Thursday, January 10, 2013

कोंडनाळीतूक कोकणकडे…. ! प्रवास नूतन वर्षाचा.


सह्याद्री, त्याच्या कुशीत शिराव त्याचे ते उंच कडे आणि इतिहास जागे करणारे किल्ले यांच्या सानिध्यात रात्र घालवावी, छ. शिवरायांच्या स्मरणाने स्फूर्ती घेऊन आयुष्याच्या रहाटगाड्याला जुंपलेल्या या माणसांनी एक नवी चेतना मिळवून एका नवीन उर्जेने ताजेतवाने व्हाव आणि पुन्हा एकदम फ्रेश मुडने नव्या वर्षातील जबाबदा-यांना सामोरे जाव असं आम्हा सर्वांनाच वाटत होत.मग काय इतिहासाचा साक्षीदार असलेला तो सह्याद्री ज्याने अनेक सत्ताधीश अनुभवले त्याच्या पोटात शिरायच ते थेट आपल्या निसर्गसमृद्धतेचा वारसा लाभलेल्या सर्वांच्याच आवडत्या अश्या कोकणात उतरायच ठरलं आणि मेलामेली पूर्ण होऊन दिवस ठरले २९,३०,३१ आणि १ जाने. २०१३ 
२९ डिसेंबर २०१२ पहाटे ६ वा स्वारगेट बस स्थानकात जमून ६.१५ च्या महाबळेश्वर बसने प्रयाण करण्याचे ठरले आणि एस. टी. महामंडळाच्या परंपरेला गालबोट लागेल अश्या पद्धतीने वागून सव्वा सहाची बस चक्क सव्वा सहालाच निघाली.पण…. पण भरारी ग्रूप चे “T मास्टर” विकास पोखरकर उर्फ़ कात्या यांनी मात्र भरारी ग्रूपच्या परंपरेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नये याची दक्षता घेतलीच.सकाळी ६.१५ ची बस स्वारगेट स्थानकातून बाहेर पडली आणि तीच बस पकडण्याकरीता विकास बरोब्बर ६.१५ लाच पाषाण च्या आपल्या घरातून बाहेर पडला. मग काय, साहेब येस्तोवर त्या बस ला रामराम ठोकून मस्त गरमागर चहा आणि तोफ़ांवर (क्रिमरोल) ताव मारून शेवट पुढच्या म्हणजेच ७.३० च्या बसने सर्व कार्यकर्ते गणरायचे नामस्मरण करून बसमधे बसले आणि ‘टिंग टिंग’ करून  कंडक्टर साहेबांनी ‘डबल’ दिली.  
महाबळेश्वर स्थानकावरून आता आम्हाला पुढच्या बसने दुधगाव हे गाव गाठायचे होते परंतू येथे मात्र महामंडळाने आपली परंपरेला अनुसरून पुढचे ३ तास आमचे पुतळे केले. तेवढ्या वेळात महाबळेश्वरात किराणा खरेदी झाली. मी आणि आमोद नी कात्याला (विकास) खास महाबळेश्वर मेड ट्रेकिंग सॅक घेतली आणि त्याच्या आधिच्या पर्स वजा सॅकसह जेवणाचा बराचसा शिधा त्यात कोंबला.तर शाहूने (निलेश महाडीक) आमच्यासाठी अर्धा किलो फ़ूटाणे आणले.बस ची वाट पहाता पहाता आता सूर्य डोक्यावर आला होता आणि माझे जवळपास सगळे म्हणजे अर्धा किलो फ़ुटाणे संपत आले होते शेवटी बस चा नाद सोडून खाजगी जीप वाल्याला विनंती करून पैष्याची घासागिस करत आम्ही निघालो.(ही अविस्मरणीय अशी जीप आणि त्याचा चालक यांच्यावर एक वेगळा लेख टंकायचा माझा मानस आहे. वेळ मिळाल्यास आपणासाठी अवश्य सादर करेन) वळणावळणाचा घाट रस्ता,जिपमधे देखील आडव झोपायची हौस (खाज),उन्हात खाल्लेले अर्धा किलो फ़ुटाणे आणि बाकी कोणालाही वाटा न दिल्यामूळे जी  फ़ळे भोगावी लागतात ती मलाही भोगावी लागली आणि आमच ‘कोंबड आरवलं’!  शेवट “वकार युनूस” च्या बॉलींगवर माझी विकेट उडाली आणि भरारी च्या सैनिकांनी टाळ्यांच्या गजरात पुढचा प्रवास सुरू केला. (अर्थबोध झाला नसेल तर मला फ़ुटाणे खायला घालून माझ्याबरोबर घाटाचा प्रवास करा.) साधारण ४ च्या सुमारास आम्ही “चतूर्बेट ” गावी उतरलो आणि कूच केले किल्ले मधू-मकरंद गडाकडे. २ तासांच्या पायपिटीअंती आम्ही गडाच्या खांद्यावर असलेल्या ‘घोणसवाडी’ या लहान पण स्वच्छ आणि टुमदार अश्या गावी पोहचलो. एकतर संपूर्ण शाकाहारी आणि मला प्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे एकही “कुत्र” नसलेल हे आजवर पाहिलेल एकमेव गाव होय. ह्या गावात तिथल्या अत्यंत प्रेमळ लोकांच्या साथीत आपण एक दिवस तरी घालवलाच पाहीजे हे सर्वांनाच वाटत होते, (मला तर समजलय की गावात कुत्र नाही म्हणून ‘बिक्या’ म्हणे इकडे सहकुटूंब शिफ़्ट होण्याच्या विचारात आहे [ बिक्या- भरारी ग्रुप मधील अशी व्यक्ती आहे कि ज्याला कुत्रे आवडत नाहीत पण कुत्र्यांचे त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे ] ) तसही तिन्हीसांज होत होती त्यामुळे गडावर मुक्काम करण्यापेक्षा इथेच चूल मांडण्याचा निर्णय झाला आणि सख्ख्या आजीची आठवण करून देणा-या श्रीमती जानकी आज्जींच्या सुंदर अश्या शेणाने सारवलेल्या अंगणात आम्ही मुक्काम ठोकला.
श्रीमती जानकी आंज्जींसमवेत मंडळी, मुक्काम पहिला.
बल्लवाचार्यांचे मानाचे ‘उपरणे’ माझ्या खांद्यावर टाकून मला चूलींचा ताबा देण्यात आला.कात्या चूल पेटवत होता तर अमोद आणि हिमाल्यपूत्र उर्फ़ सुदीप आकाशातले तारे बघत आपल्या ‘अकलेचे तारे’ तोडत होते. शाहू आणि राक्या बाकी तयारी करत होते.थोड्या वेळातच फ़ोडण्या तडकल्या आणि आजच्या रात्रीला मस्त मटार उसळ आणि गरमागरम भात असा मेनू तयार झाला. ‘एक साधी काडी देखील सापडणार नाही अस सारवलेल स्वच्छ अंगण, हवेत छान गारवा एका बाजूला दिमाखदारपणे शेकडो वर्षे आपले पाय रोवून उभा असलेला सह्यद्रीतला तो मकरंद गड, नूकताच पोर्णीमेने सूंदर रूपडे धारण केलेला तो गोरापान चांदोमामा त्याच्या साथीला चमचमणा-या तारका, या सगळ्यांच्या संगतीत मस्त मटार उसळ रस्सा, गरमागरम भातावर ताव मारून मंडळींनी तृप्तीचे ढेकर दिले व त्याच अथांग अवकाशाखाली आम्ही पोरांनी आपापल्या पथा-या पसरल्या आणि गप्पांच्या रंगात मध्यरात्र उलटून गेल्यावर निद्रदेवतेनी सर्वांच्या नयनांवर आरूढ होवून सर्वांचा ताबा कधी घेतला हे कळालेच नाही’.
३०डिसेंबर २०१२ सकाळी ६ च्या सुमारास सर्वांना जाग आली. कात्या आणि शाहू च्या कृपेमुळे प्रसंन्न वातावरणात धारोष्ण दुधाचा फ़क्कड चहा पुढ्यात हजर झाला.चहापान आणि प्रार्तविधी आटोपून आम्ही सर्व साहित्य जानकी आज्जींच्या ओसरीवरच सोडून तडक मकरंद गडावर कूच केले.पांडवकाळात घेउन जाणारा हा किल्ला फ़ारसा मोठा नसून गडावर सुंदर असे ‘शिवाल्य’ बघावयास मिळते.