Friday, July 22, 2011

सह्याद्रीतली संगीत मैफ़ल – एक स्वप्नपूर्ती


भटक्या सह्यवीरांना आपल्या सह्याद्रीबाबत वाट्टेल ती स्वप्न पडत असतात. तसच मधे मलादेखील स्वप्न पडल होत , “आपण मित्रांसमवेत मस्तपैकी सह्याद्रीच्या कुशीत आहोत पाऊसाच्या चमत्काराने आपला सह्याद्री अंगावर हिरवी शाल पांघरून आपले मनोहर रूप सर्वांसमोर मिरवतोय, थंड हवा मस्त शीळ घालतीय आणि त्याच मंजूळ शिळेची साथ संगत पकडत “बासरीचे” सूर त्या सह्याद्रीत घुमत आहेत जणू तो मुरलीधर स्वत: या स्वर्गरूपी सह्याद्रीत प्रगटलाय आणि आपल्या सूरेल स्वरांनी वातावरण अजूनच धूंद करतोय सारी दु:ख, सा-या वेदना क्षणात दूर होवून मी त्या मंजूळ स्वरांमद्धे त्या गारव्यात पूर्ण हरवून गेलोय ! ”  आणि तेवढ्यात आईच्या हाकेने मला जाग आली. नेहमीचेच आळस देउन उठलो खरा पण पडलेल स्वप्न स्वस्थ काही बसून देईना.शेवट १६ जुलै चा दिवस उजाडला आणि आमचे परंम मित्र आणि प्रसिद्ध बासरीवादक ’श्री. अमित काकडे’ यांच्या कृपेने ते माझ स्वप्न एकदाच सत्यात उतरलच... !
१५ ला रात्री आम्याचा फोन आला,“निल्या उद्या सकाळी ५.३० ला पुणे स्टेशन ला भेट मस्त “पेबच्या” किल्ल्यावर भटकंती करून येउयात खास तूला ऎकावयाला बासरी घेउन येतोय !“ 

“क्या बात है ! झक्कास,पोहचलोच समज” असा १ ओळीचा प्रतीसादाने फोन बंद झाला आणि सकाळी ६.०५ ला मी, अनिल, अमित, अशुतोष आणि संजय असे ५ जण सिंहगड खर तर सिंव्हगड एक्स्प्रेस नी कर्जत ला रवाना झालो. सकाळची न्याहरी म्हणून अंडा आम्लेट आणि व्हेज कटलेट वर गाडीतच मस्त ताव मारून ८ वा कर्जत गाठले.आज आमच्या गाड्या वेळेत सुटल्या होत्या पण अनिल ची गाडी काही आज वेळेत सुटली नव्हती त्यामूळे त्याने कर्जत स्टे. ला १ अयशस्वी प्रयत्न केला.(अर्थबोध होत नसेल तर खाजगीत संपर्क करा) आणि लगेचच आम्ही लोकलने नेरळ स्टे. गाठले.नेरळहून आम्हाला संजय नामक सारथ्याचे दर्शन घडले आणि “एका रिक्षेत सारथीसह (फ़क्त )६ जण कसे आरामशीर बसू शकतात हे उदा: सह स्पष्ट करत आम्हा मावळ्यांना किल्ले पेबच्या पायथ्याला असलेल्या “फ़णसवाडीत” सुखरूप (अस आता म्हणतोय) पोच केले.वाडीत पोहचताच निथळ खळखळणा-या झ-याचा आवाज जणू आज सूरांची मैफ़ल ‘नक्की’ याची पावती देवून गेला.इथेच आम्हाला “गुरूप्रसाद” वाटाड्या म्हणून मिळाला आणि साक्षात आमचा गुरूच असल्याचा पुरावा देउन गेला.
पेब उर्फ़ विकटगड आता आम्हाला आव्हान देत होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या “पेबी” या देवीवरून याला पेब असे नाव पडले.हा किल्ला स्वराज्यात सामील झालेला असून महाराजांनी धान्य कोठारासाठी याचा उपयोग केला अश्या नोंदी आढळतात. साधारण सकाळी ९ च्या आसपास आम्ही मावळ्यांनी गडाकडे प्रस्थान केले.
अतिशय मनमोहक वातावरण होते लांबवर गडावरून पडणारा धबधबा आमचे लक्ष ओढून घेत होता आणि आपोआपच पाउले झपाझपा पडत होती जवळपास १ तासातच आम्हाला आता चढण लागायला लागली.वरूणराजाच्या कृपेने आजूबाजूचा परीसर चांगलाच खूलला होता. रान चांगलेच माजल्याने ते तूडवतच आता आमचा प्रवास सूरू झाला.चहूबाजूला हिरवी वनराई मनाला आणि शरीराला सतत गुदगूल्या करत होती. संपूर्ण रस्ता भलताच निसरडा झाल्याने जागोजागी लोटांगणे घालतच मावळे पुढे चालत होते त्यातही लोटांगणे घालण्यात अनिल आघाडीवर होता.हिरवीगार गवताची पाती वा-याच्या झुळूकेबरोबर अल्लड्पणे डोलताना फ़ारच सुंदर भासत होती. जवळपास २ तासानंतर १ छोटासाच पण पाऊसामूळे जरा कठीण वाटावा असा १ Rock Patch पार करून मावळे माथ्यावर विसावले. मावळ्यांचा आनंद आता गगनात मावेना, मग काय... “क्षत्रीय कुलावतंस.....” च्या घोषणेने सारा आसमंत दुमदूमला आणि जणू महाराजांनी “आजून मी इथेच आहे तूमच्याच बरोबर” याचाच काय तो पुरावा म्हणून त्या कातळकड्यांमधून “प्रतीध्वनी” उमटले.एका कड्याला डाव्या बाजूला ठेउन उजवीकडे हिरव्या रंगाच्या असंख्य छटांची शाल पांघरून बसलेल्या जवळपास २००० फ़ूट खोल दरीतल्या त्या निसर्गाची किमया पहात आम्ही पुढे सरसावलो आणि १० मि. मद्धेच डाव्या हाताला वरच्या बाजूस असलेल्या प्रचंड मोठ्या आणि अतिशय स्वच्छ अश्या गुहेच्या तोंडापाही आपापल्या पाठा टेकल्या.


गुहेच्या माथ्यावरून छोटासा पण मन चिंब करणारा धबधबा खूपच सुंदर दिसत होता. समोरच्या दरीमधे आता धुक्याने आपली चादर पांघरून पांढ-या शुभ्र दरीचे मनमोहक दर्शन दिले होते आणि गार वारा आता वरूणराजाच्या आगमनाची चाहूल देतो तोच, धो धो करून आपली हजेरी लावून देखील गेला. आता पोटातले कावळे आपली चाहूल भासवत होते मग काय पटापटा बत्ती पेटली आणि गारव्यात मस्तपैकी खीचडी रटरटली तीकडे चुलीवर गुरूने सगळे पापड भाजून तयार ठेवलेच होते. आता पापड म्हणल की माकड आलच त्यामूळे त्या रानटी माकडांच्या साथीनेच या शहरी वानरांनी मस्त पापड खिचडीवर ताव हाणला.
आता पोटोबा शांत झाले होते वातावरण हलकासा गारवा मनाला गिरक्या घालून परत त्या शुभ्र दरीत लुप्त होत होता पावसाची रिमझीम सुरूच होती आणि अचानक त्या गुहेतल्या प्रसंन्न शांततेत काही क्षणातच “पहाडी” रागाचे ते मंजूळ स्वर निनादले आणि अमित ने ताबडतोप ’वाह वाह’ ची दाद मिळवली.मग काय फ़र्माईशी सुरूच झाल्या पहाडी,शिवरंजनी असे एकापेक्षा १ राग त्या वातावरणाला आजून धूंदी आणत होते मग फ़िल्मी संगीत म्हणून खास हिरोची धून झाली आणि तिर्थ विठ्ठल या अभंगाने मैफ़लीची (वेळेअभावी) सांगता झाली.मी आता पूरता हरवून गेलो होतो माझे स्वप्न आज सत्यात उतरल्याचा आनंद काही औरच होता हिरव्या शालीने नटलेल्या त्या सह्यकुशीत आज मी बासरीचा मंजूळ आवाज ऎकत होतो आणि साथीला होते ते कोसळणारे धबधबे, पावसाच्या जलधारा, टप टप पडणारे ते टप्पोरे थेंब, आणि लडीवाळ शीळ घालत जाणारा तो वारा ! कोणताही ताण, क्षिण मनावर नसेल तर “पवित्र मनाला”   येणा-या त्या अनुभूतीने मला आनंदून टाकल होत. सगळे मावळे सापाने कात टाकून पुन्हा तरूण व्ह्यावे त्याप्रमाणे तरतरीत झाले होते आणि आम्ही अमित काकड्यांचे ’आभार’ मानून आता बालेकिल्ला सर करायला पुढे सरसावलो होतो.गुहा डाव्या हाताला ठेवून सरळ पुढे गेल्यावर शेवटी रस्ता संपतो आणि वरून पडणा-या पाण्यामूळे थेट खोलवर दरीत एक घळ उतरते बरोब्बर तिच्या तोंडालाच १ लोखंडी शिडी एका कातळावर घट्ट बसवलेली दिसते. बास, त्याच शिडीवर चढून धुक्याचे ढग पार करून आम्ही आता जणू स्वर्गप्रवेश केला होता आणि आमच्या सर्वांच्या नजरेसमोर पसरला होता, शेकडो वर्षे पहाडासारखी छाती ठोकून उभा ठाकलेला तो अथांग सह्याद्री...

