Friday, March 4, 2011

॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥

                                                              

२४ जानेवरी २०११ सकाळी माझ्या मित्राचा फोन आला आणि इतर वेळी तास तास गप्पा मारणारे आम्ही आज फ़क्त १ ओळ फोनवरती बोलून दोघेही स्तब्ध झालो. तो म्हणाला.. "निल्या, अण्णा गेले रे" डोळ्यात टचकन पाणि आले आता वाटले जणू संपूर्ण विश्वातले सूरच हरपले होते. अण्णा जवळपास २ आठवडे दवाखान्यात होते मागच्या शनिवारी दवाखान्यात भेटायला गेलो पण फ़क्त निरोप मिळाला की, आत्ता तब्येत सुधारते आहे तेवढ्यावरच समाधान मानून घरी परतलो होतो पण "बहुधा दिप अस्ताला जाण्याअगोदर त्याची वात प्रखर आणि मोठी होते त्याचाच तो प्रत्यय होता".मी तडक गाडी काढून पंडीतजींचे घर गाठले. आसपासचे सर्व रस्ते बंद, मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आणि प्रचंड चाहता वर्ग अगोदरच जमा होता मी दर्शनासाठी घरात गेलो.
समोर अण्णाचे पार्थिव बघून मन विशण्ण झाले क्षणात ते "सूर" कानात घूमू लागले.मैफल संपवून निवांत पहुडलेल्या आण्णांच्या चेहर्‍यावर मैफलीची एक सफल सांगता झाल्याची "चित्कळा" पसरली होती. सूरांचा तो राजा ज्याने राज्य केले अहो, साधेसूधे नव्हे तब्बल ८९ वर्ष राज्य केले त्या सूरांवर, त्या चाहत्यांवर, त्या गाण्यावर, त्या आवाजावर ज्याने आपला अंमल ठेवला तो गंधर्व आज स्तब्ध होता.
"अण्णा" हे एक अस व्यक्तीमत्व होत ज्याच्यासमोर या भूतलावरच्या सर्व स्वरांनी जणू लोटांगण घातल होत. ज्यांच्या अभंगात स्वत: पांडूरंग तल्लीन होत आपले भान हरपत असेल आपला कमरेवरचा हात काढून तो "हरी" देखील ’वाह..वा’ ची दाद देत असेल असा तो "स्वरभास्कर" आज आपल्यात नाही हे मनाला पटत नव्हते, सहन होत नव्हते. या महाराष्ट्रातील अभंगवाणी आता मुकीच झाली जणू असे वाटायला लागले.   मी शाळेत असल्यापासून माझ्या आजोबांचे मित्र असलेले आण्णा, सवाई मधे पहाटेपर्यंत गाणारे आण्णा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आण्णा, "मिले सूर मेरा तूम्हारा" या ओळी ऐकल्या की वाड्यातल्या कोणाच्यातरी एखादयाच्याच घरात असलेल्या टिव्ही समोर संपूर्ण वाडा क्षणात गोळा करणारे आण्णा, माझ्या शाळेत आण्णांचा "सवाई" असतो असे अभिमानाने आम्हा पोरांना गावभर सांगायची ईच्छा निर्माण करणारे आण्णा, २००८ साली देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या "भारतरत्न" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ते आण्णा, पाच दशकांपासून भारतीय शास्त्रीय गायनाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे आण्णा, जणू आताच अखेरची "भैरवी" घेउन पहूडलेले भासले. संगिताच्या तिर्थक्षेत्रातील विट्ठलच आज हरपला हे कटूसत्य तेव्हा मला सहन होत नव्हत !
आता आण्णां चा "तो" प्रवास सुरू झाला असेल. स्वर्गलोकी आज आपल्या मैफ़लीत आण्णांचे ते जुने सवंगडी भेटतील वसंतराव, पु.ल. यांसमवेत आता पून्हा ती मैफ़ल बसेल आणि तो आसावरी तोडी, मालकंस, पूरिया धनश्री गायला जाईल साक्षात "ईद्र" पण वाहवा.. क्या बात है। ची दाद देईल आज ते "तुकाराम महाराज" ती स्वर्गीय संत मंडळी खरी "अभंगवाणी" ऐकून तल्लीन होतील आणि साक्षात परमेश्वराला देखील आज खर्या "स्वर्गसुखाची" गोडी कळेल!
अश्या त्या पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण,भारतरत्न आश्या अनेक किताबांनी गौरविलेल्या रसींकाच्या तारा जुळवून खरा सूर गवसलेले माझे, तूमचे, आपले, सर्वांचे ते "भिमाण्णा" त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभेलच आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना असे स्वर्गीय सूर ऐकवण्यासाठी ते नवा आवाज घेऊन परत येतील कारण ते "स्वरभास्कर" आहेत भास्कराचा अस्त शक्य नाही फ़क्त ते परत येतील तोपर्यत आपण सारे त्यांच्या त्या सूरांमध्दे त्यांना सदैव स्मरत राहूयात. नव्हे, याला पर्य्रायच नाही ! फ़क्त आज तूमची माणस म्हणतायेत..

तंबोरयाच्या तूटल्या तारा, अभंग वाणी गोठून गेली,
शेहनाईची गुंगी अचानक, अश्रूंमध्दे भिजून गेली,
भारत भू चे रत्न हरविले, पुण्य भूमी कुंतीथ झाली.

निलेश वाळिंबे.

2 comments: