Thursday, August 23, 2012

‘भरारी’ पून्हा एकदा रसाळगडावरी….



या वर्षी पावसाने ‘आषाढ’ संपत आला तरी दडी मारून बसल्याने आता खरच पाण्याचा प्रश्ण अवघड होत चालला होता पुणे शहर आणि परीसरात आत्तापर्यंत धो धो कोसळणारा पाऊस आजून कुठेच दिसेना म्हणून पुणेकर नाराज तर होतेच पण तिकडे काळ्या आईची काळजी घेणा-या शेतकरी दादाच्या तोंडाचच पाणी आता पळायची वेळ होती, म्हणूनच की काय पण जीथे मस्त पाऊस झालाय असा आम्हा सवंगड्यांचा आवडता, सदाबहार 'कोकण' सारखा आम्हाला खुणावत होता, आमच्या नजरेसमोर येत होता. पण एक अडचण होती.. जातीवंत ट्रेकर आणि छायाचित्रकार म्हणून ओळखले जाणारे आमचे मित्र श्री. निखील केळकर यांना मागील वर्षापासून पायाच्या गंभीर दुखापतीमूळे आपल्या सह्यभ्रमंतीचा छंद जोपासू शकत नव्हते, पण आता त्यांनादेखील राहवत नव्हते आणि निसर्गाच्या त्या हिरव्यागार कुशीत त्यांना सध्या शक्य होइल अश्या ठिकाणी जाण्याकरीता आमचे प्रयत्न सुरू होते. दोन वर्षापूर्वीच्या स्वातंत्रदिनी सगळेजण रसाळगडावर खास ध्वजारोहणाला आलो होतो तेव्हाच खरतर अस ठरवल होत की पून्हा जेव्हा जमेल तेव्हा नक्की परत फ़ेरी मारायची.मग काय निखील ला पण या किल्ल्यावर चालण शक्य होत. म्हणून लगेचच एकमत झाले आणि १४ व १५ जूलै या तारखांनवर शिक्कामोर्तब केले.
१३ ला मेलामेली उरकत सर्वजण रात्री ९.३० वा डेक्कन ला भेटतील असे ठरले आणि अतिशय धक्कादायक असा प्रकार घडला, तो असा की सर्वजण चक्क ९.३० लाच भेटले. मग सर्वांचे जेवण उरकून शेवट राजे बशीत (बसमध्ये) बसून आम्हा सर्वांना घ्यायला आले आणि एक नव्हे दोन नव्हे तब्बल १५ मावळ्यांनी ‘भरारी’ घेतली ती थेट कोकणच्या वाटेने. ताम्हीणी मार्गे आता बस कोकणात उतरत होती आणि कवी अमित काकडेंच्या अतीशय रसभरीत कवीतांचा आस्वाद घेत मंडळी उद्याचे बेत शिजवीत होती. चहापाण्याचे २-३ थांबे आणि डुलक्या घेत साधारण पहाटेच्या सुमारास आम्ही खेड मार्गे गडाच्या पायथ्याला आलो.