 वरून माथेरान,नाखिंडाचा डोंगर,कलावंतीण,सोनोरी असे अनेक दुर्ग आम्हास खुणावत होते. तो सह्याद्री आपल्या अंगावर पांघरलेली धुक्याची चादर काही क्षण झटकून समोरची हिरवीगार कुरणे,झाडी,वेल्या,धबाबा कोसळणारे धवधबे,शिखरावरून जणू नक्षी काढावी त्याप्रमाणे चंदेरी झालर घेउन थेट पायथा गाठणारे ते झरे शिवणापाणी चा खेळ खेळणारे ते दवबिंदू आशी अनेक मनोहरी दृष्ये दाखवून परत शाल लपेटून बसत होता.अगदी ताज्या ताज्या हिरव्यागार गवतावरून आम्ही भटके मुक्तपणे विहार करत होतो.थोडे अंतर गेल्यावर आम्ही एका छोटेखानी पण सुंदर अश्या शंकराच्या मंदीरापाशी पोहचलो.भोलेनाथाचे दर्शन करून आता परतीला निघायचे होते.
निघताना प्रत्येकाने आपली प्रकट मुलाखत देवून अशुतोष च्या ’स्व’-वाहिनीला सहकार्य केले, आणि घसरत घसरतच जवळपास मावळे परतीला निघाले.तास दिड तासात आम्ही गुरूच्या घरी पोहचलो दुध नसले तरी “मायेच्या साईने” भरभरून असा गरमागरम चहा मारून पुन्हा संजयच्या रथात बसून नेरळ स्टे. गाठले आणि कर्जत ला वडापाव हाणून कशीबशी रेल्वेत जागा मिळवली.२ तास उभे राहून संजयच्या करामती बघत पुणे स्टे. गाठले आणि शेवट उतरल्यावर दोस्तांनी पुढच्या मोहीमेच्या आखण्या करत एकमेकांना मिठ्या मारल्या व आपापल्या घरी रवाना झाले. मी स्वप्नपूर्तीचा आनंद घेत घरी जाउन आता पुन्हा आपल्या सह्याद्रीचे एक नवे स्वप्न पाहण्यासाठी लगेचच हंतरूणात पसरलो होतो......   

Friday, July 8, 2011

॥ वारी दुर्ग आणि धाकोबाची ॥

                                            ॥ वारी दुर्ग आणि धाकोबाची ॥
जेष्ठ महीना आला की पंढरीची वारी करणा-या वारक-याला ज्याप्रमाणे आपल्या पंढरीची ओढ लागते अगदी तशीच अवस्था मृग नक्षत्र सुरू झाली की, हा निसर्गच जणू ज्यांची पंढरी त्या गड्यांची,मावळ्यांची पाउले देखील त्याच पांडूरंग रूपी सह्याद्रीच्या वाटेने पडू लागतात.आणि मग तयारी सुरू होते त्या सह्यवारी ची....

जेष्ठ वद्य सप्तमी ला पंढरपूरी निघालेले वारकरी  माउली, तुकारामांच्या 
जयघोषात पुण्यात दाखल झाले आणि आम्ही सवंगड्यांनी श्री. छत्रपतींचे स्मरण करून आमच्या या सह्यवारीसाठी २५ ता. दुपारी पुण्याहून प्रस्थान केले. स्थान ठरले होते “दुर्ग आणि धाकोबा”खर तर आपण यांना किल्ले असे म्हणू शकत नाही पण ही आहेत घाटमाथ्यावरील अत्यूच्य २ डोंगरशिल्पे. सर्व मावळे नारायण पेठेत माझ्या घरापाशी जमून आम्ही राजे च्या हडपसरच्या घरी पोहचलो दुपारी १२ वा. निघणारी आमची बस ठरलेल्या वेळेनुसार “बरोब्बर” दुपारी ३ वाजता गणेशस्तवन करून (एकदाची) निघाली.यावेळी आम्ही २ गाड्या करून निघालो होतो त्याचे कारण काही मावळे वेळेअभावी १ दिवस लौकर परतणार होते ते १ गाडी घेउन परत येउ शकतील ही सोय बघून २ गाड्या घेउन जाण्याचे नियोजन होते. जाताना वाटेत चाकण फ़ाटयाला पेढ्याला घेउन (खायचे पेढे न्हवेत हे !, हे आमचे परममित्र अमित पानसरे उर्फ़ पेढ्या होय.) गाडी पुढे निघाली आणि मा. राजे दुस-या गाडीत असल्याचा गैरफ़ायदा घेत अ(ना)वश्यक ब्रेक, थांबे घेत आम्ही जवळपास संध्या. ६ च्या सुमारास महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी च्या पायथा गाठला आणि एकवार किल्ल्याला तसेच महाराजांच्या अश्वारूढी पुतळ्याला मुजरा ठोकून दुर्ग चा माथा गाठण्याकरीता कूच केले. 
जाताना वाटेत हेम्याच्या श्रवणीय गाण्यांची साथ वातावरण आजून धुंद करत होते.वाटेत सरपंचाची गाठ घेउन त्यांनाही गाडीत घेउन आम्ही सर्वजण जवळपास रात्रौ  ८.३०च्या  सुमारास पोहचलो. गाडीतुन उतरताक्षणी आपण स्वर्गात प्रवेश केल्याचे जाणवले आणि सगळ्यांना आपण ढगात चालत आहोत असा भास झाला.आता ब-यापैकी अंधार पडला होता त्यामूळे तडक दुर्गादेवी मंदीरात पोहचलो.

चार नक्षीदार खांबांनवरती कौलारू छप्पर सांभाळत प्रचंड ऊन,वारा,पाऊसाची तमा न बाळगता गेली अनेक वर्ष निसर्गावरती मात करत हे मंदीर आजही शान सांभाळून उभे आहे. चहूबाजूला प्रचंड झाडी आणि मोठठाले खडक अश्या जागेत जेमतेम ६-७ लोक झोपू शकतील येवढ्याच चौरसामद्धे मधोमध अत्यंत रेखीव “देवीचा तांदळा” सगळ्यांच्या मनात घर करून न जाईल तर नवलच ! दुर्गवाडीतल्या वनवाश्यांनी यथाशक्ती या मंदीराची उभारणी केली आहे.देऊळाच्या आजूबाजूस अनेक शेंदूर फ़ासलेले पाषाण इतर देवांची प्रतिकात्मक रूपे म्हणून मोठ्या ऎटीत स्थामापंन्न झाले आहेत. देवीच्या पुढ्यात नतमस्तक होऊन सर्वजण जवळच असलेल्या समाजमंदीरापाशी पोहचलो आणि एकदाच आमच्या “विठोबाच्या” (सह्याद्री) कुशीत शिरल्यावर आता आठवण झाली ती “पोटोबाची”.

