Thursday, November 19, 2015

कट्य़ार काळजात घुसली.. का(?)

दिपालवी च्या आगमना प्रित्यर्थ मराठी रसीकांना मिळणारी खास भेटम्हणून कट्यार काळजात घुसली या गाजलेल्या संगीतनाटकावर आधारीत चित्रपट येतोय याचा सर्व मराठी रसीकांना नक्कीच आनंद झाला, ही संगीतभेट लौकरात लौकर मिळावी म्हणून झाडून सर्व तिकीट खिडक्या भरून वाहिल्यादेखील.उत्तम कलाकार, दर्जेदार आणि कसलेले गायक व संगीतप्रेमींसाठी ठेवलेले चित्रपटाचे नाव यामूळे चित्रपट चालणार यात शंका नव्हतीच/नाहीच पण मूळ कथेला वेगळेच वळण दिल्या कारणाने रसीकांना मिळालेली भेट ही "खास" भेट नक्कीच नाही बनू शकली याचे दु:ख झाले....त्यामूळे काही लोकांनी मांडलेले आणि मला वाटलेले हे समीक्षण.
दार्व्हेकरांनी अत्यंत विचारपूर्वक केलेल्या लिखाणाने व आपल्या सूरेल गळ्याने खांसाहेबांच्या भूमिकेत पंडित वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेले नाटक म्हणजे "कट्यार काळजात घुसली". हे नाटक अजरामर होण्यामागची २ मूख्य कारणे म्हणजे त्यातील संगीत आणि दुसरी म्हणजे या नाटकाची रचली गेलेली गोष्ट. या नाटकातीलं प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्व:तचा असा निर्माण केलेला आदर हेच तर या नाटकाचे वैशीष्ठ. पंडितजि व खांसाहेब हे मूळ नाटकात जरी एकमेकांचे (संगीत) स्पर्धकच दाखविलेले असले तरीही त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात खांसाहेब या पत्राबद्दल "कमालीचा" द्वेष कोठेच तयार होत नाही किंवा पंडितजिंचा शिष्य  सदाशिवने खांसाहेबना हरवून राजगायकपद मिळवून त्यांचा बदला घ्यावा असेही प्रेक्षकांना सतत वाटत राहात नाही हीच या नाटकाची किमया होती. रंगमंचावर अंकांनपाठोपाठ  हे नाटक आपोआप उलगडत जाते ते फ़क्त "स्वर, संगीत, त्यावरील प्रेम व ती संगीतकला यांनाच "मध्यभागी"/फ़ोकस ठेऊन आणि त्यामुळेच या नाटकात कोणीही एकमेकांचे  अजात शत्रू  नसतानाही केवळ लेखन आणि संगीताच्या जोरावर संघर्ष निर्माण करण्यात दार्व्हेकर कमालीचे यशस्वी ठरले हे मान्यच केले पाहिजे." आपल्या स्पर्धकाचा शिष्य असल्यामुळे नाही तर आपल्या घराण्याच्या गायकीत कोणतीही भेसळ नको म्हणून आणि फ़क्त म्हणूनच खांसाहेब  सदाशिवला संगीत शिक्षण नाकारतात हे मूळ नाटकात स्पष्टपणे जाणवते, त्याना पंडितजींच्या गायाकीबद्दल व त्यांच्याबद्दल नितांत आदर असतोच तसेच स्व:ताच्या पत्नीने पंडितजींवर केलेल्या कपटामूळे मला राजगायकपद मिळाले ही खंत देखील खांसाहेबांना कायम सलत असते.सदाशिव च्या गाण्यावरील असलेली निष्ठा पाहून त्याचा आदर असणारे आणि “ऐसा शागीर्द मेरे घराने में क्यो नही पैदा किया” असे चिडून बोलणारे नाटकातील खांसाहेब कायम स्मरणात राहतात.(त्यांची दुश्मनी नाही) कलाकारांच्या अद्भुत स्वरांनी तृप्त असा स्वरनाट्ययोग.. अर्थात मुळात अत्यंत उत्तम संहिता व त्याला शास्त्रीय संगीताची सूरेख जोड यामुळे हे नाटक आजही एक अजरामर कलाकृती बनून राहिले आहे यात दूमत नसावे.
पण आधुनिक चित्रपटात वठवलेले खांसाहेब मुळ नाटकाच्या खांसाहेबांच्या पूर्ण विरूद्ध वाटतात, खांसाहेब व त्यांची पत्नी हे अगदी पहिल्या मिनीटापासून खलनायक आहेत हे देखील प्रेक्षकांच्या लक्षात येते.(ज्यांनी नाटक पाहिले नाही त्यांच्यादेखील) तसेच खांसाहेब आणि स्वरांसाठी अधीर असलेला सदाशिव हे दोघेही सतत सूडबुद्धीने वागत असलेले दाखवल्याने मूळ कथेचा गाभाच बरासचा बदलून जातो. सदाशिव कडे आपला शत्रू असल्यासारखे (सतत) बघणारे खांसाहेब व कहर म्हणजे “जे हात तानपुरा चालवू शकतात ते गळाही दाबू शकतात’ असे फिल्मी डाइलोग बोलणारा सदाशिव हा तोच स्वरांसाठी अधीर असलेल्या सदाशीव आहे का (?) अशी शंका मनाला चाटून जाते. आणि त्यामूळेच मूळ कथेतील गुणीजणांची कदर करणारे खांसाहेब व गायनकले करीता स्वरांची भिक मागणा-या सदाशिव यांच्या मूळ व्यक्तीरेखाच चित्रपटात जरा