Thursday, April 2, 2015

|| सह्याद्रीतल्या घाटवाटेत स्वागत नववर्षाचे ||

३१ डिसें. च्या रात्री काहींना मद्यधूंद होवून नाचून पाय दुखवून घेणे आवडते तर काहींना सह्याद्रीची पायपीट करून पाय दुखवून घेणे आवडते... पाय दोन्हीकडे दुखतात नक्कीच पण दोघांची "नशा" मात्र फ़ार वेगवेगळी असते. यातल्या सह्यवेड्यांची जी नशा असते ती काही औरच म्हणता येईल.पायपीट करून नूतन वर्षाची सुरूवात निसर्गाच्या कुशीत करायला मिळणे म्हणजे सारे वर्ष आनंदात जाणार हीच त्यांच्या मनातील भावना असते. म्हणूनच "भरारी" च्या मावळ्यांनी या वर्षाअखेरीस आपण फ़क्त किल्ले न करता तगड्या घाटवाटा तूडवायच्या त्यांच्या कुशीत सरत्या वर्षाला निरोप देयचा तसेच नूतन वर्षाची सुरूवात देखील त्या पवित्र सह्याद्रीतूनच करण्याचे पक्के केले आणि भन्नाट बेत ठरला... 

पुण्याहून साम्रद या गावी गाडीने पोचायचे तेथून निसर्गाचे वरदान लाभलेल्या करोली घाटातून उतरण्यास प्रारंभ करायचा -- बाण सुळक्याच्या पायथ्याला जिथे सांदण घळ संपते तेथील नैसर्गिक डोहापाशी सरत्या वर्षाचे अखेरचा मूक्काम टाकून -- दुस-या दिवशी पुढे नदीपात्रातून आजोबा पर्वतावरील वाल्मिकी आश्रमात दुसरा मुक्काम टाकायचा आणि -- अवघड आणि अनवट अश्या गुहेरीच्या दारातून प्रवेश करून तिसरा मुक्काम करत -- कुमशेत मार्गे पुण्यनगरीस परत यायचे.मग काय असा रांगडा बेत ठरल्यावर मेलामेलीअंती तब्बल १२ मावळे तयार झाले आणि  ३० डिसे २०१४ ला रात्री गणेशस्तवन करून गाडीचा धुराळा उडाला. 

गाणी म्हणत, गप्पा मारत, न आलेल्या मावळ्यांच्या नावाचे उद्धार करता करता गाडीत झोपण्यास मध्यरात्र उलटली आणि पहाटे पहाटे खास 'बांग' ऎकण्यासाठी गाडीचे ब्रेक लागले व 'गाडी लागल्याने' आमच कोंबड आरवल.(अर्थबो्ध होत नसेल तर घाटवळणाचे रस्ते ST ने माझ्याबरोबर फ़िरा आणि तो आनंद अनुभवा (अर्थातच माझे तिकीट तुम्ही काढून)) तसे सर्वजण जागे झाले आणि पून्हा गप्पाचे फ़ड रंगले. सूमारे पहाटे ६, साडेसहाच्या दरम्यान आमची गाडी डोंगराच्या कुशीत वसलेल्या छोटेखानी पण सूंदर अश्या 'साम्रद' या गावी पोहचली.आवश्यक साहित्याची बांधाबांध झाल्यावर आपापले पिट्टू खांद्यावर टाकून मावळ्यांनी शिवरायांचे नाव घेतले आणि वाटाड्या सोबर आमची तंगडतोड सुरू झाली. २ वर्षापूर्वी दोर लावून सांदळ घळ चढताना ज्या जागेवर मुक्काम टाकण्यात आला होता त्याच ठिकाणी म्हणजे सांदण घळीच्या अगदी पोटात असलेल्या निसर्गरम्य डोहापाशी आम्ही या वर्षाअखेरचा शेवटचा मूक्काम टाकणार होतो, फ़क्त या वेळी उतरण करोली घाटातून सुरू केली होती. उत्तूंग सुळक्यांच्या मधून जाणारी ही पायवाट फ़ारच सुरेख आहे. १५-२० मिनिटात थोडे उतरून छोटासा रॉक पॅच पार करून आमची वाट आता डाव्या बाजूने पुढे जात होती आणि हरिशचंद्र गडावरील प्रसिद्ध अश्या कोकण कड्याची जणू प्रतिकृतीच म्हणता येईल अश्या अतिशय सुंदर मिनी कोकणकड्याचे ते विराट (नाव मिनी असलेतरी विराटच) रूप दिसले आणि सह्याद्रीच्या त्या मदमस्त रूपाला सलाम ठोकून आम्ही पुढे निघालो. हवेत तसा गारवा असल्याने मावळ्यांची दमछाक फ़ारशी न होता मस्त गप्पागोष्टी करत प्रवास सुरू होता. आणि पूढील तीन दिवसातील संपूर्ण ट्रेक मधे असंख्य वेळा ऎकू आलेले सूदीप माने उर्फ़ चेन्नई रिटर्स अर्थात हिमाल्यपूत्र याचे ते वाक्य कानावर आले आणि आम्ही पहिला थांबा घेतला. "काहीतरी खायला आहे का ?? " प्रचंड केविलवाण्या स्वरात 'काहीतरी खायला आहे का' हे वाक्य उद्गारायचे व त्याबरोबर जगातील सर्वात जास्त कूपोषीत मूलाला लाजवेल असा चेहरा करून पुढ़च्या २ मिनीटात काहीतरी खायला मिळवायचेच यात या माणसाचा हातखंडा. मग काय पटापट ३ दगडांची चूल मांडून त्यावर गरमागरम मॅगीचा पहिला नाष्टा तयार झाला व त्यावर उड्या पडल्या लगोलग फ़क्कड चहापान उरकून थोड्या विश्रांतीअंती पुढच्या प्रवासाला सुरूवात झाली. घसा-यावरून सरकत एकमेकांना हाक देत साधारण दुपारी २-३ वाजता आम्ही थेट मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो देखील.    