येथे गावतल्या जंगमांकडून दररोज यथासांग पुजापाठ केला जात असून एक जागृत देवस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. पांडव अज्ञातवासात असताना या गडावर वास्तव्यास होते त्यावेळी त्यांनी रक्त्या तलाव, मुंगळे तलाव, फ़ुटक्या तलाव अश्या विविध नावांचे एकूण सात तलाव खोदले अशी येथिल अख्यायिका प्रसिद्ध आहे. हे सातिही तलाव आजही आपण पाहू शकतो. एका बाजूला महाबळेश्वर आणि प्रसिद्ध असे जावळी खोरे तर दुसरीकडे चकदेव पर्वत आणि खाली कोकणात उतरणारी भयंकर दरी आपल्या काळजाचा ठोका चुकवते, डाव्या हाताला चमचमणारे कोयना धरणाचे पाणी आपल्या नागमोडी वळणाने लांबवर गेलेले अतिशय विलोभनीय दिसते.चहूकडे दिसणारा अवर्णनीय असा तो नजारा मनात आणि कॅमेरात साठवून मंदिरी पोहचलो आणि ‘शिवनामाचा जप’ करून आम्ही लौकरच पुन्हा घोणसपूर कडे निघालो कारण पुढे बराच प्रवास बाकी होता. आमचे सर्व साहित्य नेण्याकरता पून्हा जानकी आज्जींच्या घरी पोहचलो तर,
“माझ्या नातवंडाना उपाशी पाठवून मी एकटी म्हातारी काय सगळ खाणार का ?”असा तिखट सवाल करून आज्जींनी मायेचा दम भरत प्रचंड आग्रहाने गरमागरम भाक-या आणि चमचमीत चटणी असा अप्रतीम मेनू समोर मांडला. या सह्याद्रीतली माणस कशी अगदी त्या सह्याद्रीसारखीच अंगानी चिवट, दिसायला राकट बोलायला तिखट पण मनाने अत्यंत प्रेमळ आणि हळवीच असतात याचीच अनुभूती आज्जींनी आज पून्हा एकदा दिली. साध्या चटणी भाकरीला आज जी चव होती ती आख्या जन्मात मिळनार नाही हे सर्वांनाच माहिती होते. कारण, ७५-८० वर्ष प्रचंड काबाडकष्ट करून रापलेल ते शरीर जरी पार थकून गेल होत तरी त्यातली माया, आपूलकी आजही ओसंडूनच वाहात होती. वयोपरत्वे डोळ्यांची दृष्टी कमी झाली होती पण त्या नेत्रांमधली प्रेमाची झाक आजदेखील स्पष्ट दिसत होती. कानात बाजूचे आवाज कमी झाले होते, पण काही तासांपूर्वी ओळख झालेल्या आपल्या नातवंडाच्या पोटात भूकेने कोकलणा-या कावळ्यांचे आवाज मात्र त्या आज्जींच्या कानात जणू घूमत होते. त्या भाक-या थापलेले ते मायेचे हात, प्रत्येक घासाघासात असलेले त्या माऊलिचे प्रेम, झणझणीत असली तरी साखर देखील फ़िक्की पडेल इतका मायेचा  गोडवा असलेली ती चटणी आणि आम्ही जेवण करतोय म्हणून आणि  फ़क्त म्हणूनच त्या माउलिच्या चेह-यावरून ओसंडून वाहणारा तो आनंद हे पाहून सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू तराळले.’रात्रभर पोर बाहेर अंगणात झोपली आणि मी म्हातारी घरात मस्त घोरत पडले’ या गोष्टीची मनाला लागलेली हुरहूर १०० वेळा समजावून पण त्या बिच्चा-या माउलिच्या मनातून काही उतरत नव्हती. शेवटी पुन्हा तूम्हाला भेटायला नक्की येणार आणि घराच्या आतमधे मुक्काम करणार अशी समजूत काढून सर्वांनी त्या लाड पूरवणा-या आज्जींचे आशिर्वाद घेतले आणि जंगम काकांबरोबर पुढच्या खडतर अश्या प्रवासाला निघलो. “मधू किल्ल्यामार्गे कोंडनळीतून कोकणकडे…..”