परंपरेचा मान ठेवून आचा-याचा पोशाख मला चढवण्यात आला आणि हातात कांदे आणि सुरी (जिच्यापुढे तलवार देखील नांगी टाकेल) देवून झालेला आनंद व्यक्त करण्याकरीता आनंदआश्रूंना वाट करून देण्यात आली.बेत ठरला गरमागरम खिचडी आणि पापडाचा. जावई बाप्पू अर्थात प्रसाद डेंगळे (तृतीय) यांना जातीने हजर राहणे शक्य नव्हते तरीदेखील आपली “बत्ती” माझ्याकडे सुपूर्त करून मित्रप्रेमाचे ज्वलंत उदा: देवून गेले म्हणून, त्याच दोस्तीला सलाम करून डेंगळ्यांच्या बत्तीला “आग” लावण्यात आली आणि फ़ोडणी पडली यावेळी झाकण्यासाठी ताटली नसल्याकारणाने दोन पातेलीच एकावर एक रचून खिचडी शिजवण्यात आली तर दुसरीकडे ’राक्या’ आणि ’सुध्या’ डोळ्यात चुलीचा धुर जात असतानादेखील डोळ्यावर काळे चष्मे चढवून (रात्रौ ११ वा.) आपले पापड भाजण्याचे काम व्यवस्थीत पार पाडीत होते.जवळ्पास अर्ध्या झोपा झाल्यावर बिरबलाची खिचडी शिजण्यास जितका वेळ लागला असावा तेवढ्याच वेळात (कदाचित जास्त पण कमी नाही) सरतेशेवटी खिचडी रटरटली आणि क्षणार्धात उड्या पडल्या,बघता बघता दोन पातेली खिचडी कधी गायप झाली हे समजलेच नाही. लगेचच जवळच असलेल्या ओढ्यावर भांडी धुण्याचा सामूदाईक कार्यक्रम पार पाडून झोपण्याची तयारी सुरू झाली. समाजमंदीरात मूंगळे आणि पावसाचे पाणी येत असल्यामूळे काही मावळे देविच्या मंदिरी आणि काहीजण गाडीतच निद्रीस्त झाले.       
                                                       
पहाटे ६ वा. च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरीने जणू जागे होण्यासाठीस “गजर” केला आणि मला जाग आली.दुर्गादेवीच्या छत्रछायेखाली कालची झोप फ़ारच गाढ झाली होती जाग येताक्षणी आजूबाजूला नजर गेली आणि आपण आजून स्वप्नातच आहोत असा भास झाला.”अतिशय प्लेझंट थंडगार हवा अंगात मस्त जोम प्राप्त करत होती, रोज सकाळी उठल्यावर येणारा आळस तर चक्क आज गैरहजरच होता, मोत्यांचा वर्षाव करावा तशी टपो-या थेंबांची उधळण आजूबाजूची गर्द हिरवी झाडी आपल्या फ़ांद्या,पानातून करत आम्हाला “सु-प्रभात” म्हणत होते,पक्ष्यांचा किलबीलाट मनाला गुदगुल्या करून ’चला तयारीला लागा तो निसर्ग खुणावतोय!’ असा संदेश देत होता.” तडक आमची तयारी सुरू झाली. प्रचंड पावसामूळे आज दुपारचे जेवण रद्द करून सकाळच्या न्याहरी वरच जोर द्यायचा ठरले. पटापटा पोर आपपल्या पद्धतीत “वाघ,ससे मारून आली”(अर्थबोध होत नसेल तर मला सकाळी भेटा ! :P) थोबाड खंगाळून आंघोळीच्या गोळ्या वाटण्यात आल्या आणि सर्व प्रार्तविधी आटोपले.कात्याने चहाचे आधण ठेवले तर इकडे मी पोहे भिजत घालून फ़ोडणीची तयारी केली थोड्याच वेळात आमचा “कांदेपोहे” (अहो तो नव्हे) कार्यक्रम पार पडून देवीचा आशिर्वाद घेउन आम्ही डोंगरमाथा गाठला.एका उंच टेकाडावर असंख्य लहान मोठे सुळके असेच वर्णन या माथ्याचे करता येईल.       

जाताना पावसाच्या धारा मन चिंब करत होत्या सतत पडणा-या पावसामुळे जागोजागी छोटे छोटे धबधबे सर्वांना आकर्षीत करत होते,क्षणात धुक्याची लाट आपल्या जादूने सारा परीसर अदृष्य करत होती, मेघांच्या दुनीयेत सर्वजण जणू स्वर्ग विहार करत होते, त्या उत्तूंग शिखरांनी आपला देह थंड करून निसर्गाची हिरवीगार शाल अंगावर लपेटून घेतली होती त्यावर दवांचे लहान लहान ठिपके आणि विवीध फुले जणू शालीवर कढलेली नक्षीच वाटत होती.एखाद्या नववधूने जसे नटावे तसा तो सह्याद्री नुकत्याच झालेल्या पावसामुळे नटून आमच्यासमोर उभा होता.बघता बघता सर्वजण या विलोभनीय वातावरणात हरवून गेले असतानाच त्या निसर्गाचे खरे रक्षक आणि जवळचे मित्र विंचू,खेकडा यांनीपण आपले दर्शन देउन आपले उपस्थीती दर्शवली. थोडा वेळ गप्पा मारून आम्ही आता “धाकोबाच्या” दिशेने निघालो होतो बरोबर सरपंच वाटाड्याच्या भुमीकेत होतेच. जाताना जितका जमेल तेवढा तो निसर्गाचा आनंद हावरटासारखा उरात साठवत सर्वजण पुढे चालले होते. यावेळी भटकंतीची मजा काही औरच होती कारण सतत कोसळणारा पाऊस आणि कायमच खाली उतरलेले ढग यातून चालताना “स्वर्गभ्रमंतीचा” जो काही आनंद मिळत होता त्याला तोडच नाही. खंत फ़क्त एकच होती की फोटो फ़ार काही काढता येत नव्हते पण पाऊस कमी झाला की परत येऊ असा निश्चय करत पुढे जात होतो आणि तसही मनाच्या कप्प्यांमद्धे बंदिस्त झालेली ही विलोभनीय दृष्ये, हे वातावरण थोडच कधी विसरण शक्य होत ? वाटेत अनेक प्रकारच्या फ़ुलांची रांग पायघड्या घातल्या प्रमाणे पसरली होती. दोन अडीच तासची पायपीट करून १ चढण पार केल्यावर आम्ही आता पोहचलो होतो धाकोबा वर.


या ठिकाणी आजुबजूचा परीसर अंत्यत रमणीय दिसतो घाट्माथ्यावरचे सर्वात उंच असे हे शिखर आहे. हे आडवेतिडवे पसरलेले पठार म्हणजेच देशाची सीमा होय. दुसरीकडे खोल दरीत दिसतो तो कोकणतळ. हरीश्चंद्रगडापासून अगदी दक्षिणेकडील सिद्धगडापर्यंतची डोंगररांग तसेच गोरखग,मच्छिंद्रगड,नाणेघाट,शिवनेरी,जिवधन,वांदरलिंगीचा उत्तूंग सुळका, ही सह्याद्रीची भुषणे आपण येथून न्याहळू शकतो मात्र ढग असल्यामूळे आम्ही या आनंदाचा फ़ारसा आस्वाद घेउ शकलो नाही.हरीश्चंद्र च्या कोकण कड्यासमानच इथेदेखील १ कोकणकडा आपले स्वागत करतो डोंगरावर  छोटेखानी “डाकेश्वराचे” मंदीर सोडले तर वास्तव्याला जागा नाही.मंडळी आता मंदीरापाशी पोहचली होती सध्या या मंदीराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे त्यामूळे बाहेरूनच दर्शन घेउन आता उतरणीच्या वाटेत काही गुहा लागतात तेथे पोचायाचे ठरले.अचानक पेढ्याची हाक आली..निल्या लौकर केमेरा काढ साप आहे इथे! मग काय सगळे छायाचित्रकार आपापले छंद जोपासायला पुढे सरसावले.

