वाटले किंवा वरातीतल्या घोड्यांसारखे का भासले असावे माहीत नाही पण त्यांनी तडक राजांना सवाल केला.. राजे कुठे लग्नाला का ? :O नाही ! असे उत्तर मिळाल्यावर त्यांनी दुसरी शंका विचारली मग कुठे मोठा कार्यक्रम दिसतोय. :D तेव्हा लक्षात आलेच की हा जरा भारीच माणूस होता (पुढे अजून कळेलच) वाटेत चहापान करून तोफ़ांवर (क्रीमरोल) ताव मारून पुणे-नारायणगाव-जुन्नर-गणेश खींड-पारगाव फ़ाटा-पारगाव आणि बगाडवाडी असा प्रवास करत आम्ही पहाटे साडेतीन चार च्या दरम्यान पारगावात पोहचलो.सरकारी कृपेने दिवसभर वीज नसल्याने गावतल्या गिरण्या रात्री सुरू असल्याचे दिसले आणि तिथेच पहूडलेल्या मामांना विचारत गावतल्या सुंदर अश्या विठ्ठलाच्या मंदीरात पांडूरंग चरणी सा-या पुंडलीकांनी आपापल्या पथा-या पसरल्या. २-३ तासाच्या डुलकीनंतर पहाटे ६.३० ला वा-याच्या मंद झुळूकेसोबतच गावातल्या आजोबांनी मंदीरात घंटानाद केला आणि आम्हाला त्या प्रसंन्न वातावरणात जाग आली. उन्ह डोक्यावर यायच्या आत गडावर जायचे असल्याने पटापटा सर्वजणांनी नदीच्या काठावरच आपापली शिकार उरकून घेत,लगोलग गरमागरम वडापाव,चटकदार भेळ,मिसळ आणि बिस्कीटे खात पोटातली मोकळी केलेली जागा भरून काढली. आणि मुबलक पाण्याचा साठा, कोरडा खाउ काहींच्या खांद्यावर तर शेगडी आणि मॆगी माझ्या खांद्यावर लादून मावळे त्या वीराट सह्याद्रीच्या कुशीत शिरले.