चहूबाजूला उत्तुंग डोंगर, हिरवीगार वनराई, प्रसंन्न शांतता, खळखळत जाणारा झरा, त्याचाच पुढे जाउन बनलेला छोटासा धबधबा आणि धबाबा कोसळणा-या पाण्याचे नितळ पाण्यात रूपांतर करून  मनाला एक विलक्षण शांती देणारा तो नैर्सगीक डोह. सह्याद्रीच्या उंचीचा जणू पुरावाच म्हणून थेट आकाश फ़ाडून स्वर्गात घुसलेला उत्तुंग बाण सुळका, निसर्गाचा अविष्कार ठरलेली ती नैसर्गीक सांदण घळ अश्या अतिशय प्रसंन्न ठिकाणी आम्ही पोहचलो होतो. सरत्या वर्षाच्या मावळत्या दिनकराला आज येथून प्रणाम करतानाच नूतन वर्षाच्या त्या रवीला देखील अर्घ्य अश्या निसर्गरम्य ठिकाणाहून देता येणार या गोष्टीचा मनोमन आनंद होत होता. जणू सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी गोल फ़ेर धरून आम्हा लेकरांना त्याच्या पोटात खेळण्यासाठीच ही जागा बनवली असावी असा मनोमन समज करून खांद्यावरच्या पाठविशव्यांना थोडा आराम देउन आमच्या उड्या पडल्या त्या थेट स्वच्छ, नितळ आणि थंडगार पाणी असलेल्या त्या डोहात. जलतरणाचा मनोमन आनंद घेत अंग मोकळे करून मनसोक्त दंगा करून आम्ही पुन्हा डोहाच्या काठावर विसावतो तोच पुन्हा तो आवाज कानावर पडला..."काहीतरी खायला आहे का ?" आणि भुकलाडू, भडंग, गूळपोळी, पू-या, बिस्कीटे असा चमचमीत माल बाहेर काढता काढता संपून देखील गेला. पोटपूजा उरकून आता मावळ्यांचा स्वछंदी विहार सुरू झाला होता, मग छायाचित्रकारीतेचा छंद जोपासणा-यांचा क्लिकक्लिकाट सुरू झाला तर दुसरीकडे मुक्कामाच्या जागेची साफ़सफ़ाई करून पथा-या पसरून शिळोप्याच्या गप्पांचा फ़ड जमला. थोड्याच वेळात १५ जणांचा मुंबईचा एक गट सांदण घळ उतरूण याच ठिकाणी मुक्कामाला आला आणि त्यांची चूल पेटते ना पेटते तोच पून्हा तो आवाज आला "काहीतरी खायला आहे का ?" आता मात्र त्या केविलवाण्या चेह-याने चक्क चूल मांडायला घेतली. सरपण गोळा करून शिधा बाहेर काढण्यात आला व बल्लवाचार्याचा पोशाख मला चढवून 'लसूण तडका मारके मूगाच्या खिचडीची' फ़र्माईश झाली.कोणी कांदा चिरून घेत होता, कोणी किराणा लावून घेत होता, कोणावर पिण्याच्या पाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली तर कोणी रिकामटेकडा चूली फ़ुंकू लागला. एका चुलीवर पाणी गरम करण्यात आले तर दुसरीचा ताबा माझ्या हाती देण्यात आला. सर्वांच्या हातभाराने आता गरमागरम खिचडी रटरटू लागली तर दूसरीकडे पापड भाजले गेले. खमंग वासाच्या त्या खिचडीवर शेवटी पेश्शल...साजूक तूप का लसूण तडका देण्यात आला.  पान मांडली गेली व वदनी कवळ घेता... च्या उच्चाराने गरमागरम खिचडी पापडावर ताव मारण्यात आला. मस्का मारून माझ्या पाककलेवर जी स्तुतीसुमने उधळली गेली त्यामुळे मला २ घास जरा जास्तच गेले. मनसोक्त ताव मारून (पार खरपूडी काढून खाउन) तृप्तीचे ढेकरांची पोचपावती दिली गेली आणि भांडी घासून पालथी देखील पडली. आता पून्हा त्या चांदण्यात गप्पाचे फ़ड रंगू लागले तेवढ्यात ४० जणांचा कोल्हापूर करांचा १ मोठा गट मूक्कामी पोहचला. एकंदर ५०-६० माणसे एवढ्या जागेत कशी बसणार ? आता ही लोक रात्री दंगा/पार्ट्या करणार अश्या शंका आमच्या मनाला चाटून गेल्या ख-या पण त्या पार फ़ोल ठरल्या. त्या सह्याद्रीने अगदी सहजपणे सर्वांना आपल्या कुषीत घेतलेच होते.. पण धांगड्धींगा वाले देखील शहरातच मागे सोडले होते.बाकी मंडळी त्यांच्या उद्योगात असताना आता भरारी चा जागर सुरू झाला... आणि 'भरारी तानसेन' पदवी मिरवणारे राकेश साहेबांची मैफ़ल बसली. गोंधळ, भावगीते, मराठी चित्रपट गीते यांचे सादरीकरण झाले आणि कान, मन तृप्त करून टाळ्यांची दाद देत त्या अनोख्या जागी सरत्या वर्षाला निरोप देउन मंडळी निद्राधीन झाली ते.. नूतन वर्षाच्या सूर्यदर्शनासाठी.
         
