Friday, July 8, 2011

॥ वारी दुर्ग आणि धाकोबाची ॥

                                            ॥ वारी दुर्ग आणि धाकोबाची ॥
जेष्ठ महीना आला की पंढरीची वारी करणा-या वारक-याला ज्याप्रमाणे आपल्या पंढरीची ओढ लागते अगदी तशीच अवस्था मृग नक्षत्र सुरू झाली की, हा निसर्गच जणू ज्यांची पंढरी त्या गड्यांची,मावळ्यांची पाउले देखील त्याच पांडूरंग रूपी सह्याद्रीच्या वाटेने पडू लागतात.आणि मग तयारी सुरू होते त्या सह्यवारी ची....

जेष्ठ वद्य सप्तमी ला पंढरपूरी निघालेले वारकरी  माउली, तुकारामांच्या 
जयघोषात पुण्यात दाखल झाले आणि आम्ही सवंगड्यांनी श्री. छत्रपतींचे स्मरण करून आमच्या या सह्यवारीसाठी २५ ता. दुपारी पुण्याहून प्रस्थान केले. स्थान ठरले होते “दुर्ग आणि धाकोबा”खर तर आपण यांना किल्ले असे म्हणू शकत नाही पण ही आहेत घाटमाथ्यावरील अत्यूच्य २ डोंगरशिल्पे. सर्व मावळे नारायण पेठेत माझ्या घरापाशी जमून आम्ही राजे च्या हडपसरच्या घरी पोहचलो दुपारी १२ वा. निघणारी आमची बस ठरलेल्या वेळेनुसार “बरोब्बर” दुपारी ३ वाजता गणेशस्तवन करून (एकदाची) निघाली.यावेळी आम्ही २ गाड्या करून निघालो होतो त्याचे कारण काही मावळे वेळेअभावी १ दिवस लौकर परतणार होते ते १ गाडी घेउन परत येउ शकतील ही सोय बघून २ गाड्या घेउन जाण्याचे नियोजन होते. जाताना वाटेत चाकण फ़ाटयाला पेढ्याला घेउन (खायचे पेढे न्हवेत हे !, हे आमचे परममित्र अमित पानसरे उर्फ़ पेढ्या होय.) गाडी पुढे निघाली आणि मा. राजे दुस-या गाडीत असल्याचा गैरफ़ायदा घेत अ(ना)वश्यक ब्रेक, थांबे घेत आम्ही जवळपास संध्या. ६ च्या सुमारास महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी च्या पायथा गाठला आणि एकवार किल्ल्याला तसेच महाराजांच्या अश्वारूढी पुतळ्याला मुजरा ठोकून दुर्ग चा माथा गाठण्याकरीता कूच केले. 
जाताना वाटेत हेम्याच्या श्रवणीय गाण्यांची साथ वातावरण आजून धुंद करत होते.वाटेत सरपंचाची गाठ घेउन त्यांनाही गाडीत घेउन आम्ही सर्वजण जवळपास रात्रौ  ८.३०च्या  सुमारास पोहचलो. गाडीतुन उतरताक्षणी आपण स्वर्गात प्रवेश केल्याचे जाणवले आणि सगळ्यांना आपण ढगात चालत आहोत असा भास झाला.आता ब-यापैकी अंधार पडला होता त्यामूळे तडक दुर्गादेवी मंदीरात पोहचलो.

चार नक्षीदार खांबांनवरती कौलारू छप्पर सांभाळत प्रचंड ऊन,वारा,पाऊसाची तमा न बाळगता गेली अनेक वर्ष निसर्गावरती मात करत हे मंदीर आजही शान सांभाळून उभे आहे. चहूबाजूला प्रचंड झाडी आणि मोठठाले खडक अश्या जागेत जेमतेम ६-७ लोक झोपू शकतील येवढ्याच चौरसामद्धे मधोमध अत्यंत रेखीव “देवीचा तांदळा” सगळ्यांच्या मनात घर करून न जाईल तर नवलच ! दुर्गवाडीतल्या वनवाश्यांनी यथाशक्ती या मंदीराची उभारणी केली आहे.देऊळाच्या आजूबाजूस अनेक शेंदूर फ़ासलेले पाषाण इतर देवांची प्रतिकात्मक रूपे म्हणून मोठ्या ऎटीत स्थामापंन्न झाले आहेत. देवीच्या पुढ्यात नतमस्तक होऊन सर्वजण जवळच असलेल्या समाजमंदीरापाशी पोहचलो आणि एकदाच आमच्या “विठोबाच्या” (सह्याद्री) कुशीत शिरल्यावर आता आठवण झाली ती “पोटोबाची”.

