Friday, July 22, 2011

सह्याद्रीतली संगीत मैफ़ल – एक स्वप्नपूर्ती


भटक्या सह्यवीरांना आपल्या सह्याद्रीबाबत वाट्टेल ती स्वप्न पडत असतात. तसच मधे मलादेखील स्वप्न पडल होत , “आपण मित्रांसमवेत मस्तपैकी सह्याद्रीच्या कुशीत आहोत पाऊसाच्या चमत्काराने आपला सह्याद्री अंगावर हिरवी शाल पांघरून आपले मनोहर रूप सर्वांसमोर मिरवतोय, थंड हवा मस्त शीळ घालतीय आणि त्याच मंजूळ शिळेची साथ संगत पकडत “बासरीचे” सूर त्या सह्याद्रीत घुमत आहेत जणू तो मुरलीधर स्वत: या स्वर्गरूपी सह्याद्रीत प्रगटलाय आणि आपल्या सूरेल स्वरांनी वातावरण अजूनच धूंद करतोय सारी दु:ख, सा-या वेदना क्षणात दूर होवून मी त्या मंजूळ स्वरांमद्धे त्या गारव्यात पूर्ण हरवून गेलोय ! ”  आणि तेवढ्यात आईच्या हाकेने मला जाग आली. नेहमीचेच आळस देउन उठलो खरा पण पडलेल स्वप्न स्वस्थ काही बसून देईना.शेवट १६ जुलै चा दिवस उजाडला आणि आमचे परंम मित्र आणि प्रसिद्ध बासरीवादक ’श्री. अमित काकडे’ यांच्या कृपेने ते माझ स्वप्न एकदाच सत्यात उतरलच... !
१५ ला रात्री आम्याचा फोन आला,“निल्या उद्या सकाळी ५.३० ला पुणे स्टेशन ला भेट मस्त “पेबच्या” किल्ल्यावर भटकंती करून येउयात खास तूला ऎकावयाला बासरी घेउन येतोय !“ 

“क्या बात है ! झक्कास,पोहचलोच समज” असा १ ओळीचा प्रतीसादाने फोन बंद झाला आणि सकाळी ६.०५ ला मी, अनिल, अमित, अशुतोष आणि संजय असे ५ जण सिंहगड खर तर सिंव्हगड एक्स्प्रेस नी कर्जत ला रवाना झालो. सकाळची न्याहरी म्हणून अंडा आम्लेट आणि व्हेज कटलेट वर गाडीतच मस्त ताव मारून ८ वा कर्जत गाठले.आज आमच्या गाड्या वेळेत सुटल्या होत्या पण अनिल ची गाडी काही आज वेळेत सुटली नव्हती त्यामूळे त्याने कर्जत स्टे. ला १ अयशस्वी प्रयत्न केला.(अर्थबोध होत नसेल तर खाजगीत संपर्क करा) आणि लगेचच आम्ही लोकलने नेरळ स्टे. गाठले.नेरळहून आम्हाला संजय नामक सारथ्याचे दर्शन घडले आणि “एका रिक्षेत सारथीसह (फ़क्त )६ जण कसे आरामशीर बसू शकतात हे उदा: सह स्पष्ट करत आम्हा मावळ्यांना किल्ले पेबच्या पायथ्याला असलेल्या “फ़णसवाडीत” सुखरूप (अस आता म्हणतोय) पोच केले.वाडीत पोहचताच निथळ खळखळणा-या झ-याचा आवाज जणू आज सूरांची मैफ़ल ‘नक्की’ याची पावती देवून गेला.इथेच आम्हाला “गुरूप्रसाद” वाटाड्या म्हणून मिळाला आणि साक्षात आमचा गुरूच असल्याचा पुरावा देउन गेला.
पेब उर्फ़ विकटगड आता आम्हाला आव्हान देत होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या “पेबी” या देवीवरून याला पेब असे नाव पडले.हा किल्ला स्वराज्यात सामील झालेला असून महाराजांनी धान्य कोठारासाठी याचा उपयोग केला अश्या नोंदी आढळतात. साधारण सकाळी ९ च्या आसपास आम्ही मावळ्यांनी गडाकडे प्रस्थान केले.
अतिशय मनमोहक वातावरण होते लांबवर गडावरून पडणारा धबधबा आमचे लक्ष ओढून घेत होता आणि आपोआपच पाउले झपाझपा पडत होती जवळपास १ तासातच आम्हाला आता चढण लागायला लागली.वरूणराजाच्या कृपेने आजूबाजूचा परीसर चांगलाच खूलला होता. रान चांगलेच माजल्याने ते तूडवतच आता आमचा प्रवास सूरू झाला.चहूबाजूला हिरवी वनराई मनाला आणि शरीराला सतत गुदगूल्या करत होती. संपूर्ण रस्ता भलताच निसरडा झाल्याने जागोजागी लोटांगणे घालतच मावळे पुढे चालत होते त्यातही लोटांगणे घालण्यात अनिल आघाडीवर होता.हिरवीगार गवताची पाती वा-याच्या झुळूकेबरोबर अल्लड्पणे डोलताना फ़ारच सुंदर भासत होती. जवळपास २ तासानंतर १ छोटासाच पण पाऊसामूळे जरा कठीण वाटावा असा १ Rock Patch पार करून मावळे माथ्यावर विसावले. मावळ्यांचा आनंद आता गगनात मावेना, मग काय... “क्षत्रीय कुलावतंस.....” च्या घोषणेने सारा आसमंत दुमदूमला आणि जणू महाराजांनी “आजून मी इथेच आहे तूमच्याच बरोबर” याचाच काय तो पुरावा म्हणून त्या कातळकड्यांमधून “प्रतीध्वनी” उमटले.एका कड्याला डाव्या बाजूला ठेउन उजवीकडे हिरव्या रंगाच्या असंख्य छटांची शाल पांघरून बसलेल्या जवळपास २००० फ़ूट खोल दरीतल्या त्या निसर्गाची किमया पहात आम्ही पुढे सरसावलो आणि १० मि. मद्धेच डाव्या हाताला वरच्या बाजूस असलेल्या प्रचंड मोठ्या आणि अतिशय स्वच्छ अश्या गुहेच्या तोंडापाही आपापल्या पाठा टेकल्या.