वेळेअभावी येथून काही सैनीक म्हणजेच कात्या,राहूल्या,भास्कर,अक्षय माघारी फ़िरून लौकरच पुण्याला रवान होणार होते त्यांना घेउन सरपंच परतीला निघाले आणि आम्हाला गुहेकडे जाण्याची वाट दाखवली.आम्या,विज्या,पेढ्या,सुध्या,राक्या,निळकंठ,हेम्या आणि मी आम्ही मंडळी दाखवीलेल्या वाटेने निघालो. कोणालाच माहीत नव्हते या वाटेवर काय “वाट” लागणार आहे ते...   



आम्ही सर्वजण आता गुहेकडे निघालो होतो. पाऊस थांबायच नाव घेत नव्हता आणि धुक्याची चादत अखंड पसरून वातावरणात वेगळाच रंग आणत होती.आम्हाला सांगीतल्या प्रमाणे साधारण १ तासात आम्ही पुहेपाशी पोचावयास पाहीजे होतो पण जवळपास २ तास होऊन गेले तरी आम्हाला गुहा लागली नव्हती.प्रचंड धुक्यामूळे बाजूचा माणूस दिसणे अवघड झाले होते. काही वेळाने आम्ही सर्वजण थांबलो पाणी कोसळण्याचा आवाज येत होता थोडे धुके सरल्यावर रस्ता कधीच चुकला आहे आणि आता आम्ही एका मोठ्या धबधब्याच्या माथ्यापाशी पोहचलो आहोत हे लक्षात आले दु. ४ वाजत आले होते आजून १,२ तासात अंधार होण्याअगोदरच गुहा सापडणे आवश्याक होते.काहींचे मत माघारी फ़िरायचे ठरले पण तो रस्ता पण सापडेलच याची खात्री नव्हतीच तसेच २ तासात सर्व अंतर पार होणे पण शक्य नव्हते त्यामूळे म्हागारी फ़िरायचे नाही हे मी पक्के करून सर्वांना पटवून दिले. पण काही नविन मावळे माझ्यावर (भितीने) फ़ारच रागावलेले दिसले त्यात राजेने देखील आत १ धाडसी निर्णय घेतला आणि या धबधब्यातूनच कडेने खाली उतरत जायचे नदी पकडून जवळचे गाव गाठायचे असे पक्के झाले.ठरल्याप्रमाणे राजे सर्वात पुढे मग विज्या आणि नंतर सर्वजण व शेवट मी आश्या पद्धतिने मोहीमेची सुरूवात झाली. बाजूलाच प्रचंड जलप्रपात, चहूबाजूला धुके,तूफ़ान पाऊस आणि निसरडी वाट यातून प्रत्येकजण एकमेकांची साथ घेत उतरत होता. नवीन मावळ्यांची शब्दश: “फ़ाटली” होती पण त्यांना धिर देण्याचे काम बाकी सवंगडी जोमाने करत होते.कोणतीही चुक फ़ार महागात पडणार होती एका ठिकाणी कातळावरून बसूनच सर्वांना पुढे सरकायचे होते थोड घसरण देखील थेट धवधब्यात निमंत्रण होत नेमक त्याच ठिकाणी माझ्या बुटाचा सोल थोडासा फ़ाटला म्हणून पुढे असलेल्या विज्याला सोल कापून टाक सांगीतल तर भाईने माझा पायच ओढला माझी क्षणभर तंतरून मी थेट दगडातून उगवलेल्या निवडूंगाला आधार म्हणून धरल खर पण हाताचा “झारा” करून घेतला. बघता बघता तासाभरात आम्ही नदीची वाट पकडली. गाव आता जवळ दिसत होत घाबरलेले चेहरे देखील आता हसू लागले होते. जाताना गावाच्या अगदी अलीकडे डोंगराच्या पायापाशी अगदी चिटकून पुढे अलग झालेला सुळका आम्हाला जिवधनच्या 'वांदरलिंगी' चा भास करून गेला.
आता आम्ही गावात पोहचलो होतो एका घरात पोहचताच आपण आंबोली या गावी सुखरूप पोहचलो आहोत ही गोष्ट उमगली.मावशींच्या हातचा गरमागरम चहावरील प्रेमाची साय मन तृप्त करून गेली. गावातीलच १ जीपने आम्ही नारायणगाव गाठून पुढे दुस-या वाहनाने पुनवडीस निघालो वाटेत समाधान उपहारगृहात समाधान होइस्तोवर पोरांनी मटण भाकरीवर ताव हाणला नी पुन्हा गाडीत बसले. सकाळपासून सोसाट्याचा वारा आणि धो धो पावसात प्रचंड भिजल्याने जवळपास सर्वांनाच थंडी भरली होती, पाण्याने जड झालेले ओझे सांभाळत केलेल्या साहसाने संपूर्ण अंग आता दुखायला लागल होत पण त्याची पर्वा होती कोणाला ? मी डोळे मिटून दिवसभराच्या गोष्टींनद्धे कधीच रमून गेलो होतो..


 “निसर्गाने आज जिवनाचे नवे धडे दिले होते म्हणाला होता, “घाबरू नका, माझ्याकडे पहा कोणत्याही परिस्थीतीत मी कसा तग धरून उभा आहे माझ्या जंगलातल्या वृक्षाच्या फ़ांद्या बघा कशा हातात हात गुंफ़ून एकत्र विहार करत आहेत, एकमेकांना खांदयाचा आधार देत पाय रोवून उभे आहेत, शांत रहा मीच वाट दाखवीन तुम्हाला फ़क्त मनानी हरू नका ! काहीही न बोलता तो बरच काही सांगून गेला होता. आज अजून १” थरार” आपल्या अनूभवाच्या गाठोड्यात बांधून समृद्ध झालेले मावळे पुन्हा पुढच्या ट्रेक चे स्वप्न मनाशी बाळगून आपली सह्यवारी पुर्ण झाल्याच्या आनंदात आता परतीच्या प्रवासाला निघाले होते...पण मन मात्र तिकडेच कुठेतरी हरवल होत !”
भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.