बाजूला पडत जातात. जी थेट स्पर्धा व दुष्मनी पुरषोत्तमजी दार्व्हेकारांना नाटकात अभिप्रेतच न्हवती तीच स्पर्धा फ़ार ठळक पणे चित्रपटात दाखवली गेली आहे असे सतत जाणवते. मुळ नाटकात "जिथपर्यंत सदाशिवचा गळा जातो , तिथपर्यंत तुमची नजर तरी जाते का ?" असे आपल्या आळशी पुतण्यांना ठणकावुन सांगणारे, पण त्याचवेळी "एकवेळ मी सदाशिवला माझी मुलगी देईन , पण माझ्या घराण्याची गायकी मात्र कधीही देणार नाही" असा निर्धार केलेले खांसाहेब प्रेक्षकांच्या मनात अजरामर स्थान मिळवतात, पण ती जागा काही काही दृश्य जास्त मसालेदार करून चीत्रपटातील खांसाहेब नक्कीच गमावून बसले आहेत. चित्रपटातील "गायन संघर्ष बाजूला पडतो आणि दूश्मनी शिगेला पोचल्याची जाणीव कायम प्रेक्षकांना होत राहते."
एक नवीन प्रयोग म्हणून सिनेमा बघायला हरकत काहीच नाही पण, दुस-याच्या चांगल्या कामात स्व:ताची भेसळ करणे योग्य नसून मूळ निर्मात्याचा तो अपमानच असू शकतो असे मला तरी वाटते. मूळ नाट्कातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे, "सूरेल गाणी/नाट्य़पदे ज्यावरच हे नाटक अजरामर झाले आणि त्या नाट्कावर चित्रपट बनविण्य़ाची ईच्छा देखील त्यामूळेच झाली असणार, पण चांगले पाव डझनापेक्ष जास्त दिग्गज गायक सोबतीला असताना नाटकामुळे अजरामर झालेली गाणी फारशी न खुलवता काही मिनिटांत आटोपती घेतली आहेत याची सल अभिजात संगीत ऐकायला आलेल्या प्रेक्षकांच्या मनात कायम राहते हे नक्की." नाटक व चित्रपट यांची तुलना केल्यामुळे हे भास होत असतीलही कदाचीत पण 'नाटकाचा चित्रपट बनवला ' अशी कबूली आणि  अशीच जाहीरात देखील खूद्द निर्माते व सर्व कलाकार करीतात त्यामूळे मायबाप प्रेक्षकांना(किमान मला तरी) तूलना न करणे शक्य होत नाही... नाटकाचाच चित्रपट करायचा होता तर मुळ गोष्टीला कोणताही धक्का न लावताही चांगले लिखाण करून चित्रपट यशस्वी करताच आला असता व मायबाप प्रेक्षकांना अजूनही तृप्त करीता आले असते असे नक्कीच वाटते. उच्च दर्जा राखत सूरेल गाणी प्रेक्षकांना मिळून देखील चित्रपट्गृहातून बाहेर पडताना मूळ कथेत झालेल्या विचीत्र बदलामूळ संगीताचे महात्म्य बाजूला पडल्याची खंत वाटते व चंदेरी कट्य़ारीवर असलेल्या संगीताच्या धारेपेक्षा अहंकारामूळे निर्माण झालेल्या दुश्मनीची धार अधीक बोचरी वाटते.
तरीही चित्रपटातील जमेच्या बाजू सांगावयाच्या झाल्याच तर, राहुल देशपांडे, शंकर महादेवन, महेश काळे आणि अरिजितसिंगसारखे तयारीचे गायक घेत गायकीचा दर्जा राखण्याची घेतलेली काळजी नक्कीच स्तूत्य आहे, शंकर महादेवन व टीम ने सूंदर शब्दांना अभिजात संगीताने नटवून कर्णमधूर आणि उत्तम दर्जाची निर्माण केलेले संगीत फ़ार अप्रतीम झाले आहे. तसेच बॉलीवुडच्या सिनेमांच्या बरोबरीत भव्य, देखणी, भरजरी आणि नजर खिळविणारी कलाकृती पाहून डोळ्यांचे पारणे फ़िटते आणि अचूक कलाकारांची निवड करून बरेचवेळा त्यातील काही वाहवत जाणा-या कलाकारांना  योग्य पद्धतीने लगाम लावण्यात सूबोध भावें नक्कीच यशस्वी ठरले आहेत.अजरामर झालेल्या या नाटकावर चित्रपट बनवीण्याची केवळ हिम्मद दाखवणे नाही तर त्यात अजून काही गाणी भरून त्यांचा दर्जा राखण्याकरीता केलेला प्रयत्नांत पहिल्याच दिगदर्शनात सूबोध भावें यांनी बाजी मारली आहे. यामूळे मराठी संगीत नाट्यांना नवे स्थान प्राप्त होऊन नवा चाहता वर्ग देखील नक्कीच मिळेल फ़क्त.... चाहत्या वर्गाला मूळ कथेतील पात्रांबाबत होणारा गैरसमज नसता झाला(जो दूनियादारीत देखील झाला) तर अत्यंत आनंद वाटला असता. असो..

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच),
निलेश गो. वाळिंबे.


तळटीप :-  सदर समीक्षण हे वैयक्तीक असून यात कोणाच्याही भावना दुखवीण्य़ाचा उद्देश नाही तसेच कोणाचाही अपमान करीण्य़ाकरीता हे केलेले नसून केवळ मला जे जाणवले (माझा वेळ आणि पैसे घालवून) ते मांडण्य़ाचा प्रयत्न आहे