गुहेच्या माथ्यावरून छोटासा पण मन चिंब करणारा धबधबा खूपच सुंदर दिसत होता. समोरच्या दरीमधे आता धुक्याने आपली चादर पांघरून पांढ-या शुभ्र दरीचे मनमोहक दर्शन दिले होते आणि गार वारा आता वरूणराजाच्या आगमनाची चाहूल देतो तोच, धो धो करून आपली हजेरी लावून देखील गेला. आता पोटातले कावळे आपली चाहूल भासवत होते मग काय पटापटा बत्ती पेटली आणि गारव्यात मस्तपैकी खीचडी रटरटली तीकडे चुलीवर गुरूने सगळे पापड भाजून तयार ठेवलेच होते. आता पापड म्हणल की माकड आलच त्यामूळे त्या रानटी माकडांच्या साथीनेच या शहरी वानरांनी मस्त पापड खिचडीवर ताव हाणला.
आता पोटोबा शांत झाले होते वातावरण हलकासा गारवा मनाला गिरक्या घालून परत त्या शुभ्र दरीत लुप्त होत होता पावसाची रिमझीम सुरूच होती आणि अचानक त्या गुहेतल्या प्रसंन्न शांततेत काही क्षणातच “पहाडी” रागाचे ते मंजूळ स्वर निनादले आणि अमित ने ताबडतोप ’वाह वाह’ ची दाद मिळवली.मग काय फ़र्माईशी सुरूच झाल्या पहाडी,शिवरंजनी असे एकापेक्षा १ राग त्या वातावरणाला आजून धूंदी आणत होते मग फ़िल्मी संगीत म्हणून खास हिरोची धून झाली आणि तिर्थ विठ्ठल या अभंगाने मैफ़लीची (वेळेअभावी) सांगता झाली.मी आता पूरता हरवून गेलो होतो माझे स्वप्न आज सत्यात उतरल्याचा आनंद काही औरच होता हिरव्या शालीने नटलेल्या त्या सह्यकुशीत आज मी बासरीचा मंजूळ आवाज ऎकत होतो आणि साथीला होते ते कोसळणारे धबधबे, पावसाच्या जलधारा, टप टप पडणारे ते टप्पोरे थेंब, आणि लडीवाळ शीळ घालत जाणारा तो वारा ! कोणताही ताण, क्षिण मनावर नसेल तर “पवित्र मनाला”   येणा-या त्या अनुभूतीने मला आनंदून टाकल होत. सगळे मावळे सापाने कात टाकून पुन्हा तरूण व्ह्यावे त्याप्रमाणे तरतरीत झाले होते आणि आम्ही अमित काकड्यांचे ’आभार’ मानून आता बालेकिल्ला सर करायला पुढे सरसावलो होतो.गुहा डाव्या हाताला ठेवून सरळ पुढे गेल्यावर शेवटी रस्ता संपतो आणि वरून पडणा-या पाण्यामूळे थेट खोलवर दरीत एक घळ उतरते बरोब्बर तिच्या तोंडालाच १ लोखंडी शिडी एका कातळावर घट्ट बसवलेली दिसते. बास, त्याच शिडीवर चढून धुक्याचे ढग पार करून आम्ही आता जणू स्वर्गप्रवेश केला होता आणि आमच्या सर्वांच्या नजरेसमोर पसरला होता, शेकडो वर्षे पहाडासारखी छाती ठोकून उभा ठाकलेला तो अथांग सह्याद्री...