         
     नूतन वर्षाच्या पहाटेलाच चक्क निसर्गाने देखील खूश होत पावसाच्या एका सरीने सर्वांना जागे केले. प्रार्तविधी उरकून, बाकी मंडळींनाआवराआवरीस मदत करून निरोप दिले गेले तोच पून्हा आवाज आलाच 'काहीतरी खायला आहे का ?' खास आग्रहास्तव गरमागरम "कांदेपोहे" कार्यक्रम पार पडला. (सगळे विवाहीत पण हा कार्यक्रम आजूनही आवडीने करतात) व पिट्टू पून्हा सज्ज केले गेले पुढच्या प्रवासाला. पुढची वाट समजून घेत आमच्या वाटाड्याला आता निरोप देण्यात आला. त्याच्या म्हणण्यानूसार... "लै लांब नाय...इथून व्हड्यानी खाली जावा तिथ थेट नंदीला भिडलानव्ह..की नंदींपासून सीधा जात राव्हा कूठ्बी नाय व्हळायच....इस्ट्रेट जात राव्हा की २-३ घंट्यात गावातच पोचताय ! " अशी अगदी तंतोतंत वेळ आणि वाट पाळत आम्ही थेट पोहचलो डेहणे या गावी. ब-यापैकी दमछाक झालेली होती पण येथून आजोबा पर्वत गाठण चांगल वाट लावणार होत म्हणून गडी जरा दम खात होते तेव्हा पुन:श्च तो आवाज घूमला..काहीतरी खायला आहे का ?' काहीतरी भूस्कट त्याच्या तोंडात कोंबत असतानाच लांबवर १ जीप जाताना दिसली म्हणून आरोळ्या ठोकल्या तर नशिबाने दादा अर्ध्या वाटेवर सोडायला तयार देखील झाले. मग काय पटापटा जीप मधे (१ जीप मधे १२+२ असे १३ फ़क्त) बसलो आणि गावाच्या नागमोडी वळणातून कौलारू घरांना मागे टाकत आम्ही निघालो आजोबा पर्वतावरील प्रसिद्ध वाल्मीकी आश्रमाकडे.. चढाच्या अर्ध्या रस्त्यात गाडीने जाण्यास मिळाल्याने आता बाकी चढाईला पून्हा जोम चढला होता. दोन्ही बाजूला उंच च्या उंच झाडे, प्रचंड बनराई आणि त्यातून जाणारी  वळणावळणाची सुंदर वाट उन्हाचा जराही चटका लागू देत नव्हती. सुमारे तास, दीडतासाची ती चढण चढूण आता आम्ही पौराणीक महत्व असलेल्या आजा पर्वताच्या अर्ध्या पाऊण उंचीवर असलेल्या 'वाल्मीकी आश्रमात' पोहचलो होतो.                                         
विविध जातीच्या सापांचा सुळसूळाटामूळे आणि रंगीबेरंगी पक्ष्यांचा किलबीलाटामुळे प्रसिद्ध असलेला,निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेला 'आजोबा डोंगर' म्हणजे ट्रेकसाठी खरच उत्तम पर्याय म्हणता येतो. या गडाला 'अजापर्वत' किंवा 'आजोबाचा डोंगर' असेही म्हणतात.. नावाप्रमाणेच हा गड सर्व डोंगररांगांमध्ये वडिलधाऱ्या डोंगराप्रमाणे भासतो. प्रचंड वनराईमधून विहार करत आश्रमापर्यंत पोहचणे, पुढे घसा-याच्या वाटेवरून सीतेच्या पाळण्यापर्यंत चढण चढणे आणि त्यापूढे अतिशय अवघड असे प्रस्तारोहण दोराच्या साह्याने पार करणे या सर्व गोष्टींमुळे गिर्यारोहकांना मोहित करणाऱ्या या 'आजोबा डोंगराच्या' नावाचीदेखील एक पुराणकथा सांगितली जाते; याच डोंगरावर बसून वाल्मिकी ऋषींनी 'रामायण' हा धर्मग्रंथ लिहिला, या डोंगरावर सीतामाईने लव, कुश यांना जन्म दिला व लव-कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा संबोधत, म्हणूनच या डोंगराला 'आजोबा' असे नाव प्राप्त झाले, अशी अख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच या डोंगरवर वाल्मिकीऋषींचा आश्रम व त्यांची अतिशय सुंदर समाधी आहे. अनेकांचे श्रध्दास्थान असलेली ही पवित्र जागा फ़ारच शांत आणि निसर्गाची पुरेपूर उधळण झालेली आहे. अनेक वर्षे मोठ्या श्रद्धेने आणि पारंपारीक पद्धतीने या जागेचे महात्म्य आजतागायत जपले गेले आहे.