 पुढचे वर्णन वाचण्या आगोदर मी आपणास एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगू इच्छीतो की, हा ब्लॉग टंकायच्या अगोदर मी पून्हा एकदा खास पूण्यावरून त्या घळीच्या तोंडापाशी जावून स्वखर्चाने १ फ़लक टांगून आलोय…
                                             “वर जाण्यासाठी, खाली उतरण्याचा मार्ग”
असो तरी त्याचा खर्च देणगीपोटी स्विकारला जाईल याची नोंद घ्यावी.असो..


बरेच वर्षात कोणी गेल नाहिये, तूम्ही पण या वाटेने जाण टाळा असा उपदेश वजा सल्ला तसा बरेच जणांनी दिला होता पण ‘किडे/खाज’ काहीही म्हणा हव तर.. पण आम्ही पोरांनी निश्चय पक्का केला होता. (चूलीत गेले असले निश्चय अस नंतर वाटल म्हणा,पण आता कोणाला सांगता) जंगम काकांनी नळीच्या तोंडापाशी आम्हाला सुखरूप पोचविले आणि खाली पोचल्यावर न विसरता फोन करायचाच या बोलीवर आम्हाला निरोप दिला.आता लिड करत होते हिमाल्यपूत्र सुदीप माने.. हातात कूकरी घेउन सपासप वाट काढत पूढे सरकायचे आणि मागच्या मंडळींना वाट करून देयची. घळीच्या अगदी सुरवातीलाच या मार्गानेदेखील कोणी खाली उतरू शकत हीच अतिशयोक्ती वाटते.आणि सुरवातीच्या अगदी ५ मि. मधेच तूम्हाला पुढे येणा-या त्या आक्राळ विक्राळ सह्याद्रीचा अंदाज यायला लागतो. सह्याद्रीवरील प्रचंड श्रध्दा, त्यावरच नितांत प्रेम, निसर्गाची साथ, सोबत असलेले सहकारी, पाणी आणि ग्लूकॉन डी फ़क्त यांच्या जोरावरच प्रत्येकाला ही वाट पार करण शक्य आहे.साधारण दुपारी २.३० च्या सुमारास आम्ही घळीच्या तोंडापासून खाली उतरलो, नव्हे घरंगळलो.समोर दिसणारा सह्याद्रीचा उत्ताल कडा थेट आमच्या नजरेत सूद्धा मावत नव्हता. मधू किल्ल्याची कातळ भिंत पाठीमागे आम्हाला निरोप देत होती आणि दोन्ही बाजूंना थेट गगनाला भिडणारे उंच कातळ मानवाला जणू त्याच्या खूज्या उंचीचीच आठवण करून देत उभे ठाकले होते.तर पुढ्यात खोल दूरवर फ़क्त किर्र झाडी आणि मोठाले खडक आमच्या स्वागताला तयारच होते. निसर्गाने आपल्या संपत्तीची संपूर्ण लयलूट केलेली ही जागा अतिशय सुंदर आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, वृक्ष,वेली,झाडे, विवीध पानाफ़ूलांनी नटलेला त्या निसर्गाने असंख्य जातीच्या प्राणी पक्ष्यांना सहारा देत त्या ठिकाणी नंदनवन फ़ुलविले आहे.मोठमोठाले खडक चढून उतरायचे. कधी हातात हात धरून साखळी करून, कधी दोराने तर कधी चक्क बसून घसरगूंड्या सुरूच होत्या.. आठ दहा फ़ूटांचे ते खडक आता चांगलीच परीक्षा घेत होते. त्यातच पाठीवरच्या ३-४ दिवसांचे कपडे पाणी आणि शिध्याने सॅक्स फ़ारच जड झाल्या होत्या.