१४ जूलै २०१२: डोळे उघडून बाहेर बघतो तोच आपण कोकणात आल्याची खात्री पटली. भोवतालचा हिरवा गार निसर्ग आमच्या स्वागताला तयारच होता. पटापट सर्व साहीत्य गाडीतून उतरवण्यात आले आणि सॅक भरल्या गेल्या. माझ्या बरगड्यांना मागील आठवड्यात पडल्यामूळे जरा मार लागला होता म्हणून माझ ओझ पाटलांच्या खांद्यावर लादून आम्ही गडावर कूच केले. आजूबाजूचा थंडगार वारा दूरवर पसरलेल्या हिरवाई बरोबर आपले लडीवाळ खेळ करत मस्त विहार करत होता. लांबपर्यंत पसरलेले पांढरे ढग पिंजून ठेवलेला कापूस जणू भासत होते. अश्या धुंद वातावरणात मावळे पुढे सरकत होते. वाटेत निसर्गाच्या अद्भूत किमयेमूळे वाहणारे झरे आपल्या मधूर पाण्याने आमची तृष्णा भागवत होते. रसाळगडावर पोहचण्यासाठी तूम्हाला त्याच्या डाव्या बाजूने प्रदक्षीणा सुरू करावी लागते आणि बरोब्बर पलिकडल्या बाजूस पोहचून मग माथ्यावर प्रवेश करावा लागतो. आता सर्वजण धूक्याच्या लाटांमधून विहार करत अतीशय मनोहरी असे किल्ल्याचे रूप समोरून बघत होतो. समोरच असलेले दोन दरवाजे आणि आज सुद्धा त्यांचे रक्षण करणारे ते बुलंद बुरूज सर्वांचे लक्ष वेधत होते.आम्ही आता गडात प्रवेश करत होतो. वाटेवरच असणा-या आणि सहसा न आढळणा-या त्या 'मिशीवाल्या' मारूतरायाच्या मंदिरी मस्तक टेकवून बलोपासना झाली आणि शनिवार सार्थकी लावत आम्ही गडमाथ्यावर आलो. आता तो थंडगार वारा जणू आमची भेट झाली म्हणूनच की काय पण लहान पोराप्रमाणे आमच्याशी खेळत होता. आणि आम्ही पण त्याच्या त्या दंग्यापासून सावरत त्याचा आनंद घेत आता आई 'झोलाई' च्या मंदीरात दाखल झालो होतो. गडाचे विस्तीर्ण पठार, सोसाट्याचा वारा, चहूबाजूला पसरलेला तो हिरवा रंग त्याच्याबरोबर लपंडाव खेळणारे ते धूक्याचे ढग पाठीमागे मनोहरी अशी दिपमाळ व उत्तूंग ध्वजस्तंभ आणि समोर साक्षात माता झोलाई अश्या त्या मंगलमय वातावरणात तूमच्या,आमच्या,आपल्या त्या राजाच्या,त्या परमेश्वराच्या,त्या शिवरायाच्या स्मरणार्थ मग एकच आवाज घुमला आणि "क्षत्रीय कुलावतंस....” च्या आरोळीने सारा आसमंत दुमदुमून गेला.
मंडळी आता आपले ओझे उतरवून मंदिराची थोडी साफ़सफ़ाई करीत होते. साफ़सफ़ाई करता करता सगळ्यांना गरमागरम चहा ची आठवण होत होती म्हणून लगेच सलग ३-४ वर्षे 'टी मास्टर' म्हणून किताब मिळवीणारे विकास पोखरकर उर्फ़ कात्या यांनी आपली कंबर कसली आणि थोड्याच वेळात फ़क्कड आलेयुक्त चहा आणि गरमागरम मॅगी आमच्या पुढ्यात सादर झाले. गरमागरम चहा आणि मॅगीचा आस्वाद घेत आता पुढच्या आखणीची चर्चा सुरू झाली आणि आत्ता झोपणेच कसे 'आवश्यक' आहे हे प्रत्येकाने (काहीही न सांगता) मान्य करत आपापल्या पथा-या पसरल्या. थोड्या वेळातच घोरण्याच्या प्रचंड आवाजाने (बापरे! याला घोरणे म्हणतात ? ) मला मात्र जाग आली आणि अत्यंत त्रासीक चेह-याने मी सर्वत्र पहात असतानाच गाभा-यातील देवीचे देखील हात तीच्या कानावर असल्याचे मला भासले.ती देखील (बिच्चारी) काहीच करू शकत नाहीये हे लक्षात आल्यावर मी सुद्धा आता समस्त "घोर कंपनी" च्या नावानी शिव्या हासडून बाहेर दिपमाळेपाशी येउन बसलो. काही वेळातच माझ्यासारखे आजून काही त्रस्त बाहेर येउन माझ्या घोळक्यात सामील झाले होते पण आतल्या लोकांचे "घोरणे" काही बंद होण्याचे नाव नव्हते.आता तर एकमेकांशी जणू स्पर्धाच सुरू आहे अश्या थाटात 'एकापेक्षा एक' चे अंतीम पर्व चालू झाले होते,काहीवेळाने ती स्पर्धा संपूष्टात येउन आता "समूहगान" सुरू झाल्याचा भास मला झाला. शेवट झोप बाजूला ठेउन आपण जेवण्याची पूर्वतयारी करावी या मतावर आम्ही जागे असलेली 'अघोर' (जी घोरत नव्हतो ती) मंडळी आलो आणि कामाला सुरूवात केली. कांदे, बटाटे,तोंडली,वांगी स्वच्छ धुवून चिरून ठेवली आणि किराणा व्यवस्थीत लावून ठेवण्यात आला. दुपारच्या जेवणाला मस्त कांदे, बटाटे, मटकी, वांगी अश्या सर्व भाज्यांचा 'भोगी स्टाईल' रस्सा करण्याचा बेत ठरला व तशी सर्व तयारी करून ठेवण्यात आली.
वामकुक्षी झाल्यावर आता गप्पा ठोकत गडावर फ़ेरफ़टका सुरू होता.मधूनच पावसाच्या सरी आमच्या भेटीला येत मन एकदम चिंब करून जात होत्या. त्या पावसात मनमुराद भिजत आम्ही मंडळी गडावर फ़ेरफ़टका मारत होतो.समोर पसरलेला सह्याद्री आपल्या पहाडी दर्शनाने रूबाबदार तर दिसत होताच पण हिरव्या रंगाच्या त्या असंख्य छ्टांनी रंगलेला तो भरजरी शालू लपेटून त्याचे रूप फ़ारच मोहक भासत होते. चकदेव पर्वताच्या लांबवर पसरलेल्या डोंगररांगा धूक्याच्या त्या शुभ्र पडद्यामागून जणू दुधाने अंघोळ करून नुकत्याच समोर उभ्या होत्या. निसर्गसौदर्याने नटलेल्या सुप्रसिद्ध अश्या महाबळेश्वरच्या डोंगरांगाना समांतर अशी सुमारगड रसाळगड आणि महीपतगड या तीन किल्ल्यांची ही रांग त्या महाबळेश्वरच्या सौदर्याला तोडीचे आव्हान देत उभी असलेली मला भासली आणि " त्या निरागस निसर्गाच्या मनात कधीच शर्यत नसते "तो कायम सुरेखच असतो हे 'त्रीवार सत्य' क्षणभर मी विसरूनच गेलो होतो. लांबवर पसरलेली हिरवळ त्यावर पडलेले दवबिंदू जणू मोत्यांची उधळण केल्याप्रमाणे भासत होते. काही हौशी छायाचीत्रकारांच्या कॅमेरांचा क्लिक-क्लीकाट चालू होता तर 'बिक्या' सारखे रसीक वय विसरून त्या वातावरणात धुंद होऊन आपल्या खास करामती (माकडचाळे) दाखवत लोकांचे मनोरंजन करत होते.तर काही मंडळींनी खास वायर चा 'गळ' बनवून त्या गळाला लागण्यासाठी जवळच्याच तळ्यातल्या माश्यांना गळ घालीत बसले होते. जलधारांच्या वर्षावान न्हाउन निघालेल्या गडकोटांच्या तटबंद्या पावसाळ्यात एका आगळ्या लकाकीनच तळपून निघाल्या होत्या त्यांना बघताना तिथ घडलेल्या प्रसंगाची भाषाच जणू त्यांच्यावर उमटू लागली होती.हिरव्या शालीन नटलेला तो सह्याद्रीचा काळा फ़त्तर आपली ती रौद्रता बाजूला सारून हिरवाईचा साज घेउन आज माझ्यासमोर उभा होता.