परंपरेचा मान ठेवून आचा-याचा पोशाख मला चढवण्यात आला आणि हातात कांदे आणि सुरी (जिच्यापुढे तलवार देखील नांगी टाकेल) देवून झालेला आनंद व्यक्त करण्याकरीता आनंदआश्रूंना वाट करून देण्यात आली.बेत ठरला गरमागरम खिचडी आणि पापडाचा. जावई बाप्पू अर्थात प्रसाद डेंगळे (तृतीय) यांना जातीने हजर राहणे शक्य नव्हते तरीदेखील आपली “बत्ती” माझ्याकडे सुपूर्त करून मित्रप्रेमाचे ज्वलंत उदा: देवून गेले म्हणून, त्याच दोस्तीला सलाम करून डेंगळ्यांच्या बत्तीला “आग” लावण्यात आली आणि फ़ोडणी पडली यावेळी झाकण्यासाठी ताटली नसल्याकारणाने दोन पातेलीच एकावर एक रचून खिचडी शिजवण्यात आली तर दुसरीकडे ’राक्या’ आणि ’सुध्या’ डोळ्यात चुलीचा धुर जात असतानादेखील डोळ्यावर काळे चष्मे चढवून (रात्रौ ११ वा.) आपले पापड भाजण्याचे काम व्यवस्थीत पार पाडीत होते.जवळ्पास अर्ध्या झोपा झाल्यावर बिरबलाची खिचडी शिजण्यास जितका वेळ लागला असावा तेवढ्याच वेळात (कदाचित जास्त पण कमी नाही) सरतेशेवटी खिचडी रटरटली आणि क्षणार्धात उड्या पडल्या,बघता बघता दोन पातेली खिचडी कधी गायप झाली हे समजलेच नाही. लगेचच जवळच असलेल्या ओढ्यावर भांडी धुण्याचा सामूदाईक कार्यक्रम पार पाडून झोपण्याची तयारी सुरू झाली. समाजमंदीरात मूंगळे आणि पावसाचे पाणी येत असल्यामूळे काही मावळे देविच्या मंदिरी आणि काहीजण गाडीतच निद्रीस्त झाले.       
                                                       
पहाटे ६ वा. च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरीने जणू जागे होण्यासाठीस “गजर” केला आणि मला जाग आली.दुर्गादेवीच्या छत्रछायेखाली कालची झोप फ़ारच गाढ झाली होती जाग येताक्षणी आजूबाजूला नजर गेली आणि आपण आजून स्वप्नातच आहोत असा भास झाला.”अतिशय प्लेझंट थंडगार हवा अंगात मस्त जोम प्राप्त करत होती, रोज सकाळी उठल्यावर येणारा आळस तर चक्क आज गैरहजरच होता, मोत्यांचा वर्षाव करावा तशी टपो-या थेंबांची उधळण आजूबाजूची गर्द हिरवी झाडी आपल्या फ़ांद्या,पानातून करत आम्हाला “सु-प्रभात” म्हणत होते,पक्ष्यांचा किलबीलाट मनाला गुदगुल्या करून ’चला तयारीला लागा तो निसर्ग खुणावतोय!’ असा संदेश देत होता.” तडक आमची तयारी सुरू झाली. प्रचंड पावसामूळे आज दुपारचे जेवण रद्द करून सकाळच्या न्याहरी वरच जोर द्यायचा ठरले. पटापटा पोर आपपल्या पद्धतीत “वाघ,ससे मारून आली”(अर्थबोध होत नसेल तर मला सकाळी भेटा ! :P) थोबाड खंगाळून आंघोळीच्या गोळ्या वाटण्यात आल्या आणि सर्व प्रार्तविधी आटोपले.कात्याने चहाचे आधण ठेवले तर इकडे मी पोहे भिजत घालून फ़ोडणीची तयारी केली थोड्याच वेळात आमचा “कांदेपोहे” (अहो तो नव्हे) कार्यक्रम पार पडून देवीचा आशिर्वाद घेउन आम्ही डोंगरमाथा गाठला.एका उंच टेकाडावर असंख्य लहान मोठे सुळके असेच वर्णन या माथ्याचे करता येईल.       