(सर्वात जास्त सामान त्यांच्याच खांद्यावर लादल होत अस ज्यांच म्हणणे असेल त्यांची या ठिकाणी मी माफ़ी मागतो पण ऐनवेळी ‘गाढव’ मिळाली असती तर तूमच्यावर ही वेळ आली नसती :P) त्या ओझ्याने आता घामाच्या धारा लागल्या होत्या. प्रत्येक वळणावर आता पाणी कमी कमी होत चालल होत आणि वळण मात्र वाढतच होती. मधेच अचानक जंगली श्वापदांचा उग्र वास वातावरण अजूनच खराब करत होता. वाटेत सापडणा-या प्राण्यांच्या सांगाड्याला ओलांडून पुढे जातो तो लाल चुटूक खेकड्यांची जत्रा भरलेले खडक दिसत,मधेच चिरतरूण असणा-या सापांनी आपल्या वार्धक्याला मागे सारून पुरावा म्हणून ठेवलेल्या काती कपारींमधे सापडत होत्या.तर मधमाशांचा घोंगवणारा आवाज त्या शांततेला चिरून जात होता. विकासचे पाय आता चांगलेच बोलायला लागले होते.(तसे सगळ्यांचेच बोलत होते पण त्याचे जरा जास्तच बडबड करत होते.) छातीचे भातेदेखील चांगलेच थकायला लागले होते ६ वाजून गेले होते सूर्यनारायणाने तर कधीच पाठ दाखवली होती वरती ‘खग’ देखील आपली दिनचर्या आटोपून पिल्लांच्या ओढीने परतीच्या प्रवासाला निघालेले दिसत होते. अंधार वाढत चालला होता तरी मोठ्ठाले खडक असंख्य दगड गोटे आपल्या अफ़ाट सैन्यासह अजूनही सज्जच होते.शेवट विकासने शरणागती पत्करली आणि आम्ही सर्वांनी देखील आमच्या मोहीमेला स्वल्पविराम देत आपला मूक्काम याच घळीत निसर्गाच्या कुशीत करायचा निर्णय घेतला.झोपताना सपाटीवर, वा पाणवठ्यावर झोपणे तसे धोकादायक होते पण नशीबाने म्हणा सपाटी नव्हतीच. :D १ मोठ्ठा खडक बघुन त्यावरच ४ जणांनी झोपायच आणि २ जण प्रत्येक वेळी राखण करतील अस एकमत झाल.पोटातल्या भूकेच्या कावळ्यांचे आता पार हात्ती झाले होते, पटापटा सॅक सोडून आजूबाजूचा परीसर एकवार न्याहाळून जागेची थोडी साफ़सफ़ाइ केली गेली आणि सरपण गोळा करून लगेच चूल मांडून कात्याने गरमागरम मॅगी तयार केले.गार गार हवेमद्धे रातकिड्यांच्या किर्र्र.. किर्रर्र..च्या पार्श्ववादनात मधूनच एकाधी वा-याची झुळूक पसरलेला पाचोळा पुढे घेउन जात होती जसकाही त्या रातकिड्यांच्या वादनाला दिलेली दादच म्हणाना ! लगोलग झाडावरची पानगळ आता नव्याने त्या उडालेल्या पाचोळ्याच्या जागेचा ताबा घेत होती चमचमणारे काजवे जणू आमच्यासाठीच विजे-या (टॉर्च) घेउन सज्ज असलेल्या सेवकांप्रमाणे आमच्या आजूबाजूला फ़िरत होते आणि ‘काळजी नसावी’ म्हणत आमच्या सोबत राहण्याचे आश्वासन देत होते.एक मोठ्ठा लाकडाचा ओंडका आणून त्याची मस्त शेकोटी पेटवलेली होती तर चुलीवरच्या गरमागरम मॅगी, बिस्कीट यावर मनसोक्त ताव मारून मंडळी आता ‘दुख-या देहांना’ गार गार जाणवणा-या त्या मोठ्ठ्या खडकावर टेकवून थोड्याशा थकलेल्या पण सावध नजरेतूनच या आपल्या आवडत्या तरी आज अचानक लाडक बाळ चिडून अंगावर धावून येत त्याप्रमाणे अंगावर आलेल्या सह्याद्रीतल्या त्या कडेकपा-यांमधे चमकणा-या डोळ्यांचा वेध घेत होती.