आता पून्हा मंदीरात येउन आम्ही जेवणाची तयारी सुरू केली होती मला प्रथेस मान देउन बल्लवाचार्याचा पोशाख चढविण्यात आला आणि तयारी सुरू झाली रस्सा बनवायला. तर दुसरीकडे चुल मांडून त्यावर भात रांधायला टाकण्यात आला.रस्सा बनवताना बिक्या ने घरून आणलेला मिरचीचा ठेचा जरा माझ्या हातून जास्तच् पडला गेला आणि खरी मॅच इथे सुरू झाली. रस्सा उकळताना मस्त वास होता पण चव घेतल्यावर त्यातला झटका जाणवत होता मग पाणी घालून तो वाढवण्यात आला तरीदेखील तो तिखटच म्हणून साखर घालण्यात आली तरी झटका काही जाईना शेवट पोह्यासाठी आणलेल्या दाण्यांना टॉवेल मध्ये गुंडाळून त्यांचा कूट करून तो घालण्यात आला आणि तिखट्पणा जरा कमी झाला.या सगळ्या प्रयोगामध्ये बराच वेळ गेला तोपर्यंत पोटातल्या कावळ्यांचे पार हात्ती झाले होते. मग लगेचच अंगत पंगत बसली आणि गरमागरम भात व रस्स्यावर उड्या पडल्या. सोबत तोंडी लावण म्हणून पापड,फ़रसाण,पु-या,चटणी आणि तिखट लागल तर बिस्कीटे असा मस्त मेनू हारपून मंडळीनी तृप्तीचे ढेकर दिले. पुढे ताट वाट्या भांडी घासण्याचा सामूदाईक कार्यक्रम पार पाडून ग्रुप फोटोशेशन पार पडले आणि गप्पांचा फ़ड रंगला.गप्पांच्या ओघात तिन्हीसांज कधी झाली आणि सूर्यनारायण परतीला कधी निघाले हे कळाले देखील नाही. परतीला जाताना जणू त्यांचा निरोपच घेउन येतोय अगदी अश्याच अविर्भावात समोरून पाऊस येताना दिसला आणि ते विहंगम दृश्य कायमचे मनावर कोरले गेले.
पून्हा गड किल्ले आणि मागच्या ट्रेकच्या आठवणीत मावळे त्या पावसातच गप्पा करत बसले.मधेच सरपणासाठी असलेल्या कु-हाडी लाच 'सब्जेक्ट' बनवून खास तिच्या सोबत छायाचित्रण झाले.आता तसा अंधार पडत चालला होता म्हणून सर्वजण मंदिरात आलो आणि साफ़सफ़ाई करून अंग कोरडे करून आतमद्धे रसाळगडाच्या मागील फ़ेरीच्या गप्पा सुरू झाल्या तर काही मंडळी खास रात्री गडावर फ़ेरफ़टका मारून आले आमच्यातले गि-या आणि देबू खास गडपायथ्याच्या वस्तीवर जाउन ताजे दूध चहासाठी घेउन आले आणि पुन्हा चहापान पार पडले.रात्री फ़ारशी भूक नसल्याने आणि दुपारचा भात शिल्लक असल्याने त्यालाच मस्त फ़ोडणी दिली गेली आणि मंदिरात आता तानसेन आणि कानसेन यांची जंगी संगीत मैफ़ल बसली.
भरारी पथकाचा तानसेन किताब पटकवणारे श्री. राकेश यांनी गणेशस्तवन करून मैफ़ीलीला सुरूवात केली आणि मराठी अभंग,जुनी नवीन फ़िल्मी गीते, भावगीते आशी एकामागे एक फ़र्माईश होतच राहीली. "वाह वा" ! "क्या बात है" ! ची दाद रसीकांकडून मिळवत मध्यरात्र उलटेस्तोवर राकेश साहेब आपल्या खड्या स्वरांनी गड जागता ठेवत राहीलेशेवटी गझल गायली गेली आणि तीलाच भैरवी मानून मंडळी त्या मंगल वातावरणात निद्रादेवतेच्या अधिन झाली.