या भागात बिबट्यांच वास्तव्य जास्त असल्याने तो दिसावा (पण लांबून) असे मनोमन वाटत होते. उन्हाळा असल्याने संपूर्ण जंगल करपल होत. प्रचंड प्रमाणात रानटी झाड आपले काटे पसरून आम्हाला त्यांच्या अस्तीत्वाची जाणीव करून देत होते. सदैव सह्याद्रीची सखी असलेली ‘कारवी’ आज फ़ारच रागावलेली भासत होती आपल खरखरीत रूप दाखवत तीन पार ओरबाडून काढल होत पण साथीला असलेल्या करवंदाच्या जाळ्या तोंड आंबट गोड करत, “त्या कारवीच मनावर घेउ नका हं ! घ्या माझा रानमेवा खा आणि त्या वेदना विसरून जा “आसच जणू सांगत होत्या.रान तूडवत वाट शोधण सुरू होत मी आणि राजे पुढे जाउन वाट शोधत होतो आणि आजूबाजूचा सह्याद्रीचा विस्तीर्ण पसारा बघत मावळे पुढे येत होते.सकाळची वेळ असून देखील तस ब-यापैकी उन लागत होत पण पाणी फ़ार जपून वापरायच हे सर्वांनी पक्क केल होत. तासाभरात अर्धा डोंगर चढून मावळे चालत होते, समोर एकच ध्येय होते त्या लाडक्या सह्याद्रीच्या कड्यावर जाउन त्याच्या कुशीतला वारा प्यायचे. मधेच मला आणि अमोद ला जरा आड वाटेने जावून थोडस थ्रील करायचा कीडा वळवळला आणि बाकी पोरांना पुढे धाडून आम्ही कडा पकडला. कड्यावरून चढत जात असताना पाठीवर ओझे असल्याने चांगलीच तहान लागली पण लक्षात आले की सर्व पाणी त्या ग्रूपमधे होते मग काय.. हळूहळू तशीच चढाई सुरू ठेवली पण थोड्याच वेळात घशाला फ़ारच कोरड पडली होती आजून कडा पार करून पाउल वाटेवर लागायला साधारण ७०-८० फ़ूट अंतर बाकी होते तिथे चक्कर आल्यासारखे झाले म्हणून वाटेतच असलेल्या  एका मोठया कपारीत आम्ही बसलो आणि पाठीवरच्या ओझ्यात चाचपणी सुरू केली त्यात नशीबाने लिंब सापडली आणि मग त्यालाच कापून तोंडात ठेवली त्याने जरा बरे वाटले ५ मिनीटात पुढे निघू अस ठरवून वर चढून आलेला कडा न्याहाळत होतो तो राजेला कपारीत ‘बिबट्याची विष्ठा आणि काही हाडे दिसली’ काही क्षण आराम करून आम्ही पुढली वाट धरली शेवटच्या टप्प्यात पुन्हा मला तहानेने व्याकूळ झालेले पाहून पायवाटेने कड्यावर पोचलेला शाहू पाण्याच्यी बाटली घेउन थोडा खाली उतरला आणि माझी तृष्णा भागवून आम्ही पुन्हा सर्वजण कडा पार करून वर आलो आता आम्ही सोंडेवर येउन पोहचलो होतो. दोन्ही बाजूला खोल दरी उजवीकडे लांबवर पसरलेला  पिंपळगाव जोगे धरणाचा चमचमता जलाशय आणि डाव्या हाताला खाली दिसणा-या टुमदार घरांच्या वाड्या, वस्त्या, तर तळपत्या सूर्याला आव्हान देत रूबाबात उभ्या असलेल्या लांबवर पसरत गेलेल्या डोंगररांगा आणि पिवळ्या धमक गवतात काळ्या कातळात कोरीवपणे आपले ठाण मांडून बसलेला सिंदोळा आम्हाला समोर दिसत होता. जाताना वाटेत दोन डोंगरातून पडलेल्या कपारीमधे थोडासा ओलावा दिसला, या ठीकाणी पाणीसाठा असावा असा अंदाज आल्याने सर्वजण त्या घळीतून वरपर्यंत चढून गेलो.घळीच्या टोकावर पोहचताच जंगली प्राण्यांचा जो उग्र वास येतो असा प्रचंड उग्र वास यायला लागला थोडे वाकून बघीतल्यावर लक्षात आले की आत थोडे पाणी आहे पण तिथे मधमाश्यांनी आपली ठाणी मांडली होती आणि घळीच्या वरच एक गुहा दिसत होती त्यात व्यवस्थीत चारा पसरलेला दिसत होता आणि सर्वात जास्त वास तिथूनच येत होता थोडे आजूबाजूला पाहील्यावर तिथे देखील “बिबट्याची विष्ठा” आढळली. थोडक्यात हे साहेबांचे निवास्थान आहे अशी आमची खात्री झाली आणि लगेचच तिथून रामराम घेतला व गडमाथा गाठायला सुरू केले. 

शेवटच्या टप्प्यात आता मावळे पोहचले होते या ठीकाणी वाट थोडीशी बिकट झालेली आहे, अतीशय अरूंद वाट एका बाजूला प्रचंड खोल दरी आणि वाटेवर तयार झालेला घसारा यामूळे जरा सावधतेने पावले टाकीत आम्ही पुढे सरसावलो. पावसाळ्यात ही वाट भयंकर अवघड होत असणार त्यामूळे आम्ही आत्ताच आलो ते बरे झाले असा विचार (मनात) करत सर्वजण माथ्यावर पोहचलो.गडाच्या प्रवेशद्वारात दोन फ़ुटके बुरूज आपले अस्तीत्व टिकवून शेकडो वर्षानंतर देखील तग धरून आहेत. समोरच अत्यंत सुंदर असे गणेशशिल्प कोरलेले असून त्यासमोर कोण्या सह्यभक्ताने निरांजन ठेवलेले आहे. गडात प्रवेशाचा हा एकमेव मार्ग आहे.हा किल्ला टेहाळणी साठी वापरत असणार याची खात्रीच आपणाला येथे पटते. गडावरून माझा आवडता हडसर, चावंड,शंभोचा डोंगर,दूर्ग चे विस्तीर्ण पठार,ढाकोबा,नाणेघाट,जीवधन तसेच हरीषचंद्रगडाची लांबवर पसरलेली रांग अगदी स्पष्टपणे दिसते. या सर्व गडांना मुजरा करून त्यांचे राकट रूप डोळ्यात साठवत आम्ही गडावरील टाक्यांपाशी पोहचलो पण पूर्ण अटून गेलेल्या टाक्यांजवर पोहचल्यावर मॆगी कार्यक्रम रद्द करून फ़क्त बरोबर असलेला खाउ खाण्याचे ठरले. गडावर बघण्यासारखे अजून काहीच शिल्लक नाही आणि सावलीसाठी झाड देखील नसल्याने आम्ही लवकरच त्याचा निरोप घेउन मुख्य दरवाज्यापाशीच आमच्या शिदो-या उघडल्या. सफ़रचंद,केळी,भाकरी,चटणी,खाकरा,लोणच,पोळीचा लाडू,भडंग अश्या ना ना पदार्थांवर ताव मारून पाणी पिउन आम्ही उतरायला सुरूवात केली. साधारण २,३ च्या सुमारास आम्ही पायथा गाठला आणि ऊसाचा रस पिउन लगेचच गाडीत बसलो कारण की सूर्यास्ताच्या आत नाणेघाटावर पोहचून सूर्यनारायणाच्या नीरोप समारंभाचे छायाचीत्रण करावयाचे होते.५ च्या सूमारास ज्याला सरकारी भाषेत ‘रस्ता’ म्हणले जाते अश्या भयानक वाटेने हाड खिळखीळी करीत आम्ही नाणेघाट गाठले.   
   
नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेलेला हा घाट फ़ारच सुंदर आणि प्रसिद्ध अशी जागा आहे.पावसाळ्याच्या सुमारास या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते. महाराष्ट्रातील प्राचीन असे सातवाहन कूळ ज्यांचे राज्य इ.स. पूर्व अडीचशे वर्ष तर ते इ.स. नंतर अडीचशे वर्षे असे जवळजवळ पाचशे वर्ष होते. त्यांचीच “प्रतिष्टान” (जून्नर) ही राजधानी. त्यांच्याकडून सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जून्नर) या राजमार्गावर नाणेघाट डोंगर फ़ोडून या मार्गाची निर्मीती केली गेली.प्राचीनकाळी कल्याण बंदरामद्धे परकीय लोक विशेषत: रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत.हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातली राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीस व्यापारासाठी नेला जाई.त्यासाठी व्यापा-याकडून जकात गोळा केली जात. त्याच जकातीसाठी बांधलेला आदमासे चार फ़ूट व्यासाचा आणि पाच फ़ूट उंचीचा सुरेख असा दगडी रांजण शेकडो वर्षानंतर आजही येथे रूबाबात उभा आहे.जकातकर रूपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत.नाणेघाट चढून गेल्यावर प्रथमदर्शी दृष्टीक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऎसपैस आणि सुंदर गुहा आणि पाण्याचे कुंड हेच येथील महत्वपूर्ण वैशीष्ट होय.या गुहेत साधारणत: पाऊणशे लोक सहज राहू शकतात.गुहेमधील तिन्ही भिंतींवर लेख कोरलेला दिसतो. हा लेख वीस ओळींचा असून मध्य भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भिंतीवर १० ओळी आढळतात.हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत.येथे पुरातत्व विभागाने संरक्षक कठड्यांबरोबरच त्या गुहेला दरवाजे बसवून तेलकट रंगाचे लेप फ़ासून त्याचे सौदर्य पार धुळीस मिळविलेले पाहून मनाला असंख्य यातना होतात पण घाटमाथा आणि कोकण यांचा देखणा मिलाप घडवून आणणा-या या जागेला ‘स्वर्ग’ म्हणणे अतीशयोक्ती ठरणार नाही.घाटाच्या डाव्या बाजूला हाताच्या अंगठ्याप्रमाणे दिसणारा सुळका आपले लक्ष वेधून घेतो यालाच “नानाचा अंगठा” असे सुरेख नाव देत लोकांनी आपलेसे करून घेतले आहे. तर उजव्या बाजूला दिसणा-या अतीउच्च दाबाच्या विद्यूत तारांचे मोठाले वीजवाहक मनोरे थेट हजारो फ़ूट खोल कोकणात उतरताना पाहून मन चकीत होते.आजुबाजूला दिमाखात उभ्या असलेल्या शिवनेरी,हडसर,चावंड व जिवधन या चार किल्ल्यांच्या मिलापाने नाणेघाटाची संरक्षक फ़ळी बनलेली आहे.याच निसर्गरम्य वातावरणात आमचा जेवणाचा आणि मुक्कामाचा बेत ठरला होता.मे महीना असल्यामुळे कुंडातील पाणी आटले होते म्हणून मी,अमोद आणि शाहू गावातील विहीरीवरून पाणी आणण्यासाठी बाहेर पडलो तर बाकी कार्यकर्ते गुहेतील साफ़साफ़ाई करण्यात गूंग झाले.विहीरीवर पाणी काढत असताना अमोदच्या हातून पोहरा पाण्यात पडला आणि पुढचा अर्धा तास तो काढण्यासाठी कराव्या लागलेल्या कसरती व करामतींमुळे निसर्गाने नकळत एक नवा अनूभव शिकवला होता.     
संध्याकाळ ओसरून आता अंधार पडत चालला होता आणि फ़क्कड चहा आणि गरमागरम मॆगी बरोबर गप्पा रंगत होत्या. तर दुसरीकडे जेवणाची पूर्वतयारी सुरू झाली होती.आमचे वाहन चालक श्री. विनोद गाडी सोडून आमच्याबरोबर राहणार नव्हते ते गाडीतच झोपणार होते. पण निसर्गात भटकंतीचा आजीबातच आनंद आणि रस नसलेले त्यात भर म्हणून कानावर आलेल्या अफ़वांमूळे आणि काही लोक त्यांचा पाठलाग करीत आहेत अश्या होत असलेल्या भासांमूळे त्या अंधारात आणि सूसाट वा-यांच्या आवाजात त्यांची चांगलीच तंतरली आणि ‘मला आजच मुलगा झालय हो..काही बरवाईट झाल तर मी फ़ार अडचणीत येईन, काहीही करा पण इथून चला!’ अश्या याचना कम हट्टच त्यांनी धरला.  सरतेशेवटी त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थीतीमूळे आम्ही सर्वांनी तेथून जवळच असलेल्या एका घराच्या पडवीत जेवण बनवून मुक्काम टाकायचे ठरवले.विनोद साहेबांच्या आणा-भाकांमूळे गुहेत राहण्याशी इच्छा तशीच मनात दाबून त्या टुमदार घराच्या मस्त सारवलेल्या अंगणात आमच्या चुली आणि बत्त्या पेटल्या तसे सर्वजण मदतीला आले.कोणी भांडी साफ़ केली, कोणी कांदे चिरले,कोण पापड भाजू लागले तर काहीजण विजे-या हातात घेउन स्वत: सूर्यनारायण बनून आमचे उर्जास्त्रोत होवून आम्हास प्रकाश पुरवू लागले.खांद्यावर पंचा टाकून मला आचा-याचा पारंपारीख पोशाख परीधान करण्यात आला.थोड्याच वेळात साजूक तुपातील मुगाची खिचडी रटरटली आणि तळणीच्या मिरच्या,लोणच,कांदा तोंडीलावण म्हणून घेत मस्त आडवा हात मारण्यात आला.गरमागरम खिचडीला पापडाच्या चमच्यांची साथ वर मस्त ढगाळ हवा (हो ! चक्क मे महीन्यात पण) खालपर्यंत उतरलेले ढग हवेत थंडावा आणि चहूबाजूनी अथांग सह्याद्रीचे रिंगण अशी आमची पंगत रंगली होती.जेवणानंतर शेणानी सारवलेल्या त्या भुसभूशीत जमिनीवर सर्वजण आडवे झाले आणि गप्पा रंगू लागल्या.गप्पांच्या नादात मध्यरात्र कधी उलटून गेली आणि आमच्या नयनांवर निद्रदेवतेने कधी बस्तान बसविले हे कळालेच नाही.