(स्पष्टच सांगायच तर ‘यांची’ पार ‘फ़ाटली’ होती :D ) मधू किल्ल्यांच्या पाठीमागून आता गोरापान चांदोमामा देखील आमच्या सोबतीला हजर होत होता त्याचे स्वागत करत त्या नभांगणातील काही तारे ओळखण्याचा प्रयत्न करत माझी आणि राजेची ‘रक्षक ड्यूटी’ सुरू होती. निसर्गाच्या कुशीत आज आम्हाला खरोखरच त्याने सर्वकाही विसरायला लावले होते. छोटासा दगड जरी वरून घसरला वा जवळच असलेल्या पाणवठ्यावर आवाज जाणवला की तत्पर्तेने आमच्या विजे-यांचे झोत तिकडे पडत होते. खूपच दमछाक झाल्याने मधूनच डोळे मिटले जात होते. पण येणारा अनुभव फ़ारच भारी होता.थोड्यावेळानंतर मला विश्रांती देत सुदीप शेकोटीपाशी आला आणि मी चमचमणा-या तारकांचेच पांघरूण ओढून त्या मोठ्या खडकशैयेवर आडवा झालो.                
३१ जाने. २०१२ थंडगार वा-याचा मूक्त विहार, पाखरांचा किलबीलाट, धगधगत्या शेकोटीतली आजूनही शाबूत असलेली ती गरम गरम उब आणि गरमागरम चहापानासाठी कात्याने (शिव्या हासडून) केलेला गजर  यामूळे ६ साडे सहाच्या सुमारास मला जाग आली.सकाळी उठल्यावर सर्वांना विश्रांती मिळाली होती खरी पण थंडगार खडकावर झोपून हवेतल्या गारव्याने आता संपूर्ण शरीर दुखायला लागल होत पण पुढचा प्रवास लौकरात लौकर करण गरजेच असल्याने तडक सर्वजण चहापान करून ‘शिकारीला’ जाउन आले. (अर्थबोध होत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या) पटापटा ओझी खांद्यांवर लादून पून्हा कालसारखा प्रवास सुरू झाला.थोड पुढे गेल्यावर थंडगार पाण्याच्या डोह लागला आणि अंग मोकळ करायला किंवा पूर्ण बधीर करायला पोरांच्या उड्या पडल्या. जलक्रीडेचा आस्वाद घेउन पायपीट सुरूच होती पण अजूनही लांबवर फ़क्त उतरती घळ दगड गोटे या पलीकडे काहीच दिसत नव्हते. आता ११ वाजून गेले होते पून्हा घामानी थकून वेग मंदावला होता आणि त्या सह्याद्रीने त्या निसर्गाने आपली किमया दाखवली. अचानक देवदूताप्रमाणे २ दिवसापूर्वी हरवलेला बैल शोधायला म्हणून समोरून “जाधव मामा” आमच्या समोर हजर झाले.’याच वाटेने सरळ चालत राहीलात तर आजून २ तासात तूम्हाला नदीपाशी रस्ता मिळेल’ अस त्यांनी सांगीतल पण २ तास आता २ वर्षाप्रमाणे भासले होते. आमच्या चेह-यांवरचा थकवा ओळखूल बैल नंतर शोधू आधी तूम्हाला शॉर्टकट ने गावात नेतो सांगीतल आणि पून्हा जंगलातल्या डाव्या अंगाला असलेल्या दुस-या वाटेने ५० मि. मधे थेट ‘कळंबली’ या कोकणातल्या छोट्याश्या पण डुमदार गावातल्या आपल्या घरी चहापानाला पोच केल.त्यांच्याच घरात चहापान, थोडी विश्रांती घेतल्यावर जाधव मामांचे उपकार मानून आमच्यातर्फ़े छोटीशी भेट देउन आम्ही पुढल्या प्रवासासाठी महामंडळाच्या २.३० च्या गाडीची वाट पहात कळंबली थांबा गाठला.’वाट पाहीन पण ST नेच जाईन’ या वाक्याला चिकटलेले आम्ही २.३० च्या गाडीसाठी ५ पर्य़ंत त्याच थांब्याला चिकटून बसलो.पण शेवट महामंडळानेच आलो. (बोंबलायला पर्याय होताच कुठे)