सध्या २ साधू महाराजांकडून या ठिकाणाची व्यवस्था, येणा-या जाणा-या भक्तांची काळजी, रोजची पूजाअर्चा मोठ्या भक्तीभावाने यथासांग पार पाडली जाते. यांच्या अगोदर अनेक वर्षे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या साध्वी स्त्री ने आपला देह याच ठिकाणी ठेवल्यानंतर त्यांची छोटीशी पण छान समाधी बांधून या दोन साधूंनी मोठ्या आनंदाने तेथील कारभार सांभाळला आहे.एकाचवेळी १०० च्या वर जास्त भावीक/पर्यटक व्यवस्थीत मुक्काम करू शकतील एवढी मोठी धर्मशाळा या ठिकाणी बांधली असल्या कारणाने राहण्याचा प्रश्न भेडसावत नाही. तसेच बारमाही सूमधुर नैसर्गीक पाण्याच्या टाक्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील उद्भवत नसल्याने भक्ताचा मोठा ओढा या ठिकाणी ओढला जातो. अश्या या नितांत सुंदर आणि पवित्र ठिकाणी नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमचा चमू पोचल्याने अगदी पापमुक्त झाल्याचे भासले.योगायोगाने नववर्षाच्या निमित्ताने ठाण्यातून 
दर्शनाकरीता आलेल्या एका कुटुंबाने बनवलेला झणझणीत तयार आमटी भात व कुरकूरीत बटाटा भजी आग्रहाने आम्हा मंडळींना जेवू घातली त्यामूळे आजच्या स्वयंपाकाच्या ड्यूटी ला मला चक्क सूट्टी मिळाली होती.आयत्या मिळालेल्या गरमागरम जेवणावर ताव मारून धर्मशाळेत पिट्टू ठेवले गेले आणि वाल्मीकींच्या समाधीचे दर्शन घेवून त्या निसर्गरम्य आश्रमाच्या प्रांगणात पुन्हा निवांत गप्पांचे फ़ड रंगले ते थेट शेकोटीभोवती मध्यरात्र उलटेस्तोवर. मधेच थंडीवर मात करण्यासाठी फ़क्कड चहा बनवला गेला आणि माकडांच्या माकडचेष्टांचा मनमूराद आनंद घेवून मंडळींनी विस्तीर्ण आणि स्वच्छ अश्या धर्मशाळेत पाठा टेकल्या आणि क्षणार्धातच सर्वजण घोरण्याच्या स्पर्धेत सहभागी देखील झाले.
 प्रात:काली नानाविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रसंन्न पहाटेची ती कोवळी सूर्यकीरणे अंगावर घेण्यासाठी सह्यरांगातील आजोबा मानल्या जाणा-या त्या पर्वतावर मावळ्यांचा आता पुन्हा विहार सुरू झाला होता. नैसर्गीक कूंडातील थंडगार पाण्याने सुर्चीभूत होऊन आश्रमातील आरतीला हजेरी लावली गेली आणि ध्यानधारणा करून फ़क्कड चहा झाला. आज आमच्यातले ३ मावळे काही अपरीहार्य कारणामुळे अर्ध्यातूनच परत निघणार होते त्यांच्यासाठी म्हणून खास सोयाबीन पुलाव बनवण्यात आला आणि त्यांना निरोप देवून आम्ही पर्वतावर बाकी भटकंती करून पुढच्या प्रवासाला लागलो. आता पुन्हा वाटाड्या शोधणे आवश्यक होते कारण मिळविलेल्या माहितीवरून गुहेरीचे दार गाठणे वाटते तेवढी सोप्पी गोष्ट नव्हती. फ़क्त सापडण्यास कठीण नसुन ती पार करणे देखील कष्टप्राय असल्याने वाटाड्या शिवाय जाऊ नका असा सल्ला अनेक अनुभवींकडून मिळाला असल्याने आम्ही वाटाड्याच्या शोधात निघालो आणि खाली धनगर वाडीत राहण्या-या, रानावनात भटकंती करून त्याच निसर्गावर आपली गुजराण करून त्या निसर्गाला आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक समजत असलेल्या फ़ासेपारधी समाजातील संपूर्ण कुटूंबाशीच आमची भेट झाली तोवर दुपार टळत आलेली होती. आमच्या विनंतीस मान देवून महिला मंडळास घराकडे धाडून मामा, भाचे असे दोघेजण
आम्हाला वाट दाखविण्यास आपली गिलवर सोबत घेवून तूम्हाला मुक्कामाची जागा दाखवून आजच आम्ही माघारी फ़िरणार या बोलीवर येण्यास तयार झाले आणि आमचा आनंद द्विगुणीत झाला.कमितकमी थांबे घेत निघालात तर संध्या. ७ ते साडेसात च्या सूमारास शेवटच्या थोड्या अवघड प्रस्तारोहणापाशी आपण पोहचू असे सांगीतल्यामूळे पावले शक्य तितक्या झपाझप टाकत मावळे निघाले होते.भातखेचर ओलांडून आजोबा पर्वताला उजव्या हाताला सोडत आमचा मोर्चा आता खड्या चढाला लागला होता. घामाच्या धारा पूसत पाणवठ्यावर थोडा दम घेत आम्ही घनदाट अश्या कारवीत घुसलो आणि चढण आजूनच वाढत गेली. वाटेत आलेली कारवी तूडवत वेळप्रसंगी तिचाच आधार घेत पहिल्या प्रस्थारोहणापाशी मावळे विसावले होते.एकमेकांचा आधार घेत पाठपिशव्यांना पुढे ढकलत पहिला पॅच पार पडला पण आता चांगलाच दम निघाला होता तरिही गुहेरीच्या दाराचे आजून दर्शन देखील होत नव्हते.दमछाक वाढत होती, चढ वाढत होते आणि सोबतीचा सूर्यप्रकाश कमी होत अंधांर देखील वाढत होता. पण मावळे थांबले नव्हते (थांबायला जागाच नव्हती त्या वाटेवर ही गोष्ट वेगळी) वेग जरी मंदावला असला तरी
एकमेकां साह्य करू.. म्हणत हात देत, पाठपिशव्यांची अदलाबदल करून मंडळी पुढे जात होती. पहिला, दूसरा, तिसरा कठीण प्रस्थारोहण टप्पा पार करून देखील गुहेरीच्या दाराचे दर्शन झाले नव्हते. "पटापट चाललात तर आजून फ़क्त १० मी." हे एकच वाक्य फ़क्त गेल्या १ तासापासून कानावर पडत होते पण वाट काही संपत नव्हती. सूर्यनारायण अस्ताला गेल्याने आता विजे-यांच्या झोतात आमची चढण सुरू होती, थोडे अवघड वाटावे असे चवथे प्रस्तारोहण आले ते पार केल्यावर डावीकडे वळून उजव्या बाजूला पून्हा चढण सुरू झाली आणि अखेरीस त्या घळीचे शेवटचे टोक म्हणजेच तो माथा दूरवर का होईना पण एकदाचा दिसला. आता खडी चढण चढताना आमच्या पाठीमागे खोलवर फ़क्त अंधाराचे साम्राच्य पसरलेली भयाण दरी दिसत होती.त्यात मूरूम जरा ठिसूळ झाल्याने वाट थोडी धोक्याची होती. सावकाश पणे आमची वाटचाल सुरू होती. आता दमछाक, त्यात अंधार आणि घसा-याची वाट यामूळे वेग फ़ारच मंदावला होता. थोड्याच वेळात आता सर्वजण पाचव्या आणि संपूर्ण मोहिमेतील कठीण अशा प्रस्तारोहणापाशी पोहचलो होतो. वाटाड्याने पुढे होत सर्वप्रथम सर्व पाठपिशव्या वरती घेत आता १-१ मावळा पूढे होत होता. लहान चूकीला देखील क्षमा नसल्याने अगदी सावकाश आणि आत्मविश्वासाने एक एक पाऊल टाकत सर्वजणांनी तो टप्पा पार केला व पूढची वाट धरली. समोर खरच २० मिनिटात पोहचता येईल अश्या ठिकाणी आता सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. जवळपास १५-२० मिनिटामध्ये सर्वजण शेवटचा टप्पा पार करून माथ्यावर पोहचले होते. आमचा आनंद आता गगनात मावत नव्हता. अंधार असल्याने वरून बघताना त्या भयाण दरीचा पक्का अंदाज या क्षणी येत नव्हता पण जी वाट पार करून आम्ही पोहचलो होतो त्यावरून अंदाज बांधणे अवघड नव्हते. खूप वेळ धापा टाकणारी छाती आता गर्वाने फ़ूलली होती शिवरायांचे नाव घेत पून्हा एकदा माथ्यावरील कारवीत मंडळी घूसली आणि वेगातच आम्ही माथ्यावरील तळ्यावर विसावलो. शेकोटी पेटवून चूल मांडली गेली व गरमागरम मॅगी तयार झाले.

निसर्गाच्या कुषीत घूसून त्याच्या खडतर वाटा पार करत, थंडगार वा-यात, बोच-या थंडीत देखील दमछाक होऊन वाहणा-या घामाच्या धारा पुसत, वाट शोधत, झाडे वेलींचा आधार घेत सवंगड्यांसमवेत चढाई करून, दगड गोट्यांतून, घसा-यातून तोल सांभाळत, आपल्याला मित्रांना कोणतीही ईजा होऊ नये म्हणून पूरेपूर काळजी घेत सरतेशेवटी माथा गाठायचा, शिवरायांच्या नावाने आरोळी ठोकायची, भारत मातेचा जयजयकार करायचा आणि गरमागरम भोजन चोपायचे व निसर्गाच्या कुषीत साठलेले अमृतासमान पाणी ढसाढसा पित त्याच्या गारव्याची अनुभुती घ्यायची.... या पेक्षा मोठा आनंद तो काय. पोटपूजा उरकून अंथरूण टाकले गेले आणि अथांग अवकाशाखाली लाखो चमचमत्या चांदण्यांच्या साथीत शेकोटीच्या उबेमधे मंडळी निद्राधीन झाली. सकाळी पून्हा आलेल्या वाटेवर फ़ेरफ़टका मारून ज्या भन्नाट वाटेने आम्ही गुहेरीचे दार गाठले त्या वाटेचे छायाचित्रण झाले आणि पिट्टू खांद्यावर टाकून परतीचा प्रवास सुरू झाला. परत एकदा २-३ तासाची पायपीट करून आम्ही कुमशेतच्या 'ठाकरवाडी' या गावी पोहचून आमच्या येणा-या गाडीची वाट पहात विश्रांती घेतली. दुपारी ११ वाजता येणारी आमची गाडी ४ वाजता (फ़क्त ५ तास उशीराने)  पोहचली आणि त्या सह्याद्रीला मुजरा करून ट्रेक च्या गप्पा गोष्टी करत परतीचा प्रवास सुरू झाला. नारायणगावा जवळ आमच्या सर्वांच्या आवडत्या खानावळी मधे पोटभर चुलीवरचे जेवण हादडून पून्हा पुण्याकडे रवाना झालो. 