जाताना पावसाच्या धारा मन चिंब करत होत्या सतत पडणा-या पावसामुळे जागोजागी छोटे छोटे धबधबे सर्वांना आकर्षीत करत होते,क्षणात धुक्याची लाट आपल्या जादूने सारा परीसर अदृष्य करत होती, मेघांच्या दुनीयेत सर्वजण जणू स्वर्ग विहार करत होते, त्या उत्तूंग शिखरांनी आपला देह थंड करून निसर्गाची हिरवीगार शाल अंगावर लपेटून घेतली होती त्यावर दवांचे लहान लहान ठिपके आणि विवीध फुले जणू शालीवर कढलेली नक्षीच वाटत होती.एखाद्या नववधूने जसे नटावे तसा तो सह्याद्री नुकत्याच झालेल्या पावसामुळे नटून आमच्यासमोर उभा होता.बघता बघता सर्वजण या विलोभनीय वातावरणात हरवून गेले असतानाच त्या निसर्गाचे खरे रक्षक आणि जवळचे मित्र विंचू,खेकडा यांनीपण आपले दर्शन देउन आपले उपस्थीती दर्शवली. थोडा वेळ गप्पा मारून आम्ही आता “धाकोबाच्या” दिशेने निघालो होतो बरोबर सरपंच वाटाड्याच्या भुमीकेत होतेच. जाताना जितका जमेल तेवढा तो निसर्गाचा आनंद हावरटासारखा उरात साठवत सर्वजण पुढे चालले होते. यावेळी भटकंतीची मजा काही औरच होती कारण सतत कोसळणारा पाऊस आणि कायमच खाली उतरलेले ढग यातून चालताना “स्वर्गभ्रमंतीचा” जो काही आनंद मिळत होता त्याला तोडच नाही. खंत फ़क्त एकच होती की फोटो फ़ार काही काढता येत नव्हते पण पाऊस कमी झाला की परत येऊ असा निश्चय करत पुढे जात होतो आणि तसही मनाच्या कप्प्यांमद्धे बंदिस्त झालेली ही विलोभनीय दृष्ये, हे वातावरण थोडच कधी विसरण शक्य होत ? वाटेत अनेक प्रकारच्या फ़ुलांची रांग पायघड्या घातल्या प्रमाणे पसरली होती. दोन अडीच तासची पायपीट करून १ चढण पार केल्यावर आम्ही आता पोहचलो होतो धाकोबा वर.


या ठिकाणी आजुबजूचा परीसर अंत्यत रमणीय दिसतो घाट्माथ्यावरचे सर्वात उंच असे हे शिखर आहे. हे आडवेतिडवे पसरलेले पठार म्हणजेच देशाची सीमा होय. दुसरीकडे खोल दरीत दिसतो तो कोकणतळ. हरीश्चंद्रगडापासून अगदी दक्षिणेकडील सिद्धगडापर्यंतची डोंगररांग तसेच गोरखग,मच्छिंद्रगड,नाणेघाट,शिवनेरी,जिवधन,वांदरलिंगीचा उत्तूंग सुळका, ही सह्याद्रीची भुषणे आपण येथून न्याहळू शकतो मात्र ढग असल्यामूळे आम्ही या आनंदाचा फ़ारसा आस्वाद घेउ शकलो नाही.हरीश्चंद्र च्या कोकण कड्यासमानच इथेदेखील १ कोकणकडा आपले स्वागत करतो डोंगरावर  छोटेखानी “डाकेश्वराचे” मंदीर सोडले तर वास्तव्याला जागा नाही.मंडळी आता मंदीरापाशी पोहचली होती सध्या या मंदीराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे त्यामूळे बाहेरूनच दर्शन घेउन आता उतरणीच्या वाटेत काही गुहा लागतात तेथे पोचायाचे ठरले.अचानक पेढ्याची हाक आली..निल्या लौकर केमेरा काढ साप आहे इथे! मग काय सगळे छायाचित्रकार आपापले छंद जोपासायला पुढे सरसावले.