 वरून माथेरान,नाखिंडाचा डोंगर,कलावंतीण,सोनोरी असे अनेक दुर्ग आम्हास खुणावत होते. तो सह्याद्री आपल्या अंगावर पांघरलेली धुक्याची चादर काही क्षण झटकून समोरची हिरवीगार कुरणे,झाडी,वेल्या,धबाबा कोसळणारे धवधबे,शिखरावरून जणू नक्षी काढावी त्याप्रमाणे चंदेरी झालर घेउन थेट पायथा गाठणारे ते झरे शिवणापाणी चा खेळ खेळणारे ते दवबिंदू आशी अनेक मनोहरी दृष्ये दाखवून परत शाल लपेटून बसत होता.अगदी ताज्या ताज्या हिरव्यागार गवतावरून आम्ही भटके मुक्तपणे विहार करत होतो.थोडे अंतर गेल्यावर आम्ही एका छोटेखानी पण सुंदर अश्या शंकराच्या मंदीरापाशी पोहचलो.भोलेनाथाचे दर्शन करून आता परतीला निघायचे होते.
निघताना प्रत्येकाने आपली प्रकट मुलाखत देवून अशुतोष च्या ’स्व’-वाहिनीला सहकार्य केले, आणि घसरत घसरतच जवळपास मावळे परतीला निघाले.तास दिड तासात आम्ही गुरूच्या घरी पोहचलो दुध नसले तरी “मायेच्या साईने” भरभरून असा गरमागरम चहा मारून पुन्हा संजयच्या रथात बसून नेरळ स्टे. गाठले आणि कर्जत ला वडापाव हाणून कशीबशी रेल्वेत जागा मिळवली.२ तास उभे राहून संजयच्या करामती बघत पुणे स्टे. गाठले आणि शेवट उतरल्यावर दोस्तांनी पुढच्या मोहीमेच्या आखण्या करत एकमेकांना मिठ्या मारल्या व आपापल्या घरी रवाना झाले. मी स्वप्नपूर्तीचा आनंद घेत घरी जाउन आता पुन्हा आपल्या सह्याद्रीचे एक नवे स्वप्न पाहण्यासाठी लगेचच हंतरूणात पसरलो होतो......   

7 comments:

  1. सुंदर जसे किल्ले कायमचा भारी असतात तसेच तुझे ब्लोग पण अप्रतिमच असतात, पेब किल्ला बघितला नाही पण तू सफर घडवून आणलीस.
    अमीत च्या बासरी चा आस्वाद घेण्याचा नशिबात न्हवत, पुढे कधी तरी असा योग आला तर जन्माचा कल्याण होयील.

    ReplyDelete
  2. फोटो सुंदर आले आहेत...बाकीचे पण भारीच असणार खात्री आहे.
    अख्ख्या ट्रेक च्या फोटो ची तहान मला ताकावर भागवावी लागली आहे...बाकीचे फोटो लवकरात लवकर पाठवणे...नम्र विनंती

    ReplyDelete
  3. Sundar lihile ahes , Killyawarachya swargiya watawaranamadhe basariche manjul sur mhanje dugdha sharkara yogach.. Nashib ahe leka tuza.

    ReplyDelete
  4. मित्रा एकदम खास... खरेच माझे सुद्धा असे स्वप्न आहे.. सह्याद्रीच्या उदरात असलेल्या गुहेमध्ये मस्त संगीत मैफल रंगवायची...

    ReplyDelete