आता मध्यरात्र होत होती आणि मंडंळीं घराकडे निघाली होती. थोडाफ़ार थकवा जाणवत देखील होता, खरचटलेल्या खुणा ठणका देत अंगावरच अस्तीत्व दाखवत होत्या पण तरीदेखील...
नेहमीच्या सडकेवर, पाऊलवाटांवरून चालण्यापेक्षा या घाटवाटा तूडवून वेगळीच मजा आली होती. आलेला थकव्याची पर्वा नव्हती .तब्बल ४ दिवस वेगळ्याच विश्वात घेऊन गेलेला हा सह्याद्रीचा प्रवास. सरत्या वर्षाचा शेवट गोड करून येण्या-या नवीन वर्षासाठी नवचेतना, नवा जोष, नवी ऊर्जा घेवून जगण्याची नवी उर्मी देऊन गेला होता हे मात्र नक्की. हीच तर त्या सह्याद्रीची त्या निसर्गाची आम्हा सह्यवेड्यांस मिळालेली नववर्षाची भेट होती जी चिरकाळ टिकणार होती. जी जगण्याची शिकवण देत होती, निसर्गावरचे प्रेम द्विगुणीत करणारी होती.येत्या नववर्षात जास्तीत जास्त सह्यभटकंती करण्याची संधी मिळो ! याच एका मागणीने आता मी देखील घरी पोहचलो होतो.

भेटा अथवा लिहा, (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे
९८२२८७७७६७

सहभागी वीर :- अमोद राजे, राकेश जाधव, निलेश महाडीक, भास्कर कुलकर्णी, निखिल केळकर, सुदीप माने,अक्षय बोरसे,अश्विन मेनकुदळे, राहूल सारडा, विकास पोखरकर,प्रसाद डेंगळे,निलेश वाळिंबे.




    

4 comments:

  1. Wa.. Mastach Walimbe. Nisargache wa ekandarit trek Che apratim warnan karun tyawar ji narma vinodacha Jo tadaka tumhi dila ahat.. To ekdam lajawab..Tumacha lekh wachun punha ekada me guyaricha dar ani walmiki ashramat bhatkun alo.

    ReplyDelete
  2. असेच मलाही शोधावेसे वाटते माझे मीपण सह्याद्रीच्या कुशीत.

    ReplyDelete
  3. असेच मलाही शोधावेसे वाटते माझे मीपण सह्याद्रीच्या कुशीत.

    ReplyDelete