वेळेअभावी येथून काही सैनीक म्हणजेच कात्या,राहूल्या,भास्कर,अक्षय माघारी फ़िरून लौकरच पुण्याला रवान होणार होते त्यांना घेउन सरपंच परतीला निघाले आणि आम्हाला गुहेकडे जाण्याची वाट दाखवली.आम्या,विज्या,पेढ्या,सुध्या,राक्या,निळकंठ,हेम्या आणि मी आम्ही मंडळी दाखवीलेल्या वाटेने निघालो. कोणालाच माहीत नव्हते या वाटेवर काय “वाट” लागणार आहे ते...   



आम्ही सर्वजण आता गुहेकडे निघालो होतो. पाऊस थांबायच नाव घेत नव्हता आणि धुक्याची चादत अखंड पसरून वातावरणात वेगळाच रंग आणत होती.आम्हाला सांगीतल्या प्रमाणे साधारण १ तासात आम्ही पुहेपाशी पोचावयास पाहीजे होतो पण जवळपास २ तास होऊन गेले तरी आम्हाला गुहा लागली नव्हती.प्रचंड धुक्यामूळे बाजूचा माणूस दिसणे अवघड झाले होते. काही वेळाने आम्ही सर्वजण थांबलो पाणी कोसळण्याचा आवाज येत होता थोडे धुके सरल्यावर रस्ता कधीच चुकला आहे आणि आता आम्ही एका मोठ्या धबधब्याच्या माथ्यापाशी पोहचलो आहोत हे लक्षात आले दु. ४ वाजत आले होते आजून १,२ तासात अंधार होण्याअगोदरच गुहा सापडणे आवश्याक होते.काहींचे मत माघारी फ़िरायचे ठरले पण तो रस्ता पण सापडेलच याची खात्री नव्हतीच तसेच २ तासात सर्व अंतर पार होणे पण शक्य नव्हते त्यामूळे म्हागारी फ़िरायचे नाही हे मी पक्के करून सर्वांना पटवून दिले. पण काही नविन मावळे माझ्यावर (भितीने) फ़ारच रागावलेले दिसले त्यात राजेने देखील आत १ धाडसी निर्णय घेतला आणि या धबधब्यातूनच कडेने खाली उतरत जायचे नदी पकडून जवळचे गाव गाठायचे असे पक्के झाले.ठरल्याप्रमाणे राजे सर्वात पुढे मग विज्या आणि नंतर सर्वजण व शेवट मी आश्या पद्धतिने मोहीमेची सुरूवात झाली. बाजूलाच प्रचंड जलप्रपात, चहूबाजूला धुके,तूफ़ान पाऊस आणि निसरडी वाट यातून प्रत्येकजण एकमेकांची साथ घेत उतरत होता. नवीन मावळ्यांची शब्दश: “फ़ाटली” होती पण त्यांना धिर देण्याचे काम बाकी सवंगडी जोमाने करत होते.कोणतीही चुक फ़ार महागात पडणार होती एका ठिकाणी कातळावरून बसूनच सर्वांना पुढे सरकायचे होते थोड घसरण देखील थेट धवधब्यात निमंत्रण होत नेमक त्याच ठिकाणी माझ्या बुटाचा सोल थोडासा फ़ाटला म्हणून पुढे असलेल्या विज्याला सोल कापून टाक सांगीतल तर भाईने माझा पायच ओढला माझी क्षणभर तंतरून मी थेट दगडातून उगवलेल्या निवडूंगाला आधार म्हणून धरल खर पण हाताचा “झारा” करून घेतला. बघता बघता तासाभरात आम्ही नदीची वाट पकडली. गाव आता जवळ दिसत होत घाबरलेले चेहरे देखील आता हसू लागले होते. जाताना गावाच्या अगदी अलीकडे डोंगराच्या पायापाशी अगदी चिटकून पुढे अलग झालेला सुळका आम्हाला जिवधनच्या 'वांदरलिंगी' चा भास करून गेला.
आता आम्ही गावात पोहचलो होतो एका घरात पोहचताच आपण आंबोली या गावी सुखरूप पोहचलो आहोत ही गोष्ट उमगली.मावशींच्या हातचा गरमागरम चहावरील प्रेमाची साय मन तृप्त करून गेली. गावातीलच १ जीपने आम्ही नारायणगाव गाठून पुढे दुस-या वाहनाने पुनवडीस निघालो वाटेत समाधान उपहारगृहात समाधान होइस्तोवर पोरांनी मटण भाकरीवर ताव हाणला नी पुन्हा गाडीत बसले. सकाळपासून सोसाट्याचा वारा आणि धो धो पावसात प्रचंड भिजल्याने जवळपास सर्वांनाच थंडी भरली होती, पाण्याने जड झालेले ओझे सांभाळत केलेल्या साहसाने संपूर्ण अंग आता दुखायला लागल होत पण त्याची पर्वा होती कोणाला ? मी डोळे मिटून दिवसभराच्या गोष्टींनद्धे कधीच रमून गेलो होतो..