१५ जूलै २०१२ : सकाळी ६,७ च्या सूमारास सर्व मावळे जागे झाले होते. (सत्या सोडून) आपापली शिकार उरकून प्रत्येकजण पून्हा गडावर पडलेल्या त्या कोवळ्या उन्हात फ़ेरफ़टका करून आला आणि परत एकदा खाण्यासाठी सज्ज झाला. (खाणे आणि जाणे (कूठे ते विचारू नका) हे सोडून काहीही केल नाही यांनी) मग मस्तपैकी कांदा बटाटा पोहे बनवण्यात आले आणि वरून मस्त कोथंबीर आणि तळणीच्या मिरचीने सजवून त्यावर गडी तूटून पडले.पोटभर पोहे चोपून त्यावर मस्त चहा झाला आणि मंदिराची साफ़सफ़ाई करून झोलाई देवीला, मूबलक पाऊस पडावा म्हणून साकडे घालून सर्वजण परतीला निघालो.
परतीच्या वाटेत देखील निसर्गाचा ती मूक्त उधळण सुरूच होती. पावसाच्या जलाभिषेकाने तो रसाळगड न्हाउन निघत होता, चहुबाजूस संपूर्ण हिरवळ पसरली होती, अवखळ खेळत निघालेले झरे कड्यापाशी पोहचून धबाबा कोसळणारे धबधबे बनलेले पाहून मनाला वेगळाच आनंद देत होते.त्या झ-यातले पाणी विकतच्या मिनरल वॉटरच्या अनेक पटीने शुद्ध आणि गोड लागत होते.त्या निसर्गाची जादू बघून छोट्याश्या झ-यापाशी काहीकाळ फोटो काढत गप्पा मारून ते पाणी पित "झरझरते नभ घागर मंथर, थरथर एकटवाणी । अंथरलेली हिरवळ त्यातून मंतरलेले पाणी ॥" या कवितेच्या ओळी गुणगुणत सर्वजण गाडीपाशी पोहचलो.आणि थेट सावित्री नदीचा तीर गाठला. मग काय पटापटा कार्यकर्ते सावित्रीतील पाण्याने पवित्र होवून पून्हा गाडीत आसनस्त झाले. आता गाडीत गाण्यांच्या भेंड्यांना काही वेगळाच रंग चढला होता. अखंड प्रवासात काही खरी काही ऐन वेळी बनवलेली असंख्य गाणी गात पून्हा पौड मद्धे सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला आणि सर्वजण पुढच्या ट्रेकचे प्लान करतच पुण्यनगरीत हजर झालो.घरी पोहचल्यावर त्या नितांत सुंदर सह्याद्रीचे ते मनोहारी दृष्य मनाच्या कप्प्यात घर करून बसल्याचे जाणवले एकासूरात कोसळणारे ते प्रपात त्याच्याशी लगट करू पाहणारे दाट धूके भर्राट वा-याचे झोत आणि ती निरव शांतता यात एका आगळयाच् रानभूलीने माझ्या मनाचा ताबा आजूनही सोडला नव्हता तश्याच धूंदीत मी कधी झोपलो हे मला कळाले देखील नाही.


भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच),
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७

सहभागी मावळे :- भास्कर कुलकर्णी (बिक्या), राकेश जाधव (राक्या),विकास पोखरकर (कात्या), निखील केळकर (केळ्या), प्रसाद डेंगळे (तृतीय,वारे बत्तीवाले), निलेश महाडीक (शाहू) , सतीश सूर्यंवंशी (सत्या),देबशीश नाथ (देबू), गिरीश कोळपकर (गि-या),सूरज पाटील (बिबट्या),कौस्तूभ खांडवे, अमित गाजरे,अमोद राजे,निलेश वाळिंबे.