Friday, March 4, 2011

माझी दंत-कथा

                                                                                                                                                                                           
मित्रहो नाव वाचून कदाचीत लक्षात आलं नसेल पण खरच हो ही माझीच दंतकथा आहे. अगदी सत्यघटनेवरची दंतकथा म्हणा हव तर. म्हणजे माझ्या दाताची कथा आहे ही.” ऐन तारूण्यात हे असले आजार होतातच कसे ?” परंमपुज्यांच्या या प्रश्णाच्या प्रहाराने माझ्या कथेला सुरूवात झाली. त्याच झाल अस की, जवळपास १ आठवडा माझी दाढ अचानक प्रचंड दुखू लागली. मागेही दुस-या एका दाढी(ढे)ने (मिशी आणि दाढीतली दाढी नव्हे) मला या “(प्रसूती)वेदना”  दिलेल्या होत्या आणि त्यावर उपाय म्हणून मला “root canal” नावाचा महाभयंकर प्रकाराला सामोरे जावे लागले होते.त्यावेळेपासूनच root canal नाव जरी ऐकले तरी माझी “दातखिळीच” बसते. आता पुन्हा त्या सगळ्या प्रकाराला आणि त्या मेंदूत आतपर्यंत घूरघूरणा- -या आवाजाला त्या जादूच्या all in one अश्या खूर्चीत बसवून रबरी हातमोजे घालून आपले जबडे ताणले जाणार या भितीनेच मी जवळपास आख्खा आठवडा घरगूती उपायांवर काढत होतो.
कापराचा कापूस, लसणाची पाकळी, लवंगीचा बोळा असल्या नाही नाही त्या ’फ़ोडण्या’ मी आठवड्याभरात त्या दाढेला देउन बसलो होतो. यात फ़ायदा काहीच झाला नव्हता मात्र काहीही खाल्ले तरी मला त्या मसाल्याच्या पदर्थांचीच चव सगळ्याला जाणवू लागली होती. पण वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यामूळे आता आपल्याला दंतवैद्याच्या ”त्या” खुर्चीत लोळायला लागणार (सहसा खुर्चीत बसतात पण त्या खुर्चीत तूम्ही गडाबळा लोळायचे बाकी असता ) हे जवळपास निश्चीत झाल होत. पण आता काहीही झाल तरी मी त्या मागच्या वेळी गेलो होतो  त्या Dr. कडे जाणार नव्हतो(तो मी तेव्हाच केलेला निश्चय होता) त्यामूळे आता माझी नविन शोधमोहीम सुरू झाली होती. माझ्या घराजवळच लहानपणापासून (म्हणजे माझे दुधाची दात होते आगदी तेव्हापासून) मी  १ दातांच्या Dr. चा दवाखाना पहात आलो होतो आणि मला त्यांच्या आडनावाबद्दल फ़ारच कुतूहल वाटत असे. म्हणजे ते आत्ता देखील वाटते म्हणूनच मी त्यांच्याकडेच जायचा निर्णय घेतला.त्या माझ्या Dr. नाव होत “दाते”. यांच्याकडे जावून,“तूम्ही आडनावावरून हा व्यवसाय निवडला का या व्यवसायात आला म्हणून आडनाव बदलले” किमान या यक्ष प्रश्णाच उत्तर आतातरी नक्की मिळणार या आशेने मी त्या दवाखान्याच्या (लहानपणी मी याच “दवाखाना या शब्दाला दवारवाना” अस वाचायचो) वेळा, फोन नं. टिपून घेतल्या. फोन केल्यानंतर दुस-या दिवशी संध्या. ७.३० ची वेळ मिळाली. ठरल्या वेळेनुसार मी बरोब्बर ८.१५ ला (फ़क्त ४५ मि. उशीर) पोहचलो. दारातच  “एकदंताच” स्मरण करून आत गेलो. आतमद्धे माझ्या आगोदर १ आजोबा आपला नंबर लावून बसलेले होते. सहजच माझ लक्ष त्यांच्या चमकणा-या दातांवर गेल आणि त्यांच्या (आजोबांच्या) जबडा आकसून बसण्याच्या त्या कृतीने माझ्या लक्षात आल की आजोबांनी नक्कीच ही नवीन कवळी लावलेली दिसतीये. थोडा वेळ तिथे पडलेली काही चित्रपटांची मासीके चाळून मी माझी दाढ्दूखी कमी करत (आणि दोकेदुखी वाढवत) बसलो असताना २० मि. नंतर माझा नंबर आला आणि मी आत गेलो.
आतमद्धे गेल्यावर समोरच मल प्रथम नजरेस पडली ती सर्वगुणसंपंन्न आशी लोळायची (म्हणजे लोळायला लावणारी खुर्ची) आणि टेबलवर  मला दात दाखवत ईईई.. करून बसलेली खोटी कवळी.त्याच्याच बाजूला त्रिकोणी आकाराची १ हातोडी दिसली आणि मला मागच्या
वेळेच्या सगळ्या घटना आठवू लागल्या. तेवढ्यात इतका वेळ हात धूवत असलेल्या Dr. सौ. दाते आपल्या चेह-यावरचा मास्क बाजूला सारत आपले “दाखवायचे दात” दाखवत समोर आल्या. आता दुस-या पर्वाला सुरूवात होणार होती.
आता मी त्यांच्या टेबलाच्या समोरच्या खुर्चीत बसून माझी ‘बत्तीशी’ सुरू केली सगळ ऐकून घेतल्यावर त्यांनी मला खुर्चीत बसण्याची सूचना केली. मी बसल्यावर त्या जादूई खुर्चीला डाव्या हाताला असलेल्या नळाला आपोआप पाणी आले त्याखाली ठेवलेल्या ग्लासमद्धे भरले गेले.(अय्या..’जादू’ अस झाल) आता मला चूळ भरून “आ” करायला सांगीतले गेले. त्या पाण्यानी चूळ भरताच मला एकदम दात घासल्यासारखा भास झाला. मी “आ” वासून बसलो होतो वैद्य बाईंनी आता माझ्या डोक्यावर त्या खुर्चीचाच १ भाग जो मला दिवा असलेला  हात वाटला तो आणून ठेवला होता आणि कुठल्याश्या लोणी लावायच्या सूरीसारख्या आयुधाने आपले परीक्षण सुरू केले होते. आणि थोड्या क्षणातच माझी “आंकाळी” (आ करून मारलेली किंकाळी) त्या वेदनेसह बाहेर आली. २-३ मि. च्या निरीक्षणानंतर परत चूळ भरायला लावून आपल्या चेहत्याचा मास्क बाजूला सारत शक्य तेवढा गंभीर भाव चेह-यावर आणून (ही बिलाच्या वेळी त्रास वाटू नये म्हणून केलेली युक्ती असावी असच वाटते मला) मला म्हणाल्या कदाचीत “root canal” कराव लागेल आत्ता आपण X-ray काढून घेउ. मी फ़क्त ठिक आहे म्हणालो (अजून काय बोलणार हो हा माझा देह) आणि त्यांनी लगेच त्याच जादुई चा दुसरा शस्त्रधारी हात वाटावा असा एक टोक असलेल मशीन समोर ओढून माझ्या दाढेखाली काहीतरी ठेवून एखाद्या जाहीरातीमद्धे “एका क्षणात क्ष-किरण” अशी पंचलाईन शोभेल इतक्या वेगात तो X-ray काढला व पुन्हा उठून त्यांच्या टेबलपाशी बसायाची सूचना केली. दात घासायच्या ब्रश सारख्या आकाराच्या एका पेनने त्यांनी मला काही गोळ्या लिहून २ दिवसांनी काहीतरी खाउन यायाला सांगीतले.
मी तिकडून निघालो पण घरी पोचेस्तोवर आता मला मागच्या वेळेचा घडलेले सर्व प्रकार आठवले. आता मला त्या सर्व वेदनांना आणि त्या root canal नावाच्या प्रकाराला पुन्हा सामोरे जायचे होते. त्यातल्या त्यात मला बर वाटेल आशी वैद्य बाईंनी आजून १ गोष्ट सांगीतली होती ती म्हणजे माझी जी दाढ दुखत होतो ती म्हणे “अक्कल दाढ” होती. त्यामूळे की काय, “चला किमान (अक्कल)दाढ तर आहे म्हणजे आपल्याला यानेच काय ते मी थोडा सुखावलो होतो.”
आज ठरल्याप्रमाणे मी थोड खाउन दवारवान्यात (दवाखान्यात) पोहचलो २ दिवसाच्या गोळ्यांनी वेदना ब-याच कमी झाल्या होत्या. पुन्हा त्या “एकदंताला” स्मरून मी वैद्य बाईंपुढे माझे ’हस्तीदंत’ उघडून बसलो. त्यांनी तो छोटासा X-Ray बघत मला जो जबरद्स्त धक्का दिला त्याने माझी ’दातखीळीच’ बसली. त्या म्हणाल्या, “कीड फ़ार आत गेली आहे ही दाढ काढूनच टाकूयात असही फ़ारसा उपयोग नसतोच आजकाल हिचा.” मनात म्हणल उपयोग नसतो मग काय Dr. ला काढायचे पैसे मिळावेत आणि उत्पंन्नाचा त्रोत मिळावा म्हणून निसर्गाने दिलीये का ती मला ? पण हे प्रत्यक्ष कस बोलणार हो आपण पडलो गरीब लोक, शेवट काय “दात दाखवून अवलक्षण” म्हणाव त्यातला प्रकार झाला होता आणि मी ५ मि. वेळ घेउन शेवटी ती काढायचा निर्णय घेतला.( त्या ५ मि. मधे अक्कल नव्हतीच आता अक्कल दाढ पण जाणार याचच दु:ख करत बसलो होतो ) मग काय, ती खुर्ची, पक्कड, सुई, इंग्जशन,कापूस यांनी मला संगीतातले आकार घेयला लावले आणि १० मि. मध्दे पुढचे सोपस्कार उरकून मी फ़क्त हुम्म्म.., हम्म..,हुउउउउ.. असली उत्तर देत माझे बिल चुकते केले आणि
“हा दाते नामक दंतवैद्य माझ्या दातांचा ’दाता’ असावा आश्या भ्रमात ज्या दवाखान्यात अक्कल नसल्यासारखा गेलो तेथेच ती अक्कल दाढ देखील सोडून दाते बाईंच्या हसताना दिसणा-या त्या दंतपंक्ती बघत पुढच्या वेळी आजून नवा वैद्य हा निश्चय करत तिकडून बाहेर पडलो.”  