 “निसर्गाने आज जिवनाचे नवे धडे दिले होते म्हणाला होता, “घाबरू नका, माझ्याकडे पहा कोणत्याही परिस्थीतीत मी कसा तग धरून उभा आहे माझ्या जंगलातल्या वृक्षाच्या फ़ांद्या बघा कशा हातात हात गुंफ़ून एकत्र विहार करत आहेत, एकमेकांना खांदयाचा आधार देत पाय रोवून उभे आहेत, शांत रहा मीच वाट दाखवीन तुम्हाला फ़क्त मनानी हरू नका ! काहीही न बोलता तो बरच काही सांगून गेला होता. आज अजून १” थरार” आपल्या अनूभवाच्या गाठोड्यात बांधून समृद्ध झालेले मावळे पुन्हा पुढच्या ट्रेक चे स्वप्न मनाशी बाळगून आपली सह्यवारी पुर्ण झाल्याच्या आनंदात आता परतीच्या प्रवासाला निघाले होते...पण मन मात्र तिकडेच कुठेतरी हरवल होत !”
भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.

8 comments:

  1. झकास... मित्रा...

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन केलेले आहेस... I wish I could join you guys...

    ReplyDelete
  3. वाळिंबे उच्चं लिहिला आहे blog
    परत एकदा दुर्ग ढाकोबा करून आल्या सारखा वाटल
    अश्याच आपल्या ट्रेक च्या आठवणी शब्द रूपाने कोरून ठेवा!!!

    आपला लोभाचा लोभी
    ||आमोद राजे||

    ReplyDelete
  4. mala ekdam awadla, mi actually imagine karat hoto tuza interpretation wachtana..

    local train madhe wachtana mi ektach hasat hoto..ani loka ghabarun station to station lamb palat hoti, kahi loka dusrya dabyat geli..aso

    dhabdhaba event: mi asto tar asa risky paryay laglach nasta tumhala..mi kadhich rasta chukat nay..
    pan lai kalla patch asnar rao ..
    "fatli"wala scene lai kalla ahe re hahahaha loka ragavlit mhane :D hahaha...regular memeberana mahit ahe so te ragavle nahiyet :D

    baki alankar changle ahet ..especially last paragraph...lihayla thik ahe pan mala khatri ahe aplyatlya ekala pan asa watla nasal...junglat koni bai distiye ka..kinva bakichya khudguni activities karat asnar :D

    rofl: पारी १२ वा. निघणारी आमची बस ठरलेल्या वेळेनुसार “बरोब्बर” दुपारी ३ वाजता गणेशस्तवन करून (एकदाची) निघाली

    ReplyDelete