पहाटे पाचालाच अगदी कानापाशीच कोंबड्यानी बांग ठोकली आणि आम्ही सर्वजण जागे झालो.आजूबाजूला अगदी जमिनीपर्यन्त ढग उतरले होते मग नानाच्या अंगठ्याला एक धावती भेट दिली गेली आणि थंडगार हवेमध्ये मस्त गरमागरम पोहे त्यावर फ़रसाण असा नाष्टा तयार झाला.न्याहरी उरकून, सह्याद्रीस मुजरा करून आम्ही उन्हाळ्यात भटकंती करून देखील निसर्गाने दिलेल्या या गारव्याचा, आनंदाचा अनुभव घेउन पुण्यनगरीस रवाना झालो.
जाताना बरेच जण आम्हाला ‘ऐन रणरणत्या उन्हाळ्यात जाणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे’ असे म्हणत होते त्यांना गेल्यावर अभिमानाने सांगायचे होते……

‘पहाडासमीप छाती ज्यांची, नजर ज्यांची करारी
फ़क्त त्यांनीच घ्यावी या सह्याद्रीत “भरारी”.. या सह्याद्रीत “भरारी” !’       

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे


मोहिमेतील सहभागी सदस्य :-   शरद येवले, प्रसाद डेंगळे उर्फ़ वारे बत्तीवाले उर्फ़ सर डेंगळे तृतीय, निलेश महाडीक उर्फ़ शाहू, पाटील बंधू बिबड्या व चित्ता,अमोद राजे आणि निलेश वाळिंबे.