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश वाळिंबे

॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥

                                                              

२४ जानेवरी २०११ सकाळी माझ्या मित्राचा फोन आला आणि इतर वेळी तास तास गप्पा मारणारे आम्ही आज फ़क्त १ ओळ फोनवरती बोलून दोघेही स्तब्ध झालो. तो म्हणाला.. "निल्या, अण्णा गेले रे" डोळ्यात टचकन पाणि आले आता वाटले जणू संपूर्ण विश्वातले सूरच हरपले होते. अण्णा जवळपास २ आठवडे दवाखान्यात होते मागच्या शनिवारी दवाखान्यात भेटायला गेलो पण फ़क्त निरोप मिळाला की, आत्ता तब्येत सुधारते आहे तेवढ्यावरच समाधान मानून घरी परतलो होतो पण "बहुधा दिप अस्ताला जाण्याअगोदर त्याची वात प्रखर आणि मोठी होते त्याचाच तो प्रत्यय होता".मी तडक गाडी काढून पंडीतजींचे घर गाठले. आसपासचे सर्व रस्ते बंद, मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आणि प्रचंड चाहता वर्ग अगोदरच जमा होता मी दर्शनासाठी घरात गेलो.
समोर अण्णाचे पार्थिव बघून मन विशण्ण झाले क्षणात ते "सूर" कानात घूमू लागले.मैफल संपवून निवांत पहुडलेल्या आण्णांच्या चेहर्‍यावर मैफलीची एक सफल सांगता झाल्याची "चित्कळा" पसरली होती. सूरांचा तो राजा ज्याने राज्य केले अहो, साधेसूधे नव्हे तब्बल ८९ वर्ष राज्य केले त्या सूरांवर, त्या चाहत्यांवर, त्या गाण्यावर, त्या आवाजावर ज्याने आपला अंमल ठेवला तो गंधर्व आज स्तब्ध होता.
"अण्णा" हे एक अस व्यक्तीमत्व होत ज्याच्यासमोर या भूतलावरच्या सर्व स्वरांनी जणू लोटांगण घातल होत. ज्यांच्या अभंगात स्वत: पांडूरंग तल्लीन होत आपले भान हरपत असेल आपला कमरेवरचा हात काढून तो "हरी" देखील ’वाह..वा’ ची दाद देत असेल असा तो "स्वरभास्कर" आज आपल्यात नाही हे मनाला पटत नव्हते, सहन होत नव्हते. या महाराष्ट्रातील अभंगवाणी आता मुकीच झाली जणू असे वाटायला लागले.   मी शाळेत असल्यापासून माझ्या आजोबांचे मित्र असलेले आण्णा, सवाई मधे पहाटेपर्यंत गाणारे आण्णा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आण्णा, "मिले सूर मेरा तूम्हारा" या ओळी ऐकल्या की वाड्यातल्या कोणाच्यातरी एखादयाच्याच घरात असलेल्या टिव्ही समोर संपूर्ण वाडा क्षणात गोळा करणारे आण्णा, माझ्या शाळेत आण्णांचा "सवाई" असतो असे अभिमानाने आम्हा पोरांना गावभर सांगायची ईच्छा निर्माण करणारे आण्णा, २००८ साली देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या "भारतरत्न" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ते आण्णा, पाच दशकांपासून भारतीय शास्त्रीय गायनाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे आण्णा, जणू आताच अखेरची "भैरवी" घेउन पहूडलेले भासले. संगिताच्या तिर्थक्षेत्रातील विट्ठलच आज हरपला हे कटूसत्य तेव्हा मला सहन होत नव्हत !
आता आण्णां चा "तो" प्रवास सुरू झाला असेल. स्वर्गलोकी आज आपल्या मैफ़लीत आण्णांचे ते जुने सवंगडी भेटतील वसंतराव, पु.ल. यांसमवेत आता पून्हा ती मैफ़ल बसेल आणि तो आसावरी तोडी, मालकंस, पूरिया धनश्री गायला जाईल साक्षात "ईद्र" पण वाहवा.. क्या बात है। ची दाद देईल आज ते "तुकाराम महाराज" ती स्वर्गीय संत मंडळी खरी "अभंगवाणी" ऐकून तल्लीन होतील आणि साक्षात परमेश्वराला देखील आज खर्या "स्वर्गसुखाची" गोडी कळेल!
अश्या त्या पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण,भारतरत्न आश्या अनेक किताबांनी गौरविलेल्या रसींकाच्या तारा जुळवून खरा सूर गवसलेले माझे, तूमचे, आपले, सर्वांचे ते "भिमाण्णा" त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभेलच आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना असे स्वर्गीय सूर ऐकवण्यासाठी ते नवा आवाज घेऊन परत येतील कारण ते "स्वरभास्कर" आहेत भास्कराचा अस्त शक्य नाही फ़क्त ते परत येतील तोपर्यत आपण सारे त्यांच्या त्या सूरांमध्दे त्यांना सदैव स्मरत राहूयात. नव्हे, याला पर्य्रायच नाही ! फ़क्त आज तूमची माणस म्हणतायेत..

तंबोरयाच्या तूटल्या तारा, अभंग वाणी गोठून गेली,
शेहनाईची गुंगी अचानक, अश्रूंमध्दे भिजून गेली,
भारत भू चे रत्न हरविले, पुण्य भूमी कुंतीथ झाली.

निलेश वाळिंबे.