६.३० च्या सुमारास आम्ही खेड स्थानकावर उतरलो आता नूतन वर्षाचा सूर्योद्य हा आपल्या लाडक्या रसाळ्गडावरच करायचा अशी प्रत्येकाचीच मनोमन ईच्छा होती.पण रसाळगडावर आता जाण्यासाठी बसची कोणतीही सोय नव्हती. म्हणून एका सह्यप्रेमी रिक्षावाल्या भाउंना भेटून विनंती करण्यात आली आणि आमच्या विनंतीस मान देउन खेडेकर आणि त्यांचे एक मित्र हे आपापले रथ घेउन आमाच्या सेवेस दाखल झाले.जातानाच खेडमधून नॉनव्हेज वाल्यांसाठी व्हेज कोंबडी घेण्यात आली आणि सरत्या वर्षाचा शेवटचा प्रवास सुरू झाला किल्ले रसाळगडाकडे. वाटेत बहूदा नववर्षाच्या शुभेच्छा देयलाच अत्यंत विषारी समजल्या जाणा-या “घॊणस” सापाने आम्हाला दर्शन दिले आणि आम्ही गडपायथ्याला पोहचलो.अर्ध्या तासात गडावर कूच करून पटापट तयारी सुरू झाली. आणि पाश्चात्य पद्धतीने न्यू इयर सेलीब्रेशन म्हणून व्हेज कोंबडीचे चिकन आणि लिंबू सरबत यावर गड्यांनी आडवा हात मारला.आता पोटोबा शांत झाले होते, थंडगार वा-यात आई झोलाई च्या साक्षीत नववर्षाच्या स्वागताला आमचे तानसेन राकेश सरांनी आपले सूर आवळले आणि आम्हा श्रवणभक्तांना आपल्या मधूर सूरांनी न्हाऊ घातले.गाण्यांच्या फ़र्माईची सुरूच होत्या मध्यरात्र उलटून १,२ वाजले व राकेशच्या मंजूळ स्वरांची नववर्षभेट स्विकारून आम्ही सर्वजण निद्राधीन झालो.
१ जाने. २०१३ पहाटे सूर्योद्ययालाच सर्वजण गडमाथ्यावर हजर झालो, नूतन वर्षाच्या त्या पहिल्या किरणांना सूर्यनमस्कार घालून मानवंदना दिली आणि कॅमेरांच्या क्लिक-क्लीकाटात त्याचे स्वागत करून तोंड खंगाळली गेली.माता झोलाई ला दंडवत घालून पून्हा खेड स्थानक गाठले आणि प्रवास सुरू झाला पुण्यनगरीकडे….
बसमधे आम्ही सगळेच थकून बसलो होतो. डोळे मिटून संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरून तरलत होता.’आज सिद्ध झाल होत की, तूम्ही त्या निसर्गाशी एकनिष्ठ असाल त्याच्यावर मनोमन प्रेम करत असाल तर त्याचा प्रतीसाद तसाच असतो खर तर तूम्ही कसेही असा तो फ़क्त प्रेमच करतो. नाही करत तो’ कोप’ वैगैरे काही.. तो कोप देखील घडवणारे असतात ती तूमची आमची ‘मतलबी माणसच’ तो फ़क्त आपल्याला देतच असतो आपल्या अजस्त्र हातांनी. तो नेहमीच मूक्त उधळण करत असतो आपण फ़क्त संयम पाळून, योग्य ती काळजी घेत, सगळ्या रडगाण्यांना फ़ाटा देत फ़क्त त्या आनंदाची अनुभूती घ्यायची असते बस्स.’ त्या अवघड घळीत दिसायला भयंकर दिसणारा तो सह्याद्री हेच सांगत होता, “आरे उठा, धीर सोडू नका, झटकून टाका तो थकवा ती मरगळ माझ्याकडे बघा आज शेकडो वर्ष मी उन, वारा, पावसाशी झुंजतोय लाखो आक्रमण मी अशी परतवून लावलीयेत तरी आज खंबीरपणे पाय घट्ट रोवून उभाय.माझा आदर्श समोर ठेवा. मला विसरू नका, माझ्यापासून दूर जावू नका, माझा आनंद घ्या, माझ्या कुशीत शिरा आणि बघा काय जादू आहे ते’ तेवढ्यात कंडक्टर साहेबांची “टींग” अशी सिंगल वाजली…आणि आम्ही स्वारगेट स्थानकात उतरलो ते… येत्या वर्षात जास्तीत जास्त ट्रेक आखण्याचा निश्चय करतच.

भेटा अथवा लिहा,(शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७
 १ जाने. २०१३ ची मंगल पहाट किल्ले रसाळगडावरून.

सहभागी वीर :- कर्णधार श्री.आमोद राजे,भरारी चे तानसेन श्री.राकेश जाधव , सदा हसतमुख आणि उत्साही असलेले  श्री.निलेश महाडिक उर्फ शाहू, हिमाल्य मोहिमेसाठी सुट्टी  मिळाल्यामुळे  आपल्या संगणक अभियंत्याच्या नोकरीवर खुशाल लाथ मारणारे श्री.सुदीप माने उर्फ हिमालयपुत्र, T मास्तर उर्फ़ कात्या अर्थात श्री. विकास पोखरकर आणि निलेश वाळिंबे (स्वयंघोषीत अध्यक्ष).




11 comments:

  1. aaj parat vachala blog, parat ghal utaravishi vatatiye :)

    ReplyDelete
  2. " मी चमचमणा-या तारकांचेच पांघरूण ओढून त्या मोठ्या खडकशैयेवर आडवा झालो."
    ek no...aaj parat vachala

    ReplyDelete
  3. good 1...keep it up. My best wishes for u, mitra!

    ReplyDelete
  4. Lekh Khoop Sundar Lihala Ahe, Mitra. Aaplyamule Sahyadricha thodasatari Bhag Kalala

    ReplyDelete
  5. एक हात लाकूड नऊ हात ढलपी (झीलपी......) पाल्हाळ जास्तच लावलास

    ReplyDelete
  6. kondnalit kadyamagun war yenara to Chandra ajun spasht athvtoy mala.....

    -Shahu

    ReplyDelete