Tuesday, October 19, 2010

॥ किल्ले रसाळगड ॥

नमस्कार मंडळी,

आपण सगळ्यांनी स्वातंत्रदिन हा संह्याद्री च्या कुशीत जाउन मस्तपैकी साजरा करायचा असा आमच्या पोरांचा बेत ठरला आणि क्षणात समोर आला तो कोकणातला अत्यंत मनमोहक वातावरणात असणारा "रसाळगड" !२ दिवस रासाळगडा वरच काढायचे नक्की झाले. कात्या आणि आमोद ची हि तिसरी फेरी होती. मी त्यांना म्हणालो कि २ दिवसात  एकच किल्ला काय करायचा ? आपण अजून दुसरी कडे पण जाऊन येऊ ! तर दोघे म्हणाले, आधी इथे चल तर आणि मग ठरव जायच का अजून कुठे.
ठीक आहे म्हणत मग, १३ तारीख रात्री बरोब्बर ९ वा. सगळ्यांनी रात्रीचा डबा आणि १ दिवसाचा शिधा घेउन चांदणी चौकात जमायचे ठरले. आणि अगदी ठरल्याप्रमाणे आमचा इन्या बरोब्बर ९.३० ला (फ़क्त अर्धा तास उशीरा) ठरवीलेली गाडी घेउन त्याच्या घरून म्हणजेच लोहगाव येथून डेक्कन, मग कात्रज ला आमच्या राजेंना घेउन रात्री बरोब्बर (ठरल्याप्रमाणेच म्हणा हव तर) ११ वाजता चांदणी चौक येथे पोहचला.तोपर्यन्त बाकी मंडळींचे प्रवासात खायला घेतलेले डबे संपत आले होते.मग परत एकदा राहीलेल्या पाव भाजी चा फ़डशा पाडून श्रीगणेशस्तवन झाले आणि अखेर... स्वारी निघाली निसर्गात भरारी मारायला !
रात्री एकदा चहापानाचा थांबा सोडता मी सर्व प्रवास मनामद्धे रसाळगडाच्या कार्यक्रमाचे आराखडे आखत मस्त पडी ठोकली.
१४.ऑगस्ट २०१०
पहाटे ६ वा. जाग येते तो काय आमचे राजेच चक्क सारथी बनून आमचा रथ दौडवत होते गप्पा मारता मारता ५-१० मि. होतच होती आणि आमच्या भटकंतीचा पहीला आवडता आणि कधीही आला नाही, अस झालच नाही असा सर्वांना हवा हवासा वाटणारा तो क्षण आला आणि आमच्या सारथी ने आपल्या कौशल्यानी गाडीचा वेग (कचकन) कमी करत आम्हास आनंद वार्ता दिली... " पोराहो उतरा खाली गाडी पंक्चर झालीये !" त्या क्षणी सगळी टाळकी खाली उतरून गाडीचे चाक बद्लण्यासाठी सरसावली (हे फ़क्त नाटक असत) आणि तेव्हाच आमच्या ड्रायव्हर काकांनी आजून १ आनंदवार्ता दिली "ज्याक नाहीये राव गाडीत" त्याक्षणी सगळी टाळकी ड्रायव्हर काकांच्याकडे ’आ’ वासून बघतच राहीली.आता काय ? चला तर मग आमचे सामूहीक प्रयत्न सूरू झाले २-४ गाड्यांना हात दाखवून झाले पण ज्याक साठी कूठे आमचा "ज्याक" लागेना असेच प्रयत्न चालू असताना अचानक ड्रायव्हर काकांना ज्याक ’घावला’ ! मग काय एकच जल्लोश आणि १० मि. मधे आम्ही तेथून निघालो. लगेचच पुढ्च्या ३० मिनीटात आम्ही रसाळगडाच्या पायथा गाठला.
गाडी पायथ्याला लावून सगळे मावळे तयार झाले, सर्वांनाच किल्ल्याची ओढ लागली होती. आपापल्या स्याक खाद्यावर टाकून सर्वांनी किल्ल्याकडे कूच केले. सेनापती झाले आमचे विकास पोखरकर उर्फ़ कात्या (याचा शारीरीक विकास पण नावाप्रमाणे झालाय तसा) जाताना वाटेत अतीशय "अप्रतीम नैसर्गीक झरयातल्या अम्रुताची गोडी सर्वांची त्रुष्णा भागवून गेली".स्वर्गात विहार करावा तसे धूक्याच्या लाटांमधून आम्ही वाट काढत त्या निसर्गाची किमया डोळ्यात साठवत किल्ला सर करत होतो. मधेच आम्हाला आमच्या आजून येका मावळ्याची (जो सद्या पल्याड आहे ) अर्थात "सत्या" आठवण झाली आणि तडक आमची व्हिडीओ चित्रणाला सुरूवात झाली. बघता बघता थोड्याच वेळात प्रचंड घुक्यातून १ अत्यंत हिरव्यागार वातावरणातून आम्हाला स्वर्गाचे दार दिसू लागले तसा आमचा वेगदेखील वाढू लागला आणि पुढच्या दहाच मि. मदधे आम्हि सर्वजण गडाच्या माथ्यावर पोहचलो होतो. साधारणत: बरयाचश्या किल्ल्यानवरती ज्याप्रमाणे शक्ती चे प्रतीक आणि प्रभूरामच्या दूताचे मंदीर असते तसेच १ छोटेखानी पण, आपले वेगळेपण दाखवीणारे "मिशीवाल्या" हनूमानाचे मंदीर पाहून एका वेगळ्याच मारूतअवताराचे दर्शन घडले.आता सर्व मंडळी गडमाथ्यावर विसावली होती.

सगळ्या स्याक येका ओळीत लावून प्रथम आम्ही गडावरचे देवीचे मंदीर साफ़ करून येथेच तळ ठोकण्याचा निर्णय घेतला.आणि ठरल्याप्रमाणे कामाला लागलो. मंदीराची देखभाल गावातल्या लोकांकडून अत्यंत उत्तम रितीने ठेवली जात असल्याने आम्हाला फ़ारसे कष्ट पडले नाहीत. आणि अगदी पाचच मि. मधे सगळी स्वच्छता आटपून आम्ही पूढचा आणि महत्चाचा बेत आखायला सूरवात केली.
बघतो तो ड्रायव्हर काका येव्हान मस्त घोरायला देखील लागले होते. आता पोटातले कावळ्याच्या कलकलाट बाहेर ऎकू यायला लगला होता, तशी आमची तयारी जोरात सूरू झाली. आपच्या जावईबाप्पूंना म्हणजेच "प्रसाद डेंगळे (त्रुतीय)" उर्फ़ "वारे बत्तीवाले" याला त्याच्या सासरेबूवांनी (हे नको नको म्हणत असतानाही) दिलेली अत्यंत मोलाची अशी भेटवस्तू  अर्थात "बत्ती वजा स्टोव्ह " बाहेर काढला. आणि सेना कामाला लागली पाणि आणून.. पोहे भीजत घातले गेले, कांदा चीरताना पण का होईना पण मला रडवायची ही संधी देखील कोणी सोडली नाहीच, बटाटे,मिरच्या, मसाला, हळद, मोहरी, जीरं, मिठ, साखर सगळ बाहेर काढून मस्तपैकी "पोहे" बनवायला सुरवात केली. आता सगळ्यांच्या आशाळभूत नजरा पोह्याच्या पातेल्यावर खिळल्या होत्या. पोहे तयार होताच. गिरया आणि कात्याने चहाचे आधण ठेवले आणि स्थाई स्वरूपात असलेल्या दुधा्चे अर्थात मिल्क पावडरचे, ’..पानी का भी दुध’ करण्यात पटाईत लोकांनी दुध बनवीले.आणि मग आमचा "कांदे पोहे" कार्यक्रम पार पडला. (नव्हे नव्हे तो कांदे पोहे कार्यक्रम नव्हे बर !)
कूंद हवा, हिरवागार निसर्ग, मधेच पडणारी पावसाची सर, धूक्यात हरवलेलो आम्ही आणि गरमागरम पोह्या बरोबर कडक चहा पानाची अवीट गोडी याची मज्जा काही औरच होती ! आता वेळ आली होती ठराव पास करण्याची.आमच्यात कधीच कोणतेही मतभेद अथवा वाद न होता नेहमी "जो ठराव एकमताने पास होतो" अर्थात तोच झाला "वामकूक्षी" घेण्यावर सगळ्यांचे एकमत झाले. (आपणास संसदेत पगार वाढीकरीता आपल्या खाजदारांनी दाखीवलेल्या एकीचा प्रत्यय येथे आला असेल कदाचीत ) आणि मग काय, दिली मस्त ताणून.तास दोन तासाची (छोटिशी) विश्रांती झाल्यावर आम्ही गडावर फ़ेरफ़टका मारायला बाहेर पडलो.

इथल्या निसर्गाच वर्णन करायला खरतर माझ्याकडे शब्दच नाहीयेत. उंच आकाश, डोळ्यांसमोर अथांग पर्वतरांगा, त्या ऊत्तूंग पर्वतशिखरांना मिठी मारू पाहणारे धुरकट ढग, हिरवीगार मखमली शाल पांघरलेला निसर्ग, थंडगार वारयाची सळसळती लाट, मधूनच पडणारी पावसाची हलकीच पण मनं चिंब करणारी ती सर, क्षणात आपल्या धूक्याच्या जादूने संपूर्ण निसर्गाला जणू पांढरया चादरीखाली झाकून टाकणारी ती धूक्याची जादू,आपल्या राष्ट्रासाठी आपले "भगवे रक्त" वाहीलेल्या त्या थोरांच्या  पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमितून वावरताना आम्ही सर्वजण आता एका वेगळ्याच विश्वात पोहचलो होतो.भयाण शांततेत फ़क्त त्याचा आणि त्याचाच (निसर्गाचा) हक्क असलेल्या त्या वास्तूत "स्वर्गसूख स्वर्गसूख म्हणतात ते काय, याची प्रचिती आली". त्या निसर्गाची मैत्री आणि मनमूराद आनंद देणारा त्याचा सहवास अक्षरश: माझ मन सूखावून गेला ! रसाळगड सुमारगड आणि महिपतगड अशी हि ३ किल्ल्यांची रांग मुख्य सह्याद्रीच्या रांगे पासून थोडी तूटलेली आणि महाबळेश्वर च्या रांगेला समांतर धावताना फ़ारच विलोभनीय दिसत होती तर दूसरीकडे, चकदेव पर्वताच्या त्या उत्तूंग शिखरांना पाहताना मनात धस्स होत होते. किती पाहू किती घेऊ आणि किती साठवू अशी हपापलेली अवस्था झाली होती. मग काय क्षणात आपआपले छायाचित्रणाचे छंद जोपासत जितक जमेल तसे "क्लिक" पडायला सुरूवात झाली.
वरती गडावर पाण्याची अनेक तळी आहेत त्यात पोहण्याचा (खर तर डूंबण्याचा ) मोह आमच्या मावळ्यांना झाला नसता तर नवलच, मग काय कात्या आणि निल्या (आम्ही डझनानी निलेश नेले होते त्या पैके १) मस्तपैकी आपापल्या मालकीची आहेत असा गैरसमज करून वेगवेगळ्या तळ्यात उतरले आणि पाणी घाण करून बाहेर आले. आता  बघता बघता तीन्ही सांज होत आली.मावळतीला सूर्य महाराजांची आपल्या परतीच्या प्रवासाची सुरू झालेली लगबग आम्हाला जाणवायला लागली एका बूरूजासमीप जावून त्या अस्ताला जाणारया रवी ला आम्ही सर्वानी निरोप दिला आणि विलोभनीय अश्या सोनेरी, केशरी छटांनी रंगून गेलेल्या त्या वातावरणात पून्हा एकदा "कॅमेरे" सरसावले आता तिथेच आमच्या गप्पा रंगू लागल्या.मग गडांच्या ईतिहासाबद्दल, महाराजांबद्दल चर्चा रंगल्या. पूर्वामाहितीप्रमाणे या(रसाळ) गडावर एकूण १७ तोफ़ा असल्याच समजल होत त्यातील १६ तोफ़ा आम्ही भटकंती करताना शोधल्या होत्या मात्र १ तोफ़ काही आम्हाला सापडली नाही.बघता बघता अंघार पडायला लागला होता आता वेध लागले होते ते  अर्थात "गरमागरम खिचडी" चे ! चला रे पोराहो म्हणत आता आमची पुढची मोहिम सुरू झाली.
पून्हा मला रडविण्याची संधी न चूकविता कांदे हातात दिले गेले, कात्या तांदूळ धुवून घेतोय, एक निल्या पाणी आणतोय, दुसरा निल्या भांडी धुवायला गेलाय, वारे आपली बत्त्ती (दिवे) लावतायेत, राजेंच निरीक्षण आणि पुराव्यादाखल छायाचित्रण चालू आहे, इन्या साफ़सफ़ाई करत मदतनीसाच्या भूमिकेत आहे असा "माजघराचा रंगमंच" आत त्या मंदीराच्या पवित्र वास्तूत उभा राहीला होता आणि आमच्यावर नजर ठेवत होती ती साक्षात "आई" देवी झोलाई थोड्याच वेळात पूर्वतयारी होत आली आणि मुख्य आचारयाच्या भूमिकेची संधी पून्हा मला सोपविण्यात आली. एकीकडे फ़ोडणी टाकण्यात आली आणि मुख्य खिचडी शिजायला लागली आणि तोवर लगेच दुसरीकडे आमचा उद्याचा बेत शिजायला लागला. १५ मि. खिचडी तयार झाल्यावर नंतर परत वरून १ मस्त लसूण तडका मारून आम्ही ताव हाणला. आणि मग गप्पा मारत येकमेकांच्या चादरी पळवत माजघराचा सेट निघून शयनघर ऊभे झाले.दिवसभराच्या त्या निसर्गाने दिलेला आनंद आठवत आम्ही दिवसाचा निरोप घेतला.      
१५.ऑगस्ट २०१०.
सकाळीच ड्रायव्हर काका चहा पावडर(जी काल संपली होती) घेवून गडावर आले. बरोबर २ गावकरी होते झेंडावंदनासाठी तयारी सुरू झाली "ध्वजस्थंब" उभारला गेला गावातील काही तरूण, शाळेतली मूलं, आणि खास मुबई वरून आमचे मित्र प्रविण कदम "दुर्गभरारी" या संस्थेतर्फ़े गडावर आले. मोठ्या थाटामाटात गावातील सर्वात जेष्ठ "काशीद आजोबांच्या" वय वर्षे ७९ फ़क्त यांच्या हस्ते महाराज्यांच्या प्रतीमेच पुष्पहार घालून त्याच्याकरवे झेंडावंदन पार पडले. आणि "भारत माता की जय "च्या घोषणांनी सारा आसमंत दूमदूमला. मग सगळ्यांना जिलबी वाटण्यात आली सर्वांची न्याहरी आणि चहापान आटोपून गावतल्याच एका छोट्या मित्र "लव" समवेत आम्ही गडाच्या पूर्वेस साधारणत: २५० फ़ूट दरीत उतरून अत्यंत सूबक आणि सूंदर अश्या कपारीत कोरलेल्या पाण्याचं टाकं बघायला गेलो. प्रचंड सूरेख कलाकूसर आणि अडीअडचणीत भासणारया गरजेचा  विचार करून या बारमाही पाणी असलेल्या टाक्यापाशीच आम्हाला ती १७ वी तोफ़ देखील आढळली. ती बघून येताना वाटेतील स्म्रुती मनोरयातील भंगलेले अवषेश एकत्र रचून ईतिहासाचा हा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न करत, वाटेतील कचरा साफ़ करत/ऊचलत आम्ही गडाला मुजरा करून त्याचा निरोप घेतला.
परतीच्या प्रवासात नागराजांनी आपले दर्शन देत आम्हाला आडवे गेले जणू ते निरोपच द्यायला आले असावेत.अखंडीत गाणी तसेच कात्या, गिरया, निल्या ची स्व:निर्मीत अत्यंत श्रवणीय गाण्यांचा अस्वाद घेत वाटेत "सावीत्री नदीत पवीत्र स्नान" करून आम्ही महाबळेश्वर मार्गे निघालो.वाटेत नयनरम्य निसर्गाची साथ येथेही कायम होती मोठमोठ्या डोंगरावरून कोसळणारे पांढरेशूभ्र धबधबे आमचा भिजण्याचा मोह आवरू शकले नाहीत दोन्ही बाजूला गर्द वनराई आणि नागंमोडी वाट पार करत,
स्वातंत्रदीनाच्या या दिवशी आम्ही त्या, "शहीदांना सलाम करून थोडेपार किल्ल्यावर सामाजीक कार्य करून आपला हा देश खरोखरच "भ्रष्टाचार मूक्त" बनावा आणि त्यातला निसर्ग सर्वांना जपण्याची बुध्दी मिळावी अशी मनोमन प्रार्थना त्या "झोलाई देवी" च्या चरणी नतमस्तक होवून केली आणि पूढ्च्या ट्रेक ची योजना आखत सरतेशेवटी रात्रीचे जेवणदेखील सगळ्यांनी बाहेरच करून घरी जायचा बेत ठरला पण कात्याला नेहमीप्रमाणे आजही "कोंबद्यांच्या तंगद्याच" पहीजे होत्या त्यासाठी बरेच ढाबे पालथे घातले पण जागा काही मिळेना १५ ऑगस्ट चे औचित्त साधून बहूधा समस्त पूणेकर महीलांनी देखील आज स्वत:ला स्वयंपाकतून "स्वातंत्र" दिले होते अखेर बरयाच मेहनतीअंती आम्हाला शाकाहारी जेवण मिळाले आणि कात्यासकट सगळे तेच मस्त पिठलं भाकरी आणि खरड्यावर ताव मारून रात्री ११ वाजता पुनवडीस परतलो."              

भेटा अथवा लिहा (शक्यतो भेटाच)
निलेश गो. वाळिंबे.
९८२२८७७७६७